Friday, November 20, 2009

एक आठवण...


अश्विनी, तू जेव्हा भूपाळ्या, पाळणे, जयंत्या याबद्द्ल लिहीलंस तेव्हा जाणवलं खरंच असं का ? माझी एक घरगुती आठवण जरा वेगळ्या संदर्भाची मला एकदम आठवली. मी खूपच लहान होते (२-३ री मधे). त्यामानाने बहिण व भाऊ समजत्या वयाचे. तेव्हाच्याकाळी कुठलीही वस्तू एकच आणून सगळ्यांना कशी वापरता येईल असा दृष्टिकोन. (अर्थात परिस्थिती पण नव्हती) सायकल घेतली ती लेडीज. म्हणजे सगळ्यांनाच वापरता येईल. तेव्हा सायकलवर नाव घातलं जाई. त्यावर नाव घातलं "उमेश जोशी". असं का? असा प्रश्न कदाचित ताईला पडला असेल. मी थोडी मोठी झाले तेव्हा एकदा स्त्रीमुक्ती... वगैरे विषय चालला होता, तेव्हा ह्या प्रसंगाला वाचा फुटली. ताई म्हणाली, "बघ वैशाली सायकलवर उमेश जोशी हे नाव, स्वयंपाक घरातील भांडी आई वापरते, पण नाव "वि. पं. जोशी" आई म्हणाली, "तू उगीच वाकडा अर्थ लावतेस. सगळीकडे एकसारख नाव असलं की लक्षात ठेवायला सोपं जातं. (तेव्हा उमेश जोशी हे नाव का हे मात्रा गुलदस्त्यात राहिलं). मग थोडं मागे गेले. आईच्या माहेरी सगळी भांडी, ट्रंका, धान्याच्या कोठ्या इ. बरच काहीवर "बा. रा. जोशी" हे नाव. तसच वडिलांकडे "पं.के. जोशी" हे नाव. (विद्या इथं मला म्हणायच आहे की पूर्वापार प्रथा तश्याच चालू राहतात का कोणी विचारत नाही). माझं लग्न झालं तेव्हा आनंदचं पुण्यातलं घर नविन थाटलेलं.काही मोजकी भांडी व वस्तू. त्यावर सगळीकडे "वि. स. भिडे" असं लिहीलं होतं. सासूबाई म्हणाल्या, "काही भांडी आपण घेऊयात. तुझ्या पसंतीने घ्यायची म्हणून मी थांबले" मग त्यांना जी आवश्याक वाटत होती त्या सगळ्या भांड्यांची खरेदी झाली. त्या म्हणाल्या "सगळ्यावर नाव व तारीख घाल, बरं असतं". मग मी लगेच भांडीवाल्याला सांगितलं, हं घाला "वैशाली भिडे" (आज मी हे लिहील्यावर परत एकदा त्याभांड्यांवरची तारीख बघितली - ४-१-९६)

3 comments:

  1. वैशाली,
    मला जे लिहायचं आहे ते मी माझ्या blog वर लिहिनच. इथे फक्त शाबासकीची नोंद.
    मी कल्पना करू शकते, नुकतं लग्न झालेलं, त्यात सासूबाईंची इच्छा, नव्या घरात आल्याचा ताण (का तुला तो नव्हता?),आणि तू म्हणते आहेस ,’हं! घाला. वैशाली भिडे!’ वा!

    ReplyDelete
  2. वैशाली,
    या बाबतीतली माझी एक आठवण- आमच्या लग्नानंतर आम्ही जेव्हा घरात भांडी खरेदी केली, तेव्हा त्या भांड्यांवर "अश्विनी-जगदीश" असं नाव टाकलं! (बहुदा त्या भांड्यांचा दोघांकडून वापर व्हावा अशी सुप्त इच्छा होती..)
    -अश्विनी

    ReplyDelete
  3. भांडी आणि त्यावरील नावाचा विषय चाललाय म्हणून आठवणीतील एक गोष्ट.नवीन लग्न करुन कौस्तुभच्या घरी आले.नव्याचे नऊ दीवस सरले आणि मी स्वयंपाकघरात प्रवेश केला.नवीन उत्साह,आणि मला अपेक्षित असलेली एकत्र कुटुंबपद्धती.मी खूष होते.
    लग्न झाल्यानंतर पहीला मी केलेला पदार्थ म्हणजे कोबीची भाजी.बारीक चिरलेला कोबी, खोवलेला ओला नारळ, हीरव्या मिरच्यांचे बारीक एकसारखे चिरलेले तुकडे, आणि चिरलेली हीरवीगार कोथिंबीर.... सासूबाईंना विचारुन भाजी परतण्यासाठी कढई घेतली.कढई चकचकीत स्वच्छ.ती गॅसवर ठेवली.आधीच्या सवयीप्रमाणे (माहेरच्या) कढई गरम करण्यासाठी गॅस फुल केला.आणि जरा वरच्याच पट्टीत सासुबाईंचा आवाज आला. त्या म्हणाल्या तो गॅस बारीक कर जळेल माझी कढई.अजुनही २५ वर्षे झाली तरी माझी भांडी आज नवीन आणल्यासारखी आहेत.त्यावरील नावही दीसतेय.तो गॅस बारीक कर आणि भाजी टाक.
    माझा सगळा उत्साह मावळला आणि डोळे पाण्याने डबडबले.माहीत नाही खूप ओरडून नाही बोलल्या पण जे बोलल्या ती पद्धत तेव्हा खटकली.आजही इतक्या वर्षांनी कोबीची भाजी टाकताना ती आठवण आल्याशिवाय रहात नाही.
    नंतर ५ वर्षांनी आम्ही एकत्र कुटुंबातून वेगळे झालो व आमचा संसार मांडला.ह्या संसाराला लागणारी सर्व भांडी मी आणि सासुबाईंनी एकत्रच जाऊन खरेदी केली. खरेदी झाल्यावर त्या भांडयांवर नाव घालण्यासाठी त्या दुकानातील मुलाला त्यांनी बोलावले तेव्हा मात्र मी ठाम राहीले की भांडयांवर नावं घालायची नाहीत म्हणून...त्यांनीही ते लगेचच मान्य केले. आज आमच्या घरातील एकाही भांडयांवर कोणाचेच नाव नाही.
    तसं पाहीलं तर बाब फारच शुल्लक होती पण त्या प्रसंगाने माझ्यात झालेला हा बदल कायमस्वरुपी होता.
    आज माझ्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत.आज माझं आणि आईंचं नातं एका छान वळणावर येऊन पोहोचलं आहे.आणि दीवसेंदीवस दोघींमधलं अंतरही खूप कमी होत चालले आहे. मनाने,प्रेमाने आम्ही एकमेकींच्या खूप जवळ येत आहोत.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...