Saturday, March 8, 2014

तुमचं स्वातंत्र्य तुम्हांला जपता येवो


स्वत:चं स्वातंत्र्य जपायचं. त्याविषयी काटेकोर, आग्रही राहायचं. सोपं नसतं.
स्वत:चं एक स्वतंत्र बेट करून नाहीच राहता येत.
तसं एक बेट असतंच म्हणा, प्रत्येकाच्या मनात.
तिथे कुठलं स्वातंत्र्य? तिथे तर आपली हुकूमशाहीच.
आपणच वसवलेलं गाव ते!
माझं गाव तर अस्ताव्यस्तच!
हवं तसं पसरलेलं.
स्वत:ला भेटायला इतरांना किती आवडतं कोण जाणे!
मला खूप आवडतं. दरवे्ळी एकटेपण म्हणाजे एकाकीपण नसतं.
स्वत:बरोबर मजा येते.

विषय चाललाय तो बाहेरच्या जगात स्वातंत्र्य जपण्याचा!
आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे की लोक सहजच बाई म्हणून गृहित धरतात, मदत करायला येतात, डावलतात.
अशावेळी बरेचदा, एकतर दुर्लक्ष करणं शक्य असतं किंवा तिथल्या तिथे बोलून मोकळं होता येतं.
किंवा आवडलं नाही तरी सोडून देता येतं.
अवघड आहे ते नात्यात स्वातंत्र्य जपणं.
त्यांच्या प्रेमळपणाचं, त्यांच्या काळजीचं काय करायचं?
मी बाई असल्याने मी कुठेही असले तरी कळावं म्हणून मोबाईल हवाच, म्हणणारांचं काय करायचं?
ते आपले आप्त नव्हेतच का?
भावनांच्या बाबतीत इतकी गुंतागुंत असते.
सरळ तोडून टाकायचं म्हणजे कोरडेपणा!
आपल्याला न पटणार्‍या गोष्टी स्वीकारून नात्यातला ओलावा टिकवायचा?
शक्य होत नाही. मग आपलं असणं / आपण ’आपण’ असणं काय ते!
निजखूणच पुसायची?
मग कधी समजावून सांगायचं, कधी हट्टीपणा करायचा, कधी थोडी मुरड घालायची, असं करावं लागतं.

अगदी जवळच्या नात्यात स्वातंत्र्य कसं जपायचं?
तिथे तर हे ही कळत जातं की आपण वाटतो तितके सुसंगत नाही.
कधी कधी विसंबायचं असतं, कधी अधिकाराने आपणच निर्णय घेण्याचा हक्क घेतो, कधी सोपवावंसं होतं.
अशावेळी स्वातंत्र्याचं काय करायचं? त्यांच्याही आणि आपल्याही?
अशावेळी काटेकोर नियम नाहीच लावायचे.
तरी
स्वत्व गमवायचं नाही, स्वातंत्र्यही नाहीच.

जवळची आणि दूरचीही माणसं तर हवीतच.

तुमचं स्वातंत्र्य तुम्हांला जपता येवो, त्या मार्गावर सोबत लाभो, भावनांना वजा करण्याची वेळ न येवो.
शुभेच्छा!

आणि स्वत:च्या आतल्या जगात, तिथे स्वतंत्र असण्याची गरज आहेच हं!
गाभ्याशी स्वातंत्र्य असल्याशिवाय ते बाहेर कसं येणार?
ते लाभो.
शुभेच्छा!

5 comments:

  1. >>स्वत:बरोबर मजा येते.
    मस्त! आणि तुलाही शुभेच्छा!

    - सचिन

    ReplyDelete
  2. तुमचं स्वातंत्र्य तुम्हांला जपता येवो..
    आणि इतरांचंही....

    ReplyDelete
  3. आवडलं.
    >>अगदी जवळच्या नात्यात स्वातंत्र्य कसं जपायचं? तिथे तर हे ही कळत जातं की आपण वाटतो तितके सुसंगत नाही.
    >>अवघड आहे ते नात्यात स्वातंत्र्य जपणं. त्यांच्या प्रेमळपणाचं, त्यांच्या काळजीचं काय करायचं?
    hmm..

    ReplyDelete
  4. छान !
    भावना आणि स्वातंत्र्य यातलं दोन्ही एकाच वेळी क्वचित जपता येतं..

    ReplyDelete
  5. >>स्वत्व गमवायचं नाही, स्वातंत्र्यही नाहीच.
    https://www.loksatta.com/lifestyle-news/pregnancy-timetable-japan-1710362/

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...