Saturday, June 28, 2014

माझ्या सासूबाई

माझ्या सासूबाई - सुमती भिडे. आधीच्या सुधा आठवले.त्यांनी  मला कधीच प्रत्यक्ष पाहिलं नाही. कारण त्या आमच्या लग्नाच्या आधी काही वर्ष दृष्टीहीन झाल्या होत्या.
.........

लग्नाच्याबाबतीत निर्णय घेताना माझ्या मनावर ताण आला.
त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. हे गृहित धरुन मगच "हो" असा निर्णय घ्यायचा आणि एकदा "हो" असा निर्णय घेतल्यावर मग त्याचा व्यवस्थित स्विकार करायचा हे मी मला सांगत होते.

हो असं ठरलं.

माझ्या लग्नाच्या सर्व खरेदी साठी त्या आमच्याबरोबर आल्या. प्रत्येक खरेदीच्यावेळी त्यांचं असं मत होतं. अगदी डिझाईन, रंग इ... बाबत. त्यांच्या दोघी बहिणींच्या मदतीने त्यांनी संपूर्ण कार्य पार पाडलं.

आता माझा खरा कसोटीचा काळ चालू झाला.
मला स्वयंपाकाची सवय नव्हती. भाज्या फारशा येत नव्हत्या. पण आता ही आपलीच जबाबदारी आहे असं होतं त्यामुळे ताण होता. मी नोकरी करत होते. सकाळी नऊ वाजता जायचे ते संध्याकाळी सहा वाजता यायचे.

लग्नानंतर नोकरी चालू झाली. पहिल्या दिवशी सकाळचं करुन कामावर गेले. संध्याकाळी घरी आले तर सगळा स्वयंपाक तयार. अगदी कुकर सुध्दा. मला म्हणाल्या अगं माझा वेळ जात नाही कंटाळा येतो. मी करत जाईन संध्याकाळचं. तूही दमतेस. मला फक्त पोळ्या नाही जमत. लाटताना पोळपाट कुठं संपतो त्याचा अंदाज नाही येत. पोळ्या बाई करतील, बाकी मी करेन. त्यांनी ते ठरवूनच टाकलं होतं. 

हळूहळू जरा आमची एकमेकींशी ओळख झाल्यावर मला त्यांनी वेगवेगळ्या भाज्या शिकवायला सुरुवात केली. भाजी शिकून झाली की मला ती लिहून ठेवायला सांगायच्या. प्रमाण सुध्दा अचूक असायचं. त्यांचं माहेर नागपूरचं असल्याने पदार्थ पण चमचमीत असायचे. मला म्हणायच्या सगळ्या गोष्टी तू एकदा शिकून घे. मग आवडल्या तर कर. मग माझी एक पाककृतीची वही तयार झाली.
घराची स्वच्छता, आवराआवरी त्याच करायच्या. किराणा सामान संपत आलं की त्यांनी मनात यादी केलेलीच असायची. ती फक्त कागदावर उतरवायची मदत मी करायचे.

दिवाळी मधे मला म्हणाल्या आनंदला तू तेल लाव आणि तुला मी लावते. कदाचित स्पर्शातून त्यांना मला पाहिचं असेल.
दिवाळीत फराळाच्या गोष्टी करण्यासाठी त्यांची मदत होणार नव्हती. त्यामुळे त्यांनी मला स्पष्टपणे सांगून टाकलं, काहीही घरी करण्यात कष्ट करु नकोस. सरळ चितळ्यांकडून विकत आण. मला एकदम हलकच वाटलं.

उन्हाळाच्या सुट्टीत मला म्हणाल्या साखर आंब्याच्या कै-या आणून दे. मी त्यांना सामान आणून दिलं. एक दिवस कामावरुन घरी आले तर साखर आंबा तय्यार. असच लोणचं पण घातलं. 

आमची ओळख अजून विस्तारली. जवळीक वाढली. तशी त्यांनी मग मला संसाराच्या व्यवस्थापनाबाबत टीप्स द्यायला सुरुवात केली. गुंतवणूक, बचत याबाबत सल्ला दिला. मला माझं स्वत:च स्वतंत्र बचत खातं उघडायाल सांगितलं. म्हणाल्या तुझे तू स्वतंत्रपणे पैसे ह्यामधे ठेव. घरात खर्च करुन टाकू नकोस.

घरी एकटं बसून त्यांना कंटाळा यायचा. मग कधी कधी गावात बहिणीकडे जायच्या. एकट्य़ा जायच्या. मी सोडू का असं विचारल्यावर म्हणायच्या कशाला तुझा वेळ घालवते मला माहिती आहे रस्ता. एक दिवस मी त्यांच्या बरोबर गेले. तेव्हा बघितलं त्या सतत रिक्षावाल्यांशी बोलत होत्या. कुठल्या भागात आलो आहोत हे तपासत होत्या. शेवटपर्यंत त्यांनी अचूक ठिकाणं सांगितली. नगरला सुध्दा मोठ्या मुलाकडे त्या कधीकधी एकट्य़ाने प्रवास करुन जायच्या. 

टि व्ही वरच्या सिरीयल, बातम्या, इतर कार्यक्रम त्या आवडीने बघायच्या. हो बघायच्याच. मी घरी आले की कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यायच्या. 

त्यांना आता नातवंड येण्याकडे डोळे लागले होते. माझ्यावर त्यांच बारीक लक्ष असायचं. प्रत्येक महिन्यात पाळी येऊन गेली का ते विचारायच्या. मग हळूहळू कळलं की मला औषध - उपचाराची गरज आहे. दवाखान्याच्या वा-या, मनावरचा ताण हे सगळं सुरु झालं. त्यांना ते जाणवत होतं. एक दिवस मला म्हणाल्या, एक लक्षात घे मुलं झाली म्हणजे आकाशाला हात टेकले असं अजिबात नाही. मुलं झाली की संसार परिपूर्ण असं नसतं. शेवटी माणुसकी महत्वाची.
त्यानंतर त्यांनी मला कधीच त्याबाबतीत विचारलं नाही.
.............

त्यांचा संसार खूप खडतर झाला.
आनंदच्या जन्मानंतर डायबेटिस झाला. पण संसारच्या जबाबदारीमुळे कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि त्याचा परिणाम दृष्टी जाण्यापर्यंत झाला.

नव-याच्या व एका मुलाच्या अकाली निधनाने खचून न जाता त्यांनी त्यांच्या जबाबदा-या खंबीरपणे पार पाडल्या.

"त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. " हे माझं मत पूर्ण चुकीचं ठरलं. मी मात्र छोट्य़ा छोट्य़ा गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून रहात असे.

खूप स्वाभिमानाने त्या जगल्या. त्यांना कोणाला सांभाळायची वेळ येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. अचानक एक दिवस रात्री पाठ दुखीचा त्रास सुरु झाला आणि ह्र्दय विकाराच्या झटक्याने त्या सकाळी आम्हाला कायमच्या सोडून गेल्या.
.......

त्यांनी शिकवलेल्या भाज्या मी करते. स्वयंपाघरातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाळते. त्या आजही माझ्याबरोबर आहेतच.

6 comments:

  1. छान!

    >>"त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. " हे माझं मत पूर्ण चुकीचं ठरलं. मी मात्र छोट्य़ा छोट्य़ा गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून रहात असे.

    :)किती छान!

    ReplyDelete
  2. >> एक लक्षात घे मुलं झाली म्हणजे आकाशाला हात टेकले असं अजिबात नाही. मुलं झाली की संसार परिपूर्ण असं नसतं. शेवटी माणुसकी महत्वाची. त्यानंतर त्यांनी मला कधीच त्याबाबतीत विचारलं नाही.

    खूप आवडलं

    ReplyDelete
  3. खूप सुंदर.

    अशी सासू मिळायला भाग्य लागतं :)

    ReplyDelete
  4. मस्त!

    > खूप स्वाभिमानाने त्या जगल्या.
    वाचताना जाणवतंय, छानच!

    ReplyDelete
  5. इतकी छान, समजूतदार मते असणारी व्यक्ती दृष्टीहीन कशी असू शकेल? त्या तर सगळ्यात जास्त ’डोळस’पणे जगल्या.

    - सचिन

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...