Sunday, November 22, 2009

चित्र बदलतंय....

विद्या, आपल्या ब्लॉगवरचा विषय वाचून मन भूतकाळात डोकावतंय... मी जेव्हा लग्नानंतर सासरी आले तेव्हा माझं जग पूर्णपणे बदललं होतं. एका चौकोनी कुटुंबातून मोठा गोतावळा असणार्‍या कुटुंबात मी प्रवेश केला होता. वयही लहान असल्याने खूप गांगरून गेले होते . एक छोटासाच प्रसंग सांगते. लग्नानंतर काही दिवसांनी आमच्याकडे बरेच पाहुणे - नीरजचे मामा, त्यांची मुलं वगैरे जेवायला आले होते . सगळे पुरुष आधी जेवले . मग पाहुण्यांमधल्या बायका जेवल्या. शेवटी मी आणि सासूबाई जेवायला बसलो. नीरजचे जेवून झाल्यावर तो त्याच्या भाऊ - बहिणीबरोबर गप्पा मारत बसला. आणि मी शेवटी जेवून, सगळं आवरत होते. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. मला असं वाटत होतं कि मी या घरात आलेली एक नवीन सून आहे कि काम करणारी बाई... जर नीरजने मला आवरताना किंवा जेवायला वाढताना मदत केली असती तर मी पण त्यांच्याबरोबर गप्पा मारायला जाऊ शकले असते. आणि असाच प्रसंग जर माझ्या माहेरी घडला असता तर... जेवून झाल्यावर नीरजने आवरावं अशी त्याच्याकडून कुणी अपेक्षाही केली नसती. हा फरक का? मुलगा जेव्हा लग्न करून एक मुलगी आपल्या घरी आणतो तेव्हा तिला ते घर लवकर आपलंसं वाटायला लागण्यासाठी त्यानेसुद्धा प्रयत्न कारण तितकंच गरजेचं आहे.

पण आता लग्नानंतर ११ वर्षांनी कुठेतरी मला वाटतंय की चित्र बदलतंय... मुलगा असूनही आदित्यला घर सजवायची, व्यवस्थित ठेवायची मनापासून आवड आहे. मी काही नवीन पदार्थ करत असले की तो आवर्जून माझ्याशेजारी येऊन उभा राहतो. "मी करतो तू मला सांग", असं त्याचा आग्रह असतो. नीरज पण, मला खूप काम असलं किंवा मी दमले असेन तर मला खूप मदत करतो. आणि गंमत म्हणजे घरी आलेले पाहुणेसुद्धा तू आमच्याबरोबर जेवायला बस असा आग्रह करतात. मला घरीच आलेल्या या अशा काही अनुभवांवरून असं वाटतंय की स्त्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न पुरुष करत आहेत. आणि हा बदल स्वागतार्ह आहे.

3 comments:

  1. स्मिता,
    तुझा अनुभव वाचून, बायकांना किती समांतर जाणारे अनुभव येतात असे वाटले.
    असाच प्रसंग जर माझ्या माहेरी घडला असता तर... जेवून झाल्यावर नीरजने आवरावं अशी त्याच्याकडून कुणी अपेक्षाही केली नसती.
    हा तुझा विचार आवडला. मी सुद्धा कायम हे तपासत बसलेली असते.
    सर्वात छान आपली मुले! ती घडवणे तर आपल्या हातात असते ना?( हो, ना? कोण जाणे?)
    छान वाटलं वाचून. हे बदल स्वागतार्ह आहेतच.

    ReplyDelete
  2. स्मिता खरं आहे तुझं. एका स्त्रीचं दमणं(मग ती स्त्री घरातील असो कींवा नोकरी करणारी)कींवा तीला सुद्धा तिच्या कामात कुणाच्यातरी मदतीची अपेक्षा असते हे कुणी ग्रुहीतच धरत नाही. आपण घर चालवतो, पैसे कमावून आणतो आणि आपणच दमतो या थाटात पुरुष आपल्या घरात आल्यावर बायकोला हूकूम सोडत असतो.हा पुरुषीपणाच त्याच्या नसानसात भिनलेला आहे.अनेक पिढ्या तो एकदम बदलू म्हणून बदलणार नाही.त्याला खूप काळ जाणार आहे.आणि हा पुरुष बदलण्याची वाट बघण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना एक चागंला माणूस घडवण्याचा नक्कीच प्रयत्न करु शकतो.
    जिच्या बरोबरीने आयुष्य एकत्र घालवण्याचा,जगण्याचा निर्णय आपण घेतो त्या स्त्रीला कोणत्याही बाजूने आपण समजावून कसे घेत नाही याची जाणीवच न होणे हेच मुळी एक पुरुषी अहंकाराचे लक्षण आहे असे मला वाटते.त्यामुळे जे पुरुष हे बदल करण्यासाठी दोन पाउले पुढे टाकत आहेत त्यांचे निश्चितच स्वागत आहे....

    ReplyDelete
  3. सगळे पुरुष आधी जेवले . मग पाहुण्यांमधल्या बायका जेवल्या. शेवटी मी आणि सासूबाई जेवायला बसलो. >> मला एक अत्यंत चीड आणणारी पद्धत- रीत- रिवाज.. घरच्या बायकांना.. किंवा पाहुण्या बायकांपैकी कोणाला आधी भूक लागू शकत नाही का?? सगळीकडे तीच तर्हा.. स्त्रियांना गरम आणि ताजे अन्न खायची मुभाच नाही का आपल्यात??

    पण आता लग्नानंतर ११ वर्षांनी कुठेतरी मला वाटतंय की चित्र बदलतंय... >> माझी एक नणंद आहे.. ती मला अध्येमध्ये सांगते.. बाई हि घराची राणी होते.. पण त्यासाठी आधी तिला निरपेक्षपणे ४-५ वर्षे तरी खपावे लागते.. खरे असावे ते... तुम्ही तर ११ वर्ष दिलेली दिसतात...

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...