Friday, June 29, 2012

वाचकांचे लेख -- त्याच्या आयुष्यातील आपली गरज.. स्थान.. --- ३

छान लिहिलंयस ग..  
तू मनोविज्ञान किंवा विवाह समुपदेशन यापैकी कोणत्या क्षेत्रात आहेस का?
मनाचा गुंता अगदी सहज सोडवलास.. टप्प्याटप्प्याने..

तुझे काय चुकले?>> खूप लोक जेव्हा "तुझं चुकतंय" असं म्हणतात तेव्हा पटकन "माझं चुकलं" असं म्हणून एक पाउल मागे यायची माझी प्रवृत्ती आहे.. त्याचे मुळ कदाचित माझ्या मुलगी असण्यात किंवा मला ज्याप्रकारे वाढवले गेले त्यात असावे. काही वेळेस खरोखर माझी चूक असतेच.. पण ती नसते तेव्हाही माझं चुकलंय हे मी कबूल करते माझ्या अश्या वृत्तीमुळे..

"आपल्या भावना", ”आपल्याला आतून वाटणं’ हे कधीही नाकारायचं नाही.’मला वाटूच नये”, ’असं मनात नाही यायला पाहिजे’,...... अशा अपेक्षा स्वत:कडून ठेवणं हे स्वत:वर अन्याय करणारं आहे.>> हे असं म्हणणारे खूप कमी भेटतात.. आपल्या समाजात/ संस्कृतीत काही वेळेस काही विचार/भावना मनात येणे (उदा. काकस्पर्श), कोणाकडूनही कुठलीही अपेक्षा करणे हे सरसकट चूक मानले जाते. 

हा तुम्हां दोघांना वाढवण्यातला फरक आहे.>> ह्म्म्म.. हे बरोबर आहे. माझ्या बाबतीत मला आयुष्यातली बरीचशी मौजमजा करण्यासाठी मला लग्न होण्याची वाट पहायला लागली आहे (त्यामुळे मलाच माझ्या लग्नाची इतकी घाई होती कि मी सासरी जातांना रडले पण नाही :D :D) . तसं त्याचं झालं नसावं. आणि शिवाय माझ्याच नवरयापुरत बोलायचं झालं तर इकडे सासरी नातेसंबंधान्विषयी खूप पारंपारिक अप्रोच आहे. माझ्या सासरेबुवांनी कधीच अजूनही आईंना नावाने हाक मारलेली नाहीये किंवा (मी मागे म्हटलं तसं) कुठेच फिरायला वगैरे घेऊन गेलेले नाहीयेत.. मुलांची नावंसुद्धा ठेवतांना सासूबाईंना विचारले देखील नव्हते.. त्यांच्या आईने (माझ्या आजेसासूबाई) सांगितले ते नाव ठेवले. माझा नवरा तेच पहात लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने कदाचित तो माझ्याशी बोलतो किंवा माझ्यासोबत बाहेर येतो हेच खूप (आणि पुरेसे) असेल.

आपल्याला अशी पायाची दासी वगैरे व्हायचं आहे का? (तिथे स्थान निर्माण करायला पुष्कळ वाव आहे.) नाही ना?>> नक्कीच नाही. म्हणूनच मी काय ते स्थान निर्माण नाही झाले तरी चालेल.. पण त्याला त्याची कामे स्वत:लाच करू देते/ करायला लावते/ सांगते. मात्र माझ्या सासूबाई त्यावेळी आमची नव्हती हो टाप कधी नवरयाला स्वत:चे ताट स्वत: वाढून घ्या म्हणायची..असे भुवया विस्फारून सांगतात.. (मी गम्मत म्हणून सोडून देते :) ).

मुली सहसा असं करतात, तुझं काय मला माहीत नाही, त्यांच्या मनात जी घोड्यावरून दौडत येणार्‍या राजकुमाराची प्रतिमा असते, तिला आपल्या नवर्‍याचं रूप देतात. नवरा म्हणजे असा असणारच, असायलाच हवा, असं गृहीत धरतात. >> रंग-रूपाच्या बाबतीत मुळीच अशी प्रतिमा नव्हती. पण तो मला फुलासारखं जपेन (आणि माझ्यामागे भुंग्यासारखा फिरेन :D :D ), आणि सारख सारख मला काय हव नको ते विचारेन असे काहीतरी माझे विचार होते.. पण ते बरेचसे बालिश आहेत याची मला लग्नानंतर आपणहून जाणीव झाली. (शिवाय घरकाम करण्यात एवढी सूट आहे याला मी फुलासारखे जपणेच म्हणेन.)

नवरा असण्याआधी तो एक माणूस आहे, आणि तो तसा नाही आहे. हे वास्तव मुली पाहू शकत नाहीत.>> हे कोणत्या बाबतीत म्हणते आहेस? रंगाच्या, रूपाच्या, पैश्यांच्या, आवडीनिवडीच्या, सवयींच्या (उदा. स्वच्छता इत्यादी) कि स्वभावाच्या??

मला असं वाटतं लग्न झाल्या झाल्या मुली नवर्‍यात फार अडकतात, याचं कारण शारीरिक संबंध हे असावं.>> तो एक भाग झाला.. मुळात स्त्रीचं सर्वस्व.. मग ते तन-मन-धन काही का असेना.. ते नवऱ्याच्या मालकीचं आहे.. तिच्या स्वत:च नाही, या संस्कारात आहे.. तू शारीरिक अनुषंगाने म्हणते आहेस पण आजही बरयाच मुली लग्न झाले कि आपली कोणत्याही मुलाशी असलेली मैत्री/ संपर्क  कमी करते क्वचित तोडून टाकते हि भावनिक गुंतवणूक झाली ना.. आणि धनाच्या बाबतीत तर आपण नकोच बोलूयात.. तो एक स्वतंत्र विषय आहे..

बायकोशिवायही त्यांचं त्यांचं जग असतंच.>> आणि बायकोच तसं नसतं.. याच कारण पुन्हा त्यांना कसं वाढवलं गेलं आहे त्यात असत.. हो ना?

त्यामुळे जर त्याच्या आयुष्यात स्थान नाही, त्याला आपली गरज नाही असं वाटायला लागलं तर अहंकार दुखावला जात असेल, पण त्यापेक्षाही मला वाटते ही निराशा आहे.>> खुपदा असे विचार मनात येतात कि मी त्याला आपलंस करू शकले नाही.

त्याला आठवत असणारही पण तो तुला सांगत नाही आहे, अशी एक शक्यता आहे.>> असेल.. सर्वसामान्य पुरुषांप्रमाणे तोही अबोल असेल.. किंवा त्याच्या संस्कारात पुरुषाने आपल्या भावना व्यक्त करणे नसेल.

एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते असं की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आपण आहोत. केंद्रस्थानी दुसर्‍या कुणालाही, नवर्‍यालाही ठेवायचं नाही. >> थोडक्यात आपला आनंद आणि भावना परावलंबी करायच्या नाहीत. बरोबर?

मी जर त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती नाही आहे तर याचं कारण माझ्यात काहीतरी कमी आहे, असे अर्थ काढायचे नाहीत.>> हम्म्म.. याने निराशा नक्कीच कमी होईल.

मुळात खरोखरी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी सहा महिने हा खूपच थोडा कालावधी आहे, एवढ्यात तर एकमेकांची पुरेशी ओळखही होत नाही. (याबद्दल सगळ्यांनी सांगीतलं आहेच! :) )>>
हो ना.. पण मुळात आसपास नवविवाहित जोडपी पहिली कि ते प्रेमातला हा असा मिस यु लव्ह यु वाला बालीशपणा खूप करतात..त्यात पण मजा असते एक. मग मला असं वाटायचं कि आपल्या लग्नाला ६च महिने झाले, इतक्यात आपल्या नात्यातली नवलाई संपली का??कि आता मी असले काय नि नसले काय.. कुठे फरक पडतो? मी माझ्या लेखात जो प्रसंग सांगितला आहे त्यावरून मी काढलेला निष्कर्ष लग्नाला अजून ६च महिने झाले आहेत म्हणून सगळ्यांनी चुकीचा आहे असे सांगितले. पण उलट आमच्या लग्नाला २० वर्ष झाली असती आणि त्याला माझी आठवण आली नसती तर कदाचित आता मी माहेरी जाण्यात आता कसली नवलाई असं मीच म्हटलं असत..आणि मला वाईट वाटलं नसत.. नवऱ्याने आपल्याला सारख मिस यु किंवा लव्ह यु म्हणव हि अपेक्षा लग्नानंतरच्या पहिल्या ६ महिन्यानंतर असते कि लग्नाला १०-१२ वर्ष झाल्यावर?? 
कदाचित माझा प्रश्न चुकला.. एकदम स्थान वगैरे म्हणणे एकदम चुकीचे होते.. पण त्याला माझी आठवण यावी हि अपेक्षा रास्त होती.. तुला काय वाटत??

स्थान निर्माण करण्यासाठी असं वरून नाही काही करता येत.>> बर झालं सांगितलस ते.. माझा आटापिटा कमी होईल..

तुझ्या या स्वतंत्र लेखाबद्दल खूप खूप आभार.. आत्मपरीक्षण करण्यास मदत झाली आणि स्वत:ला आणि स्वत:च्या भावनांना जसे आहे तसे स्वीकारण्यासाठी सुद्धा..

ता.क. १. मी जिथे जिथे मुला-मुलीवर होणारे संस्कार आणि त्यांची वाढ असे म्हटले आहे तिथे मला पालक आणि आजूबाजूचा समाजही जे संस्कार करतो त्यांविषयी बोलायचे आहे. मी कुठेच पालकांना अश्या संस्कारांसाठी एकमेव दोषी मानलेले नाही.

ता.क. २. एवढी मोठी प्रतिक्रिया त्या लेखाखाली देण्यात तांत्रिक अडचण येते आहे त्यामुळे हि प्रतिक्रिया स्वतंत्र लेख म्हणून प्रसिद्ध करावा.

-पियू

2 comments:

  1. तुमचं काय बरोबर आहे ?

    स्वत:बद्दल, आपल्या जगण्याबाद्दल विचार करणं, तपासत जाणं.

    ही बर्‍यापैकी दुर्मीळ सवय आहे, जपून ठेवा.

    Few people are capable of expressing with equanimity opinions which differ from the prejudices of their social environment. Most people are even incapable of forming such opinions.

    - Albert Einstein

    ReplyDelete
  2. >> तू मनोविज्ञान किंवा विवाह समुपदेशन यापैकी कोणत्या क्षेत्रात आहेस का?
    :) नाही.

    >> नवरा असण्याआधी तो एक माणूस आहे, आणि तो तसा नाही आहे. हे वास्तव मुली पाहू शकत नाहीत.>> हे कोणत्या बाबतीत म्हणते आहेस? रंगाच्या, रूपाच्या, पैश्यांच्या, आवडीनिवडीच्या, सवयींच्या (उदा. स्वच्छता इत्यादी) कि स्वभावाच्या??
    प्रेमाच्या ज्या स्वप्नाळू (फिल्मी) कल्पना असतात. त्यात जसा तो केवळ तिचाच आणि ती त्याचीच असते, तसं शक्य नसतं. तो एकटा नसतो, त्याच्या गोतावळ्यासह असतो. आई वडील, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रिणी या सार्‍यांसह असतो. ( ती सुद्धा खरं म्हणजे तिच्या गोतावळ्यासह असतेच. ) शिवाय सवयी, विचार करण्याच्या पद्धती आहेत.

    >> मला असं वाटतं लग्न झाल्या झाल्या मुली नवर्‍यात फार अडकतात, याचं कारण शारीरिक संबंध हे असावं.>> तो एक भाग झाला.. मुळात स्त्रीचं सर्वस्व.. मग ते तन-मन-धन काही का असेना.. ते नवऱ्याच्या मालकीचं आहे.. तिच्या स्वत:च नाही, या संस्कारात आहे.
    मी लग्न झाल्या झाल्या लगेचचं बोलते आहे. त्याचं कारण सांगते आहे. कुठल्याही व्यक्तीशी जवळीक व्हायला, प्रेम वाटायला, ती व्यक्ती म्हणजे माझं सर्वस्व आहे , हे वाटायला किंवा समाज ’जे हे सांगत असतो ते" लगेच मनाने स्वीकारणं का होतं? हे शोधत होते.

    >>बायकोशिवायही त्यांचं त्यांचं जग असतंच.>> आणि बायकोच तसं नसतं.
    हं. खरं म्हणजे असतं, तरी ती ते मागे टाकते.

    >>खुपदा असे विचार मनात येतात कि मी त्याला आपलंस करू शकले नाही.
    स्वत:ला आणखी थोडा वेळ दे.

    >>एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते असं की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आपण आहोत. केंद्रस्थानी दुसर्‍या कुणालाही, नवर्‍यालाही ठेवायचं नाही. >> थोडक्यात आपला आनंद आणि भावना परावलंबी करायच्या नाहीत. बरोबर?
    हं आणि आपलं काम, आपलं अस्तित्व....
    हे लिहिण्याइतकं सोपं नसतं. दरवेळी जमेलच असं नाही. ’विचारांनी मान्य आहे’ इथवर पोचायलाच हवं.

    >>पण मुळात आसपास नवविवाहित जोडपी पहिली कि ते प्रेमातला हा असा मिस यु लव्ह यु वाला बालीशपणा खूप करतात..त्यात पण मजा असते एक.
    हो.
    >> इतक्यात आपल्या नात्यातली नवलाई संपली का??कि आता मी असले काय नि नसले काय.. कुठे फरक पडतो?
    तू प्रेमाच्या, नवविवाहितांनी वागायच्या रूढ कल्पना घेऊन बसली आहेस का?
    जे कोणी एकमेकांना सारखं सारखं मिस यू, लव्ह यू, म्हणत नाहीत त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही असं असतं का?
    प्रेम असणं, आठवण येणं महत्त्वाचं आहे की त्याचा उच्चार करणं?
    काही शब्द जादू करतात, हे खरं असलं तरी, नाही आपला नवरा ते म्हणत, तर किती त्रास करून घ्यायचा?
    प्रेम ही अशी गोष्ट आहे, विचारांनी ती पूर्ण उलगडत नाही.

    तू एकदा वेळ काढून त्याच्याशी बोल.
    त्याला विचार, "प्रेम म्हणजे काय? त्याची व्याख्या तू कशी करशील? तुझं माझ्यावर प्रेम आहे का?"
    तुझ्या स्वत:च्या प्रेमाबद्दलच्या कल्पना काय आहेत? त्या त्याला सांग.
    तटस्थपणे एकमेकांवर प्रेम आहे का? हे तपासून पाहा.
    विचारांनी एवढंच करता येण्याजोगं असतं.

    प्रेम हा संसाराचा पाया असला पाहिजे पण तू डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहशील तर कितीक संसार त्याशिवाय चाललेले असतात.
    त्यांना त्याची कल्पनाही नसते.
    प्रेम म्हणजे हक्क, प्रेम म्हणजे कर्तव्य, प्रेम म्हणजे जबाबदारी, प्रेम म्हणजे आपुलकी, प्रेम म्हणजे चालवून घेणं, प्रेम म्हणजे दुसर्‍यासाठी स्वत:ला मुरड घालणं, प्रेम म्हणजे बंधन.... असेच समज असतात. या सगळ्यातही प्रेम असतंच पण या सगळ्याला पुरून उरेल असं काहीतरी असतं.

    नवरा - बायकोमधे मैत्री आणि परस्पर आदर, इतकं असलं पाहिजे, म्हणजे खूप झालं.

    >> नवऱ्याने आपल्याला सारख मिस यु किंवा लव्ह यु म्हणव हि अपेक्षा लग्नानंतरच्या पहिल्या ६ महिन्यानंतर असते कि लग्नाला १०-१२ वर्ष झाल्यावर??
    :) प्रत्येकाच्या स्वभावावर आहे.
    (माझा नवरा जर रोज, सारखं, असं म्हणायला लागला तर मला त्याची काळजी वाटेल, मी त्याला विचारीन, "तुझी प्रकृती बरी आहे ना?")
    लग्नानंतरच्या सुरूवातीच्या दिवसांत.
    लग्नाला दहा बारा वर्षे झाल्यावर, सारखं म्हणावं अशी अपेक्षा? नसेल/नसते.

    >> पण त्याला माझी आठवण यावी हि अपेक्षा रास्त होती.. तुला काय वाटत??
    हो.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...