Sunday, June 15, 2014

नसरीन

मी पहिल्यांदा वसतिगृहात राहायला गेले आणि दुसर्‍याच दिवशी नसरीन गावाहून आली. कोकणात तिचं गाव होतं. तिला वसतिगृहात येऊन महिना होऊन गेला होता.

तिच्या वडिलांचा आणि भावांचा गावी काहीतरी व्यवसाय होता. पुण्यातल्या कुलकर्णी ब्रदर्स नावाच्या अप्पा बळवंत चौकातल्या दुकानाशी त्यांचे व्यवहार चालायचे. गावाहून तिने निरोप आणलेला होता तो द्यायला तिला अप्पा बळवंत चौकात जायचं होतं.

तिचं माझं जुजबी ओळखीचं बोलणं झालं. तिने विचारले, " येतेस का माझ्याबरोबर?" मलाही पुस्तकांची दुकाने असलेला हा चौक एकदा पाहायचाच होता. दोघी शोधत शोधत गेलो. तिच्याबरोबर मी पहिल्यांदा तिथे गेले आणि मग जातच राहिले. कितीतरी पुस्तकं मी रसिक साहित्य च्या लायब्ररीतून आणून वाचली. तो रस्ता माझा रोजचा पायाखालचा रस्ता झाला.या आमच्या हॉस्टेलमधे बरेच कडक नियम होते, रात्री आठनंतर बाहेर थांबता यायचं नाही.

मग रात्रीचं जेवता जेवता आणि नंतरही आतच गप्पा चालायच्या.

नसरीन सरकारी नोकरीत होती आणि नोकरी अंतर्गतच कुठलासा नऊ-दहा महिन्यांचा कोर्स करायला पुण्यात आली होती.

उंची बेताची, सडपातळ, निमगोरी, कमरेपर्यंत एक वेणी आणि कायम दोन्ही खांद्यांवरून घेतलेली , व्यवस्थित पिना लावलेली ओढणी, अशी ती असायची.

आमच्याकडे बहुभाषिक मुली असल्याने मुख्यत: बोलणे हिंदीतून चालायचे. पण नसरीन अगदी शुद्ध मराठी बोलू शकायची.

माझ्या वर्गात पाचवी ते सातवी एक मुसलमान मुलगी होती, तिचं आडनाव शेख, आम्ही तिला आडनावानेच हाक मारायचो.

त्यानंतर कुणीही मुस्लिम मैत्रिण मला नव्हती, एक नसरीन वगळता.

औरंगाबादमधे, मुसलमान भाजीवाल्या, दुकानदार, कंडक्टर असा मुसलमानांशी काहीतरी संबंध यायचा.

इथे अजिबातच येत नाही.

दोन जगं वेगळी झालेली.

नसरीनच्या मोठ्या भावांची, मला वाटते एका मोठ्या बहीणीचंही लग्न झालेलं होतं. तिला चार-पाच छोटी भाचरं होती आणि त्यांची तिला आठवण यायची. दोन अडीच महिन्यांनी ती जायची तेव्हा इथून त्यांच्यासाठी काय काय छोटी खेळणी घेऊन जायची. तिला त्या लहानग्यांमधे राहण्याची, त्यांचं करण्याची सवय होती.

हळू हळू मला तिनं पंखांखाली घेतलं.

मी उशीरापर्यंत जागायचे आणि उशीरा उठायचे.

ती नऊला जाताना मला उठवून जायची. लोळत लोळत मी तिचं आवरणं, ओढणीला व्यवस्थित पिन लावणं, बघायचे. नऊ नंतर आमच्याकडे गरम पाणी आंघोळीला मिळायचं नाही. कधी कधी ती माझ्यासाठी पाणी आणून ठेवी आणि ते गार होण्याआत आंघोळ उरकायला सांगून जाई. यात माझ्या आंघोळीच्या काळजीपेक्षाही मिळू शकणारं बादलीभर गरम पाणी का सोडायचं? हा तिचा हिशोब असे. :) कारण आमच्या या हॉस्टेलवाल्या दोन्ही काकवा अतिशय खडूस होत्या आणि अत्यंत हिशेबी!

कधीतरी कॉलेजमधून आल्यावर पाहिलं तर माझं टेबल आवरून ठेवलेलं असे. मी म्हणे, " असू दे गं, मला पसारा चालतो."

एके दिवशी खोलीतल्या लहानशा मोरीच्या टाईल्स चकाचक घासून ठेवलेल्या.

मला म्हणाली, "ओळख. काय वेगळं दिसतंय?"

मला इतका वेळ लागला! :)

तर असले काय काय उद्योग करायला तिला आवडायचं.

कितीदातरी तिचा हात पाहून मी भविष्य सांगितलं असेल. अशी एक दोन पुस्तकं वाचून मी त्यातलं काय काय सांगू शकायचे. :)

" तुला ना नसरीन जुळी मुलं होणारेत! इथल्या रेषा बघ." मी असं सांगितल्यावर तिचे चकाकलेले डोळे मी पाहिले आहेत.

म्हणायची, ’तुला बारशाला नक्की बोलवीन."

आमच्या जुन्या हॉस्टेलमधे महिनाभरासाठीच एक मुलगी आलेली, अनिता! (तिच्यावरही कधीतरी लिहिन.)

तर ही अनिता दुपारी मी कॉलेजला गेलेले असताना , माझ्या कॉटवर बसून केस विंचरायची, कारण माझा पलंग खिडकीजवळ.

चार दिवसांनी माझं डोकं खाजायला लागलं. काही सुचेना.

आई माझ्या केसांची खूप काळजी घ्यायची. शाळेत असतानाही आईने कधी माझ्या डोक्यात उवा होऊ दिल्या नाहीत. रोज फणीने विचंरायची. एखादी बया आली असेल उडून तर लगेच काढली जायची.

इथे काय झालं? मला कळेना.

मग नसरीनने फणीने माझे केस विचंरले, उवा काढल्या. ते लायसील घ्यायला माझ्याबरोबर आली.

अगदी मोठ्या बहीणीसारखं, वर मला म्हणाली की भाच्यांच्या केसांचं मीच बघते.

या घ्यायला येण्यावरून आठवलं.

हॉस्टेलला आल्यावर मी सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला सुरूवात केली, इथे ती कापडं धुणार कुठे? आणि वाळत कुठे घालणार? म्हणून.

ते मी औरंगाबादहून घेऊन यायची. आई मला आणून द्यायची. औषधांच्या दुकानात जाऊन दुकानदाराला ते मागायला मला खूपच लाज वाटायची.

एकदा इथे आणायची वेळ आली तेव्हा नसरीन माझ्याबरोबर आली आणि तिने घेऊन दिले.

वर मला ऎकवलं, "त्यात काय लाजायचंय?"

हळू हळू माझी भीड चेपली.

या जुन्या हॉस्टेलचं बांधकाम निघालं तेव्हा सुदैवानं आम्हा तिघीचौघींना जवळच एक चांगलं हॉस्टेल मिळालं.

इथे आमच्यावर बंधनं नव्हती. नाटक / सिनेमा पाहून मी बाराला परत येऊ शकायचे. डबाही बाहेरून लावता यायचा.

मग काय आम्ही सुटलोच! पण नसरीन नाही.

इथे भिंतीवरही काही लावलं तर चालायचं.

मग माझ्या भिंतीवर मी काही पोस्टर्स, काही कविता लावल्या. जी. एं च्या पत्रातलं एक वाक्य लिहिलं. NO buddy can go home once again , बाकी मुली खवळल्या. हे काय असलं लिहून ठेवलंय. आम्हांला वाचायला लागतंय वगैरे, नसरीन काही म्हणाली नाही, तिची भिंत आहे, तिला हवं ते करू देत.

मी त्याचा अर्थ काय आहे ते सांगितल्यावरही, मुलींना ते खटकायचंच.

नसरीनकडून मी नमाज पडायला शिकायचं ठरवलं आणि थोडंफार शिकलेही बहुदा.

एकही केस दिसू नये अशी काळजी घेऊन ओढणी कशी बांधायची ते आणि अजूनही थोडंफार काही तरी नियमांविषयी वगैरे असेल.

ती काही फार धार्मिक वगैरे नव्हती.

एकदा अशाच काहीतरी गप्पा चाललेल्या. मुलग्यांविषयी, लग्नाविषयी असेल.

मी नेहमी असायचे तशी जोशात कुठल्याही स्वरूपातील हुंडा घेणार्‍या मुलाशी मी लग्न करणार नाही, लग्नानंतर नाव बदलणार नाही, मला रजिस्टर मॅरेजच करायचंय. काय काय मुद्दे मांडून माझी बाजू पटवून देत असणार.

सगळ्यांसमोर नसरीन काही बोलली नाही.

नंतर मला एकटीला विचारलं, " तू बोलते आहेस हे खरंच की वाद घालण्यापुरतंच? "

मी म्हणाले, "खरंच."

" नाहीच मिळाला मनाजोगता मुलगा तर?"

" तर काय? नाही करणार लग्न."

" हे जमवता येईल?"

" हो. जमवीन. बघ तुला लग्नाला बोलवीन."

हे खरंच सोपं नव्हतं , हे आज कळतंय.

मग म्हणाली, "तुझ्या मनासारखं होऊ दे. विद्या, मलाही हुंडा घेणार्‍या, माझ्या नोकरीकडे पाहून लग्न करणार्‍या मुलाशी लग्न करायचं नाहीये. मलाही रजिस्टर लग्न करायला आवडेल, ते काही शक्य नाही. आपल्याला हवा तसा मुलगा कुठे शोधायचा? अम्मीने एक शोधलाय, हुंडा नकोय त्याला पण तो कधीतरी पितो, मला नाही चालायचं."

नसरीन कोर्स संपवून गावी गेली. त्यापूर्वी आठ दिवस तिची धाकटी बहीण आलेली, प्रचंड उत्साही आणि प्रचंड बडबडी!

तिने स्वत:चा स्वत: नवरा शोधलेला. नसरीन अजून लग्न करत नाही म्हणून थांबलेली......

.

नंतर नसरीनचं एक पत्र आलं होतं. देईन देईन म्हणता उत्तर द्यायचं राहून गेलं.

तिला लग्नाची पत्रिका पाठवली होती.

पुन्हा काहीच संपर्क नाही.

नसरीन, तुला शोधून काढायचंच म्हंटलं तर शोधू शकेनच.

पण जग तसं छोटं आहे. कधीतरी पुढ्यात उभी राहशील.

तेव्हा मला सांगशील की जुळ्या मुलांची नावं काय ठेवलीस ते!

त्यातल्या एकाचं मी ठेवणार होते! :)

 

 

3 comments:

 1. मस्त!

  > हळू हळू मला तिनं पंखांखाली घेतलं.
  :)

  ReplyDelete
 2. >>अशी एक दोन पुस्तकं वाचून मी त्यातलं काय काय सांगू शकायचे. :)
  भूतकाळ का बरं? ;-)

  - सचिन

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...