असंख्य छोट्या छोट्या गोष्टी आपण सोडून देतो, द्यायला हव्यात. निदान त्याची जाणीव तरी आपल्याला असते का?
त्या सोडाव्या लागणार आहेत हे आपण स्वीकारावं पण सोडतो आहोत याची जाणीव असावी.
लग्न झाल्यापासूनच बायको नवर्याची सगळी कामे आपल्याकडे घेते. साधी कपडे नीटनेटके ठेवण्यापासून, गावाला जाण्याची तयारी, जमतील ती बाहेरची कामे, एखाद्या कुशल व्यवस्थापकासारखी! हे आपण का करतो? नवर्याशी आपले काय नाते असते? कसे असावे अशी आपली अपेक्षा असते?
लग्नाच्या थोडसं आधी मिलिन्दने मला विचारले होते,’कंपनीच्या एका योजनेअंतर्गत काही घरगुती वापराच्या वस्तू घेण्यासाठी निवडायच्या आहेत, त्यात इस्त्री घ्यायची का?’ मी म्हणाले,” मला करायला जमणार नाही, तू वापरणार असशील तर घे.” मला माझ्या कपड्यांना इस्त्री लागतेच असे नाही. त्याचे तो बघेल.
लग्नानंतर मिलिन्दची रजा संपली, आम्ही पुण्याला आलो, मिलिन्दने त्याचे कपडे धुवायला भिजत घातले, बरेच होते, दोन-तीन बादल्या. भिजल्यावर त्याने धुवायला सुरूवात केली. मी वाचत होते, एकटाच कपडे धुतोय म्हणून उठून बाथरूमच्या दाराशी जाऊन त्याच्याशी गप्पा मारत उभी राहिले, मला त्याला मदत करावीशी वाटली नाही, असं नाही, का करायची? तेंव्हा मी फार टोकदार होते. घर म्हणजे वसतिगृह नाही, नवरा बायको म्हणजे रूममेटस नाहीत. तरी ज्याची कामे त्याने करावीत हेच बरं. शेवटी वाळत घालायला मी मदत केली, मग दोघेही बाहेरच्या खोलीत येऊन गप्पा मारत बसलो. मिलिन्दने एका शब्दानेही किंवा कृतीतून मी त्याला मदत केली पाहिजे असं सुचवलं नाही.
माझ्याजागी मिलिन्द असता तर( किंवा उलट) चा खेळ खेळायचा झाला तर मी कपडे धूत असताना वाचन सोडून माझ्याशी गप्पा मारायला नक्कीच आला नसता.
नंतर नंतर हा काटेकोरपणा गेला, आमच्यातली हद्द्देखील पुसली गेली. मी घर सांभाळणे एव्हढंच करत बसले, तरी
छोट्या छोट्या गोष्टी करताना/ सोडताना त्याचे अर्थ काय आहेत हे माझ्या डोक्यात असतं.
काही वेळा छोट्या गोष्टींनी ’शितावरून भाताची परीक्षा’ करता येते.
नवर्याशी आपले नाते काय असते? कसे असावे अशी आपली अपेक्षा असते?
आपण लग्न कशासाठी करतो?
त्याची कामे करणे, त्याची सोय पाहणे म्हणजे प्रेम करणे आहे का?
आपल्याला त्याच्या ’पायाची दासी’ वगैरे व्हायचं नाहीये ना? ( तिथे पुष्कळ जागा आहे.) आपल्याला जर सोबत हवी आहे आणि द्यायची आहे तर तो मार्ग हा नाही.
आपल्याला लग्नाच्या नात्यात मैत्री हवी असेल तर नातं बरोबरीचं असायला हवं.
छोट्या छोट्या गोष्टी करताना किंवा सोडून देताना आपल्यातलं नातं बरोबरीचं आहे याची खोल जाणीव दोघांनांही असायला हवी.
*****