आपण शील ही जगण्यापेक्षा किमती वस्तू करून करून ठेवली आहे.
जोहार काय? सती काय? काय आहे यांच्या मुळाशी?
बाईनं पवित्र राहिलं पाहिजे. बाई ही घराची, कुटूंबाची एक गौरवाची वस्तू असते,
ती घासून पूसून चकचकीत ठेवायची. मिरवायची. तिच्यावर डाग पडून चालणार नाही.
डाग पडला आणि पुन्हा धुवून टाकला... चालणारच नाही.
ते काचेचं भांडं आहे, तडा गेला की संपलंच!
जन्मभर बाईने प्रामुख्याने काय करायचं आहे? तर स्वत:ला सांभाळायचं आहे.
लहानपणापासून मुलींना काय काय शिकवलं जातं?
माझ्या आईने मी कळती झाल्यावर दोन गोष्टी सांगितलेल्या....
एकदा सांगितल्या, त्यातला गंभीरपणा मला कळला, पुन्हा तिने सगळं माझ्यावर सोडून दिलं.
पहिलं हे होतं की कुठल्याही पुरूषाशी बोलताना थेट डोळ्यात डोळे घालून बोलायचं नाही.
खालमानेने पुरूषांशी बोलायचं? का म्हणून? ते काय आकाशातून पडलेत का?
ह्या! मला नाहीच जमणार आणि नाहीच चालणार!
डोळे हे संवाद साधण्याचं महत्त्वाचं आणि प्रभावी साधन आहे.
आपण जर नीट समोरच्याच्या डोळ्यात बघून बोललो तर आपला आत्मविश्वास पोचतो त्याच्यापर्य़ंत,
आणि बाईला कळतंच ना, समोरचा पुरूष कुठल्या नजरेने पाहतो आहे ते,
अशा पुरूषांना नजरेने तिथल्या तिथे गप्प बसवता येऊ शकतं, नाहीतर सोडून द्यायचं/ द्यायला लागतं.
कोणी पुरूष नकोशा नजरेने माझ्याकडे पाहतो आहे, डॊळ्यांनी सांगून त्याला कळत नाही आहे,
तर त्याला गप्प बसवण्यासाठीचे शब्द मी शोधले पाहिजेत.
माझा प्रॉब्लेम हा आहे की मी शिव्या देऊ शकत नाही. पण कुठले तरी सभ्य अशब्द मला वापरता आले पाहिजेत.
त्या शब्दांमुळे त्यालाही आणि आजूबाजूच्या इतरांनाही माझी नाराजी/ त्रागा कळला पाहिजे.
असे शब्द माझ्या पिढीत माझ्याकडे नव्हते.
तर मला म्हणायचंय असं की पुरूषांच्या नकोशा पाहण्यासाठी मी काहीतरी उत्तर शोधीन पण म्हणून सरसकट सगळ्या पुरूषांच्या डोळ्यात "थेट आणि नीट" न पाहता बोलायचं, हे स्वीकारणार नाही.
मी ते पाळलं नाही.
दुसरं तिने सांगितलेलं की कुठल्याही वयाचा कुठलाही पुरूष आणि आपण असे दोघेच एका घरात असू, खोलीत असू, तर असं थांबायचं नाही. तिथून बाहेर पडायचं.
हे मी पाळलं खूप वर्षं! आता सोडून दिलं.
हे जे सांगणं आहे ना? त्यात अख्य़ा पुरूषजातीबद्दलची बायकांना वाटणारी भीती दडलेली आहे.
यामुळे होतं काय की आम्ही पुरूषांना समजूनच घेऊ शकत नाही.
त्यांच्याशी मैत्रीच होऊ शकत नाही आमची.
अख्खं पुरूषांचं जग अनोळखीच राहून जातं.
अनोळख असल्याने आपसूकच भीती वाटायला लागते.
बाईच्या आयुष्यात येणारा पुरूष म्हणजे नवरा.
त्याच्याशी जर मैत्री करता आली तर जरा खिडक्या उघडू शकतात
अन्यथा अंधारच!
एकाच जगात, पुरूषांचं वेगळं आणि बायकांचं वेगळं अशी दोन जगं आहेत,
एकमेकांना समातंर अशी!
नव्या पिढीत, आपल्या मुलांमधे, मुलामुलींची मैत्री दिसते आहे.
ही दोन जगं मिसळण्याच्या काही शक्यता मला दिसताहेत.
या मैत्रीमुळे पुरूषांच्या जगाचं स्त्रियांच्या जगावरील आक्रमण कमी होईल,
थांबू शकेल.