Sunday, July 12, 2015

जोक??

काही दिवसांपूर्वी व्हॉटसॅपवरच्या एका ग्रुपवर एक जोक शेअर केला गेला. एका मुलानी फ़ॉरवर्ड केलेला तो जोक असा होता,
दोन बायका बुद्धिबळ खेळत असतात.....
           :
           :
:
:
                 :
                 :
खाली कशाला आलात, जोक वरतीच संपला!
   लगेच त्यावर ठरलेले ‘डोळ्या्तून हसून हसून पाणी येणारे’ ते स्माईली पाठवले गेले. त्या क्षणी डोक्यात सणक गेली आणि त्या मुलाला विचारावं वाटलं, हे असे जोक पाठवून तुम्ही मुलींची टिंगल करता - त्यांना ह्युमिलिएट करता असं नाही वाटत का? त्यावरचा त्याचा रिप्लाय कळस गाठणारा होता.
"सत्यं नेहमी कटु असतं."
सत्यं? ‘बायका बिनडोक असतात, उगाच न झेपणारी बौद्धिक कामं न करता त्यांनी चूपचाप घर सांभाळावे’, या मानसिकतेचीच ही पुढच्या काळातली आवृत्ती असं वाटून मी त्याला प्रत्युत्तर द्यायचंच हे ठरवलं आणि लिहीलं,
"अजूनही मुलींना कमी लेखण्याची मानसिकता आहे आणि आपली आत्ताची पिढी पण तीच मानसिकता अंगी बाणवते, हे तू दाखवून दिलंस, धन्यवाद."
त्यावर धडाधड मेसेजेस येऊ लागले,
"Chill yar, it's just a joke" वगैरे.....
आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे मेसेज मुख्यत: ग्रुपमधल्या मुलींकडूनच आले. म्हणजे ज्यांच्या वतीने मी बाजू मांडतीये, वाद घालतीये, त्याच मला पाठिंबा द्यायच्या ऐवजी मला ‘Chill’ करायचा प्रयत्न करतायत! हा माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का होता.....ज्या मुद्द्यावर सर्व स्त्रियांनी (आणि बाकीही सद्सद्विवेक जागृत असणा-या लोकांनी) एकत्र यायला हवं, त्याऐवजी या मुद्द्यावर बोलणा-यांचेच पाय ओढले जात आहेत....
   थोड्या वेळानी त्या मुलाचा परत मेसेज, "ह्या जोकमध्ये बायका असा उल्लेख केलाय, आणि तुम्ही अजूनही मुली आहात."
यावर लगेच बाकीच्यांचे पाठिंबादर्शक रिप्लाय, "पॉईंट आहे" वगैरे.....  आता या सारवासारव करणा-या मेसेज मध्येही लोकांना काय ‘पॉईंट’ दिसला काय माहित.....उगाच एकाची बाजू लावून धरण्यासाठी आंधळेपणानी फ़क्त ‘री’ ओढायची....
      बायका असो वा मुली, शेवटी हा विनोद ‘स्त्री’ वरच केला गेला होता ना....आत्ता जरी हा फक्त एक ‘विनोद’ वाटत असला, तरी तो अनेक ग्रुप्सवर फॉरवर्ड होणार - त्यावर लोकं ‘जोक’ म्हणून हसणार...आणि न कळत अशीच मानसिकता एखाद्या व्हायरस सारखी समाजात भिनत जाणार. ज्या मुलींनी हा फक्त एक ‘जोक’ म्हणून सोडून दिला, त्याकडे फार काही गांभीर्याने पाहिले नाही, त्या मुलींना उद्देशून मला असे लिहावेसे वाटते की, ‘it's just a joke’ इतक्या casually घेऊन आणि त्याकडे दुर्लक्ष करून आपण एक प्रकारे त्याला प्रोत्साहन किंवा छुपा पाठिंबाच दाखवत नाही का? अशाच जोकसारख्या छोट्या छोट्या बिनमहत्वाच्या वाटणा-या गोष्टींमुळेच आज २१ व्या शतकातही ‘स्त्री’ ची प्रतिमा तशीच राहिलेली आहे. बाह्यत: जरी स्त्री-पु्रूष समभाव वगैरे दिसत असला तरी समाजातील ‘स्त्री’ बद्दलची मानसिकता, तिची प्रतिमा तसूभरही बदललेली नाही. फक्त तिची जागा दाखवण्याच्या, कमी लेखण्याच्या पद्धती बदलल्या आहेत.....असं असताना आज या विनोदाकडे कानाडॊळा करून चालेल का?
      त्यावर काही जणांचं म्हणणं असं की आपल्या ग्रुपचा समाज तेवढा सुशिक्षित आहे की तो मुलींचा मान राखेल.......‘सुशिक्षित?’ नुसतं उच्चशिक्षण घेतलेले, पण अशी मानसिकता असलेले लोक ‘सुशिक्षित’ कसे? असा मला प्रश्न पडतो. आणि जर तुम्ही म्हणता की हा समाज मुलींचा मान राखण्याइतका ‘समंजस’ वगैरे आहे, तर असे जोक्स शेअर तरी कसे केले जातात?
त्यानंतर एक-दोन दिवसातच त्या मुलाचा आणखी एक मेसेज आला, ‘मुलापेक्षा मुलगी कशी चांगली-महान’ अशा अर्थाचा तो मेसेज होता आणि खाली लिहीलं होतं, माझ्या जोक वर रूष्ट झालेल्यांसाठी खास....
खरं तर हे ही अपेक्षित नव्हतं मला..... ‘स्त्री’ ला काय हवंय, फक्त बरोबरीचा दर्जा. उगाच देवीच्या स्थानावर बसवलेलंही नकोय. कारण त्यामुळे तिचा चुकण्याचा अधिकारच तुम्ही नाकारताय....या दोन टोकाच्या भूमिका घेण्यापेक्षा ‘स्त्री’ ला माणूस म्हणूनच वागवा असं मनापासून सांगावसं वाटतं....
     सर्वात महत्वाचं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं किंवा समोर जे चुकीचं घडतंय त्याला विरोध न करता गप्पं बसणं हे आधी आपण थांबवलं पाहिजे. म्हणतात ना, म्हातारी मेल्याचं दु:खं नाही, काळ सोकावतो......आपण विरोध दर्शवला, किमान आपली बाजू, आपलं म्हणणं नीट पोहोचवू शकलो, तरीही खूप सुधारणा होऊ शकेल, असं वाटतं.

--- गौतमी

7 comments:

  1. गौतमी,

    अभिनंदन आणि शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. >> सर्वात महत्वाचं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं किंवा समोर जे चुकीचं घडतंय त्याला विरोध न करता गप्पं बसणं हे आधी आपण थांबवलं पाहिजे.
    तुझ्या कृतीबद्दल खूप कौतुक वाटतं आहे.
    अभिनंदन!
    Keep it up!

    ReplyDelete
  3. गौतमी,
    मनापासून अभिनंदन!!!

    ReplyDelete
  4. Read the last para from this article

    http://www.lokprabha.com/20120914/cover02.htm

    ReplyDelete
  5. गौतमी,
    आवडलंय.
    १) तुला कुठल्यातरी बायकांवरचा जोक हा समग्र बायकांवरचा वाटला, तू ते जोडून घेऊ शकलीस.
    २) जोडून घेतल्यावर तू तिथल्या तिथे आपलं मत व्यक्त केलंस आणि बाजू लावून धरलीस. म्हातारी मेल्याचं दु:खं नाही, काळ सोकावतो हे अगदी खरं आहे.
    मला तुझं कौतुक वाटतं.
    याच ब्लॉगवर पूर्वी मी लिहिलेलं.....
    हिंसा केवळ शारीरिक नसते. आपण ज्या वर्गात आहोत तिथे स्त्रीला तिची जागा (?) दाखवून देण्याचे खूप सभ्य मार्ग आहेत, विनोद हा त्यातला एक. (कधी कधी मला वाटते की बायका खरोखरच मठ्ठ आहेत असा तर पुरूषांचा समज झालेला नाही ना? हे सारं आम्ही हसून साजरं करावं अशी त्यांची इच्छा असते?)

    ReplyDelete
  6. स्पष्ट भूमिका घेतलीस, अभिनंदन!

    ReplyDelete
  7. गौतमी,

    तुझी प्रतिक्रिया हि स्वाभाविक आहे. अगदी योग्य .

    मला हे वाचल्यावर काही वर्षे मागे जावेसे वाटले. १२५ / १५० वर्षांपूर्वी ज्योतीराव फुले, धोंडो केशव कर्वे, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे , न्यायमूर्ती रानडे अशा अनेकांनी डोंगराएवढे काम करून समाज मानसिकता पार बदलून टाकली. त्यावेळची स्त्रियांची अवस्था वाच. अंगावर काटाच येईल. हे सर्व बदलणे अशक्य आहे इतके निराशेचे दडपण स्त्रियांनी वाहिले.
    पण हळू हळू परिस्थिती बदललि. सावित्रीबाई फुले, लेडी रमाबाई, रमाबाई रानडे , आनंदीबाई जोशी , ताराबाई शिंदे, अवंतिकाबाई गोखले, सोरोजीनी नायडू, विजयलक्ष्मि पंडित, कमलादेवी चट्टोपाध्याय, महादेवी वर्मा, उषा मेहता, अरुणा असफअली यांनी स्त्रियांची प्रतिमा बदलायला मोठा हातभार लावला. ( यापैकी प्रत्येकाचे कार्य समजून घेणे तुला आवडू शकते )
    पण या न त्या कारणांनी त्या सुदैवी होत्या त्यांच्या पाठीशी त्यांचे आई वडील, पती किंवा गर्भश्रीमंत घरे होती. त्यामुळे त्यांना हे जमले. पण याचा अर्थ त्यांना कमी संघर्ष करावा लागला असे मात्र नाही.
    पण सामान्य स्त्रियांना हे अशक्य होते. याचे कारण शिक्षणाचा अभाव. आणि अर्थात आपल्या सांस्कृतिक / धार्मिक रीतीरिवाजांचा अजगरासारखा घट्ट विळखा. श्वास गुदमरून मरून जाण्याशिवाय पर्यायच नसे.
    पण जसजसा मोकळेपणा येवू लागला स्त्रियांचे assertion वाढले. त्यातही एखाद्या स्त्री ला चांगली संधी मिळाली कि इतर स्त्रियांना नाही म्हणाले तरी थोडा मत्सर वाटत असे. पण हे समजून घ्यायला हवे. कारण संधी न मिळणाऱ्या स्त्री ला आपले आयुष्य खुरटून जाणार याची चीड आणि असहायता असे. त्यातही पुरुषांइतका बाह्य जगाचा अनुभव नसल्याने संधी मिळालेली प्रत्येक स्त्री चुकत माकत काम करे. आणि पुष्कळदा टीकेची धनी होई. हा सर्व बदलाचा कालखंड होता.

    पण पुरुषांनी हे समजून न घेता स्त्रियांमधील भांडणे हा स्त्री स्वभाव असल्याचे सांगून त्याची रेवडी उडवायला सुरवात केली. मला आठवतंय कि अति विशाल महिला मंडळ ( पूर्वी महिला मंडळे हा स्त्रियांच्या सामाजिक होण्याचा, व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग मानत असत ) या शब्दावरून कितीतरी किस्से, विनोद, कोटया पुरुष मंडळी करत असत. आणि स्त्रियांमध्ये यामुळे थोडासा कमतरतेचा, न्यूनगंडाचा भाव निर्माण होत असे. पुरुष विनोद करायला कित्येक वर्षे स्वतंत्र होते. स्त्रियांची मोकळे होण्याची सुरवात होती. पण हे लक्षात कोण घेणार.

    State Bank of India, ICICI bank, Dena Bank, Axis Bank, Allahabad Bank

    १९७५ -- आंतरराष्ट्रीय महिला वर्ष! मी त्यावेळेला शाळेत होतो. लहानपणापासून आईला नोकरी करत असताना बघत होतो. स्वतंत्रपणे शाळा चालवताना, चर्चा करताना घरातली परिस्थिती हाताळताना, मते मांडताना, बघत होतो. पण या वर्षामुळे महिलांची विशेष अशी मागणी आहे असे पहिल्यांदा ध्यानात आले. ती मागणी मुळात अधिक स्वातंत्र्याची आणि समान हक्कांची होती. मोठ्या प्रमाणात द्रीष्टीकोन बदलण्याची होती. एक वेगळाच माहोल निर्माण व्हायला या आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची मदत झाली असे मला तरी वाटते.

    त्यानंतर आणखी नव्या नव्या गोष्टींना सुरवात झाली. दहावी बोर्ड परीक्षेत मेरीट मध्ये नंबर येणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा वाढू लागली. आणि दरवर्षी वृत्तपत्रातून त्याची प्रसिद्धी होत होती. यामुळे जुन्या पुरषी मानसिकतेला आणखी एक तडाखा बसला. आजतागायत मुलींचे हे प्रमाण ज्यास्तीचे राहिले आहे.

    त्या नंतरचा इतिहास काही लिहित बसत नाही. आजहि स्त्री हक्क पूर्णपणे मिळाले असे नाही पण जी प्रक्रिया सुरु झाली ती आता irreversible बनली.
    एक गम्मत सांगतो.
    State Bank of India, Axis Bank, Dena Bank, ICICI Bank, Allahabad Bank या सारख्या अवाढव्य आणि देशाच्या leading बँकांच्या chairman पदावर एकाच कालखंडात सर्व स्त्रियाच होत्या / आहेत. केवढी हि झेप.

    आम्ही घरचे सर्वजण दापोली / हर्णे ला फिरायला गेलो होतो. तिथे मासळीचा घाऊक बाजार भरतो. मुंबईचे मोठे व्यापारी Refrigerated Truks घेऊन सौदा करत असतात. हा आर्थिक व्यवहार कोण सांभाळतो? कोळी नाही तर त्यांच्या बायका. ज्याने त्याने आपापले कौशल्य असेल त्याप्रमाणे काम करावे. कोळी मासे पकडून आणतात, बायका आर्थिक व्यवहार सांभाळतात.

    आता हे आणि असे विचार पुरुषांना करावेच लागणार.

    त्यामुळे कोणी असा बायकांवर joke केला तर आजीबात चिडू नकोस.

    फक्त मस्त smile कर आणि म्हण "Get well soon! " आणि म्हण " I will pray for you. "

    ------ रेणूचा मामा

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...