अगदी काल-परवाचा ताजा प्रसंग...माझ्या भावजयीचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम.सगळी तयारी झाली होती.झोपाळा सजवला,ओटीचे ताट सजवले,औक्षणाची तयारी केली,सर्व काही.आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.आईने मला आमच्याकडील बायकांना भावजयीची ओटी भरायला बोलवायला सांगितले.माझ्या जरा नावडीचे आणि मला अवघड असे ते काम.अवघड अश्यासाठी की त्या बायकांमध्ये अश्या दोघीजणी होत्या की त्यांना माझी इच्छा असूनही मी बोलवू शकले नाही.कारण एक विध्वा व दुसरी अशी की जिला मूलबाळ नाही. विचार आला आणि आईपाशी गेले.मी त्या दोघींना बोलावू का असे तिला विचारता तीही दोन मिनीटे थांबली आणि तिने माझ्याकडे बघून नकारात्मक मान हलवली.त्या दोघींच्याच बाजूला बसलेल्या बायकांना बोलावताना मला माझीच लाज वाटत होती.किंबहूना अपराध्यासारखे वाटत होते.मला माझा स्वत:चाच राग आला होता. मी काय आणि माझी आई काय अश्या रुढी अजिबात न मानणा-या.पण आमच्या मनावर या समाजाचे दडपण नकळत होतेच.आपण कीतीही म्हणलं तरी ही चौकट मोडण्याचे धाडस आपल्यात नसतच.म्हणजे माझ्याततरी नव्हतं.विचार केला तर त्याप्रसंगी माझी आई माझ्या पाठीशी उभी राहीली असती तर सगळ्यांशी वाद घेऊन त्याला विरोध देखील केला असता.पण तसे झाले नाही.मनातून पटत नसताना देखील आईचे मी ऎकलेच.इतर ठीकाणी नाहीपण आपल्या माहेरच्या,हक्काच्या माणसांमध्ये आपण ही चौकट मोडू शकू असे अनेकदा मला वाटत होते. पण ते तेवढे सोपे नव्हते.काय झालं असतं त्यादोघींनी तिची ओटी भरली असती तर....?इतक्या सगळ्या बायकांत त्या दोघींना वेगळी वागणूक देणारी मी शेवटी इतर बायकांसारखीच निघाले.भले ते वागणे मला पटो अथवा ना पटो.या सगळ्यांच्या विरोधात जाण्याची ताकद माझ्यात नव्हती.आणि ह्यामध्ये मी माझी हार झाली असे समजते.
सुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.
Subscribe to:
Post Comments (Atom)
हिरो
माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...
-
माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...
-
यात्रा हे मुक्ता बाम लिखित दिग्दर्शित नाटक आहे. एकपात्री आहे, सुकन्या गुरव ने आक्काच्या भूमिकेचं सोनं केलं आहे. यात्रा ही आक्काची गोष्ट आह...
-
"स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू असते" असं वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला मिळत... कधीकधी ते खंर आहे असं वाटायलादेखील लागतं. सासू-सून, ...
कृती होऊ शकली नाही याला ’हार’ म्हणायचे का ?
ReplyDeleteअसं वाटणं ही एक पहिली पायरी आहेच. ती गाठणे हेही महत्वाचेच आहे..
Few people are capable of expressing with equanimity opinions which differ from the prejudices of their social environment. Most people are even incapable of forming such opinions.
- Albert Einstein
या ओटी भरणे, हळदीकुंकु प्रकाराबद्दल (आणि त्यातून वगळले जाण्याबद्दल) मला एक कुतुहल आहे..
हा ’मान’ आहे असे वाटणार्या किती जणी आहेत आपल्या पिढीत आणि आपल्या आजूबाजूस ?
आणि वैवाहिक दर्जावर जो ’मान’ मिळतो तो झिडकारणेही तेवढेच पोटतिडिकीने का नाही होत जितके तो ’मान’ नाकारला जातो तेव्हा होते ?
याच उदाहरणामध्ये, ज्यांना ते नाकारले गेले आणि ज्यांना तो ’मान’ मिळाला हे दोन्हीही खरंतर सारखेच विवादास्पद व्हायला हवे.
दिपा इथे मी तुला नक्कीच माझे अनुभव सांगू शकेन. आत्ता फक्त comment देते. वर म्हण्ल्याप्रमाणे ’मान’ वाटणारे कितीजण आहेत ? मी स्वतः एके ठिकाणी माझ्याकडून चालणार नाही ना ? असं म्हणून अंग काढून घेतले होते. तेव्हा तेथील इतर बायका अस काही नाही अस म्हणून मला सांभाळत होत्या. पण मी मनातल्यामनात सुटले म्हणत होते. इतरांच्या बाबतीत आपण निर्णय घेऊ शकत नाही.(तुझ्य़ा वहिनीचे त्याबाबतीतले मत महत्वाचे) त्यामुळे तू न केलेल्या क्रुतीबद्द्ल तुला हरले म्हणायच काहीच कारण नाही.
ReplyDeleteदीपा, हे हरणं नाही, हतबलता आहे. प्रत्येक वेळी या गोष्टी आपल्या हातात असत नाहीत. मिलिन्दने लिहिलेलंही खरं आहे. "ज्यांना ते मान नाकारले गेले आणि ज्यांना तो ’मान’ मिळाला हे दोन्हीही खरंतर सारखेच विवादास्पद व्हायला हवे."
ReplyDeleteबाईची प्रत्येक बारिक सारिक गोष्ट ही नवर्याशी, पुरुषाशी-त्याच्या आस्तित्वाशी निगडीत करुन टाकलेली आहे.तिचं असणं, दिसणं, नेसणं,अगदी नावही. लग्नाआधी ’कु’ लिहा, लग्नानंतर ’सौ’ लिहा..(मधे एक चि. सौ. कां. पण येऊन जातं).
लग्नानंतर नाव लिहायचा प्रसंग आला, तेव्हा बदललेलं मधलं नाव आणि आडनाव मी सहजपणे लिहिलं कारण ते बदलणार आहे हे मी माझ्याही नकळत मान्य केलं होतं आणि त्याबद्दल काही वेगळा विचारच केला नव्हता. पहिलं नाव मात्र कटाक्षाने ’अश्विनी’च लिहिलं.’सौ’मात्र लिहिलं नाही. अजूनही लिहित नाही.लग्न झालंय म्हणून, किंवा नवर्याचं आस्तित्व आहे म्हणून बाईनं स्वतःला भाग्यवान का म्हणवून घ्यायचं? मग लग्नाआधी काय तिचं नशीब फ़ुटलेलं असतं? आणि अशी काही सिस्टीम पुरुषांच्या नावांबाबत नाही. ते एकतर ’कुमार’, नाहीतर ’श्रीयुत’.
हल्ली सरसकट सगळ्या बायकांच्या नावामागे ’श्रीमती’ लावतात, ते एक चांगलं आहे.
ओटी भरण्यावरून आठवलं - आणखी एक परीक्षेचा प्रसंग असतो, तो म्हणजे लग्नात हळदीकुंकू, अत्तर गुलाब देण्याचा..एका चतुर बाईच्या हातात हळदीकुंकू दिले जाते. ती चाणाक्ष नजरेने समोरच्या बाईच्या नवर्याच्या आस्तित्वाचा शोध लावत हळदीकुंकू देत असते. माझ्या भावाच्या लग्नात माझ्यावर हा प्रसंग आला तेव्हा मी हळदीकुंकू हे प्रकरणच कटाप करून टाकलं. तो तथाकथित मानही नको आणि कुणाला त्यातुन वगळणंही नको. नुसतं सुगंधी अत्तर आणि ताजे टपोरे गुलाब.
छान वाटलं ते देताना.
मिलिन्द, तुला वाटते इतके सोपे नसतात असे प्रसंग. असे मान ज्यांनी झिडकारले त्यांना त्या वर्तूळात कुठे प्रवेश असतो? तरीही ह्ळूह्ळू याचा परिणाम होतोच. प्रश्न आहे, आहे त्या वर्तूळात राहून काही सुधारणा करता येणे शक्य आहे का? हा.नव्या पर्यायी पद्धती आपण सुरू करणार का? ज्या वर्तूळाचा विस्तार वाढवतील.
ReplyDeleteह्या प्रसंगी त्या भावाचेही करा की जरा कौतुक त्यामुळे त्याला ही जबाबदारी आपलीही आहे असं वाटेल आणि गुंतवणूकही वाढेल आणि
समाजानेही हे स्वीकारलयं हे दिसेल.
दीपा, तुला हरल्यासारखं वाटतयं, पण तू लढलीस का? मग कुठली हार? लढण्याची सुरूवात तुझ्या मनात झालीय. आता तू लढशील आणि कदाचित जिंकशीलही! तुझ्या ह्या लढण्याचा फायदा आमच्यापैंकीही कुणाकुणाला होईल.
आता तू तुझ्या काकू, आत्या, मावश्या जेंव्हा भेटतील तेंव्हा सहज म्हणून हा विषय काढ आणि तुला हे आवडलेलं नाही हे त्यांच्यापर्यन्त पोचव. त्यांना काय वाटतं हे जाणून घे. त्यामुळे शांतपणे सगळ्यांचा यावर विचार होईल, त्यातला फोलपणा त्यांच्या लक्षात येईल, बदल घडेलही. तूही प्रयत्न केल्यामुळे तुझ्या हरलेपणातून बाहेर येशील.
मातृत्वाचं आपण इतकं का गौरवीकरण करतो हे ही इथे तपासून पाहायला हवं. त्याचे काय दुष्परीणाम आहेत तेही बघायला हवेत. सहज साधी गोष्ट म्हणून घ्या ना ती!
माझ्यामते हळदीकुंकू, ओटी भरणे (किंवा अगदी डोहाळेजेवण सुध्दा) वगैरे प्रथा(त्यांचे स्वरुप) आता खरेतर कालबाह्य झाल्या आहेत. आजच्या पिढीतील किती विवाहित स्त्रीया कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या इत्यादींना ‘सौभाग्यलेणी’ मानतात? किती जणींना ह्या प्रथांचे महत्त्व वाटते किंवा यात खरच स्वारस्य असते? का फ़कत एक परंपरा म्हणून किंवा आपल्या आधीच्या पिढीतील व्यक्तिचे ‘मन’ आणि ‘मान’ राखण्यासाठी म्हणून ह्या प्रथा चालू ठेवायच्या? पण मग स्वत:च्या मनाचा कोंडमारा होत असेल तर त्याचे काय?
ReplyDeleteमला मान्य आहे की कुठलाही बदल एकदम होत नसतो. पण त्या दृष्टीने सुरुवात तर केली पाहिजेच. नाहीतर ह्या चक्रातून पुढची पिढीपण सुटणार नाही.
ह्यासाठी आपण नुसताच विरोध न करता, विद्याने सुचविले तसे पर्यायी पध्द्त सुचविली पाहिजे किंवा सुरू केली पाहिजे.
माझ्या ओळखीतील एका कुटूंबाने, लग्नामधील काही विधींसाठी(सीमांत पूजन/व्याहीभेट/कन्यादान वगैरे)पर्यायी पध्द्ती शोधून त्या अमलात आणल्या तर त्याचे सर्वांनी स्वागतच केले होते.
आशा,आता संक्रांत आहे. साजरी करण्याची पर्यायी पद्धत शोधता येईल.सुरू करता येईल.
ReplyDeleteअश्विनी, सुहृदच्या वेळी तू,मी आणि स्मिता मुलांना घेऊन सारसबागेत गेलो होतो ते मला आठवलं.