’सौंदर्य’ हे एक मूल्य आहे. जे आयुष्य माझ्या वाट्याला आलं आहे, ते मी सुंदर करीन.
प्रत्येकाला सुंदर दिसण्याचा हक्क आहे. हे आपल्याला मान्यच आहे हं!
त्याच्या किती आहारी जायचं?
त्यात दाखवेगिरी किती आहे?? ...... पाहायला हवं.
आपण सुंदर दिसलो नाही तर कुणी आपल्याकडे लक्षच देणार नाही, अशी असुरक्षितता असते का मनात?
मेक अप शिवाय बाहेर पडू न शकण्याची असहायता का आहे?
काय करून टाकतो आपण आपल्या शरीराचं? एक खेळणं?
>>स्वीकारा ना स्वत:ला! जशा आहात तशा!
आणि जशा आहात तशा तुम्ही छानच आहात.
स्वत:कडे पुरूषाच्या नजरेतून बघणं टाळा.
आपल्यात काय काय छान आहे ते शोधा.
स्वत:मधलं असं ’छान’ सापडलं, की ती छान दिसेलच की नाही?
कुणाला दिसला नाहीत ’छान’... तर तो त्यांच्या नजरेचा दोष आहे.
तुम्ही ”छानच’ आहात.
हे फार आदर्शवादी झालं.
वस्तुस्थिती अशी आहे की, गोरेपणा, नितळ त्वचा, सुळसुळीत केस वगैरे वगैरे देणार्या/ किंवा अशी आश्वासनं देणार्या क्रिम, तेले , साबणे यांची विक्रमी विक्री होते. त्याशिवाय ते एवढा पैसा जाहिरातीत ओतणार नाहीत.
ही समाजाच्या दृष्टीने चांगलं दिसण्याची/ सुंदर दिसण्याची ऒढ कसली म्हणायची?
समाजाच्या दृष्टीने ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे.
समाजा-समाजानुसार यातले सौदर्याचे निकष बदलत जातात.
आपल्या समाजात अजूनही "गोर्या रंगाची" "जेत्यांच्या रंगाची" ओढ कायम आहे.
आपण समशीतोष्ण कटीबंधातले लोक आहोत, आपला रंग हा सावळा/ काळाच असणार आहे.
जागतिकीकरणामुळे जसजशी जगाची ’जागतिक खेडे’ या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, तसतशी प्रसाधन कंपन्यांचा जोर त्वचेच्या रंगापेक्षा नितळतेकडे वाढत आहे, त्यांना सर्वसमावेशक होणं गरजेचं बनलं आहे.
आपले हिरो कोण आहेत? तर रूपेरी पडद्यावरचे नट/ नट्या.
असं का व्हावं?
अनिता अवचटांना कॅन्सर झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे सगळे केस गेले. त्या समाजात तशाच वावरत असत.
आपल्याला आपले पांढरे केस झाकावेसे वाटतात, का?
ह. अ. भाव्यांनी दुर्गा भागवतांची एक आठवण सांगितलेली आहे, दुर्गाबाई भाव्यांच्या पत्नीबरोबर भाजी निवडत बसल्या होत्या. त्यांना एके ठिकाणी भाषण द्यायला जायचं होतं. वेळ होत आली, तशी त्या निघाल्या, नेसणं थोडं ठीक केलं, म्हणाल्या , ” चला.” भाव्यांनी विचारलं, ” लुगडं बदलायचं नाही का?” त्या म्हणाल्या, ”हे चांगलंच आहे.” तशा घरगुती लुगड्यावर त्या भाषण द्यायला गेल्या. श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.
हे आदर्श आमच्यासमोर का नसावेत?
ययातिच्या गोष्टीइतकीच माणसाच्या चिरतारूण्याच्या ओढीची गोष्ट जुनी असणार!
कुठलीही गोष्ट खूप खणत गेलात की ती स्त्री-पुरूष संबंधांपर्यंत येऊन पोचते.
सौंदर्याची तर पोचणारच पोचणार!
(क्रमश:)