एक व्यक्ती म्हणून कळत्या समजत्या वयात मला स्वातंत्र्य होतं का ?
माझे आई वडिल म्हणजे मागची पिढी. त्यामुळे सामाजिक, कौटुंबिक दबाव/दडपण या वातावरणातले. पण मुलगी म्हणून भेदभाव, बंधनं, एक स्त्री म्हणून समाजाकडून ठरवलेले नियम लादणं असं कधीच झालं नाही.
लग्न करताना स्थळ निवडीचं स्वातंत्र्य होतं. कशापध्दतीने त्याच्या कडे बघ असं मार्गदर्शन नक्कीच होतं. पण अंतीम निर्णय माझा होता.
लग्ना नंतर परक्या घरात येणं, तेथील रितीरिवाज समजून घेणं, त्याची माझ्या विचारंशी सांगड घालणंही माझी जबाबदारी होती. सुरुवातीला दडपण होतच. सासूबाईंनी एक व्यक्ती म्हणून मला खूप आदराने वागवलं. मंगळसूत्र, बांगड्या घाल्याव्या, कुंकू लावाव ह्या त्यांच्या अपेक्षा होत्याच. पण मग मी त्याकडे माफक अपेक्षा म्हणून बघितलं. कारण त्याबाबत कधीच आग्रह नव्हता.
सणवार, देवपूजा, धार्मिक कार्यक्रम, ह्याबाबत माझं काय मत आहे ते मांडण्याच आणि अवलंबण्याच स्वातंत्र्य मला आहे. ह्याबाबत आनंदबरोबर काही बाबतीत मतभेद आहेत. पण त्याच दडपण कधीच नाही.
मी आर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र आहे का ?
ह्याचा दोन पध्दतीने विचार केला.
१. मी स्वत: कमवून पूर्णपणे माझे खर्च, माझं घर चालवू शकते का ? तर नाही
२. आमच्या दोघांच्या उत्पन्नातून होणारे खर्च मी मला हवे तेव्हा हवे तसे करु शकते का ? हो.
घरातील कोणतेही मोठे आर्थिक निर्णय आम्ही दोघे मिळून घेतो.
लैंगिकद्रुष्ट्या मला हो / नाही म्हणण्याच स्वातंत्र्य आहे का ?
हो नक्कीच.
एकंदरीत सर्व पातळ्यांवर एक स्त्री म्हणून मला माझ्याशी निगडीत सर्व लोकांकडून स्वातंत्र्य आहे.
हे स्वातंत्र्य मी एक व्यक्ती म्हणून प्रत्येक ठिकाणी पेलू शकते का ?
घरातील कोणतेही मोठे निर्णय घेताना, कोणत्यानी मानसिक ताणाचा विचार करताना, भविष्यातील काही प्रकर्षाने जाणवणार्या चिंतांचा विचार करताना (तब्येत) मी कमकुवत होते. आणि मग एकट्य़ाने निभावणे, खंबीरपणे त्याकडे बघणे ह्याबाबत मी जवळच्या व्यक्तिचा आधार शोधते.
हे स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते का ? मला माहीत नाही.
माझ्याकडे काम करणार्या बाईंशी मी स्त्री म्हणून कशी बघते / वागते ?
कधीही रजा घेताना त्यांनी विचारल्यास नाही म्हणत नाही. (गावी जाणार असल्यास अजून एक दिवस जरुर घ्या असे सुचवते)
न सांगता सुट्टी झाल्यास फक्त कारण विचारते. (इथे आपणही कधीतरी कंटाळा आला म्हणून कामावर काहीतरी सबब सांगून सुट्टी घेतॊ हा विचार करते)
त्यांची तब्येत बरी नसल्यास त्यांना मदत करते किंवा एखाद काम राहू देण्यास सांगते.
एखाद्या मोठ्या सणावाराला जसे दिवाळी, दसरा, पाडवा इ. दिवशी सुट्टी घ्या असे सुचवते.
स्वातंत्र्याची नक्की व्याख्या काय ?
सामाजिक पातळीवर विचार केला तर ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही बर्याचश्या स्त्रीयांना स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे ह्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे खूप गोष्टी ह्या प्रथा, पध्दत, संस्कार ह्या शब्दांमधे पाळल्या जातात. आणि मग पुढे हीच स्त्री आपल्या मुलीला तू मुलगी म्हणून कशी वाग असे सांगते. आणि तेव्हाच तिच्या बाबतीतला स्वातंत्र्याचा कप्पा बंद होतो.
वैयक्तिक पातळीवर आपण त्याकडे कसे बघतो हे महत्वाचं वाटतं.
मी एक स्त्री म्हणून माझं आयुष्य समाधानानं जगत आहे. माझ्यातील मुलगी, बहीण, बायको, आई ही सर्व नाती मला खूप बळ देतात.
>> मी एक स्त्री म्हणून माझं आयुष्य समाधानानं जगत आहे
ReplyDeleteआवडलं.
>>स्वातंत्र्याची नक्की व्याख्या काय ?
तुझी व्याख्या काय आहे?
वैशाली, छान.
ReplyDelete>> मी स्वत: कमवून पूर्णपणे माझे खर्च, माझं घर चालवू शकते का ? तर नाही.
याचं उत्तर 'हो' आहे असं मला वाटतं. तुम्ही सर्वच जणी, निकड असेल तर सहज स्वतःचं घर स्वतः चालवू शकाल/ शकता. आता तसे करत नसलात तरी त्याचा फार बाऊ करायची गरज नाही, असे मला वाटते.
>> मी जवळच्या व्यक्तिचा आधार शोधते. हे स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते का?
अगदी ढोबळपणे पाहिलं तर आधार घेतल्याने स्वातंत्र्याचा संकोच होतोच. (पण हे केवळ भावनिक बाबतीत नाही. आपली सगळी समाजव्यवस्थाच परस्परावलंबनावर उभी आहे. धान्यासाठी शेतकारी आवश्यक हे आपण प्राथमिक शाळेत मुलांना शिकवतोच की. मग शेतकरी नसला, तर धान्य नाही, म्हणजे आपण परावलंबी, म्हणजे स्वतंत्र नाही.)
मात्र याकडे असं काटेकोरपणे तांत्रिक दृष्टीतून न पाहता सूक्ष्मपणे पहावं. जवळच्या व्यक्तींचा भावनिक आधार हा केवळ आवश्यकच नाही तर आयुष्य समृध्द करणारा असतो. आपण अशा आधाराच्या आहारी जात नाही आहोत, याची काळजी घेतली की पुरे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
>> मी स्वत: कमवून पूर्णपणे माझे खर्च, माझं घर चालवू शकते का ? तर नाही
ReplyDeleteहे उत्तर मी सद्यस्थिती समजून लिहीले आहे. शेवटी वेळ आलीच तर एखादी अशिक्षित स्त्री जी कधीसुध्दा घरा बाहेर पडली नाही तिला सुध्दा कुटूंब चालवाव लागतं.
>> मात्र याकडे असं काटेकोरपणे तांत्रिक दृष्टीतून न पाहता सूक्ष्मपणे पहावं. जवळच्या व्यक्तींचा भावनिक आधार हा केवळ आवश्यकच नाही तर आयुष्य समृध्द करणारा असतो. आपण अशा आधाराच्या आहारी जात नाही आहोत, याची काळजी घेतली की पुरे.
- हो. खूप पटलं.