Monday, February 1, 2010

परावलंबन

लग्न या चौकटीत आडकल्यावर एक मुलगी ही, स्त्री म्हणून अनेक गोष्टींवर अवलंबून रहायला लागते असे मला वाटते. म्हणजे ज्या घरात ती नव्याने आली आहे त्या सासरी. त्या घरातील लोकांवर ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या प्रसंगी,अवलंबून असल्याचे जाणवते. किंबहुना तशी परीस्थीती तिच्याभोवती निर्माण केली जाते.या नवीन घरात प्रवेश केल्यापासुन तिच्याहुन मोठ्या असणा-या व्यक्तिंची सारखी या ना त्या स्वरुपात परवानगी काढताना ती दिसते. तिच्या उठण्याच्या-झोपण्याच्या वेळा,ते तिने कोणत्या वेळेला काय करायचे इतपर्यंत तिच्यावर त्या घराची अशी एक पद्धत लादली जाते. मी ही सर्व कामे करीन पण मला वाट्टेल तेव्हा,माझ्यावेळेनुसार हे स्वातंत्र्य क्वचितच कोणा एकीला मिळत असेल.काही घरात तिने घराबाहेर जाताना कोठे जाणार?कधी येणार हे सांगण्याची बांधीलकी तिच्यावर असते.याच वेळी तिच्याबरोबरचा पुरुष याला या गोष्टींसाठी काहीही नियम नसतात.पुरुष घराबाहेर न सांगता जाणे हे ग्रुहीतच धरले जाते.घरातील सामुहीक प्रश्नांमध्ये तिला सहभागी करुन न घेणे,घरातील आर्थिक व्यवहार तिच्यापासुन लपवून ठेवणे,स्त्रीला तिच्या स्वत:साठी अथवा तिच्या कुटुंबासाठीलागणा-या पैशासाठी(मग ती नोकरी करणारी असो वा नसो.) सतत कोणापुढे तरी मागते रहाणे......या आणि अश्या अनेक गोष्टींसाठी स्त्री ही परावलंबी झालेली दिसते.या आणि अश्या अनेक तिच्या जीवनातील गोष्टी जर आपण पाहील्या तर असे जाणवते की या सर्वांमागे त्या तिच्या आपल्या माणसांचा तिच्यावर असलेला अविश्वास.ती आपल सर्वस्व सोडुन ज्यांना आपलं सर्व मानत असते अश्या सगळ्यांपैकी कोणा एकाचाही तिच्यावर विश्वास नसतो हे सिद्ध होते.त्या स्त्रीला तिचे असे वैयक्तिक आयुष्य असते हे मान्यच नसते कित्येकांना.तिला काय वाटते?,तिचे आवडीचे छंद,तिच्या आवडीच्या गोष्टी याचा विचार खुप कमी घरांमध्ये होत असेल .किंबहुना तीने माझ्याच आवडीनिवडींशी समरस होऊन रहावं असा हट्टच असतो. तिच्या आवडींसाठी आपण काय करु शकू का? याचा काडीचाही विचार न करणारी मंडळी खुप सापडतात.तिचे मन जाणण्याचा विचार कोणी करत नाही.याउलट आपल्या प्रत्येक तालावर नाचवून घेणारे व त्यामधुन असुरी आनंद उपभोगणारे अनेक जण आपल्याला सापडतात.स्त्रीयांची मानसिक गरज जशी लक्षात घेतली जात नाही तशी तिची शारीरीक गरज ही लक्षात घेतली जात नाही.पण या विषयावर पुन्हा सविस्तर बोलता येईल.शारीरीक गरज ही फक्त स्त्रीयांनाच असते का? किंबहुना गरज नसताना देखील केवळ पुरुषाच्या सोईने त्याला वाट्टेल तेव्हा ती गरज पुर्ण केली जाते. यात दोघांच्या आनंदाचा,पुर्ण सहभागाचा विचार खुप कमी वेळा केला जातो. प्रत्येक वेळी त्या पुरुषाचा मुड संभाळुन शारिरिक गरजा भागवणा-या स्त्रीयांची संख्या काही कमी नव्हे.कधीतरी तिचा मुड,तिची गरज लक्षात घेतली जातच नाही.ह्या आणि अश्या अनेक तिच्या आयुष्यातील गोष्टी आहेत की ज्या गोष्टींसाठी ती सतत कोणावर तरी अवलंबून रहाताना दिसते अथवा तशी परीस्थिती निर्माण केली जाते. आणि त्यामुळे आपण कुणाचं तरी मिंध असल्याच सतत तिला जाणवत रहाते. आणि या परवलंबनाचा एक प्रकारचा ताण तिच्यासाठी सहन करण मोठ आवघड होऊन बसतं. तिचे स्वत:चे असे तिचे स्वच्छंदी आयुष्य ती सतत कोणत्या तरी दडपणाखाली जगत असते.तिच्या या अश्या स्वच्छंदी जगण्यासाठी आपण काय करु शकु याचा विचार तरी प्रत्येक कुटुंबात केला जावा एवढी अपेक्षा.प्रत्येक कुटुंबात एक तरी स्त्री आहे. कधी ती आई,कधी बायको,कधी बहीण,तर कधी आपली रक्ताची लेक.पण या प्रत्येक रुपाशी वागणारा पुरुष हा नेहमीच वेगळा का असतो?

1 comment:

  1. लेख छान लिहिलास. विचार करण्यासारखा पण आचरणात अवघड. पण तसे पहिले तर आपण सर्वजण
    कोणत्या तरी बाबतीत परावलंबी असतोच.

    दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

    कदाचित काही वेळा आपण मुद्दाम परावलंबी होतो कारण त्यामुळे जबाबदारी टाळता येते.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...