Saturday, March 9, 2013

पुरुषपणाची ओझी


>> बाईपणाची ओझी
हा विषय मला आवडला, आणि तेवढ्यावर न थांबता...
>> बायकांना बाई असण्याची ओझी आहेत तशी पुरूषांना पुरूषपणाची आहेत.
...हे इंद्रधनुने आवर्जून ध्यानात घेतलं, ते अधिक आवडलं.
----

या विषयावर मी फार संगतवार विचार केलेला नाही.
----

विषय ऐकताच मला सिंहगड सहलीतला एक प्रसंग आठवला...

कौस्तुभ आणि राजूचं रापलिंग झालं होतं. नीरजा आणि त्यानंतर आणखी एका मुलीने प्रयत्न करून माघार घेतली, मग सायलीने यशस्वीपणे पार पाडलं.
त्यावेळी कोणाची तरी आई म्हणाली की, बघा मुली कशा पुढे आल्या, मुलं मागेच आहेत.
त्यावर विद्या तिला म्हणाली, मुलांवर दडपण आहे, मुली सहज माघार घेऊ शकतात, मुलांना एकदा पुढे आलं की माघार घेता येणार नाही.
अगदी बरोबर. 
पुरुषांवर पुरूषपणाची जी ओझी आहेत, त्यात "पुरुषासारखा पुरुष, आणि घाबरतोस काय" हे एक नक्कीच आहे.
----

मात्र यावर अधिक विचार करण्यापूर्वी, आधी प्रस्तावनेसारखी थोडी विषयाची मांडणी करायला हवी, की जेणेकरून माझा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुरेसा स्पष्ट होईल.

एखाद्या गोष्टीचं ओझं वाटणे ही मानसिक अवस्था आहे. त्याचा वास्तवाशी/ परिस्थितीशी संबंध असेलच असं नाही. संबंध असला/ नसला तरी विचारांच्या बळावर किंवा स्वसंमोहन, NLP सारखी तंत्रे वापरून त्या अवस्थेतून बाहेर पडता येतं.

पण हे झालं वैयक्तिक पातळीवर. एखादी विशिष्ट मानसिक अवस्था सार्वत्रिकपणे आढळायला लागली तर ती परिस्थितीजन्य आहे, असंच समजायला हवं. (उदा. महायुद्धानंतर किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर आढळणारं सार्वत्रिक नैराश्य.)

त्यामुळे एखादी गोष्ट आपण केवळ पुरुष आहोत म्हणून आपल्यावर लादलेली आहे असे पुरुषांना सर्वसाधारणपणे वाटत असेल तर त्याला मी "पुरुषपणाचं ओझं" म्हणेन. (मला एखादी गोष्ट "ओझं" वाटत असेल, पण बहुसंख्य पुरुषांना वाटत नसेल, तर ती "पुरुषपणाचं ओझं" या सदरात येणार नाही. याउलट, पुरुषांना सर्रास ओझं वाटत असणारी गोष्ट, मला तशी वाटत नसली तरी येथे येईल. थोडक्यात, इथे मला ओझं वाटणाऱ्या गोष्टींविषयी नाही तर (माझ्यामते) पुरुषांना ज्या गोष्टी ओझं वाटतात, त्यांविषयी मी बोलत आहे).

ओझं या शब्दाचा संबंध माझ्यामते लादण्याशी आहे. (Compulsion हा शब्द मला इथे वापरायचा आहे, त्याला अगदी नेमका प्रतिशब्द सुचत नाही आहे). हे लादणं "टाळता न येणाऱ्या जबाबदारीतून" येऊ शकतं, पण त्याशिवायही समाजातील/ कुटुंबातील/ गटातील नियम, समजुती, अटी, प्रथा अशा कशातूनही येऊ शकतं.

ओझं ही वाईटच गोष्ट आहे, कोणत्याही प्रकारचं ओझं नसलंच पाहिजे, असंही मला म्हणायचं नाही. स्वीकारलेल्या चौकटीत कोणत्या न कोणत्या प्रकारचं ओझं असणारच आहे/ असतंच. फक्त चौकट कोणती स्वीकारायची याबद्दल काही किमान स्वातंत्र्य असावं (पुरुषपण किंवा बाईपण निवडता येत नाही , त्यामुळे त्या बाबतीत ते नसतंच) आणि स्वीकारलेल्या चौकटीत अगदी जाचेल तिथे थोडा वेगळा मार्ग निवडण्याची, थोडी वेगळी भूमिका घेण्याची मुभा असावी, तेवढ्यासाठी फार किंमत मागितली जाऊ नये, असं वाटतं.  

आपल्या पुरुषप्रधान समाजात, बाईवर बाईपणाची जितकी आणि जशी ओझी आहेत, त्यापुढे पुरुषपणाची ओझी अगदी फिकीच पडतील. पण म्हणून ती नाहीच आहेत असं नाही. कित्येक पुरुष त्या ओझ्यांखाली कोलमडलेलेही दिसू शकतात. 

पुरुषपणाची ओझी ही बाईपणाच्या ओझ्याचीच दुसरी बाजू आहे. पुरुषपणाची ओझी समजून घेतली तर बाईपणाची ओझी समजून घ्यायला मदतच होईल, असं मला वाटतं.
----

पुरुषपणाची ओझी कोणती याचा विचार करायला लागल्यावर प्रामुख्याने तीन प्रकारची ओझी मला जाणवली.

(१)

वरचा सिंहगडावरचा प्रसंग हे पहिल्या प्रकाराचं उदाहरण झालं. "आपण घाबरलोय" हे समाजापुढे (आणि सवयीने स्वतःकडेही) मान्य न करण्याचं ओझं पुरुषावर असतं, पण केवळ भीतीपुरतं हे ओझं मर्यादित नाही. दुःख, वेदना, दुखावलेपण इतकंच नाही तर हळवेपणा, संवेदनशीलता अशा अनेक नाजूक भावना (tender emotions) व्यक्त न करण्याची अपेक्षा पुरुषांकडून आपला समाज वेळोवेळी ठेवतो. त्या व्यक्त केल्यास खिल्ली, अनादर, अपमान अशा कशालाही पुरुषाला समोरं जावं लागू शकतं. प्रसंगी मित्रांच्या/ सहकाऱ्यांच्या गटातून बाहेर फेकले जाणे, कायमचा चेष्टेचा विषय होणे असे गंभीर परिणाम देखील भोगावे लागू शकतात. स्त्रीच्या सहवासात पुरुषांवरचं हे ओझं खूपच कमी होतं/ होऊ शकतं. जिच्याकडे रडता येईल इतकी जवळची एक स्त्री असणं, हे पुरुषासाठी त्यामुळे अमूल्य असतं.

या ओझ्याचीच दुसरी बाजू (flip side) म्हणजे कठोर भावना (hard emotions) व्यक्त करण्याची सक्ती. "थांब, संध्याकाळी बाबा आले की तुला ओरडतील" पासून ते अंत्यविधीला हजेरी लावण्यापर्यंत पसरलेल्या या अपेक्षेचं कित्येकदा ओझं वाटू शकतं. या अपेक्षा पूर्ण न केल्यास पुरुषाला भित्रा, पळपुटा, दुर्बळ किंवा अगदी नामर्दही समजलं जाऊ शकतं.

(२)

पुरुषपणाचं अगदी सर्रास दिसणारं ओझं म्हणजे आपण सक्षम आहोत, वरचढ आहोत हे दाखवण्याचं दडपण. हे नैसर्गिक ओझ्याचं स्वरूप असावं. निसर्गनियमानुसार मादीला आकर्षित करण्यासाठी नराला आपण सक्षम आणि आजूबाजूच्या इतर नरांपेक्षा वरचढ आहोत हे सिद्ध करावं लागतं. प्रगत मानवी समाजात हे इतकं थेट नाही तरी कर्तबगारीतून सिद्ध करावं लागतं. मग खेळातील हार-जीत ही कित्येकदा जीवन-मरणाचा प्रश्न बनते. आधुनिक समाजात स्त्रियांना करिअर हे मुक्तीचं, बरोबरी सिद्ध करण्याचं, आयुष्याचा परीघ वाढवण्याचं साधन असेल, पण पुरुषांसाठी अजूनही ती अस्तित्वाची लढाई आहे. 

वरवर एकत्र असणाऱ्या स्त्रियांमध्ये अनेकदा मत्सराची झाक असते असं मी कुठेतरी वाचलेलं. त्याच चालीवर असं म्हणता येईल की वरवर सहकार्य करणाऱ्या पुरुषांमध्ये स्पर्धेची झाक असते. ऐन कसोटीच्या क्षणी आपला वरचढपणा सिद्ध करायला पुरुषांना सजग राहावं लागतं. कामाच्या (corporate world) ठिकाणी तर हे स्पष्टपणे जाणवतंच, पण थोडं खोलात शिरून न्याहाळलं तर अनौपचारिक गटांमध्येही जाणवतं. 

(वादग्रस्त वाटेल पण) विनोद करता येण्याची अपेक्षा हे एक अगदी उघड नसलं तरी याच प्रकारचं एक खास पुरुषी ओझं आहे. कॉलेजजीवनात विनोद करण्याची क्षमता सिद्ध करता येत नाही या ओझ्याखाली दबलेले तरुण सापडतात. विनोदाला दाद देण्याचं काम मुलींकडे असतं. त्यांनी विनोद केले तर चालतात, पण नाही केले तर हरकत नसते. विनोदाला अधिक चांगली दाद देणाऱ्या मुलीकडे अनेकदा विनोदबुद्धीचा मापदंड (benchmark) म्हणून पाहिलं जातं.

या प्रकारचं ओझं मरणप्राय यातना देणारं, जीवघेणं असू शकतं. (मागे एकदा बोलताना मांडल्याप्रमाणे) "कर्ता" पुरुष दारूच्या आहारी जाण्यामागे किमान कर्तबगारी सिद्ध न करता आल्याचं ओझं अनेकदा कारणीभूत असतं.

(३)

तिसरं ओझं म्हटलं तर सर्वमान्य आहे, म्हटलं तर समाजाला अगदीच अमान्य आहे. (हे ओझं वादग्रस्त आहे, ते मांडायला हे व्यासपीठ ही कदाचित योग्य जागा नसेल. पण पुरुषपणाची ओझी मांडायची आहेत तर हे मला टाळता येणार नाही. )

हे ओझं म्हणजे "एकपत्नीत्व" (monogamy) हे कुटुंबव्यवस्थेने  आणि कायद्यानेही लादलेलं ओझं. ते समर्थनीय आहे अथवा नाही यात आता पडायला नको. पण हे एक (माझ्या समजुतीनुसार) अनैसर्गिक अशा अपेक्षेचं ओझं पुरुषावर असतं, आणि समाजात वावरताना आपण जणू हा नियम स्वखुशीने स्वीकारलाय, आपल्याला तो आनंदाने मान्य आहे, इतकंच नव्हे तर आपण जणू या नियमाचे रक्षणकर्तेच आहोत, अशा तऱ्हेने वागण्याची जवळपास सक्तीच पुरुषावर (आणि स्त्रियांवरही) असते.

बाईपणाची अनेक ओझी ही नैसर्गिक प्रवृत्तींवर घातलेल्या कृत्रिम बंधनातून आलेली दिसतात. ती ओझी कशी असतील याची पुरुषाला एक झलक दाखवणारं असं हे ओझं आहे.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की पुरुषांच्या (स्त्रीविरहित) अनौपचारिक गटात हे ओझं बहुतेक वेळा मोकळेपणाने आणि सर्वानुमते मान्य केलेलं असतं आणि वागण्यात नाही तरी निदान बोलण्यात तरी काही अंशी झुगारून दिलेलं असतं.
----

वर लिहिल्याप्रमाणे या विषयावर मी फार विचार केलेला नाही. या लेखाच्या निमित्ताने थोडा विचार झाला, निदान सुरुवात झाली. सिंहगडावरील प्रसंगाबद्दल आणखी एक गोष्ट लिहून थांबतो.
----

सिंहगडावर रापलिंग करताना सचिन दोनदा मागे फिरला.  नंतर तर त्याने ते छानपैकी केलंच, पण मला वाटतं रापलिंगपेक्षाही मागे फिरणं कोणाही पुरुषाला जास्त कठीण होतं. सचिनपेक्षा जास्त भीती वाटूनही मागे न फिरलेले पुरुष तिथे असतील.  सचिनने केली ती एक बंडखोरी होती. मागे फिरलेलं चालणार आहे हा एक नवा पर्याय त्याच्यामुळे पुरुषांना उपलब्ध झाला. 
सचिन, हे मला खरंच जमलं नसतं, मला तुझं कौतुक वाटतं.

-- नीरज

6 comments:

 1. > ओझं या शब्दाचा संबंध माझ्यामते लादण्याशी आहे. हे लादणं "टाळता न येणाऱ्या जबाबदारीतून" येऊ शकतं, समाजातील/ कुटुंबातील/ गटातील नियम, समजुती, अटी, प्रथा अशा कशातूनही येऊ शकतं.
  हो. नक्कीच.
  कुठल्याही प्रसंगात न डगमगता तोंड देणं, वरचढ राहणं, दु:ख व्यक्त करताना रडण्याची मुभा न घेणं, कायमच धीरानं/धीटाईनं राहणं हे नक्कीच पुरुषांवर व्यक्तीगरित्या अथवा सामाजिकरित्या लादलेल्या गोष्टी आहेत. नोकरीत सतत सिध्द होणं, कुटुंबप्रमुख हे लेबल गृहित धरल्यामुळे ती जबाबदारी पार पाडणं ही सगळी कर्तव्य पुरुषांचीच अशी एक मानसिक घडणं बनलेली/बनवलेली आहे.
  हे सततच ओझंच आहे.

  नीरज लेख आवडला.

  ReplyDelete
  Replies
  1. >> नीरज लेख आवडला.
   धन्यवाद!

   Delete
 2. छान लिहिलं आहेस.

  >> विनोद करता येण्याची अपेक्षा हे एक अगदी उघड नसलं तरी याच प्रकारचं एक खास पुरुषी ओझं आहे.
  याचा मी कधी विचार केलेल नव्हता. इथे वाचल्यावर लक्षात येतंय.

  >> monogamy , या विषयाचा माझा काही अभ्यास नाही. इतिहासात आपल्याला बहुपत्नीत्वाची चाल अगदी सर्रास आढळते. पुराणात एक द्रौपदी वगळता बहुपतित्वाचं उदाहरण नाही.
  मानव या प्राण्याची वृत्ती काय आहे? नैसर्गिकरित्या तो कोण आहे? आणि सुसंस्कृत होता होता त्याने कुठले नियम बनवले? आणि ते पाळत आला?
  त्यातल्या काही नियमांचा काच होत असेलही.
  त्याच्या निचर्‍यासाठी वेश्यागमन हे असणार.

  तू म्हणतो आहेस की
  >>पुरुषांच्या (स्त्रीविरहित) अनौपचारिक गटात हे ओझं बहुतेक वेळा मोकळेपणाने आणि सर्वानुमते मान्य केलेलं असतं आणि वागण्यात नाही तरी निदान बोलण्यात तरी काही अंशी झुगारून दिलेलं असतं.
  हे ही मला नवीन कळलं. असू शकेल.

  मागे मंगला सामंतांचे चतुरंग मधे यावर लेख आले होते.

  मला हे वाचून असा वाटलं बायकांच्या पुरूषविरहीत अनौपचारिक गटात त्या काय बोलतात? त्यांच्यावर नाही का हे ओझं? मानव हा प्राणी जर polygamy असेल तर त्यांनाही हे ओझं नाही का वाटत? त्या तर एक नवरा मिळाला की त्यालाच सुधारण्याच्या मागे, आयुष्यभर! की त्यांना हा विचार सुचावा इतकं मोकळं वाढवलंच जात नाही?

  ReplyDelete
  Replies
  1. >> विनोद करता येण्याची अपेक्षा

   या विषयावर झालेल्या संशोधनासंबंधी एक लेख मी पूर्वी वाचला होता. आता तो शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही सापडला.
   पण त्याच्या जवळपास जाणारा हा दुसरा सापडला…

   “Although both sexes say they want a sense of humor, in our research women interpreted this as ‘someone who makes me laugh,’ and men wanted ‘someone who laughs at my jokes.’”

   http://psychcentral.com/lib/2011/how-and-why-humor-differs-between-the-sexes/all/1/

   मात्र हे पुरुषपणाचं ओझं असू शकेल हे मी केवळ माझ्या स्वतःच्या निरीक्षणाच्या जोरावर लिहिलं आहे.

   >> monogamy/ polygamy
   यावर माझाही अभ्यास नाही. (आणि एकूणच हा निराळा आणि मोठा विषय आहे)
   मात्र "हे ओझं आहे" असं बहुसंख्य पुरुष सरळच कबूल करतील असं मला वाटतं, त्यामुळे मला हे लेखात यायलाच हवं होतं.
   मी अगदी थोडक्यात (काही प्रमाणात त्रोटक) लिहिलं आहे. "(माझ्या समजुतीनुसार) अनैसर्गिक अशा अपेक्षेचं ओझं" किंवा तत्सम उल्लेख कोणाला वादग्रस्त वाटू शकतील. या लेखाच्या संदर्भात मी प्रत्येक उल्लेखाबाबत फार आग्रही नाही. हे ओझं आहे याची नोंद व्हावी इतकाच हेतू होता. तेवढं पोचलं की मला पुरे आहे.
   बायकांच्या दृष्टिकोनातूनही या विषयावर विचार व्हायला हवा.

   Delete
 3. खूप छान लेख!
  पुरूषांवर आणखी एक ओझं असतं..स्वत:चं मूल या जगात आणून ’पुरूषत्व’ सिद्ध करण्याचं. ते बाईलाही असतंच पण बाईसाठी त्यात सांस्कृतिक दडपणाचा भाग जास्त असतो. पुरूषांसाठी तो ’पुरूष’ म्हणून जणू काही अस्तित्वाचा प्रश्न असतो असं मला निरीक्षणातून जाणवलं आहे.

  ReplyDelete
 4. >> खूप छान लेख!
  धन्यवाद!

  >> स्वत:चं मूल या जगात आणून ’पुरूषत्व’ सिद्ध करण्याचं.
  आयुष्याच्या एका टप्प्यावर या प्रकारचं दडपण असतं. तो जणू अस्तित्वाचाच प्रश्न तर होतो हे खरंच आहे. (All basic instincts are manifestation of natural compulsion to survive. Survival does not restrict to survival of self, but extends to survival of one's own jenes & one's own species.)

  तरीही "लादणे" या अर्थानी "एक ओझं" या स्वरूपात बहुसंख्य पुरुष याकडे पाहत असतील का याबद्दल मला शंका आहे. असूही शकेल.

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...