लेकीची गोधडी फाटली होती आणि मलाही माझ्यासाठी एक हवी होती.
लहानपणी माझी माझी एक गोधडी होती आणि ती मला फार प्रिय होती.
कुशनसाठी कापड पाहात होतो तर तिथे गोधडी पाहिली, रजई / रजईत आत कापूस असतो ना?
ती वापरा आणि टाकून द्या प्रकारातली होती, सवलतीतील किंमतही मला जास्त वाटली,
म्हणून घेतली नाही.
आणि एकदम मला आठवलं की अरेच्चा! मला तर घरी गोधडी शिवायची होती!
हं!
आई बाबा येणारच होते, आईला म्हणाले की तुझ्या जुन्या सुती साड्या घेऊन ये.
आई साड्या आणि जुनी शालही घेऊन आली.
इंटरनेटवर गोधड्या पाहायला सुरूवात केली.
भारतातल्या गोधड्या पाहिल्या.
नीलिमा मिश्रा सर्च देऊन पाहिल्या.
गोधड्या आहेत पण खूपच्या खूप नाहीयेत.
तेच जर क्विल्ट सर्च दिला तर आहेत.
अमेरीकन क्विल्टचे खूप प्रकार दिसतात.
मागे चार-सहा वर्षांपूर्वी जेव्हा मला गोधडी शिवायची होती, तेव्हाही मी बरेच प्रकार पाहिलेले.
यावेळी माझं क्विल्ट नाही हे नक्की होतं.
माझ्या परंपरेतली माझ्या मातीतली डिझाईन्स मला हवी होती.
बरेच क्विल्टचे प्रकार पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्हांला मोहवून टाकण्याची शक्ती क्विल्ट्मधे आहे.
अनेक प्रकार! वेगवेगळ्या रंगसंगती, छोट्या छोट्या तुकड्यांची असंख्य कॉम्बीनेशन्स!
डोळे फिरावेत इतकी कामातली सफाई!
मी त्या सगळ्या प्रकारांना म्हंटलं, नाही!
मला माझी साधीसुधी गोधडीच हवी होती.
माझ्या आजीला,पणजीला तिच्या आजीला ज्यांनी ऊब दिली ती गोधडी!
खाली एक सुती, मांजरपाटाचं कापड अंथरलं. (तीनदा धुवून आता आकसणार नाही याची खात्री झाली.)
त्यावर आईची सुती साडी, त्यावर शाल, त्यावर पुन्हा सुती साडी,
यावर आता मला घरचे माझ्या शिवणकामातले तुकडे जोडायचे होते!
रंग जाऊ नये म्हणून ते कपडे आधी केमिकलमधे टाकून, मग धुवून वाळवले.
त्यांच्यावरून इस्त्री फिरवली.
मोठ्या सुया, गोधडीचा दोरा आणलेलाच होता.
पहिले ३/ ४ तुकडे लावले. आणि मनातल्या मनात कुठे कुठले तुकडे असतील असं करत गोधडी पूर्ण करत आणली!
आई गं!
बसूनच राहिले.
मी काय आरंभलं आहे याची मला जाणीवच झालेली नव्हती.
मी सहज अगदी सहज सुरूवात केलेली!
पण बाई गं! कुठे कुठले तुकडे जोडणार आहेस? माहित आहे का तुला?
हरक्षणी डिझाईन बदलणार आहे.
कुठे लाल घेऊ? कुठे पिवळा घेऊ? कुठे काळा घेऊ?
तुकडा बदलला की गोधडी बदलणार होती.
गोधडी म्हणजे एक चित्र आहे, हे मला पहिल्यांदा आतून कळलं.
माझ्यासमोर कोरा कॅनव्हास होता आणि रंगांचा ब्रश दोन ठिकाणी टेकवून मी नुसती बसून राहिलेले.
काय करू? कशी करू?
क्विल्ट त्यामानाने खूप सोपं आहे, एक भौमितीक रचना मनात धरून ती रिपीट करत राहायची!
काय तयार करायचंय हे पूर्ण मनात तयार असलेलं. त्यात कलेपेक्षा कुसर अधिक आहे.
गोधडी या माध्यमात प्रचंड ताकद आहे.
त्यात कुठलाही फॉर्म / रचना ठरलेली नाही.
तुकड्यांची लांबी रुंदी, रंग काय हवं ते तुम्ही ठरवायचं आहे.
खूपच मोकळीक दिलेली आहे.
अधिक स्वातंत्र्य त्यामुळे अधिक जबाबदारी!
मनात येईल ते करण्याची पूर्ण मुभा आहे!
पाहणाराला त्यात तुमचं व्यक्तीमत्व दिसणार आहे.
डोळे या गोधडी नावाच्या कलाकृतीवरून कसे फिरणार हे मी ठरवणार आहे.
आहे का मला तितकी रंगांची जाण?
मी अक्षरश: काहीही म्हणू शकते, व्यक्त होऊ शकते यातून.
समोरच्याला ते कळेल की नाही, माहीत नाही.
माझा आतला प्रवाह यातून वाहू शकणार आहे.
गोधडीने मला दिलेली सगळी उर्जा हातात धरून मी बसून राहिले होते.
माझ्याकडे मोजके, शिवणकामातून उरलेले तुकडे होते,
त्यांनीच मला माझं काम करायचं होतं.
माझ्या आजी/पणजीकडे तर याहून कमी तुकडे असतील.
त्यातच तिने ठरवलं असेल, इथे हा तुकडा लावू, तिथे तो, मग पुन्हा हा.
शिवून झाल्यावर तिला किती समाधान मिळालं असेल.
तिच्या किती दु:खांचा निचरा झाला असेल.
तिघीचौघींनी मिळून गोधडी केली असेल आणि मग कुणी कुणी ती पांघरली असेल.
त्या मायेने आत आत ऊब निर्माण झाली असेल. काय काय झाकलं गेलं असेल.
त्या माझ्या आज्या/पणज्यांनी मला बळ दिलं.
" अशी बसून काय राहतेस? घे करायला. जे होईल ते तु्झं असणार आहे."
आई होतीच. आई- मी आणि माझी लेक अशा तिघींनी मिळून गोधडी पूर्ण केली.
मला खूप आवडलीय. अगदी प्राथमिक आहे तरीही.
अजून दोन करायच्या आहेत, त्यात आणखी रंगांचे प्रयोग करता येतील.
गोधडीने मला तिचं गूज सांगितलंय.
मला जितकं जमेल तितक्या छान गोधड्या मी करीन.