Tuesday, July 15, 2014

अनिता

अनिता आमच्या हॉस्टेलवर महिनाभरासाठी आलेली. सुरूवातीला तिची आमची फारशी ओळख नव्हती.
ती उशीरापर्यंत झोपायची. मी कॉलेजला गेल्यावर कधीतरी तिच्या कामावर जायची. रात्री जेवायला नसायची. उशीराच यायची.

ती मिडी/ स्कर्ट असले आमच्यापेक्षा आधुनिक कपडे घालायची. उंच टाचांच्या सॅंडल्स वगैरे, कापलेले केस खांद्यापर्यंत रूळत असायचे.
उशीरा उठायची त्यामुळे दोन-तीन दिवसांनी कधीतरी आंघोळ, स्वच्छता कमीच पण सुगंध फवारून, हलका मेक अप करून तयार!
कुठेतरी रिसेप्शनीस्ट होती. खरं तिच्याकडे दोन - चारच ड्रेस होते पण अत्याधुनिक असे, दुरून महागडे वाटायचे पण नीट पाहिले तर तुळशी बागेतलेच.

आल्यानंतर दहा-बारा दिवसांनी बोलणे झाले असेल.

तिचे लग्न झालेले होते, बरेचदा ती छोटेसे नकली मंगळसूत्र घालायची. सासर शिरूरजवळच्या कुठल्याशा खेड्यातले होते. नवरा स्थानिक पुढार्‍याचा मुलगा होता. मी त्या पुढार्‍याचे नाव ऎकलेले नव्हते. हिला नोकरी करायचीच होती, म्हणून ती इथे राहात होती. मला तिचे कौतुक वाटले.

आणखी एका जरा सविस्तर भेटीत कळले की तिचे आंतरजातीय लग्न होते. ती ब्राह्मण तर नवरा मराठा. पळून जाऊन आळंदीत लग्न केले होते. मुलगा आईला पसंत नव्हता. बहुदा तिच्या कॉलेजमधेच होता. आई जुन्या पुण्यात कुठल्याशा पेठेत राहायची. वडील नव्हते, एक भाऊ आणि आई वाड्यात राहायचे. सासरकडच्या सगळ्यांना पसंत होती, तिकडे काही प्रश्न नव्हता. लवकरच पुण्यात घर घेऊन ती आणि तिचा नवरा असे दोघे इथेच राहणार होते.

एकदा कधीतरी आम्ही आपापल्या आयांबद्दल बोलत होतो, जरा मजेमजेचं तरी आपुलकीचं असं बोलणं चाललेलं.
अनिता म्हणाली, " माझी आई, आई नाही वैरीण आहे. मला आयुष्यभर तोंड दाखवू नकोस म्हणाली आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी एकदा भाऊ वाटेत भेटला म्हणून घरी गेले होते. बसले, जरा वेळाने तिला सांगितलं की तीन महिने झाले आहेत. चिडली. उठून माझ्या पोटावर लाथा मारल्या. "पाप आहे" म्हणत होती. त्याने माझं अ‍ॅबॉर्शन झालं. माझं बाळ पडून गेलं. मी तिचं कधीही तोंड पाहणार नाही. कधीही त्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. " आम्ही सुन्न झालो. तिही रडत नव्हती. बधीर झालेली.

दुपारी तिला भेटायला किंवा घेऊन जायला कोणीतरी नवर्‍याचा मित्र यायचा, आम्ही कधी त्याला बघितलं नव्हतं. पण तो शीळ घालायचा आणि ही जायची.
 नवर्‍याच्या मित्राबरोबर बाईकवरून जायला काहीच हरकत नव्हती पण त्याने शीळ का घालावी? नीट रितसर आत येऊन बोलावू का नये? असे आपले आम्हांला वाटायचे.
आम्ही तशा मागासलेल्याच होतो.

सासर कसं आहे? असं एकदा विचारत होते तर म्हणाली, "एकदा गेलेय, आठ दहा दिवस राहून आले आहे. सासू आणि नणंदही चांगलीच आहे. नणंद माझ्या एवढीच आहे. तिची मैत्रिण म्हणूनच गेले होते."
" का?"
"अजून गावी कोणाला सांगितलेलं नाही. स्थानिक निवडणुका आहेत, त्या झाल्या की सांगू असं सासर्‍यांनी ठरवलं आहे."
मी उडालेच.
" काय? ही फसवणूक आहे. तुला कळतंय का? तुमचं लग्न कायदेशीर आहे का? तुझ्याकडे काही पुरावा आहे? उद्या लग्न झालेलंच नाही म्हणाले तर? तुझा नवरा फिरला तर? सासरच्यांच्या दबावाखाली आला आणि लग्नच नाकारलं तर? आधी मॅरेज सर्टीफिकेट घेऊन ठेव. लग्नाचे फोटो तुझ्या ताब्यत ठेव. "
मी चिडलेले. मला कळेना, ही मुलगी मूर्ख तर नाही? मला कळतंय ते हिला कळतंय की नाही? मी कितीतरी वेळ तिच्याशी बोलत रहिलेले.
पुन्हा एकदोनदा ति्ला आठवण केली की याबद्दल नवर्‍याशी बोल म्हणून.
मी तिच्याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. बोलू, हिला थोडं शहाणं करू असं मला वाटत होतं.
एक दिवस अचानकच आमचा निरोप न घेता दुपारीच ती निघून गेली.
ठरलेला महिना आणि पुढे मला वाटतं दहा - बारा दिवस ती राहिली असेल.
आमच्याकडे कुणाकडेही पत्ता नव्हता. पुन्हा कधी दिसलीही नाही.

मधेच एक दिवस ती कुठे काम करायची, त्या ऑफीसची पार्टी होती, तिकडे खूप वेळ लागणार आणि इतक्या उशीरा आलेलं त्या हॉस्टेलवर चालायचं नाही. मग ती तिथेच राहीली, हॉटेलमधेच! हे आम्हां सगळ्या जणींना खटकलेलं.

आम्ही खरं काय हिची विचित्र गोष्ट म्हणत रहिलो. तिला नावं ठेवली. अर्थात आस्थेनं ऎकून घ्यायचो  पण मदतीचा हात पुढे केला नाही. तो करेकरेतो ती निघूनच गेली आणि आम्ही तिची आठवणही काढत राहिलो नाही.

ती परिस्थितीने कॉलगर्लचं काम करायला लागलेली का? कोण जाणे.
******

मी स्वत:च्या आणि स्त्रियांच्या हक्कांबद्दल जागरूक असले तरी लैंगिकतेच्या बाबतीत अक्षरश: काहीच विचार केलेला नव्हता.
"लैंगिक स्वातंत्र्य आणि माझ्या शरीरावर माझा हक्क" हे मी शिकले, लैंगिकतेचं राजकारण शिकले ती स्त्री अभ्यास केंद्रात.
तोवर बायका बायकांमधे लैंगिकतेमुळे केलं जाणारं विभाजन मला मान्यच असावं, मी काही विचारच केलेला नव्हता त्यावर.
आता मी सगळ्या स्त्रियांकडे समानतेने बघू शकते.

*******
कदाचित तेव्हा मी तिला काही मदत करू शकलेही नसते.
आता करू शकेन.

********

आपल्या मुलीने जातीबाहेर लग्न केलं, एवढं कारणंही आईचं मुलीवरचं प्रेम संपायला पुरतं. 
अशा आया असतात.
आई थोडी उदार झाली असती, तिला आपल्या मुलीवर थोडसं प्रेम करता आलं असतं तर...
एक अनिता कदाचित वाचली असती.
*******

No comments:

Post a Comment

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...