Thursday, March 7, 2013

ओझं

पिढ्यां पिढ्या येत रहातात.पण बदल होतातच असं म्हणता येत नाही. जाणीवपूर्वक, एखाद्या विचाराने बदल घडवून आणला जातो असं नाही. इच्छा नसताना मागच्या पिढीची नकोशी वाटणारी ओझी आपण अनेक वर्षे आपल्या खांद्यावर बाळगत रहातो.मनापासून आपल्याला काय वाटते हा विचार बाजूला टाकतो आणि कोणी दुखावू नये म्हणून ते करत रहातो.आत्ता जाऊ दे . आपल्या हातात येईल तेव्हा ही चौकट मोडू. आत्ता वाद होतील,मन दुखावतील,नाती तुटतील....एक ना अनेक गोष्टींच्या भिती पोटी सहन करत रहातो. आज मी बोलणार आहे ते आमच्या घरातली अशीच एक समाजाच्या दृष्टीने पिढ्यांपिढ्या चालत असलेली चौकट मोडताना मी टाकलेले पाऊल.माझे सासरे गेले.सासूबाई खूपच धार्मिक. जुन्या मताशी चिकटलेल्या.समाजाचे बंधन, का त्यांना स्वत:ला असं आवडायचं, कोणासं ठाऊक.मी विचार करत होते. बाबा गेले त्या क्षणापासून आईंनी त्यांची सौभाग्यलेणी ,त्याचं इथून पुढचं आयुष्य कसं जगायचं? काय करायचं हे त्यांनी स्वत: ठरवावं. कोणी एक व्यक्ती कींवा समाजाच्या दडपणाखाली त्यांनी कोणतीही कृती कींवा यापुढचे त्यांचे आयुष्य जगू नये अशी माझी इच्छा होती. बाबा स्वत: खूप आधुनिक विचाराचे होते.त्यांचा मृत्यूनंतरच्या सर्व विधींवर आक्षेप होता.कशाचे तेरावे चौदावे घालता. गरीबाला जेवायला मिळत नाही. आणि ज्यांना मिळतं त्यांनाच जेवणं घालायची असे ते स्वत: म्हणत. पण प्रत्यक्षात ते गेल्यानंतर आमच्या घरात हे सगळे विधी पार पडले. घरातल्या माणसांची मनं दुखावली जाऊ नये म्हणून पटत नसूनही मी गप्प राहीले. मी माझ्या हातात असणा-या गोष्टींबद्दल कसं लढता येइल याचा विचार करु लागले. एवढं केलं की गुरुजींना सांगितलं की असं काहीही आई करणार नाहीत की तुम्ही एक तो विधी आहे म्हणून त्या जोडवी, मंगळसूत्र,कूंकू,अन्य सौभाग्य अलंकार उतरवायचे, त्याचा तुम्ही उल्लेख टाळला तर बरं होईल. त्यामुळे तसं तुम्ही काही न बोलता जे काही विधी असतील ते करा. गुरुजींनी ऎकलं.हे पंधरा दिवस झाले आणि एक दिवशी मी आईंना घेऊन बसले. आणि त्यांच्याशी बोलले. खरं सांगते मनातून त्या कश्या प्रतिक्रीया देतील याची धाकधूक होती. तरी सुद्धा बोलायचे ठरवले होते. आजपासून तुमचं पुढचं आयुष्य आत्तापर्यंत तुम्ही जसं जगत होता तसंच जगावं अशी माझी इच्छा आहे. कोणी काय म्हणेल तर म्हणू देत काही झालं तर मी तुमच्या बरोबर आहे शेवटपर्यंत. तुम्ही कोणाचंच दडपण घेऊ नका. आईंचं सगळं आयुष्य सहकारनगरच्या त्यांच्या हक्काच्या घरात गेलं. पहीलं सांगितलं की तुम्हाला जिथे रहायला आवडेल , आनंद मिळेल तेथे तुम्ही रहा. तीन मुलं आसून एकट्या रहातात एवढ्या बंगल्यात...असे टोमणे लोकं मारणारच आहेत. महत्वाचं आहे ते तुम्हाला छान कोठे वाटेल याचे. तुम्ही शांतपणे विचार करा आणि ठरवा.लाल कूंकू लावायचं की नाही, जरीच्या रंगीत साड्या घालायच्या की नाही ,हळदीकूंकू यासारख्या सणाचे काय करायच,केसात गजरा माळायचा की नाही अश्या अनेक प्रश्नांवर फुल्या मारा. आपल्या घरापासून त्याची सुरवात करु या. बाबा गेल्यावर सगळे सणवार जसे पूर्वी होत होते त्या पद्धतीने आम्ही केले. कोणी म्हणत होतं यावर्षी तुम्ही गौरी बस्वणार का? गणपती बस्वणार का?दिवाळी साजरी करणार का? या सर्व प्रश्नांवर आम्ही फुली मारली. आम्ही उलट गौरीचे दरवर्षी प्रमाणे हळदीकूंकू केलं.आईंना घेऊन मी सगळ्यांकडे हळदीकूंवाला घेऊन गेले.आवर्जून सांगितलं त्यांना हलदीकूंकू लावा. आम्हाला चालतं.आज बाबा जाऊन एक वर्ष झालं पण आई त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणे आनंदाने जगत आहेत त्यांच्या मर्जीप्रमाणे. त्यांचं असं जगणं बघून मला खूप समाधान मिळतं. मागे जाऊन विचार करते तेव्हा वाटतं की आईंच्या भितीमुळे, त्या काय म्हणतील? समाजाच्या दडपणाखाली मी त्यांच्याशी हे बोललेच नसते तर माझ्या मनावरचं हे ओझं कायमच राहीलं असतं.......

5 comments:

  1. तुला सामोरी आलेली परिस्थिती नीट जाणून घेऊन त्यावर तू वेळीच आणि आवर्जून उपाययोजना केलीस, हे आवडलं.

    ReplyDelete
  2. >>आईंना घेऊन मी सगळ्यांकडे हळदीकूंवाला घेऊन गेले.
    आवडलं.

    ReplyDelete
  3. ओझी ही नेहमी इतरांच्या (आपण जुगारत असलेल्या) दडपणातूनच येतात. विद्याच्या एका लेखातील वाक्ये (ढोबळपणे) उधार घेऊन:
    "एकदा नाहीच घाबरायचं दूसर्‍या कुणाला हे ठरवल्यावर मग भिती कशाची?"

    - सचिन

    ReplyDelete
  4. दीपा,
    तू जाणीवपूर्वक बदलाच्या दिशेने पाऊल उचललेस म्हणून तुझे आणि हे बदल स्वीकारण्यासाठी तुझ्या आईंचेही खूप कौतुक!!

    ReplyDelete
  5. करावेसे वाटणे आणि करणे यात खूप फरक आहे. म्हणूनच अभिनंदन !!

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...