Wednesday, November 25, 2009

आम्ही

                                  जे मला जाणवतं
                                  तेच खरं आहे,
                                  जे मला सुखावतं
                                  तेच बरं आहे.
                                  हे तुझं सांगणं
                                  "मी" ला सार्वभौम मानणारं
                                  मलाही पटतं.
                                  पण लक्षावधी संबंधांनी
                                  माणसातला मी जेंव्हा
                                  दशदिशा पसरतो,
                                  तेंव्हा आपले रस्ते बदलतात.
                                  कारण मी चं रुपांतर
                                  "आम्ही" त झालेलं असतं.

                                                                ---कुसुमाग्रज
आम्ही सहाजणींनी (आशा, अश्विनी,स्मिता,दीपा, वैशाली,विद्या) मिळून हा ’इंद्रधनु’ blog सुरू केला आहे. आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आम्ही लिहिले आहे आणि लिहिणार आहोत. बाई म्हणून जगताना येणारा कुठलाही अनुभव इथे येऊ शकतो. तो व्यक्त करताना आमच्या पॅलेटवर इंद्रधनुष्याचे सगळेच रंग आहेत. कुठलेही चित्र आम्ही काळ्या पांढर्‍या रंगात काढणार नाही, ते तसे नसतेच, आम्हांला माहित आहे. मिलिन्द आणि नीरज, तुमच्या प्रतिक्रियांचे मोल आम्ही जाणतो, जे आम्हांला आमच्या स्थानावरून दिसू शकणार नाही, ते बघायला तुमची मदत होणार आहे.

आतापर्यंतच्या आपल्या चर्चेत जे जे मुद्दे येऊन गेले त्यांचं स्त्रीवादी आकलन काय असू शकेल हे मांडण्याचा हा प्रयत्‍न.


गोष्ट एका राजकन्येची---- ’ एकेक ओंजळीमागे असतेच झर्‍याचे पाणी’ हे ’असतेच’ चं काय करायचं मिलिन्द?

हे मला ’ठेविले अनंते..’ च्या चालीवर वाटतंय. दुसरे असे झरा म्हणजे शुद्ध,निर्मळ, चवदार असं पाणी समोर येतं. त्याला युगे लोटली तो झरा ओढ्याला मिळाला, ओढा नदीला, नदी समुद्राला... आमच्या ओंजळीत जे पाणी आहे ना? ते समुद्राचे आहे खारट. मीठ खाली ठेवून, यातलं पाणी बाष्प होऊन वर जाईल आणि त्याचा पाऊस पडेल तो खरा आमचा!

वैशाली, पूर्वापार चालत आलेल्या समजुती मुले सहजी स्वीकारत नाहीत असे मला म्हणायचे आहे. ती प्रश्न विचारतात, पण त्याजोगे वातावरण आपण घरी ठेवले नाही तर त्यांना ते स्वीकारावे लागते, मग तू म्हणतेस तसे घडते.

नीरज, "पिढ्यानपिढ्यांचे संकेत असे खोलवर भिनलेले असतात की आपण म्हणजे जणू स्वतंत्र व्यक्ती नाहीच. आपण केवळ समाजप्रवाहाचे सातत्य वाहून नेणारे हमाल"

खरं आहे, असा विचार करू लागलो की हताश व्हायला होतं.

’सध्याची जी स्थिती आहे तो समाजाच्या गरजेतून उत्क्रांत होत गेली आहे’ हा एक आपल्या आवडीचा गैरसमज आहे. समाजाची गरज म्हणजे कोणाची? पुरूष समाजाची?

आणि कसंकशी उत्क्रांत होत गेली स्थिती? सुरवातीच्या भटकणार्‍या समाजात ,मातृसत्ताक पद्धती होती. स्त्री जीव जन्माला घालू शकते त्याचे कुतूहल होते, आदर होता, तिच्या ठायी देवत्व असल्याचा समज होता. मग स्थिर शेतीचा शोध लागला, पशूपालन सुरू झाले, मूल जन्माला घालण्यातील स्वतःचा सहभाग पुरूषाला कळला, मग स्त्रीचे देवत्व गेले. वंशशुद्धतेसाठी स्त्रीवर बंधने लादली जावू लागली, टोळ्यांच्या युद्धासाठी मनुष्यबळ हवे होते, त्यामुळे स्त्रीला पुनरुत्पादनाच्या कामाला जुंपले गेले.ती घराशी बांधली गेली. तिचे क्षेत्र आकुंचित होत गेले नि पुरुषाचे विस्तारित. वरकड कमाई मुळे (पूर्वी रोजचे अन्न रोज शोधावे लागे, साठवणीमुळे) स्त्री रोज घराबाहेर नाही पडली तरी चालणार होते. त्यामुळे घर सांभाळणे हेच तिचे काम ठरले गेले. तिने बाहेर पडू नये म्हणून, तिने प्रतारणा करू नये म्हणून, तिच्यावर आणखी आणखी बंधने लादली गेली. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधल्या गेल्या.

ही सगळी बंधने स्त्रीवर निसर्गतः आलेली नाहीत.

दीपा, स्त्री-पुरूषांनी करायची कामे वेगवेगळी समजली गेली, स्त्री म्हणून आणि पुरूष म्हणून वागायचे संकेत समाजाने ठरवून दिले आहेत, त्याप्रमाणेच वागायसाठी प्रत्येक जण धडपडत असतो. मोठेपणी ते अवघड जावू नये म्हणून घरोघरी समांतर शाळा सुरू असतात. त्यांचा अभ्यासक्रम बदलतोय असे जर तुझे निरीक्षण असेल तर ती चांगली गोष्ट आहे. बदल खरा तिथूनच व्हायला हवा आहे.

अश्विनी, खरं आहे देवांमधेही माणसांचे प्रतिबिंब पडलेले दिसणारच (देव झाले तरी माणसाचीच निर्मिती ना?) [देवदेवतांवर पुन्हा कधीतरी नक्की लिहूया]

वैशाली, पूर्वापार प्रथा तशाच चालू राहतात, कारण कोणी प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारायचेच नाहीत असे शिकवले गेलेले असते. प्रश्न विचारले की बदल घडतात, जसे की तुझ्याबाबतीत झाले. दुसरे म्हणजे घरातला कर्ता म्हणजे पुरूष, त्याच्या नावानेच सगळे असणार ना? त्याचं घर चालवण्यासाठी म्हणून तो लग्न करून बाईला घरी घेऊन येतो, तिचे काम तेवढेच.

पण आता चित्र बदलतंय,खरं आहे, स्मिता. नव्या सुनेला/ बायकोला नवं घर आपलंसं वाटण्यासाठी काय करायला हवं? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. [पुन्हा कधीतरी यावर लिहूया] मी स्वतः यासाठी खूप वेळ घेतला, स्वतःला खूप त्रास करून घेतला.

आशा, पुरुषप्रधान व्यवस्था पुरुषांचापण पूर्ण विचार करत नाही, खरं म्हणजे त्यांचीपण अडचणच होते, माणसाला आपल्या आवडीप्रमाणे जगण्याची संधीच यात मिळत नाही. कुटूंबासाठी कमावण्याचे (मध्यमवर्गात) प्रचंड दडपण पुरूषावर असते. पुढे कमावता येईल असेच अभ्यासक्रम त्याला निवडावे लागतात. बायको जर त्याच्या बरोबरीची त्याने मानली नाही तर तो एकटा / एकाकी पडतो. शिवाय रडण्याची सोय नाही., भावना मोकळ्य़ा करू शकत नाही, त्याचंही व्यक्तिमत्व खुरटतंच.

खरं म्हणजे स्त्री-पुरूष समानता असणारं, बरोबरीचं नातं किती सुंदर असतं. आणि आपलं आयुष्य ते किती समृद्ध करतं.

तुझा दुसरा मुद्दा पण महत्त्वाचा आहे.

स्त्रियांनी पुरुषाच्या बरोबरीने, त्याच्या कार्यक्षेत्रात कर्तृत्व गाजविले म्हणजेच तिचा दर्जा उंचावतो का?

नाही. पण तसे समजले जाते. आपल्याकडे काय आहे आशा, प्रमाण हा पुरुष आहे. म्हणजे---- सरासरीने बायकांची उंची कमी असते.(शारीरिक) ----- सरासरीने पुरूष उंच असतात ----असे नसते (खरे , अजूनही चांगली उदाहरणे देता येतील.) . त्यामुळे स्त्रीलाही तसं वाटतं. शिवाय आव्हान देणारी, बुद्धीला खाद्य पुरवणारी, अशी क्षेत्रं पुरूषांची समजली जातात. आपण सगळ्या कामांना समान प्रतिष्ठा कशी मिळवून देणार हा आपल्यापुढचा प्रश्न आहे.

पुढचे, स्त्रियांना कार्यक्षेत्र निवडीचा अधिकार/स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

स्त्रीलाच का?  पुरूषालाही.
ही फार अवघड गोष्ट असते.

मी माझ्या इच्छेने हवं ते शिकले. माझा निवडीचा अधिकार / स्वातंत्र्य मी वापरलं.

पण मी आवडीचं शिकले का? तर नाही. आपल्याला येणं आणि आपल्याला आवडणं यात अंतर असतं. अवघड असतं स्वतःची आवड ओळखणं! ती ओळखण्याची संधी आपला समाज आपल्याला देतो का? आपल्या समाजाचे हिरो कोण आहेत ? कुठल्या कामांना प्रतिष्ठा आहे? संधी आहे. समाजाची नैतिक चौकट कुठली आहे? किती उदारमतवादी आहे? आपण कुठल्या काळात जन्मलोय? तेंव्हाचे समाजाच्या पुढचे प्रश्न कुठले आहेत?------------ त्यावर आधारित आपलं निवडीचं स्वातंत्र्य असतं. ते निरपेक्ष नसतंच.

आदर्श समाज तो, ज्यात प्रत्येकाला आपल्या स्त्रीत्व आणि पुरूषत्वाच्या बंधनांपलीकडे जावून आपल्या आवडीचं काम करता येईल.

1 comment:

  1. विद्या,

    मी सहमत आहे की, कार्यक्षेत्र निवडीचा अधिकार/स्वातंत्र्य पुरुषाला ही मिळाले पाहिजे. कर्तेपणाची भूमिका निभावताना त्याला आपल्या आवडीवर पाणी सोडावे लागत असेल ब-याच वेळा.

    मी पण माझ्याच इच्छेने शिकले, पण ते मला खूप आवडीच होते म्हणून नाही तर ते मला स्वत:च्या पायावर लवकर उभे राहायला मदत करेल म्हणून!कारण तेव्हा ती माझी/माझ्या कुटुंबाची गरज होती. पण तो निर्णय माझा होता, माझ्यावर तो दुस-या कोणी (परिस्थिती शिवाय) लादला नव्हता. हा माझा मुद्दा होता.

    काही स्त्रियांना हे निवडीचे स्वातंत्र्य देखील मिळत नाही की तिने कुठला अभ्यासक्रम निवडावा, नोकरी करावी की नाही? असेही नाही की फ़क्त पुरुषच हे स्वातंत्र्य देत नाही, काहीवेळा ह्या मागे दुसरी स्त्री देखील असू शकते. पण मी पुरुषप्रधानतेबद्द्ल लिहीत होते म्हणून पुरूषाचा उल्लेख केला.

    ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...