Sunday, March 25, 2012

माझे स्वातंत्र्य

माझे स्वातंत्र्य

माझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीचे भान ठेवून इच्छेप्रमाणे वागण्याची मुभा.

मात्र ही आदर्श व्याख्या झाली. मी स्वतः त्याप्रमाणे वागते का?
तर पूर्णत्वाने नक्कीच नाही. लहानपणापासूनच मला "वडीलधारी मंडळी सांगतील त्याप्रमाणे वागणे योग्य" असेच शिकवले गेले. स्वतःहून निर्णय घेण्याची संधी मला फारशी मिळाली नाही. किंवा मिळालीच तर ती मला पेलता आली नाही. हे सांगताना मला लहानपणीचे काही प्रसंग आठवतात.

तिसरी चौथीच्या सुमारास माझ्या जवळच्या मैत्रिणी नाचाच्या वर्गाला जात. मलाही नाच शिकायची खूप इच्छा होती. मात्र तसा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला घरून मिळालं नाही. मैत्रिणींनी घरी येऊन आईला गळ घालूनही मला परवानगी मिळाली नाही.

त्यानंतर आठवीच्या सुमारास मला चित्रकलेच्या वर्गांना जायची इच्छा होती. ते शाळा सुटल्यावर उशिरापर्यंत असत. त्यावेळी मी घरी हट्ट करून त्यांना जायला सुरुवात केली. मात्र चित्रकलेमुळे अभ्यासात मागे पडलेले चालणार नाही, पहिल्या पाचात नंबर आला पाहिजे असा सततचा धाक मला काही काळाने असह्य झाला. आणि मी ते वर्ग अर्ध्यावरच सोडून दिले.

दहावीला मला ९०% गुण मिळाले. पण त्यामुळे ताण कमी व्हायच्या ऐवजी वाढलाच. मग बारावीच्या परीक्षेच्या वेळी माझ्याकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे मला पेलवलेच नाही. आणि त्या परीक्षेत अपेक्षेइतके यश न मिळाल्यावर मला खरं तर हायसंच वाटलं, की आता माझ्यावरील अपेक्षा संपतील. लग्नापर्यंत मला घरून कधीही मुक्कामी सहलीला पाठवले नाही. प्रत्येक वेळी मिळालेला नकार पाहून हळूहळू मला अशीच सवय लागली की कसलाही हट्ट करायचा नाही आणि जे सांगितले जाईल ते विनातक्रार ऐकायचे.

मी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे नीरज बरोबर लग्नाचा. तो मी कसा घेतला याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. कदाचित पहिल्यांदाच मला घराबाहेरील कोणाचे तरी पाठबळ मिळताना दिसले म्हणून असेल. घरातून सुरुवातीला विरोध होऊनही मी निदान घरी इतकं तरी सांगू शकले की मला नीरज बरोबरच लग्न करायचे आहे.

आता मला स्वातंत्र्य असले तरी लहानपणीच्या सवयीमुळे म्हणा किंवा बुजऱ्या स्वभावामुळे म्हणा मी त्याचा पुरेसा उपभोग घेत नाही असे मला वाटते.

>> मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?
हो. मी आर्थिकदृष्ट्या नक्कीच स्वतंत्र आहे. लग्नानंतर सुरुवातीला मी कमावत नव्हते तेव्हाही स्वतःच्या इच्छेप्रमाणे खर्च करायची आडकाठी नव्हती. मात्र इतर कोणाला उत्तर द्यावे लागत नसले, तरी मला स्वतःलाच कुठेतरी थोडं अडखळायला होत असे. आता स्वतः कमवायला लागल्यावर (आताही मी ऑफिसमध्ये केलेल्या कामाचा मोबदला म्हणून पगार घेते) तोही प्रश्न उरला नाही.

>> शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?
माझ्यावर शारीरिक किंवा मानसिक बंधने आहेत असे नाही, मात्र माझ्या स्वभावानुसार कुठेतरी मला शारीरिक आणि मानसिक आधार घ्यायची सवय झाली आहे. ही सवय दूर व्हावी अशी माझी इच्छा आहे, मात्र त्यादृष्टीने पुरेसे प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत, किंवा खरंतर त्यासाठी लागणारे धैर्य मला गोळा करता येत नाही.

>> वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?
हो. नक्कीच. मात्र माझा स्वभावच वैचारिक बंडखोरी करण्याचा नसल्याने या स्वातंत्र्याचा कस लागण्याची वेळ माझ्यावर फारशी आलेली नाही.

>> लैंगिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?
हो. नक्कीच. याबाबतीत माझ्या निर्णयाचा पूर्ण आदर राखला जातो.

>> रोजच्या दिवसभराच्या कामात स्वतंत्र आहे का?
रोजच्या दिवसभराच्या कामात मी बरीचशी स्वतंत्र असले, तरी पूर्ण नाही. काही कामांसाठी (विशेषतः घराबाहेरील) मी अवलंबून असते. या बाबतीत मी प्रयत्नपूर्वक स्वावलंबी बनण्याची गरज आहे.

>> कुठले निर्णय घेण्याचं स्वतंत्र्य मला आहे? कुठले नाही?
आता सर्वच प्रकारचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला आहे. स्वातंत्र्य नाही असा अमुक एक निर्णय डोळ्यांसमोर येत नाही. अर्थात काही निर्णय कुटुंबातील व्यक्तींचे मिळून असतात, पण त्या निर्णयातही माझा पुरेसा सहभाग असतो.
आदित्यला आम्ही लहानपणापासूनच स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास प्रोत्साहन देत आलो आहोत. तो ज्या आत्मविश्वासाने निर्णय घेतो ते पाहून मला आनंद होतो.

>> एक बाई म्हणून मी स्वतंत्र आहे का?
अर्थात आपल्या समाजात वावरताना बाई म्हणून विशिष्ट अपेक्षा आणि मर्यादा येतातच, आणि त्याचा त्रासही होतोच. पण या बाबतीत लहानपणापासून बिंबवलेले असल्याने कुठेतरी त्याबद्दल स्वीकारलेपण आले आहे.

9 comments:

 1. प्रांजळपणे लिहिले आहेस. आवडले.
  अजूनही नाच किंवा चित्रकला शिकू शकशील.
  शिकण्याचे वय कधी संपत नाही.
  >> शारीरिक आणि मानसिक आधार घ्यायची सवय झाली आहे. ही सवय दूर व्हावी अशी माझी इच्छा आहे, मात्र त्यादृष्टीने पुरेसे प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत, किंवा खरंतर त्यासाठी लागणारे धैर्य मला गोळा करता येत नाही.
  कुठल्या गोष्टींसाठी आधार लागतो, शोधून काढ. नीट प्लॅन कर. आधी छोट्या छोट्या गोष्टी स्वत: करायला लाग. बाकीच्या सगळ्याजणी सहज ज्या गोष्टी करतात, त्या करताना कशाची भीती वाटते? ते शोध. नीट विचार केलास की त्यात घाबरण्याजोगे काही नाही हे लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की (शक्यतो) आधार घ्यायचा नाही हे ठरव. ते ठरवलेस की बाकीचे सोपे आहे. तुला जमू शकेल.

  लहानपणी कसं वाढवलं गेलं याचे परीणाम दूरगामी असतात तरी आत्ताच्या आपल्या सवयींचं ओझं आईबाबांवर नाही टाकता येणार. त्यांच्या प्रभावातून बाहेर पडल्यावर, केंव्हातरी १८ व्या, २० व्या, २२ व्या वर्षी आपलं आपल्याला ठरवायला लागतं की माझं आयुष्य मी कसं जगणार आहे.

  सगळ्यात महत्त्वाचं स्वत:शी संवाद! तो तुला जमतो. स्वत:कडे तटस्थपणे पाहायला जमतंय का? स्वत:ची शक्तीस्थळे आणि कमजोरी कळाली की त्यावर काम करता येतं.
  मस्त!
  शुभेच्छा!

  ReplyDelete
 2. हे वाचताना मला असं वाटलं की आपल्यात काय नाहीये, आपण काय करत नाही यावरच जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे. एक तुलनेचा सूरही जाणवतो आहे. माझ्या आजूबाजूच्या मुली, बायका हे असं कायकाय करतात त्यातलं मी काहीकाही करत नाही. आणि म्हणून मी स्वातंत्र्याचा पुरेसा उपभोग घेत नाहीये वगैरे वगैरे.
  याला एक दुसरी बाजू आहेच ना... माझ्यात काय आहे, मी काय करते, करू शकते. इतर चारजणी करत नाहीत असं मी काही करते का ? अगदी साधं उदाहरण म्हणजे मुंबईतला लोकल प्रवास. मुंबईबाहेरच्या बहुतेकांना गांगरवून टाकणारा हा प्रवास मुंबईकरांना मात्र ’त्यात काय विशेष’ असं वाटायला लावतो. पुण्यात वाहन चालवण्याबद्दल असंच उलट्या बाजूने म्हणता येईल.

  आपलं आयुष्य मोजायला आपण आपली स्वत:ची पट्टी वापरतो का स्वत:ला इतरांच्या पट्टीने मोजून आपलं उत्तुंगपण मिरवतो वा खुजेपणाने वरमतो हा माझ्या मते कळीचा मुद्दा आहे.

  आपल्यामध्ये अनेक भूमिका नांदत असतात. आई म्हणून आपली भूमिका जोखताना आपली एकटीची पट्टी उपयोगाची नाही, आपल्या मुलाच्या पट्टीचाही विचार तिथे केला जायला हवा. तसंच सहकारी, मुलगी, वरिष्ठ, कनिष्ठ, सून, बायको, मैत्रीण या सगळ्या भूमिकांच्या बाबतीत.

  या सगळ्या भूमिकांच्या पलिकडे आपलं मीपण शिल्लक असतं, असायला हवं आणि ते जे आपलं असणं आहे त्याचं मोजमाप करण्यासाठी आपण फक्त आपली पट्टी वापरायला हवी. आपलं आकलन, आपल्या जाणीवा जशा विस्तारत जातील तशी ही आपली पट्टी बदलत जाईल.

  हे मीपण जागं ठेवणं आणि त्याचं मोल करण्याचा हक्क स्वत:कडेच अबाधित ठेवणं म्हणजे स्वातंत्र्य, मुक्ती, आत्मनिर्भरता असं मला वाटतं.

  ReplyDelete
 3. मिलिन्द,
  तू म्हणतोस त्यात मला बऱ्याच अंशी तथ्य वाटतं. सभोवतालच्या सर्वांच्या निकषांच्या पट्ट्या वापरणे योग्य नाही.
  मला जमणाऱ्या गोष्टींपेक्षा न जमणाऱ्या गोष्टी चटकन ध्यानात येतात आणि मग सगळा minus points चा हिशेब सुरु होतो. plus points या गर्दीत कुठेतरी तळाला जातात.
  तू म्हणतोस तशी माझी स्वतःची पट्टी मला शोधायला हवी.
  -स्मिता

  ReplyDelete
 4. मीही ह्या विषयावर लिहायला घेतलं तर माझं लेख डिट्तो स्मितासारखाच होईल (अगदी दहावीत ९०% सुद्धा).
  त्या दृष्टीने मिलिंदने दिलेला सल्ला अगदी पटला...

  या सगळ्या भूमिकांच्या पलिकडे आपलं मीपण शिल्लक असतं, असायला हवं आणि ते जे आपलं असणं आहे त्याचं मोजमाप करण्यासाठी आपण फक्त आपली पट्टी वापरायला हवी. आपलं आकलन, आपल्या जाणीवा जशा विस्तारत जातील तशी ही आपली पट्टी बदलत जाईल.

  हे मीपण जागं ठेवणं आणि त्याचं मोल करण्याचा हक्क स्वत:कडेच अबाधित ठेवणं म्हणजे स्वातंत्र्य, मुक्ती, आत्मनिर्भरता असं मला वाटतं.>> वाह !!!

  ReplyDelete
 5. >> माझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीचे भान ठेवून इच्छेप्रमाणे वागण्याची मुभा
  व्याख्या म्हणून मला ही (बऱ्यापैकी) आवडली.

  मात्र एकदा का ती स्वीकारली, की मग स्वतःची इच्छा समजून घेणे आणि आपली जबाबदारी कोणती याची नीट जाणीव करून घेणे महत्वाचे ठरते. या दोन्ही गोष्टी अतिशय कठीण आहेत, पण माझ्यामते त्यादृष्टीने अविरत प्रयत्न करत राहणे आवश्यकच आहे.

  खरंतर आपल्याला काय हवे आहे हे प्रत्येकाला आतून ठाऊक असते. मात्र वर्षानुवर्षे संस्कारांची, तत्वांची, योग्यायोग्यतेच्या कल्पनांची पुटे चढल्याने आपण कित्येकदा आपल्याही नकळत आपल्याला हवे ते नाकारत असतो. प्रत्येक संस्कार, तत्व, कल्पना विचारांनी तपासत राहणे; त्यातील अयोग्य वाटतील त्या टाकून देण्याची तयारी ठेवणे आणि या प्रक्रियेदरम्यान आपल्याला काय हवे आहे याची जाणीव वाढवत नेणे, हे केलेच पाहिजे. (सर्वसाधारणपणे हे पुरुषांपेक्षा बायकांना अधिक चांगले जमते असे माझे वैयक्तिक मत आहे. (विनोद म्हणून हे लिहिलेलं नाही.))

  आपली जबाबदारी कोणती हे ठरवणे अत्यंत कठीण आहे. मानसशास्त्रातील एका मतानुसार, प्रत्येक माणसात "स्वतःची जबाबदारी नाकारण्याची" (character disorder) आणि/अथवा "नसलेली जबाबदारी घेण्याची" (neurosis) प्रवृत्ती कमीअधिक प्रमाणात असतेच.

  यांपैकी "नसलेली जबाबदारी घेण्याची" प्रवृत्ती असेल तर स्वातंत्र्याचा संकोच झपाट्याने होत जातो. उदा. नेहेमी छान (nice) वागणे ही आपली जबाबदारी मानली की अनेक ठिकाणी इच्छेला मुरड घालावी लागते. केव्हा छान वागायचं आणि केव्हा नाही हे ठरवलं तर स्वतंत्राप्रमाणे वागण्याची संधी उपलब्ध होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

  ("स्वतःची जबाबदारी नाकारण्याची" प्रवृत्ती असेल तर वेगळ्या समस्या निर्माण होतात. काही वेळा इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो.)

  असे म्हणतात, की “खरेतर माणसाला स्वातंत्र्याची भिती वाटते”. स्वतंत्र व्यक्तीवर स्वतःच्या निर्णयांची, कृत्यांची जबाबदारी असते. जबाबदारी घेणे हे कधीही त्रासाचे असते. कित्येकदा माणसे जोखीमेतून सुटका करून घेण्यापायी स्वतःचे स्वातंत्र्य सोडून देतात. (आपल्या समाजात तर हे फारच दिसते.)

  आपले स्वातंत्र्य असे आपणच सोडून देत नाही आहोत ना, हे पाहत राहिले पाहिजे.

  (स्वतःच्या बायकोच्या लेखावर प्रतिक्रिया देणे कठीण काम आहे)

  ReplyDelete
 6. सर्वसाधारणपणे हे पुरुषांपेक्षा बायकांना अधिक चांगले जमते असे माझे वैयक्तिक मत आहे.>>>
  मला अगदी उलट वाटते. म्हणजे बायकांपेक्षा ते पुरुषांना करणे जमते. (चांगले कि वाईट हे नंतर ठरवू. पण निदान पुरुषांना ते जमत तरी)

  १. प्रत्येक संस्कार, तत्व, कल्पना विचारांनी तपासत राहणे >>> आपल्याच आधीच्या लेखांमध्ये आपण सगळ्यांनी चर्चा केलीये तसं, बायकांना कोणत्याही संस्कार, रूढी, परंपरा, तत्व, कल्पना तपासून पहायचे संस्कार दिले जात नाहीत. आणि तिच्याकडून तशी अपेक्षाही केली जात नाही. उलट तिने कारण न विचारता आत्तापर्यंत जे चालत आले त्याचा (तत्व, कल्पना, परंपरा) स्वीकार करावा अशीच अपेक्षा असते सगळ्यांची. त्यामुळे मुळातच स्त्रीला आपल्याला नक्की एखाद्या गोष्टीविषयी काय वाटतेय हा विचार करायला आपलं अंतर्मन जाग ठेवावं लागतं. हि एक active प्रोसेस आहे जिची सवय स्वत:ला आवर्जून लावून घ्यावी लागते. आपेआप लागत नाही. बहुतेक वेळा जे चालले आहे त्याचा सरसकट स्वीकार करणे बाईला जास्त सोपे असते. मग तो मार्ग जास्त वेळा निवडला जातो.

  २. "त्यातील अयोग्य वाटतील त्या टाकून देण्याची तयारी ठेवणे">>> हे मुद्दा १ पेक्षाही जास्त अवघड आहे. कारण हि तयारी म्हणजे नुसता आपला विचार अमलात आणणे नसते, तर कधीकधी आपल्याच आसपासच्या अनेक लोकांविरोधात/ समाजाविरोधात पुकारलेले बंड ठरते. उदा. वैष्णवीने लिहिलेला अधिक मासाच्या लेखात तिला तिच्या नवर्याने मोठेपणा/समजूतदारपणा दाखवून ते वाण घ्यायला नको आहे." पण सासरच्यांना नका घेऊ सांगितलेले आवडणार नाही. " ह्या एका वाक्यात मला वाटत सार काही येत.. म्हणजेच प्रवाहाविरुद्ध पोहायला जी ताकद लागते ती प्रत्येक बाईत असेलच असं नाही.

  ३. आपल्याला काय हवे आहे याची जाणीव वाढवत नेणे >> साधारण निरीक्षण असे आहे कि सुरुवातीलाच आपल्याला काय हवे आहे याचा विचार नाही केला तर आपल्याला काय हवे आहे याचा विचार करणे हळूहळू मागे पडते. लग्न झाल्यावर हळूहळू बाईच्या गळ्यात काम, मुले, संसार पडत जाते तसतसे तिला स्वत:ला काय हवे आहे याची जाणीव वाढण्याऐवजी कमीकमीच होत जाते. किंवा "मला आत्ता काय वाटतंय/ हवंय" याकडे दुर्लक्ष करण्याची सवय पडते. असं करणंच खुपदा आपल्या पारंपारिक कुटुंब संस्थेसाठी (किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर घरातली मनशांती टिकवण्यासाठी) हिताचं ठरत. म्हणून घरातल्या शांततेला खूप महत्व देणारी बाई "घरात वाद होण्यापेक्षा नकोच मला ते स्वातंत्र्य" असं स्वत:शी म्हणते.

  ४. (स्वतःच्या बायकोच्या लेखावर प्रतिक्रिया देणे कठीण काम आहे) >> असेलही. पण तुमच्यातल नात अधिक प्रगल्भ व्हावं यासाठी प्रतिक्रिया रूपाने तुझा जो काही प्रयत्न आहे तो स्तुत्य आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. माझ्या प्रतिक्रियेत मी "केले पाहिजे" या सदराखाली जे जे लिहिले, तो उपदेश होता आणि केवळ बायकांसाठी होता, असा गैरसमज झाला का?

   उपदेश करणे हा माझा हेतु नव्हता. "केले पाहिजे" या सदराखाली मी जे काही लिहिले ते "मी केले पाहिजे" असे मला वाटते म्हणून. आणि जे काही लिहिले आहे, ते स्त्री अथवा पुरुष कोणत्याही व्यक्तीला लागू आहे.

   माझ्या प्रतिक्रियेतून हे आधीच स्पष्ट न केल्याबद्दल क्षमस्व.

   Delete
  2. बरोबर आहे.. हे दोघांनाही लागू आहे. पण माझा मुद्दा पुरुषांना ते अधिक सोपे आहे असा होता.

   Delete
 7. पियु, मलापण तुझा मुद्दा पटला आहे. पुरुषांना आधीपासूनच आपल्या समाजात स्त्रियांपेक्षा अधिक स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आजूबाजूची परिस्थिती (स्त्रियांपेक्षा) अधिक अनुकूल असते.
  'मला काय हवे आहे ही जाणीव आपल्याला असायला पाहिजे' हे भान जर मूळातच नसेल तर ते प्रयत्नपूर्वक कसे आणायचे? कठीण आहे. स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी घेणे आणि ती पेलणे ही पुढची गोष्ट झाली.

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...