Thursday, March 7, 2013

मोकाट, स्वच्छंद कुमारिकांचे देश चिरायू होवोत


भालचंद्र नेमाड्यांच्या एका कादंबरीत हे वाक्य आहे.
त्यावर रंगनाथ पठारे यांचा ३ मार्च च्या सप्तरंग पुरवणीत लेख आला आहे.
लेख अवश्य वाचा. मला आवडला.
पठारे म्हणतात, ’ ज्या देशात कुमारिका मोकाटपणे, स्वच्छंद वृत्तीनं हिंडू शकतात ते देश चिरायू होवोत. इथं कळपाचं काहीतरी आपल्या मनात येतं. तसं नाही, एकट्या कुमारिकेलाही मोकाट आणि स्वच्छंद जगता आलं पाहिजे. दिवसा-रात्रीच्या कोणत्याही प्रहरी कुमारिकेला निर्भयपणे, मोकळेपणाने कुठंही जाता आलं पाहिजे. तिच्या मनास येईल ते करता आलं पाहिजे. मोकाट आणि स्वच्छंद या शब्दांना जबाबदारीच्या मर्यादेत पाहिलं पाहिजे."
"मोकाट, स्वच्छंद कुमारिकांचे देश चिरायू होवोत." ही भारी कल्पना आहे.
लेखात पठार्‍यांनी असं म्हंटलंय की हे आपल्या काळातल्या एका द्र्ष्ट्या साहित्यिकानं, एका कवीनं पाहिलेलं स्वप्न आहे.
अलिप्ततावादी देश, डावे देश, उजवे देश.... तसे मोकाट, स्वच्छंद कुमारिकांचे देश, देश कशामुळे ओळखला जातो आहे तर त्यातल्या कुमारिकांना कसले स्वातंत्र्य आहे? यावरून!! कुठल्याही देशाचं दरडोई उत्पन्न किंवा उर्जावापर नोंदवावा, तसं कुमारिकांना किती आणि कसलं स्वातंत्र्य आहे, याची नोंद करायची. आणि जे देश मोकाट, स्वच्छंद कुमारिकांचे देश असतील ते चिरायू होवोत.
 असं पण असायला हवं ना? की जे देश मोकाट, स्वच्छंद कुमारिकांचे असतील तेच खरं चिरायू होऊ शकतील.
कुमारिकांचे असं का म्हंटलं असेल?
मला असं वाटतं की मुली घडणीच्या काळात, कुमारपणात जर स्वच्छंदपणे, मोकाटपणे वावरू शकल्या तर ती पुढील आयुष्यासाठी केवढी मोठी शिदोरी असणार आहे.
त्या बळावर त्या स्वतंत्रपणे , जबाबदारीने, आत्मविश्वासाने पुढलं आयुष्य जगू शकतील. जगण्याला एक समर्थ पाया मिळेल.
ज्यांचं कुमारपण स्वच्छंद जगण्यात गेलेलं आहे त्यांना तुम्हांला तरूणपणी, प्रौढ वयात, कधीही आपल्या तालावर नाचवता येणार नाही.
स्त्रियांच्या पारतंत्र्याचं मूळ त्यांच्या घडवण्यात तर असतं.
आणि जो समाज आपल्या कुमारिकांना मोकाट, स्वच्छंद जगू देतो आहे, तो किती प्रगल्भ असेल. असा समाज आपल्याला हवा आहे.
आज आपण महिलादिनाच्या निमित्ताने हेच स्वप्न पुढे ठेवूया.

"मोकाट, स्वच्छंद कुमारिकांचे देश चिरायू होवोत"

*******

5 comments:

 1. अनुमोदन आणि महिलादिनानिमित्त शुभेच्छा!

  ReplyDelete
 2. मस्त लिहिलं आहेस!

  मोकाट, स्वच्छंद कुमारिकांचे देश चिरायू होवोत!

  ReplyDelete
 3. विद्या, खूप छान! आवडलं !!

  ReplyDelete

मुक्त-मनस्वी!

दिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समु...