Wednesday, May 13, 2015

स्वयंपाक

स्वयंपाक हा खरोखरच बायकांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा विषय आहे. 
म्हणजे वेगवेगळ्या अंगांनी त्याबाबत विचार होऊ शकतो. जसं अत्यंत आवडीने करणं, पर्याय नाही म्हणून करावा लागणं, ते आपलं कर्तव्य आहे असं समजून करणं, किंवा अगदी टोकाचा भाग म्हणजे रोज हॉटेलात जाणं शक्य नाही म्हणून इलाज नाही म्हणून करणं.
स्वयंपाक करणं ही प्रामुख्याने बाईची जबाबदारी आहे अशी एक सर्वमान्य धारणा आहे. म्हणजे घरी जेवायच्या वेळा झाल्या की घरच्या बाईकडे "हे काय अजून जेवायच तयार नाही" हे जितकं हक्कानं बघितलं जातं तितकं पुरुषा कडे बघितलं जात नाही. 

..............................................................................................


मला लग्न होईपर्यंत प्राथमिक स्वरुपातच स्वयंपाक येत होता. म्हणजे उपाशी राहणार नाही एवढ्यापुरता. पण त्यामुळे एक फायदा असा झाला की को-या पाटीमुळे सासरकडील चवीचे पदार्थ त्यांच्या पध्दतीप्रमाणे शिकण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्वयंपाक घरात सासू सुनेमधे तुझी माझी पध्दत अशी येणारी टसल आलीच नाही. एखादा पदार्थ आयता मिळत असेल तर त्याच्या चवीला फारसे प्राधान्य माझ्या लेखी नव्हते. त्यामुळे केलेल्या स्वयंपाकाचा मनमुराद आस्वाद घ्यायचा आणि जाताजाता थोडं फार शिकायचं या भूमिकेत मी असायचे. घरात कुटुंबही लहान असल्याने माझी अंदाजक्षमता जास्तीजास्त ४-५ माणसांपर्यंत मर्यादित असायची. माझ्या परिचयाच्या काही जणी आहेत. त्यांचा स्वयंपाकाबाबतचा आत्मविश्वास मला नेहमी न्यूनगंड देणारा आहे. म्हणजे. मी १५-२० माणसांचा स्वयंपाक कसा झटपट करु शकते ते सुध्दा कुठल्याही पदार्थाची चव न घेता हे मला मोठ्या दिमाखात ऎकवतात. (एथे चविष्ट पदार्थ करण्याच्या संकल्पनेला फारसं महत्व नसावं हे मला नंतर जाणवायचं.) 

आनंदला स्वयंपाकातील पदार्थ करण्याची आवड आहे. पण  नोकरीच्या व्यापामुळे रोजचा रोज सहभाग जमत नाही. सुट्टी च्या दिवशी मात्र तो आवर्जून एखदा पदार्थ करण्यात  सहभाग घेतो. 

स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आवड म्हणून करणं आणि इलाज नाही म्हणून करणं ह्यामुळे येणा-या मानसिकतेबाबत घरातील सगळ्यांनाच त्याची जाणीव असेल, त्यासाठी सहकार्य असेल तर मग  "स्वयंपाकघर - एक भन्नाट प्रयोगशाळा" म्हणून त्याची मज्जा घेताच येईल.

Saturday, March 7, 2015

शहाण्या झालेल्या बायका!

८ मार्चच्या निमित्ताने आपण लिहू या, तू विषय सुचव. असा दीपाचा फोन आला.
गेले काही दिवस ’स्वयंपाक’ या विषयावर लिहावं असं डोक्यात घोळत होतं,
मग सगळ्यांसाठी मी हाच विषय सुचवला.
दीपाचा लेख आल्यावर नेहमीप्रमाणे आमच्या त्यावर गप्पा झाल्या.
दीपा म्हणाली, " इतका आपल्या जिव्हाळ्याचा विषय पण तो अजूनपर्यंत ब्लॉगवर कसा आला नव्हता?"
आम्ही भेटून चर्चा करतो त्यातही कधी आला नव्हता.
मी म्हणाले, " अगं आजवर आपण नवर्‍याची गार्‍हाणी करण्यात वेळ घालवला. त्यांच्याबद्दल बोलून झाल्यावर आता आपल्याला आजूबाजूचं दिसतंय. :) "
   यात खरं तथ्य नाही, आम्ही खरोखरच वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं आहे. पण आम्हांला हसायला निमित्त झालं!
आमचं ख्यॅ! ख्यॅ! खूखू झाल्यावर आम्ही बोललो ते असं.....
की नवरे जसे आहेत तसे आपण त्यांना स्वीकारलेलं आहे , त्यांना बदलायचा प्रयत्न आता आम्ही करणार नाही. नवर्‍यांना सोडून दिलेलं आहे आणि स्वत:ही मोकळ्या झालेल्या आहोत. आता स्वत:चं जग उभारूया. स्वत:च्या आवडी जपूया. स्वत:ला हवं तसं जगायचा प्रयत्न करू या.
ज्यात त्यात नवरा हवाच आहे असं करायचं नाही. ( असा तरी तो कुठे येतो? :) ) आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी स्वत:ला ठेवायचं.
 खरं म्हणजे तसं जगायला आम्ही सुरूवात केलेली आहे.
मी म्हणाले, " आपण आता खर्‍या शहाण्या झालेल्या बायका आहोत." :)

   हे शहाणपण जसं आम्हांला आलं तसं तुमच्यापैकी प्रत्येकीला येवो, हीच महिलादिनी शुभेच्छा! :)


********

Friday, March 6, 2015

स्वयंपाक......१

    विषय वाचल्या वाचल्या माझ्या  लहानपणीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आला.भातुकली खेळत असताना आई मला खरी खरी मळलेली कणीक द्यायची.भाताला तांदूळ द्यायची,आणि काही भाज्या......इकडे भातुकली खेळत असताना हळूच माझं लक्ष नसताना माझ्या भातुकलीतल्या काही भांड्यांमध्ये खरा तयार झालेला भात,छोट्या वाटीने पाडलेल्या आणि खरंच भाजलेल्या छोट्या छोट्या पोळ्या,आणि माझ्या छोट्याश्या कढईत परतलेली खरीखरी शिजलेली भाजी.मला जादूच वाटायची.त्या न कळत्या वयात आपण कीती भारी स्वयंपाक केला असं वाटायचं.मला वाटतं याच मुळे का काय आजही मला स्वयपाकाची आवड आहे. याला आजून एक कारण असंही असावं की माझ्या लहानपनापासून मी आईच्या बरोबरीने बाबांनाही स्वयपाक करताना पाहात आले आहे.म्हणजे मला आठवतं तसं मी सहावी सातवीत असेन बहुतेक,आई ऑफीसहून येण्याआधी साधारण कणीक मळून ठेवणे,भाजी चिरुन ठेवने,वरण भाताचा कुकर लावणे अशी कामं बाबा करत.काहीवेळा त्यांच्या बरोबरीने या कामात मला त्यांनी सहभागी करुन घेतलं.ते म्हणायचे तुला जमेल तसे कर.भाजी काहीवेळा खूप मोठी चिरली जायची,भाताला पाण्याचा अंदाज चुकायचा,पण हे सगळं आई बाबांनी चालवून घेतले.त्यामुळे चुकतमाकत मी स्वयपाक शिकले.कधीही सुचना,उपदेश दिले नाहीत म्हणून त्यातली आवड आजही कायम आहे.
   माझ्या आईची एक डायरी होती .वेगवेगळ्या पदार्थांची पाककृती त्यात लिहून ठेवलेली असायची. आणि विशेष म्हणजे त्याच पद्धतीची बाबांची पण डायरी आहे.अनेक प्रकारचे मसाले,विविध प्रांतीय पाककृती ,अनेक प्रकारचे केक,एक ना अनेक पदार्थांनी ह्या डाय-या भरलेल्या आहेत.एखादा चांगला पदार्थ कोणी करत असेल तर तो डायरीत टीपून ठेवायची सवय मला यामुळेच लागली.मी रमते पदार्थ बनवण्यात आणि मला मनापासून आवडतं असे पदार्थ बनवून खाऊ घालण्यात.
     लग्नाआधी आई बाबांचे बघून बघून मी पूर्ण स्वयपाक ,अगदी पुरणपोळी सकट सगळं शिकले ते खूप आवडीने.लग्नानंतर माझी ही आवड कायम राहीली ती कौस्तुभच्या आईमुळे.आई खूप छान,चविष्ट स्वयपाक करतात.कोणताही पदार्थ खूप मनापासून करतात.त्यांचे भातांचे प्रकार खूप खास आहेत.काही गोष्टी त्यांच्या बघत बघत शिकले.
     एकत्र कुटुंब असल्याने धबडगा खूप, त्यामुळे पदार्थ करतानाची गंमत, त्यातला आनंद संपला.आवड नक्की शिल्लक आहे पण आता काही पदार्थ करताना जुन्या गोष्टी आठवतात आणि वीट येतो करण्याचा.एवढ्या धबडग्यात माझ्या स्वयपाकाला मनापासून दाद देणारी एकच व्यक्ती होती.बाबा ( कौस्तुभचे बाबा ) ,मनापासून पदार्थ कसा झालाय हे पानावर बसल्या बसल्या लगेच सांगायचे.आम्ही वेगळे झालो.दुपारी घरी जाताना ते आमच्या डेक्कनच्या घरी डोकवायचे .माझ्या गरमगरम भाकरी चालल्या असतील की हमखास खाऊन जायचे.आणि परत घरी गेल्यावर आईंना सांगायचे मजा आली आज, दिपाने गरम गरम भाकरी वाढली.खूप कौतुक होतं त्यांना. माझ्या हातची भाकरी ,आळुची भाजी,हे पदार्थ बाबांच्या विशेष आवडीचे होते. आजही स्वयपाक करताना त्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.अशी मनापासून दाद देणारं मला आजून भेटलं नाही.तुमच्या सगळ्या स्वयपाकाचा थकवा दूर करणारी गोष्ट म्हणजे त्याला मिळणारी दाद.
     स्वयपाकाचे काम हे फक्त बायकांचेच अश्या विचारांच्या घरात मी जन्मले नाही.माहेरी कधी मी हे पाहीले नाही त्यामुळे सासरी आल्यावरचे चित्र पचवणे अवघड गेले.नंतर सवयीचा भाग म्हणून पुरुषांनी ऑर्डर सोडायची आणि बायकांनी ते करत रहायचे याची सवय झाली.पहील्यां पहील्यांदा होणारी चिडचिड त्या गोष्टी स्विकारल्याने कमी झाली.आणि कोणत्याही परीस्थितीत मग आपण आजारी पडो, आपले अ‍ॅबॉर्शन होवो,बाळंतपणातून उठो,मुलं तान्ही असो,त्यांचे आजारपण असो,अश्या गोष्टींपासून ते एखाद्या दिवशी मूड नाही म्हणून.....पण ते सगळं बाजूला सारुन स्वयपाक केलेले आहेत. आता इतक्या वर्षांनी हे सगळं सहन केले आहे म्हणून का काय या सगळ्याचा वीट आलाय,कंटाळा आलाय.थकलेली आहे मी.उत्साहच कमी झालाय.या क्षणाला या स्वयपघरातून रीटायर्ड हो म्हणलं कोणी तर आनंदान बाजूला होण्याची तयारी झाली आहे.आता जे काही करते आहे ते बळं करते असे वाटते. आता अस वाटतं कोणीतरी आयतं द्यावं हातात.नाही पडायचं त्यात.त्याहीपेक्षा आवडीच्या माझ्या राहून गेलेल्या गोष्टींमध्ये रमून जायचे आहे.त्या गोष्टी करण्यात वेळ घालवायचा आहे.आणि आता त्या दिशेने माझा प्रवास सुरु झाला आहे.


Sunday, February 8, 2015

सांगता न येणार्‍या गोष्टी

माझे आणि दीपाचे बोलणे चालले होते, दीपा म्हणाली, " मी तर मोकळी आहे मी माझ्यासंबंधातलं काहीही सांगू शकते, लिहू शकते. मला सांगता येणार नाही असं काही नाहीच."
माझं म्हणणं होतं, " दीपा, मीही मोकळी आहे, मी माझ्याबाबतीतल्या ७५% गोष्टी सांगू शकेन, तू माझ्यापेक्षाही मोकळी आहेस तू ९०% गोष्टी सांगू शकशील, पण तुझ्याकडेही १०% तर असणारच, जे तुला सगळ्यांना नाही सांगता यायचं. "

 सगळ्यांना सांगण्याची इच्छा नसणं आणि सांगता न येणं या दोन वेगळ्या बाबी आहेत.
सांगायचं म्हंटलं तरी नाही सांगता यायच्या अशा गोष्टी.
अशा गोष्टी कुठल्या असतात? आहेत?
खोलवरचे अपमान, सल, दुखावले गेलेलो आहोत असे प्रसंग विसरताही येत नाहीत आणि सांगताही येत नाहीत.
काही प्रसंगांचा जीव तर इतका छोटा असतो की सांगायला गेलो तर समोरच्याला वाटतं त्यात काय एवढं? सांगताना आपल्यालाही कळत असतं की हे सहज वाटू शकतं, तरीही आपल्या आत आपण खूप दुखावले गेलेलो असतो, बाण वर्मी बसलेला असतो.
काही प्रसंग असे असतात की नंतर आपल्याला वाटत असतं की असे कसे आपण चुकलो? मग त्या आपल्या चुका नाही सांगाव्याशा वाटत.
आपलं अपयश? ते नाही सांगावसं वाटत. नातेसंबंधातलं अपयश सांगावसं वाटत नाही.

विचार करता करता असं लक्षात येतय की या तर खूप मोठ्या गोष्टी झाल्या, काही साध्या साध्या गोष्टीही नाही सांगता येत.
उदा. कुणाचा फोन चालू असेल, समोरचा माणूस गप्पाच मारतोय आणि आपण महत्त्वाच्या कामात आहोत तर मला पटकन असं म्हणता येत नाही की नंतर बोलूयात. मी त्या माणसाच्या बोलण्यातल्या फटी शोधत राहते.
 त्याउलट समोरच्याला मला गप्पा मारायच्या आहेत, माझ्यासाठी वेळ काढ, असंही नाही सांगता येत.

खरं स्वत:वर खूपच काम करायला हवं आहे.


******

Friday, November 21, 2014

दीपू

आमच्या वाड्यात लहानांत सगळे मुलगे आणि सर्वात लहान मी एकटी मुलगी.
माझ्यापेक्षा वर्षाने मोठा दीपू. पहिला वहिला मित्र. तसे वाड्यातले सगळेच मित्र पण हा खास मित्र.
 आम्ही दोघं खेळात कायम लिंबू-टिंबू. घरातही लहान त्यामुळे समदु:खी.
आमची छानच मैत्री होती. आम्ही गळ्यात गळे घालून वाडाभर फिरत असू. दुसरी तिसरीपर्यंत असेल, म्हणजे तसे लहानच.
पण तरीही आमच्या गळ्यात गळे घालण्याबद्दल किंवा एकत्र असण्याबद्दल कोणीही कधीही हटकलेलं नव्हतं.
तो आमच्या घरी नाहीतर मी त्यांच्या घरी नाहीतर दोघे मिळून वाड्यात कुठेतरी.
तो वरच्या इयत्तेत असला तरी माझं सगळं ऎकायचा. एकमतच असायचं आमचं. :)

वाड्यात छोट्या मुलांनी गणपती बसवायचा असं ठरवलं. दीपूचा मोठा भाऊ मनोज त्यात पुढे होता.
चिठ्ठ्या टाकून मुलांची कार्यका्रिणी वगैरे ठरवण्यात आली. अध्यक्ष, सचिव, खजिनदार वगैरे....
आम्ही दोघंही कुठेच नाही, आम्ही भोकाड पसरलं असेल, आया मधे पडल्या असतील, मग आम्हांला कुठलीतरी (हरकाम्या टाईप) पदं मिळाली.
एकाच नावेतले प्रवासी असल्याने आमचं मेतकूट होतं.

दीपूची मोठी बहीण आक्का चांगली दहावीत वगैरे होती, आईच्या बरोबरीने कामं करायची, तिची गणती मोठ्यातच होत असे.
मनोज त्यांच्याकडच्या मोठ्या टेबलावर चादरी वगैरे घालून घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करायचा.
आम्ही दोघं तिथेच आसपास रेंगाळत त्याच्याशी गप्पा मारत खेळत असू.
मग शेवटी तो दीपूच्या आणि त्याच्याबरोबर माझ्याही रूमालाला त्रिकोणी/चौकोनी घड्याघड्यांची इस्त्री करून देत असे.
तो गरम रूमाल घरी आणून मी व्यवस्थित कप्प्यात ठेवत असे.

तो चित्र छान काढायचा. त्याच मोठ्या टेबलावर ड्रॉईंग शीट पसरून तो तो वेगवे्गळी चित्रे काढत असे. हुबेहूब!
पुस्तकातल्यासारखे शिवाजीमहाराज!
आणि मग चित्राभोवती फ्रॆम असावी तशी वेगवेगळी वेलबुट्टी काढत असे.
एका शीटवर पाच-सहा छोटी छोटी चित्रे तो काढायचा.
डोळे विस्फारून आम्ही पाहात असू.
त्याचं पाहून मी डोळा काढायला शिकले.
मग पाहिलेल्या त्याच्या वेलबुट्ट्य़ा कुठे कुठे वापरल्या, कधी रांगोळीत कधी मेंदीत.
तोही कुठून कुठून शिकला असेल पण मी शिकले ते त्याच्याकडून.
त्याचं झालं की तो कागदाची व्यवस्थित गुंडाळी करून रबर लावून ठेवत असे.
त्याच्या नेटकेपणाला आम्ही जरा दबून असायचो.

गणपतीत एकेवर्षी आक्काने पाण्यावर सुंदर रांगोळी काढली होती.
आधी कोळशाची बारीक पूड करून घेतली, परातीत पाणी घेतलं, त्यावर सगळीकडे ती पूड पसरली आणि मग हलक्या हाताने त्यावर पांढरीशुभ्र रांगोळी काढली. साधीच रांगोळी, नेहमीची पण दिव्याच्या प्रकाशात काय सुंदर दिसत होती!
तर तिचं हे ठरल्यापासून, कोळशाची पूड, ती चाळणीनं चाळणं, मग परातीत पाणी घेणं...... रांगोळी पूर्ण होईपर्य़ंत, आम्ही तिच्या मागे मागे.

आमच्या काळी मुलांना भरपूर वेळ असे, बारीक निरीक्षण करण्याची संधी असे.
असं काहीही कळलं की आधी आम्ही एकमेकांना सांगत असू आणि मग  काय घडतंय तिथे बसून राहात असू.
साधा कल्हईवाला आला तरी त्याची सगळी भांडी होईपर्यंत आम्ही बसून राहात असू. कळकट भांडी एकदम चमकायला लागत, तो चमत्कार मिळूनच पाहायचा असे. शिवाय त्या कल्हईवाल्याला मदत देखील करायचो. वाडाभर तो फाटकाबाहेर बसलाय हे सांगत फिरायचं, शिवाय भांडी संपत आली की अजून काही आहेत का, बघा, तो आणखी चार महिने यायचा नाही, हे ओरडत आणखी एक फेरी.

अगदी नाली तुंबली असेल, ते साफ करायला माणूस आला असेल तरी आम्हांला ते टक लावून बघायचं असे. तुंबलेलं पाणी वाहून गेलं, वर चार बादल्या पाणी टाकलं, तेही भराभर वाहून गेलं की आम्ही विजयी चेहर्‍याने एकमेकांकडॆ बघत असू.

एकूण काय तर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमधे एकमेकांसोबत.
उन्हाळ्यात पत्ते, शिवाय नेहमीचे चंफूल, चिरकी, गोट्या, चक्का असे सगळ्या मुलांबरोबरचे खेळ असायचेच.

मी पहिलीत किंवा दुसरीत असताना असेल. दीपूच्या बाबांनी असेल किंवा अन्य कुणी असेल, त्याच्यासाठी एक छोटुसा शाईपेन आणला. नेहमीच्या पेनांपेक्षा जवळपास निम्मा. जाडीलाही, उंचीलाही. असं ऑलीव्ह ग्रीन रंगाचं पेन आणि सोनेरी टोपण! नुसतं शोभेचं नव्हतं ते! शाई भरली की मस्त चालायला लागलं. ते मिळालं की दीपू  लगेच दाखवायला आमच्याकडे घेऊन आला. कसलं देखणं होतं ते! त्याच्या छोट्या हातात तर ते काय ऎटबाज दिसायचं. ते तसलं पेन मला लगेच हवं झालं. पण ते काही आमच्या इथे मिळत नव्हतं. ते पेन मिळालं आणि दीपू असा हवेतच. सारखं पेन त्याच्याजवळ आणि सारखं त्यासंबंधीच बोलणं. पेनशिवाय त्याला काही सुचेना. तो नेहमीचा दीपू राहिलाच नाही. त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही असं काहीतरी आमच्या मधे येत होतं. नेहमीच्या गप्पा नीट होईनात. थोडी भांडणं व्हायला लागली, पटेनासं झालं. एकीकडे ते पेन हवंच असं मला झालेलं. आणि मी काय केलं असेल? दोन-तीन दिवसांनी त्याचा डोळा चुकवून ते पेन चक्क चोरलं. मी ते हळूच लपवून ठेवलं. पेन हरवलं म्हंटल्यावर त्याने जो काय गोंधळ घातला. मी पण त्याच्या जवळच होते. मी ते लपवलं असेल अशी कोणाला साधी शंकाही आली नाही. दुसर्‍या दिवशी तो जरा शांत झाला. पण दु:खीच. तिसर्‍या दिवशी जरा नॉर्मल. तोवर माझ्या लक्षात आलं की त्याचं पेन मी उघडपणे वापरूच शकणार नव्हते. शिवाय तो असा मलूल झाला होता की वाईटही वाटत होतं. पेन घेतल्याची टोचणीही होतीच. मग मी हळूच ते पेन त्यांच्या खिडकीच्या दाराखाली ठेवून दिलं. दोनेक तासांनी तो नाचत आला पेन सापडलं म्हणून.

 दुसरी-तिसरीपर्यंत आमची अगदी घट्ट मैत्री होती. पण तिसरीत काय झालं? मला एक मैत्रिण मिळाली, शाळेतली, पलीकडच्या गल्लीतली. मग काय आम्ही दोघी सोबतच. एकमेकींच्या घरी फेर्‍या सुरू! तिला दोन मोठ्या बहीणी होत्या आणि ती सराईतपणे अय्या, इश्श, असं मुलींसारखं काय काय करू शकायची, मला त्याची भूलच पडली.

 पुढे दीपूने वाडा सोडला. तरी आमचं जाणं येणं होतंच. मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.
पुढे सगळ्यांचीच स्वत:ची घरं झाली. तो ग्रॅजुएट झाला आणि नोकरीलाच लागला. मी शिकतच होते, आला तेव्हा नोकरीतल्या मजा सांगायचा.
आमच्याकडे कधीही मुलांनी घरी यायचं नाही, मुलांशी गप्पा मारायच्या नाहीत, असं नव्हतं. जो कोण असेल त्याची घराशी मैत्री व्हायची. हा तर वाड्यातला मित्र होता.

आधी आधी पुण्याहून गेले की मी सगळ्यांकडे जाऊन यायचे. पुढे ते बंद झालं. अजूनही आईकडून बातम्या कळतात. पण गेल्या दहा-बारा वर्षात मी त्यांच्याकडे गेलेले नाही.

*****

त्याचा पत्ता मला ठाऊक आहे. घर मला माहीत आहे.
पण असं वाटतं जाऊन बोलणार तरी काय? तेच मुलांबाळंविषयी, नोकरी धंद्याविषयी. आणि हो, वाड्यातल्या जुन्या आठवणी निघतील. मग त्याच्या बायको, मुलांना किंवा माझ्या मुलांना वाड्यात कसं होतं ते सांगीतलं जाईल. वाड्यातल्या आठवणी आमच्या बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहेत. त्याने त्या कशा पाहिल्यात कोण जाणे. म्हणजे तो त्यात रमलेला असेल की नाही? सगळेच मोठे त्या आठवणीत रमतात असे नाही. ते कुरकुरे होत जातात किंवा अलिप्त. आपली घरं किती छोटी होती, किती अडचणीत राहायचो हेच तो सांगायला लागला तर? मला नाही चालायचं. मला ते नाहीच बोलायचं.

 दुसर्‍याने काय बोलावं याच्यावर नियंत्रण ठेवू पाहणारी बाई आहे की काय मी? :)
मग माझ्यासारख्या बाईने काय करावं? तेच मी करते.
मला त्याच्या घरी जायचं नाही.

**********

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...