Monday, November 16, 2009

गोष्ट एका राजकन्येची

मु‍क्‍ता पहिलीत होती ,तेंव्हाची गोष्ट आहे. सुहृद चार-पाच महिन्यांचा असेल. आम्ही खेळत होतो. सुहृद राजा मुक्‍ता राजकन्या. ती हसतच नाहीये. मग तिला हसवायला कोण-कोण आले, ती मात्र गंभीरच. मग राज्यात दवंडी पिटली----जो कोणी राजकन्येला हसवेल त्याला अर्धे राज्य मिळेल आणि त्याचे राजकन्येशी लग्न लावण्यात येईल हो..... ----- चार गोष्टी एकत्र करून मी ती गोष्ट रचली होती. मुक्‍ताला हे नाटक खूपच आवडले. म्हणाली,” चल परत खेळूया". आम्ही पुन्हा खेळायला सुरवात केली. आता मुक्‍ताला गोष्ट माहिती होती. दवंडीपर्यन्त आलो. मुक्‍ता दवंडी पिटायला गेली----जो कोणी राजकन्येला हसवेल त्याला अर्धे राज्य मिळेल आणि त्याचे राजकन्येशी लग्न लावण्यात येईल हो..... आणि ती जर मुलगी असेल तर ती राजवाड्यात राजकन्येची बहिण म्हणून राहिल हो.......----- मी अवाक झाले.
मला हे सुचले नव्हते. इतक्या वर्षात! कितीदा ह्या अशा गोष्टी मी वाचल्या असतील. एक मुलगी हे करू शकेल ही शक्यताच विचारात घेतलेली नव्हती. का?
पुरूषप्रधानता (Patriarchy) ही समाजात इतकी रूजलेली आहे, सवयीची आहे की ती आपल्याला सहज, नैसर्गीक वाटते. आपल्याला घडवणे/ वाढवणे असेच असते की मोठे झाल्यावर आपल्याला एक बाई किंवा पुरूष व्हायचे असते, एक माणूस नाही. लहानपणापासून ज्या गॊष्टी सांगितल्या जातात किंवा गाणी त्यातही असेच असते.(आई बिचारी रडत असेल, बाबांचा पारा चढत असेल) . मालिका, चित्रपट, नाटके .... सगळीकडेच.
मला धक्का बसला कारण मी समजत होते पुरूषसत्तेचा हा कावा माझ्या लक्षात येतो. पण तसे नाही. काही काही गोष्टी माझ्यातही भिनल्या आहेत.

4 comments:

 1. एकेक ओंजळीमागे असतेच झर्‍याचे पाणी

  ReplyDelete
 2. गोष्ट एका... वाचताना वाटलं की किती नकळत मुलं काही पूर्वापार चालत आलेल्या समजूती स्विकारतात.आपण सगळे साधारण समविचारी आहोत. पण अजूनही आजूबाजूला हेच विचार रुजवले जातात. "थांब बाबांना सांगते मग कसं ऎकशील" हे वाक्य मी सतत शेजारी ऎकते. बाबांचा धाक पाहिजेच असं मला पण ती सुचवते. "तुम्ही ए बाबा म्हणता ना त्यामुळे त्यांचा काही मानच रहात नाही. रेणू म्हणते ना म्हणून ही पण म्हणू का विचारत होती, मी ठणकावून नाही म्हणलं." तेव्हा प्रश्न पडतो मान म्हणजे नक्की काय ? तो असा ठरवून ठेवता येतो का? तो उत्स्फूर्तपणे आला पाहिजे. मानाच्या व्याख्येचीच गफलत आहे. ह्यावर खूप बोलण्यासारखं आहे.

  ReplyDelete
 3. खरं आहे. पिढ्यानपिढ्यांचे संकेत असे खोलवर भिनलेले असतात की आपण म्हणजे जणू स्वतंत्र व्यक्ती नाहीच. आपण केवळ समाजप्रवाहाचे सातत्य वाहून नेणारे हमाल.

  हल्लीच एक इमेल आलेलं ना... की, एकदा एका मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा अपघात होतो. दोघेही इस्पितळात. डॉक्टर येतात. आधी मुलाला तपासायला जातात. आणि मुलाला बघून मटकन खालीच बसतात. म्हणतात हा तर माझाच मुलगा. आता जर खुद्द वडीलच इस्पितळात भरती आहेत, तर डॉक्टर असं कसं काय म्हणू शकतात? आता हे चटकन ओळखायला एक तर उत्तर तरी माहीत हवं किंवा मग मुक्ताच्या वयाचं "संस्कारमुक्त" मन तरी हवं. नाही तर आपल्यासारख्यांना सांगायला लागतं की बाबारे "डॉक्टर म्हणजे त्या मुलाची आई".

  कावा हा शब्द मात्र मला पटत नाही. हा एक नेहेमीचा गोंधळ आहे. म्हणजे जन्म घेण्याआधी पुरुषांचा एखादा orientation course वगैरे होतो का की जेथे पुरुषसत्तेचे प्रतिनिधी येऊन सगळा बेत नीट समजवून सांगतात. स्त्रीला जो बदल हवा आहे तो होण्यात फार मोठा टप्पा हा हे जाणण्याचा आहे की सध्याची जी स्थिती आहे तो समाजाच्या गरजेतून उत्क्रांत होत गेली आहे. ही स्थिती जितकी स्त्री मध्ये भिनली आहे तितकीच (आणि तितकीच फक्त... जास्त नाही की कमी नाही) ती पुरुषा मध्ये भिनली आहे. यात फरक एवढाच की स्थिती पुरुषांना सोयीची असल्याने ते त्याचा शक्य तितका फायदा उचलतात आणि स्त्रियांकरिता ती तशी नसल्याने त्या अन्याय होत असल्याची भुमिका घेतात. पण एका अर्थाने या दोन्ही भुमिका तशा "सोयी"स्करच आहेत. शेवटी वैयक्तिक पातळीवर ही सोयीस्कर भुमिका जरी आपण विचारपुर्वक सोडली तरी भिनलेल्या गोष्टी सुटत नाहीत हे वास्तव दोन्ही बाजूला आहे. किंवा खरंतर बाजूच दोन नाहीत. एकच आहे.

  असं थोडया शब्दांत या विषयावरील भुमिका सांगणे कठीण आहे. तेव्हा गैरसमज नसावा. बाकी हा "तुम्हा सार्‍याजणीं"चा उपक्रम छानच आहे.

  मिलिन्द, तुझी प्रतिक्रिया मात्र नीट कळली नाही.

  ReplyDelete
 4. वैशुताई.. लेख एकदम छान.. नीरजचे देखील पटले.. मुलगा (जो पुढे जाऊन "पुरुष" होतो) तो काही पोटातून बाईवर अन्याय करायचे असे ठरवत नसणार.. तत्कालीन समाजाचा जो प्रभाव त्याच्यावर होईल तो जाउदे.. त्यावर आपला कंट्रोल नाही.. पण.. आई म्हणून आपण त्याच्यावर आवर्जून समानतेचे संस्कार करू शकतो.. ज्यामुळे आपली मुले तरी ह्या समस्यांचे कारण बनणार नाहीत..

  खरंच.. आपल्या मनावर किती नकळत काही संस्कार झालेले असतात ना?? लग्न व्हायच्या आधी एकदम बंडखोर असलेली मुलगी आपोआपच किती शांत होते.. अगदी आपणसुद्धा.. आपले आपल्यालाच आश्चर्य वाटते.. आपण लहानपणापासून जे ऐकतो-पाहतो.. ते पटो वा न पटो.. कुठेतरी त्याचे आपल्या मनावर सूक्ष्म संस्कार होतात हे नक्की.. हे सगळे असे काही घडले कि आवर्जून जाणवते...

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...