Sunday, February 8, 2015

सांगता न येणार्‍या गोष्टी

माझे आणि दीपाचे बोलणे चालले होते, दीपा म्हणाली, " मी तर मोकळी आहे मी माझ्यासंबंधातलं काहीही सांगू शकते, लिहू शकते. मला सांगता येणार नाही असं काही नाहीच."
माझं म्हणणं होतं, " दीपा, मीही मोकळी आहे, मी माझ्याबाबतीतल्या ७५% गोष्टी सांगू शकेन, तू माझ्यापेक्षाही मोकळी आहेस तू ९०% गोष्टी सांगू शकशील, पण तुझ्याकडेही १०% तर असणारच, जे तुला सगळ्यांना नाही सांगता यायचं. "

 सगळ्यांना सांगण्याची इच्छा नसणं आणि सांगता न येणं या दोन वेगळ्या बाबी आहेत.
सांगायचं म्हंटलं तरी नाही सांगता यायच्या अशा गोष्टी.
अशा गोष्टी कुठल्या असतात? आहेत?
खोलवरचे अपमान, सल, दुखावले गेलेलो आहोत असे प्रसंग विसरताही येत नाहीत आणि सांगताही येत नाहीत.
काही प्रसंगांचा जीव तर इतका छोटा असतो की सांगायला गेलो तर समोरच्याला वाटतं त्यात काय एवढं? सांगताना आपल्यालाही कळत असतं की हे सहज वाटू शकतं, तरीही आपल्या आत आपण खूप दुखावले गेलेलो असतो, बाण वर्मी बसलेला असतो.
काही प्रसंग असे असतात की नंतर आपल्याला वाटत असतं की असे कसे आपण चुकलो? मग त्या आपल्या चुका नाही सांगाव्याशा वाटत.
आपलं अपयश? ते नाही सांगावसं वाटत. नातेसंबंधातलं अपयश सांगावसं वाटत नाही.

विचार करता करता असं लक्षात येतय की या तर खूप मोठ्या गोष्टी झाल्या, काही साध्या साध्या गोष्टीही नाही सांगता येत.
उदा. कुणाचा फोन चालू असेल, समोरचा माणूस गप्पाच मारतोय आणि आपण महत्त्वाच्या कामात आहोत तर मला पटकन असं म्हणता येत नाही की नंतर बोलूयात. मी त्या माणसाच्या बोलण्यातल्या फटी शोधत राहते.
 त्याउलट समोरच्याला मला गप्पा मारायच्या आहेत, माझ्यासाठी वेळ काढ, असंही नाही सांगता येत.

खरं स्वत:वर खूपच काम करायला हवं आहे.


******

2 comments:

  1. मी असे म्हणत होते की अश्या सांगता न येणा-या गोष्टी सांगता याव्यात यासाठी निश्चित एखादी जागा असावी प्रत्येकाकडे.....सांगून ,बोलून मोकळं वाटतं......त्यापेक्षा नसांगता त्याचे ओझे रहाते मनावर..........

    ReplyDelete
  2. हं.
    शेवटच्या उदाहरणात, मला वाटतं मोकळं असणं आणि त्या त्या वेळी स्पष्ट असणं या वेगळ्या गोष्टी आहेत.
    --अश्विनी

    ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...