Friday, March 6, 2015

स्वयंपाक......१

    विषय वाचल्या वाचल्या माझ्या  लहानपणीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आला.भातुकली खेळत असताना आई मला खरी खरी मळलेली कणीक द्यायची.भाताला तांदूळ द्यायची,आणि काही भाज्या......इकडे भातुकली खेळत असताना हळूच माझं लक्ष नसताना माझ्या भातुकलीतल्या काही भांड्यांमध्ये खरा तयार झालेला भात,छोट्या वाटीने पाडलेल्या आणि खरंच भाजलेल्या छोट्या छोट्या पोळ्या,आणि माझ्या छोट्याश्या कढईत परतलेली खरीखरी शिजलेली भाजी.मला जादूच वाटायची.त्या न कळत्या वयात आपण कीती भारी स्वयंपाक केला असं वाटायचं.मला वाटतं याच मुळे का काय आजही मला स्वयपाकाची आवड आहे. याला आजून एक कारण असंही असावं की माझ्या लहानपनापासून मी आईच्या बरोबरीने बाबांनाही स्वयपाक करताना पाहात आले आहे.म्हणजे मला आठवतं तसं मी सहावी सातवीत असेन बहुतेक,आई ऑफीसहून येण्याआधी साधारण कणीक मळून ठेवणे,भाजी चिरुन ठेवने,वरण भाताचा कुकर लावणे अशी कामं बाबा करत.काहीवेळा त्यांच्या बरोबरीने या कामात मला त्यांनी सहभागी करुन घेतलं.ते म्हणायचे तुला जमेल तसे कर.भाजी काहीवेळा खूप मोठी चिरली जायची,भाताला पाण्याचा अंदाज चुकायचा,पण हे सगळं आई बाबांनी चालवून घेतले.त्यामुळे चुकतमाकत मी स्वयपाक शिकले.कधीही सुचना,उपदेश दिले नाहीत म्हणून त्यातली आवड आजही कायम आहे.
   माझ्या आईची एक डायरी होती .वेगवेगळ्या पदार्थांची पाककृती त्यात लिहून ठेवलेली असायची. आणि विशेष म्हणजे त्याच पद्धतीची बाबांची पण डायरी आहे.अनेक प्रकारचे मसाले,विविध प्रांतीय पाककृती ,अनेक प्रकारचे केक,एक ना अनेक पदार्थांनी ह्या डाय-या भरलेल्या आहेत.एखादा चांगला पदार्थ कोणी करत असेल तर तो डायरीत टीपून ठेवायची सवय मला यामुळेच लागली.मी रमते पदार्थ बनवण्यात आणि मला मनापासून आवडतं असे पदार्थ बनवून खाऊ घालण्यात.
     लग्नाआधी आई बाबांचे बघून बघून मी पूर्ण स्वयपाक ,अगदी पुरणपोळी सकट सगळं शिकले ते खूप आवडीने.लग्नानंतर माझी ही आवड कायम राहीली ती कौस्तुभच्या आईमुळे.आई खूप छान,चविष्ट स्वयपाक करतात.कोणताही पदार्थ खूप मनापासून करतात.त्यांचे भातांचे प्रकार खूप खास आहेत.काही गोष्टी त्यांच्या बघत बघत शिकले.
     एकत्र कुटुंब असल्याने धबडगा खूप, त्यामुळे पदार्थ करतानाची गंमत, त्यातला आनंद संपला.आवड नक्की शिल्लक आहे पण आता काही पदार्थ करताना जुन्या गोष्टी आठवतात आणि वीट येतो करण्याचा.एवढ्या धबडग्यात माझ्या स्वयपाकाला मनापासून दाद देणारी एकच व्यक्ती होती.बाबा ( कौस्तुभचे बाबा ) ,मनापासून पदार्थ कसा झालाय हे पानावर बसल्या बसल्या लगेच सांगायचे.आम्ही वेगळे झालो.दुपारी घरी जाताना ते आमच्या डेक्कनच्या घरी डोकवायचे .माझ्या गरमगरम भाकरी चालल्या असतील की हमखास खाऊन जायचे.आणि परत घरी गेल्यावर आईंना सांगायचे मजा आली आज, दिपाने गरम गरम भाकरी वाढली.खूप कौतुक होतं त्यांना. माझ्या हातची भाकरी ,आळुची भाजी,हे पदार्थ बाबांच्या विशेष आवडीचे होते. आजही स्वयपाक करताना त्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.अशी मनापासून दाद देणारं मला आजून भेटलं नाही.तुमच्या सगळ्या स्वयपाकाचा थकवा दूर करणारी गोष्ट म्हणजे त्याला मिळणारी दाद.
     स्वयपाकाचे काम हे फक्त बायकांचेच अश्या विचारांच्या घरात मी जन्मले नाही.माहेरी कधी मी हे पाहीले नाही त्यामुळे सासरी आल्यावरचे चित्र पचवणे अवघड गेले.नंतर सवयीचा भाग म्हणून पुरुषांनी ऑर्डर सोडायची आणि बायकांनी ते करत रहायचे याची सवय झाली.पहील्यां पहील्यांदा होणारी चिडचिड त्या गोष्टी स्विकारल्याने कमी झाली.आणि कोणत्याही परीस्थितीत मग आपण आजारी पडो, आपले अ‍ॅबॉर्शन होवो,बाळंतपणातून उठो,मुलं तान्ही असो,त्यांचे आजारपण असो,अश्या गोष्टींपासून ते एखाद्या दिवशी मूड नाही म्हणून.....पण ते सगळं बाजूला सारुन स्वयपाक केलेले आहेत. आता इतक्या वर्षांनी हे सगळं सहन केले आहे म्हणून का काय या सगळ्याचा वीट आलाय,कंटाळा आलाय.थकलेली आहे मी.उत्साहच कमी झालाय.या क्षणाला या स्वयपघरातून रीटायर्ड हो म्हणलं कोणी तर आनंदान बाजूला होण्याची तयारी झाली आहे.आता जे काही करते आहे ते बळं करते असे वाटते. आता अस वाटतं कोणीतरी आयतं द्यावं हातात.नाही पडायचं त्यात.त्याहीपेक्षा आवडीच्या माझ्या राहून गेलेल्या गोष्टींमध्ये रमून जायचे आहे.त्या गोष्टी करण्यात वेळ घालवायचा आहे.आणि आता त्या दिशेने माझा प्रवास सुरु झाला आहे.


6 comments:

 1. >>विशेष म्हणजे त्याच पद्धतीची बाबांची पण डायरी आहे
  वा!
  >>आवडीच्या माझ्या राहून गेलेल्या गोष्टींमध्ये रमून जायचे आहे.
  :)

  ReplyDelete
 2. > आईच्या बरोबरीने बाबांनाही स्वयपाक करताना पाहात आले आहे
  > भाताला पाण्याचा अंदाज चुकायचा,पण हे सगळं आई बाबांनी चालवून घेतले.
  सहजीवनात अशा छोट्या छोट्या गोष्टीही खूप मोठ्या असतात. एकमेकांचा आदर ठेवणा-या असतात.
  छानच.

  ReplyDelete
 3. > आणि आता त्या दिशेने माझा प्रवास सुरु झाला आहे.
  मस्त!

  ReplyDelete
 4. छान. मनापासून आवडत्या गोष्टीचा, वीट येण्यापर्यंतचा प्रवास सहजपणे लिहीलाय...
  याच विषयावर लिहीलेल्या माझ्या लेखाचा दुवा शेअर करते आहे.
  http://www.loksatta.com/chaturang-news/are-swayampak-swayampak-170354/

  ReplyDelete
  Replies
  1. मला तुझ्या या लेखाची आठवण झालेली.
   मीही तुझ्या या लेखाचा दुवा देणारच होते! :)
   जरूर वाचा.

   Delete
 5. हे इतक्या प्रांजळपणे लिहिणं भावलं.
  तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी शुभेच्छा :)

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...