Thursday, March 8, 2012

या बायकांना हवंय तरी काय?



परदेशात महिलांना मतदानाच्या हक्कांसाठी लढावं लागलं, इथे पहिल्या निवडणूकीपासून सर्व महिलांना, पुरूषांच्या बरोबरीने हा हक्क मिळालेला आहे.
शिक्षण?? हवं ते आणि हवं तेव्हढं शिकवतो की आम्ही मुलींना!
नोकर्‍या करताहेत, कितीतरी स्त्रिया उच्चपदस्थ आहेत!
सातच्या आत घरात असं कोणी बजावत नाही. (आपापलं सांभाळून असा म्हणजे झालं)
गाड्या चालवतात, स्वत:च्या जीवावर प्रवास करतात.
घरकामातही पुरूष मदत करतात, जे करत नाहीत त्यांना महिलांच्या श्रमांची जाणीव आहे.
हवे ते कपडे घालताहेत, कोणी त्यांना अडवत नाही.
कायद्याने वारसा हक्क आहे.
झालंच की सगळं काही पुरूषांसारखं!
आता या बायकांना हवंय तरी काय?

खरं आहे, उच्चवर्णीय, मध्यम/उच्चमध्यमवर्गीय स्त्रियांना हे सगळं मिळतं आहे.
तरी सामाजिक संकेतांचा काच त्यांना आहेच!
रात्री बारानंतरची अघोषित संचारबंदी आहे.

बायकांना काय हवंय ?
”आपण बायकांना स्वातंत्र्य देतो’ चा, हा जो दर्प आहे ना, या वाक्यांना तो नकोय. आम्ही स्वतंत्र आहोतच, कृपया ते देण्याचं औदार्य दाखवण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये. ते सहज, स्वाभाविक,  असावं.

आता आम्हांला माणूस म्हणून जगू द्या
नका आम्हांला देव्हार्‍यात बसवू
आम्हांला चूकू द्या
आम्हांला भरकटू द्या
सावरायला पुढे नका येऊ
आम्ही ठरवू, काय करायचं ते!
आम्हांला ते प्रतिष्ठेचे दागिने नकाच घालू,
संस्कृतीचं ओझं नका मानेवर ठेवू
मग त्या इज्जतीच्या झेंड्यासाठी
आमचा बळी द्यावा लागतो.
मिरवा तुमचे तुम्हीच ते!
आमचा पाय घसरला
तर नका तुम्ही मान खाली घालू
आमची जबाबदारी आम्ही पेलू
आमचेही खांदे समर्थ आहेत.
आणि ते तुमचं संरक्षण,
काळजी घेणं, करणं,
नकोय आम्हांला
त्याचं ओझं होतं.

नाहीच घाबरायचं पुरूषांना
असं ठरवल्यावर
घाबरण्यासारखं उरतंच काय??

********

5 comments:

  1. एक छोटासा बदल:
    नाहीच घाबरायचं *कुणाला*
    असं ठरवल्यावर
    घाबरण्यासारखं उरतंच काय??

    - सचिन

    ReplyDelete
    Replies
    1. :)

      बदल अमान्य!
      मला जे म्हणायचे आहे तेच लिहिले आहे!

      Delete
  2. नाहीच घाबरायचं पुरूषांना
    असं ठरवल्यावर
    घाबरण्यासारखं उरतंच काय??

    >> घाबरण्यासारख्या उरतात त्या बायकाच.. सगळ्या स्त्रियांनी एकत्र येऊन घाबरायचं नाही असं नुस्त ठरवलं तर एकाही स्त्रीविषयक कायद्याची गरजसुद्धा आपल्या देशाला लागणार नाही. पण संस्कारांमुळे म्हणा.. विचारांमुळे म्हणा.. किंवा "स्त्री हि दुय्यमच असते" हे ज्यांना ठामपणे वाटत, किंवा ज्यांना पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे हातात आलेली घराची (खरे तर घरकामाची) सूत्रे हाच मोठा विजय/ अचिव्हमेंट वाटतो..किंवा ज्यांना या पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्वत:च्या नाकर्तेपणावर पांघरून घालायचंय अश्या स्त्रियांनीच पुरुषांविषयी जास्त भीती जगात पसरवली आहे. ह्या स्त्रियांना पारंपारिक जोखडातून मुक्ती नकोय.. स्वत:ला तर नकोच पण इतर कोणालाही मिळायला नकोय... खंर घाबरायची गरज आहे ती ह्यांनाच.. पुरुषांना नाही.. "पुरुष काही स्त्रीला छळायचे असे ठरवून आईच्या पोटाबाहेर येत नाहीत" असं आपण मागेच बोललोय नाही का?? तेव्हा मुलाला "तू तुझ्या बायकोला चांगले मुठीत ठेव.." इत्यादी इत्यादी शिकवणारी बाई हिच घाबर्ण्यालायक नाही का??

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. पुरूषसत्ताक व्यवस्थेनं पसरवलेला हा गैरसमज आहे. इथेही बाईला वापरलं जातं. दोन बायकांना परस्पर विरोधात झुंजवणं पुरूषसत्तेच्य फायद्याचं आहे.
      यावरही कधीतरी लिहायला हवं आहे.
      आणि
      पुरूषांना घाबरण्यात , बलात्काराची भीती असते,
      तेही कवितेतून सांगायचं आहे.

      Delete
  3. दोन बायकांना परस्पर विरोधात झुंजवणं पुरूषसत्तेच्य फायद्याचं आहे. >> हम्म.. फोडा आणि राज्य करा...

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...