Thursday, June 26, 2014

शकुंतलामावशी

   आम्ही वाडयातून आमच्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो तेव्हा मी चार पाच वर्षांची असेन आणि माझा भाऊ वर्षादीड वर्षांचा.आईची बाळंतपणाची रजा जसजशी संपत आली तसा आम्हाला संभाळायचा प्रश्न पुढे उभा राहीला. कोणीतरी संभाळायला ठेऊ या म्हणून शोध सुरु झाला.कारण घरात आजोबा होते पण माझी आजी पॅरेलिसीसने अंथरुणात होती.आई बाबांना दोघांनाही नोकरी करणे भाग होते.कीर्लोस्करांच्या बंगल्यावर बाबा तेव्हा साहेबांचे पी.ए. म्हणून काम बघत होते.तेथे स्वयंपाकाला असणारा बाळू सोलापूरचा रहाणारा.त्याच्या ओळखीची एक बाई.नव-याने सोडून दिलेली.....शकुंतला नाव तिचं.तिला आमच्याकडे रहायला ठेवा असा बाळूचा आग्रह.तिची पण सोय होईल आणि मुलांनाही संभाळेल.अतिशय प्रामाणिक आहे.त्याच्यावर विश्वास ठेवून बाबांनी तिला पुण्याला आमच्याकडे बोलावून घेतले.
   शकुंतला बाई.काय म्हणायचे त्यांना ?  कोणत्या गावाच्या ? कोणाच्या कोण...कोणावर  तरी विश्वास ठेवून आमच्या घराचा आसरा मिळेल अश्या आशेने आमच्याकडे आल्या आणि आमच्यातल्याच एक झाल्या. एखादी आजी काय करेल इतक्या प्रेमाने तिने आम्हा दोघांना लहानाचे मोठे केलं.अतिशय शिस्तीच्या,प्रसंगी धाक दाखवून पण अतिशय प्रेमळ.आमच्या झोपायच्या,खाण्यापिण्याच्या वेळा अगदी चोख सांभाळणारी.तिच्या हातच्या पातळ तव्यावरच्या भाक-या आणि झणझणीत पिठलं ......त्याची चव आजूनही जिभेवर आहे.मला एकदा हुक्की आली.मला स्वयंपाक शिकायचा म्हणून...तिने मला पहील्यांदा भाकरी शिकवली तो दिवस आजही मनात ताजा आहे.पहील्या पहील्यांदा माझ्या हातून खूपच जाड भाकरी थापली जायची.त्याला चिरा पडायच्या,फुगायची पण नाही.पण तेथून ती भाकरी पातळ जमेपर्यंतचे तिचे शिकवणे आजही आठवते.जेव्हा जेव्हा आजही मी भाकरी करते तेव्हा तेव्हा एकही दिवस असा जात नाही की मावशींची आठवण येत नाही. रावण पिठलं...हे त्यांनीच मला शिकवलं .म्हणाल्या असा ठसका लागायला हवा तेव्हा जमलं खरं पिठलं.त्यांची वाक्य आजही कानात आहेत.
    आमची आजारपण,आमचे धडपडणे....एक ना अनेक उद्योग.आईने डोळे झाकून त्यांच्यावर सोपवून नोकरी केली.तेव्हा रजाही सारख्या मिळायच्या नाहीत.आणि रजा घ्यायची गरजही कधी वाटली नाही.इतक्या प्रामाणिक,विश्वासू आणि प्रेमळ होत्या त्या. स्वत:ची कामे स्वत: करणार आणि दुस-यासाठीही झिजणार.आमच्या घरातच त्यांनी त्यांचं म्हातारपण घालवलं .त्या ऎंशी वर्षाच्या असतील त्यांना गुदघेदुखीचा त्रास अनेक वर्षे होता.आणि शेवटी शेवटी तर त्यांना चालणेही अवघड होऊन बसलं.जमीनीवर खुरडत खुरडत चालायच्या त्यातच म्हातारपणामुळे डोळ्यांना दिसणं कमी झालं होतं.एक दिवस आम्हाला म्हणाल्या मला एखाद्या वृद्धाश्रमात ठेवा साहेब .आता मला होत नाही आणि तुम्ही माझं केलेलं मला आवडणार नाही.माझे शेवटचे जे काही दिवस राहीलेत ते मी तेथे काढेन.आम्ही सगळ्यांनीच त्या गोष्टीला नकार दिला.पण त्यांचा एकच हट्ट की तुम्ही माझं करायच नाही.या कल्पनेनेच मला आधीच मरण येईल.आई बाबांनी ऎकल नाही.त्याचा त्यांनी इतका धसका घेतला की त्या आजारी पडल्या आणि अंथरुणाला खिळल्या.अनेक दिवस औषधे चालू होती पण काही उपयोग झाला नाही.त्यांच्या गावी सोलापूरला त्यांचा भाचा होता त्याला बोलावून घ्या म्हणाल्या.तेव्हा पत्र पाठवून त्याला बोलावून घेतले.आमच्या हातून त्यांना सेवा करुन घ्यायची नव्हती.तो गावी त्यांना घेऊन गेला आणि दहा बारा दिवसातच त्या गेल्या.त्यांचा शेवट आमच्या घरातच व्हावा असे आम्हा प्रत्येकाला वाटत होते.पण ते घडले नाही.माझ्या घडण्याच्या काळातली आई बाबांच्या इतकीच महत्वाची व्यक्ती म्हणजे शकुंतला मावशी होत्या.
   माझ्या आयुष्यात अशी काही माणसे आहेत की ज्यांच्या नसण्याने मी अपूर्ण रहाते त्यापैकी एक शकुंतलामावशी....

4 comments:

 1. > माझ्या आयुष्यात अशी काही माणसे आहेत की ज्यांच्या नसण्याने मी अपूर्ण रहाते त्यापैकी एक शकुंतलामावशी....
  आवडलं

  ReplyDelete
 2. वा! दीपा, खूप छान!

  ReplyDelete
 3. हं! छान लिहिलं आहेस.

  नवर्‍याने सोडून दिल्यावरही बायका उभ्या राहतात, राहू शकतात.
  नवर्‍याची कधी आठवण काढायच्या का त्या?

  ReplyDelete
 4. वयाच्या चार-पाच वर्षापासून रात्रंदिवस सहवास लाभलेल्या व्यक्तीचा संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडणे स्वाभाविकच आहे.
  आपला अवकाश गट एकत्र येण्यात भोजनावळी हा अत्यंत मह्त्वाचा घटक होता आणि आहे; आणि ह्यात तुझा वाटा निःसंशय सिंहिणीचा आहे.
  त्यामुळे अवकाश गटाचे श्रेय शकुंतलामावशींना दिले गेले पाहिजे.

  - सचिन

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...