Thursday, March 8, 2012

"मी किती स्वतंत्र आहे? किती परतंत्र आहे?"

या आधीही थोड्या फार प्रमाणात यावरील काही भाग पूर्वी लिहीलेल्या काही ब्लॉगमधून स्पष्ट केला आहे.त्या व्यतिरीक्त हे थोडेसे.....
आपलं कोणावर फारसं अवलंबून रहाणं अथवा न रहाणं हे माझ्यामते आपण लहानपणापासून कसे वाढवले जातो यावर खूप अवलंबून असते.यात पालक म्हणून माझे आई वडील म्हणून प्रत्येकाची भुमिका मला महत्वाची वाटते.बाबा किर्लोस्कर मध्ये मोठ्या पदावर होते. मी साधारणत: सातवी आठवीत असीन. ते मला लकाकी बंगल्यावर,ब्ल्यू-डायमंड हॉटेलमधे घेऊन जायचे.बाबांच्या मिटींग्ज,कींवा काही मोठी लोक यांच्या गाठीभेटी,कींवा नुसतंच शंतनुराव-यमुताई कीर्लोस्करांशी गप्पा मारायला...अश्या अनेक कारणांसाठी मी त्यांच्या बरोबर पुढेही अनेक वर्षे जात असे.तेव्हा ब-याचदा त्यांची मॅनेजमेंट,ते उठतात कसे,वागतात कसे,कोणकोणत्या विषयांवर बोलतात कसे,त्यांचे रहाणीमान, त्यांच्या आवडीनिवडी , इ. अश्या अनेक विषयांची ओळख,त्यानिमित्ताने बरीच नामवंत मंडळी,अश्या जगात वावरण्याची मला नव्याने ओळख झाली ती बाबांमुळे.....एरवी घरातले बाबा सुट्टीच्या दिवशी, बॅंकेचे,पोस्टाचे,शेअर्समधील गुंतवणुक अश्या आर्थिक व्यवहारांची ओळख कींवा ही कामे बाबांच्या बरोबर जाऊन मी शिकले.मंडई,कीराणा,घरातील स्वयंपाक हा घराशी निगडीत भाग मी त्यांच्याबरोबरीने शिकले.खूप लहानपणापासून बाबा मला त्यांच्या बरोबर घेऊन जात व ही कामे करत असत. त्यामुळे नवीननवीन गोष्टी शिकले आणि त्याबरोबर एक हींमत आली.त्यांचे नेहमीच म्हणणे असते की कोठेही,कोणत्याही कामात आडले नाही पाहीजे.करुन बघा,चुका आणि त्यातून शिका.या अनुभवाने मी बिनधास्त झाले.याबरोबरीने तितकाच महत्वाचा भाग होता तो आईचा.घरातील बारीकसारीक कामे,त्यांचे नियोजन,त्याविषयीचे माझ्याशी निगडीत असलेल्या विषायांचा स्वत: निर्णय घेणे,कधी,कशी,केव्हा,का या सर्व प्रश्नांचे स्वातंत्र तिने मला दिले.मुलगी म्हणून वेळेचे बंधन कींवा मुलगी आहेस म्हणून हे करु नकोस असे कधीच वाढवले नाही.याचा परीणाम आज मी खूप स्पष्ट,नुसतीच भावनिक न रहाता काही ठीकाणी प्रॅक्टीकल होता येणं,एक प्रकारचा वावरण्यातला बिनधास्तपणा, स्वत: कोणतीही परीस्थिती आली तरी धीराने तोंड देणं या गोष्टी मला यशस्वीपणे पेलता येतात.आता राहीला भाग लग्नानंतरचा.....ब-याचदा वाटतं की कौस्तुभ घरात कश्यात लक्ष घालत नाही.पण एक आर्थिक सोडलं (म्हणजे खर्चासाठी पैशाची मागणी जरी करावी लागत असली तरी त्यापैशांच्या मी केलेल्या व्यवहाराशी त्याला काही घेणं देणं नसतं ते स्वातंत्र्य नक्कीच मला आहे.) तर बाकी कोणत्याच गोष्टींसाठी मी त्याच्यावर अवलंबून नाही,ही गोष्ट माझ्यात हींमत वाढवणारी आहे.माझ्या आजूबाजूला नात्यात मी अश्या अनेक बायका बघते की ज्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्या नव-यांवर अवलंबून असतात. माळ्यावरचे काहीतरी काढून हवं आहे ते भाजी आणण्यापर्यंत अशी अनेक छोटी कामे.अश्याने मी कोणत्या न कोणत्या कारणांसाठी नव-यावर सतत अवलंबून आहे ही त्यांना मोहवणारी गोष्ट वाटत असावी का ?का त्या नव-यांनाही तिचं आपल्यावर अवलंबून असणं हवहवस वातत असतं?,आपण कसं वागायचं याविषयी स्वत: काहीच करायचं नाही.सगळं डोकं त्यानेच चालवायचे.यात आपली काहीच शक्ती वाया घालवायची नाही.ही गोष्ट्च अश्या बायकांना आवडणारी वाटते का? आणि यात मग चुकत माकत शिकायची मजा त्यांना घेता येत नाही.आज माझं मला एखादं वाहन चालवता येणं त्याच्या आधारे मी एकटी अथवा मुलांना घेऊन कोठेही जाऊ शकते.आम्ही तिघे मजा घेऊ शकतो.यासाठी मला कौस्तुभ बरोबर असावा याकरता मी कधीच त्याच्यावर अवलंबून रहात नाही.तो आपल्या बरोबर असेल का? त्याची गाडी असेल का? तरच आपण सगळे जाऊ. यात मी अडकून रहात नाही.यासाठी मी त्याच्यावर अवलंबून नाही.त्यामुळे मला त्यातील मजा घेता येते.तो आमच्या बरोबर असेल तर नक्कीच जास्त मजा आहे.पण तो नसतो म्हणून मी हातपाय गाळून बसत नाही.माझा प्रत्येक दीवस माझ्यापद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य मला आहे.कोणाच्या आधारावर ते अवलंबून नाही.ही गोष्ट मला आतून बाहेरुन भक्कम करणारी आहे. उद्या माझ्या पुढ्यात, माझ्या कुटुंबावर कोणतेही संकट अथवा कोणताही वाईट प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला खचून न जाता धीराने सामोरे जाण्याची ताकद यातून मला मिळते.मला वाटतं स्वातंत्र्य म्हणजे आपल्या विचारांच्या देवाण घेवाणीला कुठलेही बंधन नसणे, स्वत:च्या कर्तव्याच्या जाणीवेने प्रगतीकडे उचललेले पाऊल, इतरांना त्रास न देता केलेले मनासारखे स्वच्छंदी निर्मळ वर्तन.मी आज स्वतंत्र आहे अथवा कोणावर अवलंबून नाही त्यामुळे माझ्या आयुष्यातील गोष्टी मी करताना थोडी चुकणार आहे,त्यातून शिकणार आहे,माझ्या हीमतीने मी थोडी पुढे जाणार आहे,आणि त्यातील आनंद उपभोगणार आहे.यासाठी असणारी स्वत:वरच्या विश्वासाची खात्री.त्यामुळे आमूक एक गोष्ट मला जमणार नाही कींवा त्यासाठी कोणावर तरी मी अवलंबून राहून त्यातील धडपडण्याची गंमत मी अनुभवण्याची गोष्ट सोडून देत नाही.त्याची मजा मला घेता येते.लहानपणापासून मी अश्याच पद्धतीने जगत आले.समोरच्या प्रसंगाला तोंड देत राहीले.त्याचा आस्वाद घेत राहीले.त्यामुळे आज माझं आयुष्य मी स्वंच्छंदीपणे मोकळेपणाने जगण्याचा प्रयत्न करत आहे.

7 comments:

 1. दीपा,
  वा!
  नुसतं स्वातंत्र्य नाही तर त्याच्या जोडीला आत्मविश्वास लागतो. तो असला की मोकळेपणाने जगता येते.
  आणखी लिहायचं डोक्यात आहे, म्हणाली होतीस. तुझा पुढचा लेख येऊ दे.

  ReplyDelete
 2. What counts in making a happy marriage is not so much how
  compatible you are, but how you deal with incompatibility.

  - Sachin

  ReplyDelete
  Replies
  1. याच आशयाचे मराठी वाक्य आठवले..

   लग्न जमवताना पत्रिकेतील ’गुण’ किती जुळतात ते पाहिलं जातं.
   नंतर संसार करताना मात्र एकमेकांचे दोष सांभाळून घेत जगावं लागतं

   Delete
 3. वा: सचिन भारी

  ReplyDelete
 4. दीपा, तू स्वावलंबी आहेस. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता तुझ्यात आहे. आणि सहजी निभावणार नाही, असा प्रसंग तुझ्यावर आला तर त्यातून तरुन जाण्याइतका आत्मविश्वास तुझ्यात आहे.

  हे छानच आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ इतकंच असतं का? अशा कोणत्या गोष्टी आहेत जेथे तुझ्या स्वातंत्र्याचा संकोच होतो? अशा वेळी तू काय करतेस? काही ठिकाणी आपण तडजोड करू शकतो. मात्र कुठे स्वातंत्र्याशी तडजोड करायची आणि कुठे नाही, याची स्पष्टता तुला आहे का? तडजोड करायची नाही असा प्रसंग आला, तर तेथे तू स्वातंत्र्याचा आग्रह कसा धरतेस/ धरशील?

  (आणि लिहिताना विरामचिन्हांचा श्वास घेत जा, आम्हाला वाचताना धाप लागते.)

  ReplyDelete
 5. अशा कोणत्या गोष्टी आहेत जेथे तुझ्या स्वातंत्र्याचा संकोच होतो?

  एकत्र कुटुंब पद्धतीत रहाताना ब-याच गोष्टींसाठी स्वातंत्र्याचा संकोच होतो.पण प्रसंगानुसार वेळच्या वेळी त्यावर तोडगा काढता येतो.समोरच्याला मला पटवून देता येतं,आणि त्यावर समोरची व्यक्ती विचार करुन माझे म्हणणे स्विकारते. या सर्व गोष्टी पूर्वी समोरची व्यक्ती दुखावेल,माझं म्हणणं मांडायलाही माझ्यात धाडस कमी पडत होतं कारण माझा हेतू काय ? त्यामागची माझी भुमिका काय हे त्यांच्यापर्यंत स्पष्ट होतं नव्हतं. मग त्यातून रुसवे फुगवे, वादविवाद,मनस्ताप या गोष्टींची भर पडत होती. आता या सगळ्याच्या वर मी मात केली आहे. मला जे पटते, तेच मी करते. याविषयीच्या माझ्या कल्पना कश्या स्पष्ट आहेत हे समोरच्याला पटवून सांगते. एवढं करुनही प्रॉब्लेम येत असेल तर त्यापासून अलिप्त होते. जेणे करुन नाती दुखावली जात नाहीत.
  घरातले सणवार साजरे करताना माझ्या मर्यादा मला माहीत आहेत.तश्या त्या इतरांनाही माहीत आहेत.मूर्तीपूजा,आणि त्या अनुशंघानं येणा-या आजूबाजूच्या गोष्टींवर माझा विश्वास नाही.ते सर्व हक्क दादा-वहीनींना दिले आहेत. त्या व्यतिरीक्त जी आजूबाजूची मदत लागते त्यात माझा सहभाग असतो.ते करण्यात मला जास्त आनंद मिळतो.
  आत्ताही घरात बाबा गेल्यानंतर नवरात्र डेक्कानच्या घरात तुमच्याकडे बसवू असा आईंचा आग्रह होता. तुमच्याकडे पेक्षाही माझ्या देव्हा-यात टाक रहातील असा आग्रह होता.पण त्यामागे तुला मुलगा आहे म्हणून टाक आपल्याच घरात रहातील हा विचार आईंनी माझ्या समोर मांडला. हे मनाला खूप त्रास देऊन गेलं. तेव्हा मी तुमच्या पद्धतीने मला नवरात्र नाही बसवता येणारं असे स्पष्ट त्यांना सांगितले. आणि टाक ठेवले की सागरसंगीत रोजची जी पूजा करावी लागणार.सोवळं ओवळं पाळावं लागणार.हे मला जमायचं नाही.कारण कौस्तुभने जर पूजा केली नाही तर काही वेळा मी ही करत नाही. आणि काहीवेळा महीन्याच्या अडचणींच्या त्या चार दिवसातही मी देवघरापाशी जाते हे तुम्हाला चालणार नाही. हे त्यांच्याशी बोलल्यावर आता ते टाक दादांच्या देवघरात आहेत.मला वाटतं आता मला स्वातंत्र्याचा आग्रह धरायला जमत आहे.

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...