Thursday, March 31, 2011

वाजत गाजत


काल भारत पाकिस्तान उपान्त्य फेरीचा सामना संपल्यानंतर बाहेर पडलो. भारताने सामना जिंकल्याने खुशीत होतो, त्यासंबंधी बोलत होतो. दवाखान्यात जायचे होते.रात्रीचे साडेअकरा वाजले होते. पौड रस्त्यावर आलो तर नुसती गर्दी, अडकलो. सगळ्यांनी कुठे कुठे एकत्र मॅच पाहिली असणार... घरी परतत असणार. समोर चौकात काही तरूण मुलं मुली एकत्र जमून आनंद साजरा करत असणार.... साहजिक आहे.... वा! मुलांबरोबर मुलीही दिसताहेत. ट्रॅफिक जॅम मधे अडकलो तरी आजूबाजूचे चेहरे आनंदी दिसत होते. पाच मिनिटे ... दहा मिनिटे झाली..... इंचाइंचाने पुढे सरकत होतो. चौकाच्या जसजसे जवळ येत होतो तसतसे उत्साह अतिरेकी दिसायला लागला. बाजूला काही दारूच्या बाटल्या फुटलेल्या दिसल्या, पुढे मुले दारू पित होती. झुलत होती, बाटल्या हातात दिसत होत्या. ओरडत होती, एकमेकांना टाळ्या देत होती, मिठ्या मारत होती. एका बाईकवर तीन तीन जण, काही मुलांनी शर्ट काढलेले होते. या सगळ्यांनी  उन्मादी अवस्थेत जावं असं झालं होतं तरी काय?
 भारत - पाकिस्तान सामन्यात भारत जिंकायची शक्यता अधिक होती. ते ही बाजूला ठेवू पारंपारीक प्रतिस्पर्धी म्हणून जिंकल्याचा अधिक आनंद, ठीक आहे.... पण इतका??
 माध्यमे भस्मासुरासारखी आहेत. त्यांना सतत बातम्या लागतात. वाचणारे , पाहणारे त्यात वाहून जातात. माध्यमांनी ही गोष्ट इतकी टोकाची करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.
 भारत हरण्याची शक्यता होतीच ना? जर हरलो असतो तर या मुलांनी काय केलं असतं? तोड्फोड, नासधूस? जिंकण्याचा अतिरेकी आनंद तर हरण्याची अतिरेकी निराशा.
 एखादी गोष्ट तुम्ही जितक्या अभिमानाची करून ठेवाल तितकी ती घडली नाही तर शरमेची होऊन बसते.
*******
 हॉस्पीटलमधे पोचलो तर तिथेही बरेच लोक. दोन मुलांना लागले होते कारण ते जोरात गाडी चालवताना पडले होते. एक मुलगी अशीच बाईकवरून पडली म्हणून. एक गाडीवरून पडलेला तरूण रक्तबंबाळ होऊन आला, चालू शकत नव्हता आम्ही त्याला वाट करून दिली. तिथला कर्मचारी म्हणाला ” आज मॅचमुळे फार गर्दी आहे.” दोघे तिघे बाहेर पट्ट्या बांधून बसले होते.
 निघताना दोन तरूण म्हणाले,” तुम्ही हे इंजेक्शन दिलं आहे, त्यावर ड्रिंक्स घेतली तर चालतील का?”
डॉक्टर म्हणाले, ” नाही त्याचे साईड इफेक्टस होतील.”
” आज मॅच जिंकली, आज तर घेतलीच पाहिजे, काही झालं तर तुम्ही आहातच.”

*******
साखरपुडा खूप लोकांना बोलावून, खूप खर्च करून, वाजत गाजत केला जातो. त्यानंतर जर मुलाला / मुलीला आपण एकमेकांसाठी योग्य नाही असं लक्षात आलं तरी लग्न टाळता येणं फारच अवघड होऊन बसतं
 त्यापेक्षा साध्या पद्धतीने घरातल्या घरात, आपण एकमेकांना जाणून घेत आहोत हे ध्यानात ठेऊन, परतीची वाट असू शकते ही जाणीव दोन्ही बाजूंनी ठेऊन केला तर?
 पुढे अयशस्वी होणारी काही लग्ने टाळता येऊ शकतील.
********

1 comment:

  1. आकाश चोप्रा (माजी कसोटीपटू, २००४ च्या पाकदौर्‍यावर खेळला होता) चा आज लेख आहे cricinfo वर. खेळाडू या दृष्टिकोनातून या विषयाकडे तो पाहतो आहे.

    त्या लेखाच्या शेवटी आकाश लिहितो...

    It's about time that we, as a nation, answer these questions. Are we going to behave like this every time we play Pakistan? If we detest them so much, it may not be a bad idea to severe all cricketing ties with them, for a cricket match can't be used as a benchmark to prove our superiority as a nation. Every time we behave like the way we did this time, it pulls us down as a responsible nation. The choice is ours.

    आजच कोणीतरी वाचकांच्या पत्रात लिहिलं आहे तसं.. हा सामना पाहायला पंतप्रधान होते. परमनेत्या त्यांच्या मुलाबाळाजावयानातवंडांसह होत्या. सामना जिंकल्यावर राष्ट्रपतींपासून सगळ्यांनी अभिनंदनाचे संदेश पाठवले..
    ही शहाणी माणसे जर हा विवेक सांभाळत नसतील तर सामान्य माणसांना कशाला बोल लावायचा..

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...