जन्मत: आपल्याला कुठल्याही प्राण्याला असावे इतके स्वातंत्र्य असते.
किंबहुना स्वातंत्र्याची व्याख्या मी अशी करते आहे की मी / किंवा कुठलीही व्यक्ती जगात एकटी असती तर तिला जे असेल, "हवं तसं वागणं, हवं तसं बोलणं, हवं तसं वावरणं, हवं ते करणं, ....+++... यांची मुभा," ते म्हणजे स्वातंत्र्य!
आपल्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली की तिला जागा करून द्यावी लागतेच.
आपण एका घरात , कुटूंबात, समाजात, देशात जन्माला आलेलो असतो म्हणून आपलं एकेक स्वातंत्र्य आपल्याला गमवावं लागतं त्याबदल्यात एकेक सुविधा आपण मिळवत जातो. बरेचदा आपल्याला काही निवडता येत नाही.
एका घरात, कुटूंबात राहायचं तर आपल्याला तसंच घडवलं जातं. म्हणजे लहानपणी तर परावलंबनच असतं ना? माणसाच्या पिल्लाचं बालपण सर्वात अधिक काळ असतं.
समाजात राहायचं तर एक सुव्यवस्था लागते. न्यायव्यवस्था लागते. मग काही नियम पाळावे लागतात. नियम आले की स्वातंत्र्याचा संकोच होतो.
हे नियम पाळायचेच असं आपल्यात इतकं रुजलेलं असतं की आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा घालण्यात आल्या आहेत हेच मुळी आपल्या लक्षात येत नाही.
अगदी टोकाचं उदाहरण द्यायचं तर ’कपडे न घालण्याचं’ स्वातंत्र्य आपल्याला नाही. आपली त्याबद्दल काही तक्रार नाही.
असे कित्येक नियम आपण चालवून घेतो, का? तर शेवटी आपण आपल्या काळाची अपत्ये असतो. आपल्या विचारांवर ही बंधने येतात.
म्हणजे सुविधा मी नाकारत नाही, नाकारायच्या म्हंटल्या तरी ते शक्य नाही, त्यामुळे माझं स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे, एवढंच मी निदर्शनास आणू इच्छिते.
पुरूष असो वा स्त्री तिला हे मर्यादित स्वातंत्र्यच बहाल झालेलं आहे.
म्हणून मी म्हणते की मला चौकटीतलं स्वातंत्र्य आहे.
आमचं घर काही स्त्री-पुरूष समानतावादी नव्हतं. आमच्या घरात बाबांची हुकूमशाहीच होती, जशी की इतर आजूबाजूच्या घरांमधे होती. बाबा माझ्याबाबतीत वेगळे वागले आणि मीही त्यांना तसं वागायला भाग पाडलं. बाबांना वाटे, मुलींनी शिकावं, धीट असावं, स्वत:च्या जबाबदारीवर कामं (बाहेरची) करावीत, पण हे सारं करून शेवटी पुरूषाच्या आज्ञेत असावं. त्यांच्या बहीणी, त्यांच्या आत्या, त्यांची आई ह्या अशा धीराच्या, हिंमतीच्या बायका होत्या. माझी आत्या, सात महिन्यांची गरोदर बाई, येरगी ते वडगाव, सत्तरएक किलोमीटरचं अंतर घोडीवर बसून आली होती. त्या मुलांच्या शिक्षणासाठी घर करून शहरात राहिल्या. पण त्यांनी कुणीही पुरूषसत्तेला आव्हान दिलं नाही. घरातल्या पुरूषांना समजावून, प्रसंगी विरोधात जावून, कामं केली. तरीही पुरूषांचं वर्चस्व त्यांना मान्य होतं.
माझ्यात मुलगी/ बाई म्हणून कोणी बरोबरीनं वागलं नाही तर भांडायची खुमखुमी आधीपासूनच होती. माझ्याइतकीच घरातली कामे माझ्या भावाने केली पाहिजेत याबाबत मी आग्रही असे. मुली फारशा इंजिनिअर होत नाहीत, तर तिसरी चौथीतच मी इंजिनीअर व्हायचं ठरवून टाकलेलं. घरात कुणाचा विरोध नव्हता , बाकीच्यांकडे मी लक्ष दिले नाही.
माझी आई निमूटपणे सगळंच चालवून घेत आली. तिच्या वतीने मी वेळोवेळी भांडत आले. मी FE ला असताना, बाबांचे दोन मित्र सपत्नीक काशी आणि आजूबाजूचं काही असं यात्रा + सहल , जाणार होते. बाबांनी त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं.
मी म्हणाले, "आईला घेऊन जा."
" तुला इथे एकटीला राहावं लागेल."
" मी राहीन, माझी काळजी करू नका."
मग म्हणाले, " दोघांच्या खर्चाचे पैसे जरा जास्त होताहेत."
" ठीक आहे. कुणा एकट्यालाच जाता येणार असेल तर आईला जाऊ दे, तुम्ही यापूर्वी काशीला गेलेला आहात."
बाबांच्या मित्रांनीही आग्रह केला. शेवटी आई बाबा दोघेही त्या पंधरावीस दिवसांच्या सहलीला गेले.
मी घर सांभाळलं. पुढेही माझ्यावर घर सोडून ते दरवर्षी एका सहलीला जायचे.
आईबाबा घरी नाहीत म्हणजे आम्ही मैत्रिणी धमाल करायचो! मी कॉलेजमधे असायचे तेव्हढा वेळ वगळला तर सतत मैत्रिणी घरात. आमचं घर म्हणजे अड्डाच झालेला असायचा.
मी भांडून, वाद घालून आईबाबांना बदलणं भाग पाडलं. त्यांची मूल्ये बदलली आहेत का? पूर्णपणे नाही. ते माझ्यापुरते आणि माझ्यासाठी बदलले आहेत. (त्यामुळे पुष्कळच उदार झाले आहेत.)
माझ्या जवळच्या माणसांना माझ्यासाठी बदलायला लागतं, माझ्याशी समानतेने वागायला लागतं कारण त्यापेक्षा कमी, मी काही चालवूनच घेत नाही. माझं त्यांना सांगणं असतं, माझ्यानिमित्ताने बदला पण बदला, माझ्यापुरते बदलू नका.
मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाही. आर्थिक स्वातंत्र्य ही गाभ्याची गोष्ट असते. ( यावर पूर्वी लिहून झालं आहे.)
शारीरिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? नाही,
म्हणजे वावरण्याचं स्वातंत्र्य यावर अवलंबून असतं. पण ते मी उपभोगू शकते का? पूर्णपणे नाही. त्यामुळे समाजाच्या चौकटीत ज्या वेळांमधे , ज्या परिसरात वावरण्याला मान्यता आहे, तिथे मी फिरू शकते. रात्री बेरात्री फिरायला मला मदत लागते.
मानसिकदृष्ट्या/ भावनिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?. पूर्णपणे नाही.
कठीण परिस्थितीत मला आधार हवा असतो, मी धडपडत स्वत: बाहेर येण्याचा प्रयत्न करते, बरेचदा मला जमतं पण माझी खूप दमछाक होते. मी सावरू शकते, असं वाटतंय, काय सांगावं? मला खात्री नाही.
लैंगिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? नाही.
हो, नाही म्हणता येणं, आपल्या इच्छेचा आदर केला जाणं हे या स्वातंत्र्याचा छोटा हिस्सा आहे.
इथे एक लक्षात घ्या, ते स्वातंत्र्य उपभोगण्याची माझी इच्छा आहे की नाही हा वेगळा भाग झाला, मुळात मला ते स्वातंत्र्य आहे का? तर नाही. माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे का? आहे. पण नाहीच अशी माझी समजूत आहे.
वैचारीकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? नाही.
मी मघाशी लिहिलंय त्याप्रमाणे आपण आपल्या काळाची अपत्ये असतो. माझ्या घडवण्यात, माझ्या समाजात जो विचार केला जातो, तसाच विचार करायची सवय मला लावली गेली आहे. मी चौकटीची थोडी मोडतोड करते , माझ्या मापाची करू पाहते, बस! तेही पूर्वपिढ्यांनी जो विचार करून ठेवलाय त्या आधारे.
कुठले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे? कुठले नाही?
आर्थिक निर्णय मी घेत नाही कारण ते घेण्याइतकं त्यातलं मला कळत नाही. बाकी घर चालवण्यासाठीचे चौकटीतले निर्णय आम्ही दोघे मिळून घेतो. चौकटीबाहेरचे काही निर्णय घ्यायची (म्हणजे आम्हां दोघांच्य़ चौकटीबाहेरचे) वेळ आली नाही.
रोजच्या दिवसभराच्या कामात स्वतंत्र आहे का? नाही.
घरातल्या रोजच्या कामासाठी मी मावशींवर अवलंबून असते.
या वरच्या सगळ्या गोष्टींमधे बाई म्हणून माझं काय वेगळेपण आहे, या चौकटी तर पुरूषांनांही आहेतच ना?
हं, माझ्या वावरण्याच्या स्वातंत्र्यावर त्यामुळे बंधने आली आहेत.
माझं काय आणि तुमचं काय चौकटीतलं स्वातंत्र्य आहे. तुम्हांला चौकटींचा काच होतो का? मला होतो.
मला जर असं वाटलं की शहरातल्या सुनसान रस्त्यांवरून मला मध्यरात्री फिरायचं आहे, तर ते शक्य नाही, याचा मला त्रास होतो.
चौकटीतलं स्वातंत्र्य मला आहे का? तर आहे.
कितीकजणींना तेही नसतं.
बायकांना निदान तेव्हढं स्वातंत्र्य मिळावं यासाठी मी आग्रही असते.
पूर्वी या प्रश्नाकडे पाहताना मी, स्वत:चा आणि माझ्या गटातल्या स्त्रियांचाच यात अंतर्भाव करायचे.
आता मला यात वेश्यांचाही अंतर्भाव करता येऊ शकतो आहे.
कुठल्याही स्त्रीकडे पाहताना नेहमीचे पवित्र-अपवित्रतेचे चष्मे मी लावत नाही.
आता समाजात होणारी पुरूषांचीही गोची माझ्या लक्षात येते आहे.
माझ्या नात्यातल्या स्त्रिया, मैत्रिणी, आमच्या कामवाल्या मावशी किंवा इतर माझ्या संपर्कातल्या स्त्रियांशी वागताना मी माझ्याइतकंच स्वातंत्र्य त्यांना आहे, त्यांना ते मिळालं पाहिजे याची काळजी घेते.
लग्नानंतरही मी आमच्या (आईबाबांच्या) घराची सदस्य आहेच, ते घर मी सोडलेले नाही, सर्वार्थांनी, त्याप्रमाणेच माझ्या नणंदांचं संगमनेर हे घरच आहे, त्या आतल्या वर्तूळात आहेत, हे मला मान्यच आहे. आईच्या हक्कांसाठी मी भांडत आले. कायम मी स्त्रियांची बाजू समोर आणत असते त्यामुळे माझ्याशी वागताना समोरच्या व्यक्तीला ते जाणवत असावं. काही वेळा जाणवलं आहे हे कळतं. लग्नाळू मुलामुलींना तर मी सांगतेच.
स्वातंत्र्य हवं आणि त्याबरोबर येणार्या जबाबदार्यांचीही जाणीव हवी. तरच तुम्ही भरभरून जगू शकता. घर जर दोघांचं आहे तर हक्क आणि जबाबदार्यांचीही वाटणी समसमान हवी.
नुसती आर्थिक जबाबदारी नव्हे. जेव्हा आपण जबाबदारी उचलत असतो, तेव्हाच कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळू शकतं. आमच्या घरातल्या वाटणीत मी पैसे कमावत नाही, त्याशिवायच्या सगळ्याच जबाबदार्या घेऊ शकते, घेते. मिलिन्द पुण्यात नव्हता तेव्हाही मी पूर्ण घर चालवत होतेच. शिवाय त्याच्या आणि माझ्या नातेवाईकांना सांभाळण्याचं काम बर्यापैकी माझ्याकडेच आहे. मुक्ता आणि सुहृदच्या शाळेसंबंधातल्या बर्याच गोष्टी मी पाहते. मिलिन्दला सांगते, विचारांनी तो सोबत असतोच, मुख्यत: ते मीच पाहते. काही गोष्टी त्याला वेळेमुळे शक्य होत नाहीत. तो माझ्यावर अवलंबून नाही, मीही त्याच्यावर अवलंबून नाही पण सगळ्या वैचारिक बाबींमधे आम्ही एकमेकांबरोबर असतो.
स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल मी जागरूक असते एवढेच नाही तर पुरूषांच्या स्वातंत्र्याबद्दलही असते.
सगळ्यात जवळच्या नात्यात म्हणजे नवर्याला मी स्वातंत्र्य देते. हे मी त्याच्याकडूनच शिकले हे कबूल करायला हवं. प्रेम म्हणजे हक्क आणि बांधून ठेवणं असाच माझा समज होता. मी हे शिकले की प्रेम म्हणजे हक्क असला तरी बांधून ठेवायचं नाही, तरी त्याने बांधून असायचं.
लग्नाच्या नात्यात आम्ही दोघेही बर्यापैकी स्वतंत्र आहोत. यासाठी मी बरीच वर्षे घेतली.
चौकटीतले स्वातंत्र्य मी भरभरून उपभोगते, माझ्यापुरती चौकट मोडते, मोठी करू पाहते. माझ्यापुरतं काही करायचं हे मला आवडत नाही, पटत नाही. इतर स्त्रीपुरूषांनांही हे काच होऊ नयेत असं मला वाटतं. नुसती मी स्वतंत्र असून उपयोग नाही, समाजाने माझं स्वातंत्र्य स्वीकारायला हवं. इतरांच्या नजरा बदलायचं बळ माझ्यात नाही. ते सगळ्यांनी मिळूनच केलं पाहिजे.
सगळ्यांनी जबाबदारीसह येणारं स्वातंत्र्य पेललं पाहिजे, आहे ती चौकट मोठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्याला फायदा होईलच
आणि
आपल्या मुलींसाठीची वाट आणखी प्रशस्त होऊ शकेल.