Friday, June 15, 2012

मौज-मजा




बायकांना पुरूषांशिवाय मजा करावीशी वाटत नाही किंवा त्या करत नाहीत असे सर्वसाधारणपणे दिसते.
आपल्या परंपरेत असे काही सण आहेत, जेंव्हा बायका बायका मजा करतात. उदा. हळदीकूंकू, मंगळागौर, डोहाळजेवण हे अगदी बायकांचे सण आहेत. पुरूषांना अशा समारंभांना बंदी असते आणि बायका ते साजरे करतात. अशा पुरूषपात्रविरहीत सणांमधे मजा येते.
 (आम्ही इंद्रधनुच फक्त जमतो तेव्हा अशा "पुरूषपात्रविरहीत बैठकींना" खूप मजा येते. अशावेळी बसण्या, बोलण्या, वावरण्याचे जे किंचित ताण इतरवेळी असतात, ते नसतात. मोकळं वाटतं.)
म्हणजे जर परंपरेची परवानगी असेल तर बायका बायका मजा करतात.
ही परवानगी फक्त सौभाग्यवतींना किंवा कुमारीकांना होती. विधवांना हे सगळंच नाकारलेलं. बायका बायकांच्या मजेसाठीही नवरा असणं गरजेचं होतं.
 बायकांना पुरूषांशिवाय मजा करावीशी वाटत नाही याची मुळं मला वाटतं पतिव्रताधर्मात आहेत. ( पतिव्रताधर्म आणि त्यामागचं राजकारण याबद्दल कधीतरी लिहिन.) आणि आधी पुरूष आणि नंतर बायका अशी उतरंड.
 साधी जेवायची गोष्ट घेतली तरी पुरूषांची पंगत आधी अशी पद्धत होतीच ना? उरलं सुरलं बायकांच्या पंगतीला. बाईने नवर्‍याच्या ताटात जेवायचं. त्याचं उष्ट खायचं. काही दयाळू नवरे आपल्या बायकोला मिळावं म्हणून ताटात जास्तीचं गोडधोड वाढून घेत आणि पानात ठेवत. ते म्हणजे प्रेम! आपल्या पाळीव कुत्र्यामांजरावर प्रेम करावं तसं ही पुरूषमंडळी आपल्या बायकांवर प्रेम करीत आणि बायका करवून घेत.
 अशा बायका एकट्या जेवायला हॉटेलात जातील का?
 मजा म्हणजे काय? मजेची व्याख्या आपण कशी करू? ’अ’ व्यक्तीच्या मजेची व्याख्या ’ब’ व्यक्ती नाही करू शकणार. ’अ’ ने जर सांगीतलं ती मजेत आहे तर मजेत आहे. मग इथे प्रश्न येतो संस्कारांचा, समाजातील व्यक्तीची भूमिका आणि प्रतिमा यांचा.
 पियू, इथे तू म्हणतेस तशी मजा न करण्याची मुळे बायकांवरील संस्कारांत आहेत.
 पूर्वीपासून घर हेच बायकांचं कार्यक्षेत्र होतं. त्यामुळे जी काय मजा करायची ती घरातच. अशी प्रथा होती की ’ बाहेर जाणाराला कुठे जात आहात?" असं विचारून हटकायचं नाही. नाहीतर काम होत नाही. पुरूष मजा करायला कुठे जात आहेत हे बायकांनी विचारायचं देखील नाही. वा! काय न्याय आहे?
 मला वाटते आता थोडे बदल होताहेत. बायका बदलताहेत. तुझ्या सासूबाईंसारख्या आणखीही बायका असतील पण अशा सहलींना जाणार्‍या बायकाही आहेत. तुझ्या सासूबाईंनी आवडीच्या सहलीला जाण्याची संधी का नाकारली असेल? तुला काय वाटतं?
 १)अशी संधी नाकारून त्या नवर्‍यासाठी त्याग करत आहेत, त्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळत आहे.
 २) त्याचवेळी नवर्‍याला मी तुमच्यासाठी काय काय सोडते असं सांगून ’इमोशनली ब्लॅकमेल" करून त्याचे फायदे मिळवता येतात.
 ३) आणि खरं म्हणजे त्या स्वत:च्या सुखासाठी, आनंद मिळविण्यासाठी मनाने तयारच नाहीत.
हे तिसरं जे कारण आहे ना, ते करूण आहे.
आपण बायका आपल्याला स्वत:ला सुखी करण्याचा आपल्याला हक्क आहे असं मानतच नाही.

मला असं वाटतं,  फार त्याग-बीग करू नये कोणी, बायकांनी तर नाहीच नाही. आपल्यालाही आपण हे सोडलं ते सोडलं वाटत राहतं आणि ज्याच्यासाठी त्याग करतो ना ? त्यालाही त्याचं ओझं होऊन बसतं.

>> मला स्वत:ला एक माणूस म्हणून कुठलीही मौज-मजा करण्याचा अधिकार नाही का??
आहे आणि हा अधिकार नुसता खिशात ठेवू नकोस.
मजा कर.


2 comments:

  1. मजा म्हणजे काय? मजेची व्याख्या आपण कशी करू? ’अ’ व्यक्तीच्या मजेची व्याख्या ’ब’ व्यक्ती नाही करू शकणार. ’अ’ ने जर सांगीतलं ती मजेत आहे तर मजेत आहे. >> ह्म्म्म.. हे आहेच.. म्हणजे पुरुषांच्या दृष्टीने मजा म्हणजे दारू पिणे आणि सिगारेट फुंकणे असेल तर बायकांनी पण त्यालाच मजा म्हणावं असं माझंपण म्हणण नाहीये. तरीही.. बायका त्यांना स्वत:ला करायला मजा वाटेल अश्या गोष्टीही पटकन करत नाहीत.

    तुझ्या सासूबाईंनी आवडीच्या सहलीला जाण्याची संधी का नाकारली असेल? तुला काय वाटतं? >> ते कारण बहुतेक तिसरया गटात मोडत असावं. कारण त्या म्हतात "छे छे.. माझ्या नवरयाशिवाय मी एकटी ट्रीपला कशी काय(?) जाऊ शकेन?" याशिवाय पहिल्या कारणात म्हटलंय तसं त्यांना घरात राहून समाजात प्रतिष्ठा मिळणार नाहीये.. पण एकट्या फिरायला (त्यांच्या भाषेत भटकायला) गेल्या तर "लोक काय म्हणतील?"

    मला असं वाटतं, फार त्याग-बीग करू नये कोणी, बायकांनी तर नाहीच नाही. आपल्यालाही आपण हे सोडलं ते सोडलं वाटत राहतं आणि ज्याच्यासाठी त्याग करतो ना ? त्यालाही त्याचं ओझं होऊन बसतं.>> लाख मोलाचं वाक्य.. खूप आवडलं.

    आहे आणि हा अधिकार नुसता खिशात ठेवू नकोस.
    मजा कर.>> करेनच. :) इंद्रधनुच्या पुढच्या मीटिंग ला मला बोलवा.. :D

    ReplyDelete
    Replies
    1. >>इंद्रधनुच्या पुढच्या मीटिंग ला मला बोलवा.. :D
      :)
      तू म्हणालीस तसं आम्ही लेकुरवाळ्या बायका!
      मुलांची नुकती शाळा सुरू झाल्याने गडबडीत!
      लवकरच ठरवतो आणि तुला कळवतो.
      मजा करू. :)

      -- विद्या

      Delete

सुनीता

 सुनीता माझ्याकडे केरफरशीला येते.आज इतकी वर्ष आमच्याकडे कामाला येते ,घरातली एक असल्यासारखी.तिचं काम अतिशय चकचकीत, स्वच्छ. फरशी पुसताना फरशीव...