Sunday, March 11, 2012

स्वतंत्र / परतंत्र

स्वातंत्र्य म्हणजे स्व तंत्राने वागणे. स्वतःच्या विचारांप्रमाणे / स्वतःला पटलेल्या विचारांप्रमाणे वागणे आणि त्याचवेळी आपल्या स्वतंत्र वागण्यामुळे दुसर्‍याच्या स्वातंत्र्याची आपण गळचेपी करत नाही ना याचे भान ठेवणे. विद्याने लिहिलंय ते खरंच आहे - आपण समाजाच्या अशा गटाचं प्रतिनिधित्व करतो, ज्यातल्या स्त्रीला स्वातंत्र्याचे सर्वाधिक फायदे मिळालेले आहेत. प्रश्न आहे, त्या स्वातंत्र्याचे मला भान आहे का?
आपल्याला घडवण्यात आई-वडिलांचा, घराचा वाटा मोठा असतो. माझ्याबाबतीतही तो नक्कीच आहे. आमच्या घरी मुलींसाठीची वेगळी आचारसंहिता कधी नव्हती. खेडेगावात रहाताना माझ्याच वयाच्या इतर मुलींना नाकारल्या जाणार्‍या कित्येक गोष्टी आपल्याला सहजच आणि आपला हक्क म्हणूनही मिळतात हे मी पहात आले. आधी आमच्या शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने आई आम्हाला घेऊन पंढरपूरला, पळसदेवला राहिली. बाबा गावाकडची शेती बघत आणि येऊनजाऊन आमच्याजवळ रहात. आई आम्हाला घेऊन पळसदेवला रहाते याबद्दल आमच्या कुटुंबियांमधे तिचं कौतुक होतं. ते का होतं ते आत्ता कळतं. नोकरी करत आई दोन लहान मुलं आणि घर सांभाळत होती. शेतीचं उत्पन्न तसं बेभरवशी असल्याने घराची आर्थिक बाजू बर्‍यापैकी तीच सांभाळत होती. तिच्या स्वभावात बंडखोरी नाही पण ती कोणत्याही प्रसंगी मोडून न जाता निश्चयाने आणि ताठपणे आपल्या जागेवर पाय रोवून उभी रहाते. तिचा हा गुण माझ्यात थोडाफार आला आहे. आपल्या प्रत्येक कृतीसाठी स्वतःला प्रश्न विचारणं, आपली कृती आपल्या विचारांशी सुसंगत आहे का ते तपासणं, स्वतंत्र विचार करणं, आपल्या विचारांशी प्रामाणिक आणि ठाम रहाणं, गरज असेल तेव्हा आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडणं या गोष्टी बाबांकडून माझ्याकडे थोड्याफ़ार आल्या आहेत. बाबांशी कित्येक गोष्टींवरून माझे वादही होत. पण ’तुला काय कळतंय, गप्प बस’ अशी भाषा त्यांनी कधीही वापरलेली नाही. आईबाबांनी लहानपणापासून आमच्यावर छोट्याछोट्या जबाबदार्‍या टाकल्या, आम्हाला चुकू दिलं, धडपडू दिलं, आम्ही त्या जबाबदार्‍या पार पाडू असा विश्वास आमच्यावर दाखवला. अकरावीत मी पुण्यात आले आणि MSc पर्यंत होस्टेलवर राहिले. होस्टेलवर रहिलं ना, की आपण वेगळेच बनून जातो. घर लांब राहिलेलं असतं. सारखा हात देणारं कोणी नसतं. आपण कितीतरी गोष्टी शिकत जातो. जबाबदारीचं भान येतं. घराची किंमत कळते. वाटेत येणार्‍या छोट्यामोठ्या अडचणींचा बाऊ वाटेनासा होतो. शिक्षण संपल्यावर नोकरीच्या निमित्तानेही एकटं रहाण्याची माझ्यावर वेळ आली, तेव्हा मला त्याचं फारसं काही वाटलं नाही. आईबाबांनीही माझी एकटं रहाण्याची तयारी आहे हे पाहिल्यावर मला दौंडला खोली बघून दिली. नंतर माझ्या लक्षात आलं की मी एकटी खोली घेऊन रहाते, ही माझ्या सहकारी मैत्रिणींच्या मते फारच धाडसाची गोष्ट होती. त्यांच्या घरून असं एकटं रहायला कधीच परवानगी मिळाली नसती. मलाही, आईबाबांनी परवानगी दिलेली नव्हती. मी एकटं रहाण्याचा निर्णय घेतला होता, त्याला त्यांची सहमती होती. आणि ती माझ्या दृष्टीने महत्वाचीही होती.
घरात लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा मी फोटो काढून घेणार नाही, मुलाला भेटायला जाताना साडी नेसणार नाही, मुलाच्या आईवडिलांना वाकून नमस्कार करणार नाही वगैरे बर्‍याच गोष्टींवरून मी तावातावाने बोलायचे. आई मला समजावू पहायची आणि बाबा म्हणायचे - तिचे विचार चुकीचे नाहीत, करूदे तिला तिच्या मनासारखं! मुलाला भेटून आल्यावर माझा नकार असेल तर ते लगेचच त्यांना पत्र लिहून मोकळे होत. जे मध्यस्थ असत ते मुलाकडचे काय म्हणताहेत ते बघा मग निर्णय घ्या, चांगलं स्थळ आहे, सोडू नका, वगैरे सल्ला देत. आईबाबा मात्र माझं मत अंतिम मानत. मला लग्न कधी करायचंय, कोणाशी करायचंय हे ठरवण्याची पूर्ण मोकळीक होती. लग्नाच्या विधींबाबतही माझी वेगळी मतं होती, मी ती लावून धरली असती तर बाबाही माझ्यामागे ठाम उभे राहिले असते नक्कीच.
लग्नानंतर चित्र थोडंसं बदललं. काही गोष्टी तर पार उलट्यापालट्याच झाल्या. काही वाटा या आपल्यासाठी नाहीत हे माझ्यापुरतं पक्कं होतं पण सुरुवातीला त्या वाटांवरून चालावं लागलं. आपण स्वतःविरुद्ध वागतोय हे कळत असतानाही तडजोड म्हणून, कोणाला दुखवू नये म्हणून मी त्या वाटांवरून चालले. पण त्याचा जीवघेणा मनस्ताप होतो आहे हे कळल्यावर निग्रहाने त्या वाटा स्वतःसाठी बंद केल्या. माणसं तेवढ्यापुरती थोडी दुखावली गेली तरी चालतील पण भलत्या तडजोडी करायच्या नाहीत हे पक्कं ठरवलं. आता काही गोष्टींना मी ठाम नकार देते हे लक्षात आल्यावर माझ्याकडून त्या गोष्टींची अपेक्षा केली जात नाही हा एक चांगला बदल घरात झाला आहे. त्याहूनही सुखाची गोष्ट ही की असं करताना मी माझी मानलेली माणसं माझ्यापासून दुरावली गेलेली नाहीत. काहीकाही बाबतीत जगदीशची आणि माझी मतेही एकमेकांना पूर्ण छेद देणारीच आहेत. त्यावरून खणखणाटही होतात :) पण (इतक्या वर्षांनंतर) समोरच्याने आपल्या मताप्रमाणे वागावे ही अपेक्षा चुकीची आहे हे दोघांनाही समजते आहे! आम्ही दोघेही आपली मते दुसर्‍यावर लादली जाणार नाहीत असा प्रयत्न करत असतो.
आर्थिक/ शारीरिक/लैंगिक /भावनिक /निर्णय स्वातंत्र्य:.
घरात मला आर्थिक स्वातंत्र्य अर्थातच आहे. मुळात माझा स्वभाव खर्चिक नाही. मी स्वतःसाठीचे आणि घरासाठीचे खर्च जबाबदारीनेच करते आणि जगदीशलाही त्याची जाणीव आहे. कर्ज, गुंतवणूक, मोठे खर्च यासारखे निर्णय दोघांच्या विचारांनी घेतले जातात. कोणी कोणाला गृहित धरत नाही, ही माझ्या दृष्टीनं पुरेसं आहे. शारीरिकदृष्ट्या मी स्वतंत्र आहे का? बर्‍याच प्रमाणात आहे. बरेचदा कसं होतं, की आपला निश्चयच कमी पडत असतो. निश्चय पक्का असला की शारीरिक बळ थोडं कमी असलं, तरी फारसं अडत नाही. आपण ताकदीची कामंही निभावून नेऊ शकतो. कोणी मदत करेपर्यंत अडून राहावं लागत नाही. कपडे, दागिने अशा बाबतीत जगदीशची आणि त्याच्या आईबाबांची मते थोडी पारंपारीक आहेत. माझ्या आईबाबांचीही तशीच आहेत. पण माझ्या आवडीचं स्वातंत्र्य मला आहे. कुंकू, मंगळसूत्र वगैरे मला आवश्यक वाटत नाहीत. बाकीच्यांना मात्र ते अत्यावश्यकच वाटतं. तिथे मात्र माझा नाईलाज होतो. त्यांचा मान म्हणून मी ते चालवून घेते. लैंगिक? हो. नाही म्हणण्याचा अधिकार मला आहे आणि त्याबाबतीत एकमेकांच्या इच्छांचा विचार आणि आदर दोन्हीकडून नक्कीच केला जातो. भावनिकदृष्ट्या? स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मी बरेचदा घेत नाही. समोरच्या व्यक्तीचा विचार जास्त करते. किंवा माझ्या भावना समजून घेतल्या जातील अशा ठिकाणीच त्या व्यक्त करते. माझ्या अगदी जवळच्या व्यक्तींशी मी मोकळेपणाने माझ्या भावना व्यक्त करते. जवळच्या व्यक्तींवर मी भावनिकदृष्ट्याही अवलंबून असते. त्यांच्याकडून मिळणारा भावनिक आधार मला मोलाचा वाटतो. फ़क्त स्वतःच्या बळावर भावनिकदृष्ट्या खंबीर रहाणं मला बहुदा नाही जमणार. निर्णयस्वातंत्र्याच्या बाबतीत: एखाद्या प्रश्नावर घरातल्या सर्वांनी मत देणं, आपापले विचार मांडणं ही ठीकच आहे. पण अंतिम निर्णय मात्र त्या त्या संबंधित व्यक्तीला कसल्याही दबावाशिवाय घेता यायला हवा. आणि त्या व्यक्तीच्या निर्णयाचा बाकीच्यांनी आदरही करायला हवा. घरातल्या लहान मुलांनाही आपापले निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असायला हवं. माझ्या स्वतःच्या बाबतीतले निर्णय मला स्वतः घेता यावेत यासाठी मी आग्रही असते.ते स्वातंत्र्य मला दरवेळी सहजच मिळत नाही. कधीकधी ते मिळवायसाठी थोडे प्रयत्न करावे लागतात.त्याला माझी तयारी असते.
मी परीपूर्ण/ भरभरून जगते का? तसं जगताना बाई म्हणून मी स्वतंत्र आहे का?
माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी मी आवर्जून वेळ काढते. त्यात मला कोणाची सोबत असली तर छानच वाटतं, पण नसली तरी फारसं काही बिघडत नाही. एकटेपणीही त्या गोष्टी मला भरभरून आनंद देतात.
काहीवेळा माझ्या छंदांना मला इतर जबाबदार्‍यांमुळे बाजूला सारावंही लागतं, पण त्याची खंत नाही वाटत.
इतरांचं स्वातंत्र्य:
माझ्याकडे पोळ्या, केर, फरशी, भांडी वगैरे करायला येणारी संगीता गेली पाचसात वषे माझ्याकडे येते आहे. तिलाही माझ्या मुलांच्याच वयाची मुले आहेत, त्यांच्या शाळेच्या वेळा, नवर्‍याचं दारू पिणं, त्याचं अधून्मधून बेकार असणं हे सगळं सांभाळून ती कामं करते. तिचं घर एकटीच्या जिवावर चालवते. पण तिला आठवड्याची हक्काची सुट्टी नसते.हक्काच्या रजा नसतात. तिच्या इतर रजांबद्दल मी कधी तिला बोलत नाही पण तिला आठवड्याला एक दिवसाची सुट्टी देणं मला अजून जमलेलं नाही.त्यातल्या त्यात पळवाट म्हणून पोळ्यांना रविवारी सुट्टी दिली आहे, पण पूर्ण सुट्टी हा खरंतर तिचा हक्क आहे. ती तो मागत नाही, मी तो तिला देत नाही. तिला आपल्याकडून अनादराने वागवलं जाणार नाही याची काळजी मात्र मी घेते.
माझ्या कुटुंबातल्या बायकांच्या समानतेच्या हक्कांबाबत, त्यांच्या मतस्वातंत्राबाबत, मात्र मी नेहेमी जागरूक असते. त्यासाठी घरातल्या मोठ्यांना त्यांची बाजू समजावून सांगायचा प्रयत्न करते आणि प्रसंगी, आपला वाद त्या अन्याय्य रूढींशी/परंपरांशी/मतांशी आहे माणसांशी नाही याचं भान ठेवून त्यांच्याशी वादही घालते.

जसं मला माझं स्वतंत्र आणि स्वावलंबी असणं मोलाचं वाटतं, तसंच माझ्या मुलांनी स्वतंत्र आणि स्वावलंबी असावं, आपली त्यांच्यावरची माया, प्रेम त्यांच्या पायातल्या बेड्या ठरू नयेत,त्यांनी स्वतःला माझ्यावर किंवा कुणावरही शारीरिक, वैचारिकदृष्ट्या अवलंबून ठेवू नये. स्वतः विचार करावा, अनुभव घ्यावेत, मतं बनवावीत, तपासून पहावीत. आत्मनिर्भर, आनंदी आयुष्य जगावं, असंही मला मनापासून वाटतं.

6 comments:

 1. Hi Congrats!
  तुमच्या ब्लॉगचा उल्लेख मुंबई लोकसत्ता मध्ये आज झाला आहे.
  अभिनंदन.

  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=215286%3A2012-03-11-17-06-41&catid=404%3A2012-01-20-09-49-09&Itemid=408

  ReplyDelete
 2. धन्यवाद!

  तुमच्या 'Inner Circle' चाही उल्लेख त्यात आहे.
  तुमचेही अभिनंदन!

  -इंद्रधनु

  ReplyDelete
 3. अश्विनी,
  तू लिहिलंस तसं तुझ्या आवडीच्या गोष्टींसाठी तू आवर्जून वेळ काढतेस, त्याचं आम्हांला कौतुक आहे.
  तू खरोखरच बर्‍याच बाबतीत स्वतंत्र आहेस. तू कसल्याही प्रकारच्या मदतीसाठी, पुरूषांवरच काय नवर्‍यावर देखिल अवलंबून नसतेस ते मला आवडतं. तू अपेक्षेने थांबून राहात नाहीस.
  भावनिक पातळीवर याचा थोडा त्रास होतो, पण असू दे, त्याने वाढ होत राहते ना?
  :)

  ReplyDelete
 4. अश्विनी, छानच लिहिलं आहेस.

  >> तिच्या स्वभावात बंडखोरी नाही पण ती कोणत्याही प्रसंगी मोडून न जाता निश्चयाने आणि ताठपणे आपल्या जागेवर पाय रोवून उभी रहाते. तिचा हा गुण माझ्यात थोडाफार आला आहे.

  अनुमोदन.

  एकूण लेख वाचताना असं वाटत जातं की, या बाबतीत जे आहे जसं आहे त्यात तू समाधानी आहेस, कशाबद्दलच फार खळखळ न करता, प्रसंगी थोडा नेट लावून, कधी जरा जास्त ताणून धरून, कधी सोडून देऊन, केव्हा दुर्लक्ष करून तू पुढे जाते आहेस. पण आपली जितकी ओळख आहे त्यातून उभं राहिलेलं तुझं चित्र यापेक्षा (थोडं) वेगळं आहे. (कदाचित अनेक गोष्टी करूनही त्यात काय एवढं असं सहज म्हणण्याच्या तुझ्या स्वभावामुळे असेल.)

  टोकाचा संघर्ष करावा असे प्रसंग आले तर तू काय करतेस/ करशील हे आलं असतं, तर कदाचित लेख आणखी पूर्ण वाटला असता.

  बाकी, विद्याने म्हटल्याप्रमाणे तुझं कशासाठीच अडून न राहणं, खरंच कौतुकास्पद आणि शिकण्यासारखं आहे.

  ReplyDelete
 5. >> कशाबद्दलच फार खळखळ न करता, प्रसंगी थोडा नेट लावून, कधी जरा जास्त ताणून धरून, कधी सोडून देऊन, केव्हा दुर्लक्ष करून तू पुढे जाते आहेस.
  हो, हे खरंच आहे. पण मी आहे त्यात समाधानी आहे असं मात्र नाही. (आणि खळखळ करत नाही असंही नाही:))
  तुम्हाला माझ्याकडून जे अपेक्षित आहे ते मला स्वतःला पटत नाहीये किंवा माझ्यावर ते लादलं जातंय, हे एकदम स्पष्ट सांगणं मला फार अवघड जातं. पण मी माझं म्हणणं पोचवत राहते. वेळोवेळी जाणीव करून देत राहिल्याने बदल हळूहळू होत जातात. ते बदल होईपर्यंत मी अस्वस्थ असते, बरेचदा मनस्तापही करून घेते. त्या बदलांना संघर्षाचं स्वरूप येत नाही; पण माझी फार दमछाक होते :)

  ReplyDelete
 6. Freedom is not free it has its cost and one has pay to enjoy it!
  Liked your open sharing, everyone wants freedom and Independence but they are not ready to pay the cost of it! That is the biggest problem! I call it struggling to prove yourself and base of it is self respect!
  Many times thoughts are very good but action is more difficult, because once action is taken there is reaction to it and it may be different then our expectation, that’s why it is difficult to act. So many times people do not act or react. Money- time –self respect are modes of payment in such cases, if one don’t wants to compromise with self respect them money- time is not yours and once you compromise with Self respect time money and all wonderful things are yours!
  Normally women accept second position in family because it is easy, safe and without much troubles as accepted traditionally. It should be equal but then pay the cost!
  You thinking is wonderful and experiences are very eye opening and clear, you shared it nicely, Congratulations!
  Equality is not to be demanded; It should come from the heart and with feelings! Many time efforts of women to fight with the situation are not just registered.
  We must resist the basic thinking in this View.

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...