Monday, November 23, 2009

‘पुरुषप्रधानता व स्त्री’ - एक विचारमंथन

एक होती राजकन्या .... वाचून प्रथम वाटले खरचं, आपण सुध्दा किती ’टिपिकल’ विचार करतो. स्त्री आणि पुरूष यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिमा, त्यानुसार कामाची-जबाबदा-यांची विभागणी असे ‘संस्कार’ वर्षानुवर्षे आपल्या मनात रूजलेले आहेत. नकळतपणे का होईना पण या प्रतिमा तयार करण्याला आपणही थोडाफ़ार हातभार लावत असतो का?
तसे आजकाल आपण स्त्रिया, पुरुषाच्या बरोबरीने , पुरुषाच्या क्षेत्रात कामे करत असतो. पण कधीतरी .. काही प्रसंगी.... आता हे काम पुरूषाचे असा विचार आपल्याही मनात डोकावतो किंवा हे काम पुरुषाने करावे अशी अपॆक्षापण आपण करतो. पण असे विचार मनात आले म्हणजे आपण पुरूषप्रधानतेला खतपाणी घालतो किंवा पुरूषप्रधान संस्कृतीला बळी पडतो? का ती आपली त्यावेळची सोय असते?

पुरुषप्रधान संस्कृती जिथे पुरुष केंद्रस्थानी, स्त्रीचं स्थान त्याच्यापेक्षा दुय्यम दर्जाचे. तिचे कार्यक्षेत्र ’चूल आणि मूल’ इतके मर्यादित वगैरे. पण मग स्त्रियांनी पुरुषाच्या बरोबरीने, त्याच्या कार्यक्षेत्रात कर्तृत्व गाजविले म्हणजेच तिचा दर्जा उंचावतो का? प्रत्येक स्त्रीलाच ‘झाशीची राणी’ किंवा ‘किरण बेदी’ बनणे कदाचित आवडणारही नाही. काही स्त्रिया आवडीने आपल्या कर्तृत्वासाठी पारंपारिक क्षेत्रच निवडतील/निवडतात. पण हे कार्यक्षेत्र निवडीचे स्वातंत्र्य/आधिकार मात्र स्त्री ला हवा हे महत्त्वाचे! आणि स्त्री ला गृहित न धरता, तिने घेतलेल्या निर्णयाला मान आणि साथ द्यायला हवी पुरुषाने.

मनात येते की ही ’पुरुषप्रधानता’ पुरुषांना तरी पूर्णाथाने सोयीची वाटते का? त्यांच्यावर सतत कर्तेपणाची भूमिका! त्यांना ह्या पुरुषीपणाच्या चाकोरीतून बाहेर पडावेसे वाटत नसेल?

माझ्यामते, ‘पुरुषप्रधानता’ ही स्त्री-पुरुषांची मानसिकता आहे की जी हळूहळू बदलते आहे. स्त्री च्या मानसिकतेमधे जसा फ़रक पडला आहे तसाच पुरूषात ही पडलाच असेल ना! स्त्री बदलते आहे तसा पुरुष ही बदलतो आहेच. ‘चूल-मूल’ हे आता केवळ स्त्रीचेच कार्यक्षेत्र न राहता, पुरुषाचाही त्यात सहभाग वाढतो आहे.

एकंदरितच ‘पुरुष’ केंद्रस्थानी असणे किंवा ‘स्त्री’ केंद्रस्थानी असणे, हे दोन्ही ‘निकोप’ समाज घडवायला मानविणारे नाहीच. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत, हा स्त्री-पुरुष समतेचा विचार समाजात १००% रुजायला अजून बराच काळ जाणार आहे. पण आपण त्याची मुळं रोवायला तर सुरु करु शकतो आपल्या आणि आपल्या मुलांच्या मनात! आणि विद्याने मांडले तसे, प्रथम स्त्री-पुरुषाची लेबल्स काढून ‘माणूस’ म्हणून जगायला शिकूयात का?

1 comment:

  1. आशा वाचताना खूप खूप .... छान वाटलं. शेवटचा para. तर परत परत वाचला.
    - वैशाली

    ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...