Tuesday, November 24, 2009

बालपणीच्या आठवणी... (१)

मी अगदी लहान होते. तेव्हा आम्ही कोल्हापूरला एका वाड्यात रहात होते. माझ्याबरोबर खेळायला मालकांचा नातू होता. त्याच्याकडे तीन चाकी सायकल होती. त्यामुळे तो ड्रायव्हर आणि मी कंड्क्टर. (हे ठरलेलेच) मग ताईने उत्साहाने मला गळ्यात अडकवायची तिकीटांची ब्याग करुन दिली. प्रत्येक पैश्यांच्या तिकीटांचा गठ्ठा करुन पुठ्ठ्यावर चिकटवला. (आता एखादे तिकीट जरी हवे असेल तरी शोधावे लागेल.) मग आम्ही तिकीट देत, स्टोप घेत बराच वेळ खेळायचो. तेव्हा पासून तिकडचे परिचीत लोक मला कंडक्टर म्हणून हाक मारायचे.
दोन वर्षापूर्वी पन्हाळ्य़ाला गेलॊ होतो. तेव्हा कोल्हापूरला थांबलो होतो. आवर्जून वाड्याजवळ गेलॊ. वाडा अगदी तसाच. वर जायचा मोह झाला. मालकांच घर पण तसच. आजोबा (वय वर्ष ८८) अगदी तसेच पलंगावर पेपर वाचत बसले होते. मी आत गेले. मी कोण आले आहे हे सांगितल्यावर जोरात म्हणाले, "कंडक्टर ये" आणि मला जवळ घेतलं. मग आनंदला आणि रेणूला आमच्या ड्रायव्हर - कंडक्टर चे किस्से सांगितले. ड्रायव्हर तेव्हा कामावर गेल्याने भेट झाली नाही.
बाहेर पडल्यावर रेणूने विचारले " तू कधीच ड्रायव्हर झाली नाहीस?" मी म्हणलं "नाही, त्याची सायकल होती मग त्यानच ठरवलं" ती लगेचच म्हणाली, "मग तू का नाही तुझ्या आई-बाबांकडून तुला सायकल घेतलीस ?" मी थोडी संभ्रमात पडले. नक्की काय पोहोचतय. अस नकळत ठरवलं जात का, की कंडक्टर होण ड्रायव्हर पेक्षा खालच्या दर्जाच आहे (जस मुलांनी क्रीकेट खेळायच ठरवलं की, ब्याटींग करण्यासाठी भांडणं होतात), का आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण झाल्याच पाहिजेत, काही तडजॊड असू शकते हा मार्गच नाही.

2 comments:

 1. वैशाली,
  मस्त आठवण आहे गं!
  वाचताना लक्षात आले : आयुष्यात काही वेळा तडजोड करावी लागते हे अगदी लहानपणीच, नकळतपणे शिकून गेलो की आपण! त्यावेळेस एकत्र खेळायला प्राधान्य असायचे. मग कोणाकडे एखादी वस्तू नसेल तर ती ज्याच्याकडे आहे त्याच्या कलाने घ्यायचे हे आपोआपच व्हायचे. ज्याच्याकडे झोपाळा आहे, तॊच विमान-विमान खेळताना ‘पायलट’, बाकीचे सर्व प्रवासी; जिच्याकडे भातुकलीचा खेळ आहे, ती सांगेल तोच ‘रोल’ बाकीच्यांनी घ्यायचा. आमच्या वाड्यात ‘क्रिकेट’ खेळायचा असेल तर आऊट झाले तरी मला ३ वेळा ’बॅटिंग’ द्यावी लागे बाकीच्यांना!
  पण ह्या तडजोडीचा कुणालाच राग येत नसे, कारण मह्त्त्वाचे असायचे ते एकत्र खेळणे.

  ReplyDelete
 2. वैशाली,
  तुझ्या अनुभवात कितीतरी सकारात्मक गोष्टी दिसताहेत.
  १)रेणू कळीचे प्रश्न विचारू शकते.
  २)परीस्थितीत बदल कसा करायचा यावर विचार करते.
  ३)आपली ’आई’ आहे, मग ती कंडक्टर असणारच. हे तिने स्वीकारले नाही कारण घरात ती आईला कायम त्या भुमिकेत पाहत नाही.( आर्थिक परीस्थितीचा विचार ती करू शकणार नाही. हे स्वाभावीक आहे.)
  किती आशादायी चित्र आहे हे!

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...