Wednesday, June 25, 2014

आजी

आजी,
गेले दोन दिवस मी तुझं लिखाण वाचते आहे. तू लिहिलेला चारपाचशे पानांचा गठ्ठा तू गेल्यावर मी माझ्याकडे घेऊन आले. अधेमधे, थोडंथोडं वाचत होते. या दोनतीन दिवसात मात्र ते बरंचसं वाचून काढलं. या तुझ्या लिखाणावरची सर्वात आधीची तारीख २००५ सालातली दिसते आहे. शेवटच्या दोनतीन वर्षात एवढं सगळं लिहिलंयस. तुझं बारीक बारीक अक्षर, लिहिताना कागदावरच्या जागेचा पुरेपूर उपयोग करुन घेण्याची तुझी सवय हे सगळं माझ्या खूप खूप ओळखीचं आहे. वाचतानाही हे सगळं तुझ्या आवाजातच माझ्यापर्यंत पोचतं आहे. अगदी तुझ्या हावभावांसहित. तुझ्या बालपणीच्या, शाळेच्या, लग्नाच्या, वाफेगावच्या लोकांच्या, एवढंच नाही तर तुझ्यापर्यंत कुणाकुणाकडून तुझ्यापर्यंत पोचलेल्या तुझ्या जन्माआधीच्याही गोष्टी यात  आहेत. शंभरेक वर्षांचा कालपट माझ्यासमोर तुकड्यातुकड्याने उलगडतो आहे.
शाळकरी वयातली तू! आई-वडील, काका-काकू, आजी, सोवळी जिजाआत्या, भावंडं, चुलत भावंडं असं मोठं कुटुंब. तुझी आजी म्हणजे घरातलं सर्वात महत्वाचं माणूस. तिची नातवंडांवरची माया, पण त्याचवेळी ती तुझ्या आईला करीत असलेला सासुरवास, तुझी काकू आणि आई यांच्यात ती करत असलेला भेदभाव, तुझ्या आजोळच्या- ग्वाल्हेर, ब्रह्मावर्ताच्या- गोष्टी... आणि तुझ्या सख्ख्या मैत्रिणीबरोबरच्या- शरयू (बावडेकरच ना गं? आपण एकदा गेलो होतो त्यांच्याकडे) बरोबरच्या आठवणी वाचताना तर पाणीच आलं डोळ्यातून. तुम्ही शाळेच्या वाटेवरच्या कबरस्तानातून चिंचा गोळा करयचात आणि मारुतीच्या देवळात बसून खायचात :) भांडणं झाली की तू छोट्या माईच्या हाती शरयूला पाटीवर चिठ्ठी पाठवायचीस आणि तुमची भांडणं मिटवायचीस :) शाळेत जायच्या वाटेवर एकदा तू तुला त्रास देणार्‍या एका मुलाला बेदम मारलं होतंस. हे गुपित फक्त शरयूलाच सांगितलंस कारण घरी सांगितलं तर शाळाच बंद होण्याची धास्ती! तू शाळेत अगदी हुशार विद्यार्थिनी होतीस. सगळ्या विषयात पहिली येऊन महिन्याला बारा आणे शिष्यवृत्ती मिळवणारी! तुला खूप शिकायचं होतं. डॉक्टर व्हायचं होतं. तुझे काका सोलापुरातले सुविख्यात सर्जन. त्यांचा तुला पाठिंबा होता. त्यामुळेच तुला हायस्कूलचे शिक्षण घेता आले. तू तिथल्या सेवासदनात शिकत होतीस. घरी मात्र तुझ्या लग्नाचं बघत होते. तुझ्या आजीची शेवटची इच्छाच मुळी ’सुमतीचं लग्न वर्षाच्या आत करा’ अशी. त्यापुढे काकांचंही काही चाललं नाही. तुला शिकता आलं असतं तर तू सहजच डॉक्टर होऊ शकली असतीस. ती खंत तू तुझ्या संसाराच्या रामरगाड्यातून वेळ काढून होमिओपॅथीचा कोर्स करून पूर्ण केलीस का? बारा बाळंतपणं, आठ मुलं, त्यांची शिक्षणं, लग्नं, दुखणीखुपणी, पै-पाहुणे, दिरांच्या संसारांच्या जबाबदार्‍या, या सगळ्यातून वेळ काढलास तरी कधी? वाफेगावातले लोक किती विश्वासाने तुझ्याकडून औषध घेऊन जायचे. घरच्या गुरांच्या आजारपणात गुरांचे डॉक्टर वाफेगावला येऊ शकले नाहीत तेव्हा गुरांनाही होमिओपॅथीच्या गोळ्यांचा मोठा डोस देऊन बरं करणं म्हणजे मात्र कमाल होती हं :)
तू लिहिलंयस, ’आपल्याला शिकता आलं नाही तर किमान नवरा तरी खूप शिकलेला हवा, आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यानं पाच मिंटात द्यावं असं वाटायचं. पण तेही नाही घडलं.’ पण पुण्यात रहाता यावं ही इच्छा मात्र पूर्ण झाली.  (आजी पुण्यातून प्रसिद्ध होणारं ’आनंद’ मासिक वाचायची. त्यात येणार्‍या पुण्याच्या, तिथल्या सांस्कृतिक वातावरणाच्या माहितीमुळे तिची इच्छा होती की लग्नानंतर पुण्यात रहायला मिळावं)
माहेरी लाडाकोडात वाढलेली, खूप शिकायचं स्वप्न बघणारी तू, शिक्षण अर्धवट टाकून वाफेगावसारख्या आडगावी, भल्या थोरल्या वाड्यात, दुसरेपणाची बायको म्हणून आलीस तेव्हा काय वाटलं असेल तुला? लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी, सगळ्या बायका आपापल्या नवर्‍याच्या उष्ट्या ताटात जेवताहेत हे पाहिल्यावर दुसर्‍या दिवसापासून तू पुरुषांची जेवणं झाल्याबरोब्बर चपळाईने सगळ्यांची ताटं घासून टाकलीस आणि पुन्हा कधीही नवर्‍याच्या उष्ट्या ताटात जेवली नाहीस. मला तो प्रसंग वाचताना हसू आलं, पण खरंच, तुझ्यासारख्या बायकांसाठी किती कसरतीचं होतं ना त्या काळात स्वाभिमानाने जगणं? आजोबा सरळमार्गी, समजुतदार, भले होते, ही एक मोठीच जमेची बाब. नाहीतर तिथेही तुला लढत राहावं लागलं असतं. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने तुम्ही कुठेकुठे फिरलात आणि मग पुण्यात येऊन स्थिरावलात. तुझं ’आनंद’ मासिकातलं पुणं तुला मिळालं. छान वाटलं असेल ना तेव्हा? पुण्यात मुला-मुलींची शिक्षणं होऊन थोडी स्थिरता आल्यावर तुम्ही दोघांनी परत वाफेगावचं घर उघडलंत. पुढे कधीतरी बाबा तिथे आले, मग लग्नानंतर आई, मग मी, अभिजीत. माझी शाळा सुरु होईपर्यंतचा वाफेगावातला काळ अगदी धूसर आठवतो मला. पुढे आम्ही पंढरपूरला गेलो आणि मग वाफेगाव सुट्ट्यांपुरतं राहिलं. त्या घरातली तू जेव्हा डोळ्यासमोर येतेस, तेव्हा कधी चुलीवर दूध आटवत असतेस, म्हशीचं आंबोण करत असतेस, नऊवारी साडीच्या निर्‍या करुन ती गोलगोल फिरवून, तिची गाठ मारत असतेस, संध्याकाळी ओटीवर बसून सातच्या बातम्या ऐकत असतेस, मथणीपाशी उभं राहून ताक करत असतेस, आणि खूपदा रात्रीच्या वेळी उशाला बारीक कंदील ठेवून वाचता वाचता झोपी गेलेली असतेस. तुला कधी पोथ्या पुराणं वाचताना पाहिलं नाही. पण रोजच्या जगण्याशी जोडून घेणारं सगळं तुला वाचायला आवडायचं. वाफेगावच्या घरात दिवाळी अंकांच्या, मासिकांच्या, पुस्तकांच्या थप्प्याच असायच्या. रिकामा वेळ मिळाला की तू वाचत असायचीस. तुला कमी झोप पुरायची. मग रात्री जेव्हा कधी जाग यायची तेव्हा उशाला ठेवलेला कंदील मोठा करून तू वाचत बसायचीस. पुस्तकांएवढीच तुला माणसंही हवीशी असायची. वाफेगावच्या घरात सतत माणसांचा राबता असे. शेतातल्या कामांच्या, गाईगुरांच्या निमित्ताने कोणी येत, कोणी ताक, कोरड्यास मागायला येत, कोणाला औषध हवं असे, कोणी उगाचच टाईमपासला येत. तुझी तासातासाला चहाची फेरी व्हायची. जरा थांबलं की एखादा कपभर च्या त्यांनाही मिळे. रात्रीच्या वेळी तर झोपायला येणार्‍या मंडळींनी ओसरी भरून जाई.
मला तू सांगायचीस त्या गोष्टी आठवतात. तुझ्या गोष्टी म्हणजे बाबा-काका-आत्यांच्या लहानपणाचे मजेमजेचे प्रसंग, तुमच्या पुण्यातल्या घरी येणारे सगळे विचित्र पाहुणे, त्यांना तुम्ही ठेवलेली गंमतीदार नावं, चाळीतल्या गमती, तुझ्या लहानपणच्या आठवणी. ते सगळे प्रसंग पण तू केवढी खुलवून खुलवून सांगायचीस. पुन्हा प्रत्येकाच्या हुबेहूब नकलाही.
एका सुट्टीत आम्ही वाफेगावला आलो होतो आणि मला, शामूला आणि नाश्कूला तिथल्या मुलांसारखी फडक्यात भाकरी-भाजी बांधून शेतात न्यायची होती. तू खूप हसली होतीस पण आम्हाला तिघांना वांग्याचं भरीत आणि भाकरी फडक्यात बांधून दिली होतीस. आणि आपल्या घरच्या मांजरांची गंमत? मांजराच्या डोक्यावर तुपाचा थेंब टाकायचा. त्याला तुपाचा वास कुठून येतो ते कळतच नसे. मग ते आपल्याच डोक्यावर आहे हे कळल्यावर ते आपला पंजा डोक्यावरुन फिरवून पंजा चाटत बसे. आणि आपण सगळे त्याच्या पंजा चाटण्याची नक्कल करत हसत बसायचो.
आम्ही मोठे होत गेलो तसं आमचं वाफेगावला येणंही कमी होत गेलं. कॉलेजात असताना मी एकदा वाफेगावला आले होते. तेव्हा वाफेगावच्या बायकांबद्दल तू मला केवढं काय काय सांगितलं होतंस. समोरची रखमा, शकी-उशी, भामा, गोदाबाई, द्वारका, प्रत्येकीची वेगळी कथा. मी ते ऐकून हडबडून गेले होते. या सोसणार्‍या बायकांच्या कहाण्या तुझ्यापर्यंत पोचत होत्या कारण त्या बायकांना तुझ्याबद्दल विश्वास होता. तू त्यांच्या व्यथा ऐकून घ्यायचीस, जमेल तसा त्यांना मदतीचा हात द्यायचीस. रखमाला कित्येकदा घरी जेवायला द्यायचे नाहीत. ती आपल्या ओसरीवर झोपायला यायची. तू, आईनं कधी तिला उपाशीपोटी झोपू दिलं नाही.  विमलबाई तिच्या छोट्या मुलाला अफूची गोळी देऊन कामाला जायची, तिला तू परोपरीचं सांगून, मुलासाठी दुधाची सोय करून ते बंद करायला लावलं होतंस. हं, पण याचबरोबर तिथल्या तरूण मुलामुलींच्या मुक्त जगण्याच्या गोष्टीही तू सांगितल्या होत्यास....भन्नाट होत्या त्या :)
        धार्मिक रीतीरिवाज, मासिक पाळी अशा बाबतीत तर तुझे विचार बंडखोरच होते. तरूण मुलींनी उपासतापास अजिबात करु नयेत चांगलं खाऊनपिऊन असावं असं तू कितीजणींना सांगायचीस.  आजोबांच्या वर्षश्राद्धालाही कसले विधी वगैरे न करता एका विद्यार्थ्याला तू मदत करायचीस.
  आता तू नाहीस आणि वाफेगावचाही संबंध संपल्यातच जमा. तीन वर्षांपूर्वी तिथे गेले होते तेव्हा आपल्या घराच्या दगडमातीच्या ढिगार्‍यातून फिरून आले. मागच्या दारातला शेवगा आणि सायली सोडता काहीच शिल्लक नाही तिथे.
एकदा तू विचारलं होतंस नवरा कसा हवाय तुला? तेव्हा लग्नाबिग्नाचं काही डोक्यात नव्हतं माझ्या. मी काहीतरी उत्तर दिलं असेल. तू म्हणालीस, ’शिक्षण वगैरे काय गं, ते असणारच. आपल्याकडे लग्नाची मुलं बर्‍यापैकी सुस्थिरही असतात. पण हे थोडं कमीजास्त असलं तरी चालेल. तो माणूस म्हणून कसा आहे त्याची पारख व्हायला हवी, तो निर्व्यसनी आणि निरोगी असायला असावा हे मला फार महत्वाचं वाटतं.’
आमच्या लग्नाला नाही येऊ शकलीस तू. लग्नाआधी दहा दिवस वाफेगावला पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि मग हिंडणंफिरणंच थांबलं तुझं. हट्टी होतीस हं तू. आधीच आली असतीस पळसदेवला तर हे टळलंही असतं कदाचित. पण ऐकलं नाहीस. शेवटची तब्बल नऊ वर्षे तुला तशी काढावी लागली. पुस्तकं तर शेवटपर्यंत होतीच तुझ्याबरोबर. नंतर या लिखाणानंही तुला खूप सोबत केली असणार. तुझ्यासारख्या बाईसाठी ते परावलंबी आयुष्य जगणं किती जड असणार त्याची कल्पना आहे मला. तुझ्या लिखाणातूनही ते डोकावतंय अधूनमधून. त्याबरोबरच आतापर्य़ंत ऐकलेल्या अनेक कौटुंबिक गोष्टींमागची तुझी भूमिका, तुझी बाजूही कळते आहे. या सगळ्यातून माझ्या मनातली तुझी प्रतिमा अधिकच उजळत जाते आहे.
        या लिखाणाच्या माध्यमातून तू अजूनही माझ्याजवळ आहेस हे खूप छान आहे..

-अश्विनी

4 comments:

 1. अश्विनी,
  छान! लिहिताना तूही रमून गेल्याचं जाणवतं आहे.

  आजीचं आधुनिक असणं चांगलं अधोरेखित झालं आहे.
  त्या काळात तर ते किती दुर्मिळ असणार!

  ReplyDelete
 2. छान! आजींचं आत्मकथन वाचायला आवडेल.
  >>या लिखाणाच्या माध्यमातून तू अजूनही माझ्याजवळ आहेस हे खूप छान आहे..
  मस्तच!

  - सचिन

  ReplyDelete
 3. अश्विनी छान लिहीलं आहेस. आजीचं व्यक्तीमत्व डोळ्यासमोर उभं राहिलं.

  ReplyDelete
 4. वा!

  > चारपाचशे पानांचा गठ्ठा
  > बालपणीच्या, शाळेच्या, लग्नाच्या, वाफेगावच्या लोकांच्या, एवढंच नाही तर तुझ्यापर्यंत कुणाकुणाकडून तुझ्यापर्यंत पोचलेल्या तुझ्या जन्माआधीच्याही गोष्टी
  > शंभरेक वर्षांचा कालपट
  भारीच!

  ही योजना ठरली म्हणून त्यानिमित्ताने आम्हांलाही आता आजीविषयी कळतंय.

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...