Monday, June 30, 2014

शीला

शीला केरळातल्या पट्टनमतिट्टाहून आलेली. महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातल्या इंजिनीअरींग कॉलेजमधून तिने BE केलं होतं. नंतर इथे पुण्यात नोकरी करत होती. आमच्या हॉस्टेलवर राहात होती.

साधी सरळ मुलगी! प्रेमात पडली होती. लग्न ठरलेलं. ते चार वर्षांनी करायचं हे ही ठरलेलं. तो मुलगा मुंबईत राहायचा. मुंबईपेक्षा एकट्या मुलीला राहायला पुणं सुरक्षित! म्हणून आईवडिलांनी वर्षभर पुण्यात राहून नोकरी करण्याला परवानगी दिली होती.

आता आई-बाबांचं ऎकायचं, नंतर नवर्‍याचं, मग संसार मुलं.... तिचं अगदी पक्कं होतं.

आमच्यापेक्षा तिचं जरा निराळं होतं. आमचं सार्‍याजणींचं भविष्य धुसर, अनिश्चित होतं. तिचं दृष्टीपथात. त्यापेक्षाही खरं प्रेमाने तिला वर उचललेलं.

तिच्या प्रेमकथेच्या खरं मजाच होत्या.

एक म्हणजे दोघंही पट्टनमतिट्टाच्या एकाच हॉस्पीटलमधे चार महिन्यांच्या अंतराने जन्मलेले.

दुसरं..

ही दोघं आणि आणखीही आठ-दहा जण असतील, इथे शिकायला आलेले. हा खरं तर तिच्या मैत्रिणीचा चांगला मित्र! तिघेही एकाच वर्गात. पण शीला त्याच्याशी फारसं बोलत नसे. दोघांचं कसं जमलं, हा तपशील मी विसरले आहे. पण दोघांचं नक्की ठरल्यावर त्यांनी घरी सांगायच्या आत, या दोघांना त्या छोट्या गावातल्या शीलाच्या एका दूरच्या काकांनी पाहिलं. तेच तिचे local guardian होते. योगायोगाने चारच दिवसांनी ते गावी, पट्टनमतिट्टाला जाणार होते. दोघी मैत्रिणी काळजीत पडल्या. ते काका घरी जाऊन हे नक्की सांगणार! मग घरी कसा गोंधळ माजेल, कदाचित फिसकटेल हे दिसायला लागलं. मग काकांच्या आधी आपणच घरी सांगावं हा विचार करून रिझर्वेशन नसताना तसाच प्रवास करत दोघी मैत्रिणी गावी गेल्या. शीला अशी अचानक कशी काय आली? आई-बाबांना कळेना.

हिने सांगितलं की ते काका उद्या-परवा येणार आहेत, त्यांनी मला एका मुलाबरोबर पाहिलं, ते येऊन काही सांगतील तर त्याच्या आत आपणच खुलासा करावा म्हणून आले आहे. आई-बाबा म्हणाले, " अगं, वेडी की काय तू? तेव्हढ्यासाठी आलीस? त्यांनी काहीही सांगितलं तरी आमचा काय आमच्या मुलीवर विश्वास नाही? आमची खात्री आहे. तू काहीही काळजी करू नकोस. " ........ झालं! इथवर गोष्ट आली की ख्यॅ! ख्यॅ! ख्यॅ! आम्ही नुसत्या हसायला लागायचो. मग काकांना जी शंका आली ती खरीच आहे....... वगैरे वगैरे सांगताना तिची उडालेली त्रेधातिरीपीट ऎकायला जाम मजा यायची.

एकाच जाती-पोटजातीतल्या आणि अनुरूप असणार्‍या दोघांच्या लग्नाला दोन्हीकडच्यांनीही पाठिंबा द्यावा यात नवल ते काय?

तिचं सगळं शिस्तीत चालायचं. सकाळी उठल्यावर प्रार्थना, झोपताना देवाचे आभार, वगैरे वगैरे. तिच्या आयुष्यात आलेल्या ’त्याच्या’ वर ती खूष होती आणि हे करणार्‍या देवाबद्दल कृतज्ञ!आमच्या हॉस्टेलच्या शेजारी दर गुरूवारी सकाळी भजनी मंडळाच्या बायका जमून भजनं म्हणत. जो काही टिपेचा सूर लावीत! बस्स! मी म्हणायचे काय कटकट आहे! आणि माझ्या दोन मैत्रिणी नसरीन आणि शीला मला समजावीत असत की " असं म्हणू नये. देवाचं नाव आपोआप कानावर पडतं. " :)

नसरीन सारखीच शीला ही एकमेव ख्रिश्चन मैत्रिण!

तिचे बाबा तिकडे चर्चमधे फादर होते. म्हणजे तो हुद्दा की संबोधन कोण जाणे!

तिचे घरी आणि त्याला मुंबईला फोन करण्याचे दिवस ठरलेले होते. (तिचा पगार ती जपून वापरत असे.) मुंबईला फोन केला की आधी नणंदेशी किंवा सासूबाईंशी अदबीने बोलणं मग त्याच्याशी. तेव्हा सर्रास मोबाईल नव्हते, आम्ही सगळ्याच १/४ रेट झाल्यावर घरी फोन करत असू.

ते दोघे एकाआड एका रविवारी भेटत असत. बरेचदा लोणावळ्याला.  दोघांनांही ते बरे पडे.

एकदा काय निरोपात गडबड झाली माहित नाही पण ही लोणावळ्याला गेली आणि तो आलाच नाही. आम्ही कुठे कुठे भटकायला गेलेलो परत हॉस्टेलवर आलो तर ही पांघरूण घेऊन झोपलेली. कुणाशी काही बोलेना. रडतच असलेली. आम्हीही शांत बसलो. तेव्हा काय किंवा नंतर काय कधीही आम्ही या प्रसंगाची खिल्ली उडवली नाही.

एकदा कधीतरी लोकरीच्या विणकामाचा विषय निघाला, मी शिकवू शकेन म्हंटल्यावर दोघी- तिघीजणी जाऊन तुळशीबागेतून लोकर , सुया घेऊन आल्या. मी काहीतरी साधीशी विण शिकवली असेल. नसरीनने पण कुणासाठीतरी करायला घेतला. शीलाला आपण त्याच्यासाठी स्वेटर विणतोय हे इतकं भारी वाटत होतं. मला म्हणाली, "तुझं लग्न ठरलं की तुही एक छानसा विण. "

" मी? ह्या!"

" कशी गं तू? तुला काहीच नवर्‍यासाठी करायला नको आहे. त्याला किती छान वाटेल! विचार करून बघ. "

" मला वाटतं, ही अशी भेट मला मिळाली तर मला किती छान वाटेल! तुम्ही स्वत:ला छान वाटण्याचा जरा विचार करून बघा. " :)

त्या रविवारी तो यायचा होता. मुंबईहून पुण्याला. त्याला साडी नेसलेली आवडते म्हणून शीला एक साडी घेऊन आली होती. ती तिला नेसायची होती. इतक्या लगेच ब्लाऊज कसा शिवून मिळेल? मग काय सगळ्याच जणी सल्ले द्यायला तयार! रेडीमेड कुठे मिळेल? पासून काळा चालेल, पर्यंत. ती कॉटनची काळ्यावर डिझाईन असलेली साडी होती. मी म्हणाले, " तुला अगदी मॅंचिग हवा आहे ना? मग काय कर, तुझ्याकडे काळा ब्लाऊज आहेच ना, त्याच्या नुसत्या बाह्या बदल. साडीच्या आतल्या बाजूकडून बाह्या कापून घ्यायच्या आणि जोडायच्या, कोणीही हे पटकन करून देईल. "

"वा!" ती एकदम खूष झाली.

पण दोन दिवसांत हे करून देईल असा कोणी टेलर मिळाला नाही.

" विद्या, तूच दे ना करून. "

" बरं. " मीही उदारपणे म्हणाले.

रविवारी सगळ्याजणी कुठे कुठे गेलेल्या. आम्ही दोघीच होतो. तो दुपारी चारला यायचा होता.

मी उशीरा उठून सावकाश आवरून, पेपर वाचून, निवान्तच. तिने जुना ब्लाऊज उसवून ठेवलेला, आणि माझ्या मागे पुढे.

जेवायला दोघीच होतो. शेवटी ती म्हणाली, " विद्या, शिवून देणारेस की नाही?"

" देते की! कितीसा वेळ लागणारे!"

" जेवण झालं की दुसरं काहीही करू नकोस."

जेवणानंतर खरंच मी शिवायला घेतला.

मग माझ्याजवळ बसून त्याच्याबद्दल काय काय सांगायला लागली.

ती इतकी त्याच्या प्रेमात बुडालेली होती आणि इतकी सुंदर दिसत होती.

म्हणाली, " त्याला दुबईला जाऊन खूप पैसा कमवायचाय. दोन-चार वर्षच जाईन म्हणतो आहे. आमच्याकडे हे फार आहे. पुरूषमंडळी आखातात आणि बरेचदा बायका इकडॆ. लग्न झालं तरी आम्हांला एकत्र राहायला मिळणार की नाही कोण जाणे. "

ती काळजीतही होती आणि सुखातही.

मी नुसती ऎकत होते.

ती बोलत होती.

प्रेमामुळे माणसं कशी फुलून येतात, कशी तरंगायला लागतात हे मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिलं ते तेव्हा!

तिचाही स्वर इतका सलगीचा होता, इतका आतला होता.

नुसत्या मैत्रीने , स्नेहाने मी न्हाऊन निघत होते.माणसाला काय बरं हवं असतं?

आतलं आतलं बोलता यावं असं एक माणूस!शीलाही पत्त्यासगट कुठेतरी हरवून गेली.

पट्टनमतिट्टा ? की मुंबई? की दुबई?

कुठे आहेस तू?स्वत:ला छान वाटावं याचा विचार करून बघितलास की नाही अजूनतरी?


********


5 comments:

 1. >> स्वत:ला छान वाटावं याचा विचार करून बघितलास की नाही अजूनतरी?

  :)

  ReplyDelete
 2. वा! मस्त प्रवाही झाला आहे लेख!

  > प्रेमामुळे माणसं कशी फुलून येतात, कशी तरंगायला लागतात हे मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिलं ते तेव्हा!
  मस्त!

  ReplyDelete
 3. >>माणसाला काय बरं हवं असतं?
  आतलं आतलं बोलता यावं असं एक माणूस!

  का न बोलताही ज्याला आतलं आतलं कळतं असं एक माणूस?

  - सचिन

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...