Wednesday, December 16, 2009

जड झाले ओझे....

मुलींना घरात वाढवलं जायचं तेच मुळी हे त्यांचं घर नव्हे, त्यांचं घर म्हणजे त्यांच्या नवर्‍याचं घर. पूर्वी आया सोनंबिनं घेऊन ठेवायच्या मुलीच्या लग्नासाठी. परवा परवा पर्यन्त बैकांच्या जाहिराती असायच्या की मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज देतो म्हणून!
माझ्याहून साताठ वर्षांनी मोठ्या असणार्‍या माझ्या आतेबहिणीला वाटले केस कापावे, तिला पाहायला सुरवात केली होती.तर आत्या म्हणाली ,’आत्ता नको, एकदा लग्न होऊदे, मग कापा नवर्‍याला आवडले तर!’

माझ्या घरात असे संवाद झाले नाहीत, तरी नातेवाईक होतेच की! मी ME करायचे ठरवल्यावर माझी मोठीआई बाबांना (आईला नाही बाबांना) म्हणाली’ ’पोरीला एवढं शिकवताय ,आता साजेसा जावाई कुठे शोधाल?’ (साजेसा म्हणजे माझ्यापेक्षा वयाने,उंचीने, शिक्षणाने जास्त)
मुलीच्या जन्माचं ध्येय काय? तर लग्न करून चांगला नवरा मिळवणे. म्हणजे नशीब काढलं पोरीनं!
कळती मुलगी म्हणजे आईबापांच्या जीवाला घोर! एकदा लग्न झालं की ते सुटले!
( मला माहित आहे आपण मुलींना असे नाही वाढवत, आपणही अशा वाढलो नसू, पण आजूबाजूला तर अशी खूप उदाहरणे होती/आहेत.)

अशी मुलगी लग्न होऊन सासरी आली की ते तरी तिचे घर असते का?

आपण पाहिलेच ना? भांड्यांवर नावे कुणाची?

ते तर ....श्री.रा.रा.......यांचे घर आजन्म कराराने (खाऊन,पिऊन, राहण्याची सोय करून) चालवण्यास दिलेले आहे.घराचे पडदे आणि उशांच्या खोळी निवडण्याचे स्वातंत्र्य सदरहू ....चि.सौ.कां...यांना देण्यात आलेले आहे. बाकी गोष्टीत त्यांनी नाक खुपसू नये अशी अपेक्षा आहे.......

तेही तिचे नसते. आहे त्या घराच्या साच्यात तिला बसवण्याचे प्रयत्न होतात.
बाई ही अशी तुटलेलीच असते आयुष्यभर!

आमचं लग्न झालं. आम्ही सगळे संगमनेरला आलो.... संध्याकाळ...स्वैपाकघरात काहीतरी चहापाण्याची व्यवस्था चाललेली....सगळे मजेत...कदाचित खूप दिवसांनी भेटलेले नातेवाईक...एकमेकांशी गप्पा मारताहेत...आनंदात....छोट्या मुलांची काहीतरी गडबड चाललीये.... पाखरांची घरट्याकडे परतायची वेळ झालेली.....बाहेर पक्षांचा किलबिलाट..... घरातला दिव्यांचा मंद उजेड.....बैठकीच्या खोलीतला बातम्यांचा आवाज.... मी इथे काय करू?.......मी इथे का आहे?......माझं घर मागे ठेवून आलेली मी आणि ज्याच्याशी मी नुकतं लग्न केलयं असा, त्याच्या माणसांमधे रमलेला माझा नवरा...माझ्यापासून कोसों दूर.....मी एकटी....गप्प.... ते तुटलेपण मला लख्ख जाणवलं.
हा अनुभव प्रातिनिधिक नसेलही. (सगळ्या गोष्टींची कारणं बाहेरच्या परिस्थितीतच असतात असे नाही ,काही आत शोधावी लागतात.)
तुमच्यापैकी प्रत्येकीला असा तुट्लेपणाचा अनुभव टप्याटप्यानी / अचानक केंव्हातरी आला असेलच. काय केलंत तुम्ही त्याचं?
...................................
तुटलेपणाची म्हणजे परात्मतेची संकल्पना प्रथम मार्क्सवाद्यांनी मांडली.म्हणजे कामगार जे काम करतो त्यापासून तुटलेला असतो, घर बांधणारा मजूर कधीही त्या घरात राहणार नसतो असं.
मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी पहिल्यांदा हे स्त्रियांना कसं लागू पडतं हे दाखवून दिलं.
.....................................

6 comments:

 1. तटस्थ राहणा-या व्यक्तींचा मला पहील्यापासूनच खूप राग येतो.मग ती व्यक्ती कोणीही असो.आपली आई,बाबा,भाऊ,नवरा,कोणीही जवळची.काहीही व्यक्तच नाही करायचं.आणि त्यावर भाष्यच नाही करायचं. म्हणजे माझ्या म्हणण्याचा यांना राग आलाय,वाईट वाटलय,आनंद झालाय की दु:ख,का ह्यांच्या मेंदूपर्यंत काही पोचतच नाही आपण काय म्हणतोय ते.फक्त शांत बसून रहायचं.याच काय कारण असावं? ते आजतागायत नाही सापडलं.कुठल्याच प्रश्नांची उत्तरे न दिल्याने प्रश्न सुटतात,संपतात का प्रश्नांच्या संख्येत वाढ होते? आपण आपलं माणूस म्हणून त्यांच्याशी काही शेअर करतो आणि ती व्यक्ती अशी उत्तर न देता घम्म बसते. काहीही शेअर करत नाही तेव्हा त्या तुटलेपणाचा खूप त्रास होतो. आपलं उठणं,बसणं,वागणं त्यांना खटकतं का? का आपल्या असण्याने,नसण्याने त्यांना काहीच फरक पडत नाही. कशाचेच उत्तर मिळत नाही.याला मी तुटलेपण म्हणीन.

  ReplyDelete
 2. विद्या, बाई नेहमी तुटलेलीच असते हे खरं आहे, पण तू लिहिलेल्या अनुभवात आहे ते तुटलेपण आहे, की नवखेपणामुळे आलेलं (तात्कालिक) एकटेपण? एकटेपण मलाही जाणवतं कधीकधी, पण त्यात तुटलेपण नसतं. आणि असा एकटेपणा तर कुणालाही जाणवतो एखाद्या टप्प्यावर.
  फक्त आपल्यासारख्यांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर आपण आपला जोडीदार आपापल्या परीने विचार करून निवडतो, पुढचं मार्गक्रमण एकत्र करायचं ठरवतो. दोघेही शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम असतो. घरातले छोटे मोठे निर्णय एकमेकांच्या विचाराने घेतो, खूपशा बाबतीत दोघेही एकमेकांवर अवलंबून असतो, मग तरीही माझं इथे स्थान काय, मी इथे का आहे, असे प्रश्न का पडावेत?

  ReplyDelete
 3. दीपा,
  आपल्या असण्या नसण्याने यांना काहीच फरक पडत नाही का?
  हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे.
  पण आपलं असणं म्हणजे काय?
  घरकाम,स्वैपाकघरातलं अस्तित्व? ती कामे तर सहज दुसरं कोणी करू शकेल.
  मग आपल्या घरातलं आपलं असणं नेमकं काय आहे?
  यावर नक्की विचार करू या.
  अश्विनी,
  आपल्यासारख्यांच्या बाबतीतले तुझे निरीक्षण मला मान्य आहे. उलट कधी कधी मिळालेल्या संधीचा बायका पुरेसा उपयोग करून घेत नाहीत असं वाटतं. सगळ्यात जास्त स्वातंत्र्य मिळालेल्या गटाचं आपण प्रतिनिधित्व करत असू. तरीही त्याचा आपण स्वतःला घडवण्यासाठी उपयोग करून घेत नाही. आपल्यासारख्यांच्या घरातल्या पुरूषांपेक्षा बायकांबाबतच माझ्या जास्त तक्रारी आहेत.
  एकटेपण आणि तुटलेपण यात फरक कसा करू या?
  मी एकटी आहे, मला जवळचं, समजून घेणारं कोणी नाही असं वाटणं हे तात्पुरतं असू शकतं.
  तुटलेपण म्हणजे मी जे करते आहे त्याच्याशी माझी काही जवळीक नसणं, काही नातं नसणं,
  ( आणखी चांगल्या शब्दात खरं तुम्हीही भर घालू शकाल.)

  माझ्या अनुभवाबाबत---एकटेपण तर होतच पण तुटलेपणही होतं
  मी आणि मिलिन्दने लग्न करायचं ठरवलं तेंव्हा माझे विचार त्याला पटवून द्यावे लागले, असं काही नाही, त्याचेही तेच होते.
  आम्ही नोंदणी पद्धतीने लग्न केलं. पण लग्नच केलं ना?
  लग्न करण्याच्या पद्धतीतला आमच्यामते चांगला पर्याय आम्ही शोधला.
  पण लग्नाची चौकट स्वीकारलीच ना? तेंव्हा मी लग्न म्हणजे काय? असा विचार करत होते, लग्नाच्या चौकटीतही आपण समानता आणायची, मिटून जायचं नाही वगैरे. यापेक्षाही जास्त खरं हे होतं की मी प्रेमात पडले होते.
  त्यामुळे लग्नाच्या चौकटीला मी प्रश्न विचारले नाहीत. तीच वाकवून घेऊ असे ठरवले.
  मी माझं घर सोडून आले नव्हते फक्त मागे ठेवून आले होते.
  लग्न म्हंटले की ते झाल्यावर मुलीने सासरीच जायला हवं ना?
  त्या पद्धतीला मी प्रश्न विचारले का? तर नाही. मुलीनेच का घर सोडायचं?
  मी इथे का आहे???
  मी इथे एकटी आणि हा मात्र सगळ्या गोतावळ्यात, असे का?
  मी नुकत्याच केलेल्या लग्न या व्यवस्थेपासूनच तुटलेली होते.

  ReplyDelete
 4. मला लहानपणापासूनच काही स्त्री-प्रथा कधीच आवडल्या नाहीत. त्यातली एक सांगायची झाली तर ’हळदी-कुंकु’(ह्या प्रथेचे मूळ कारण वेगळे असावे,पण कालांतराने त्याचे स्वरूप बदलले असावे). ह्यात सहभाग कोणाला? फ़क्त ‘सुवासिनीं’ना. ओटी भरायची प्रथा, ती पण कोणाची तर ’सवाष्णीची’. ‘विधवा’ स्त्रियांना यातून वगळले जायचे. का? नवरा गेला म्हणजे तिचे सार्वजनिक आयुष्य संपले? तिची ओळखच गेली? तिचे स्वत:चे काही अस्तित्व नाही? तसेच एखादे मंगलकार्य असेल तर ओवाळायला ‘विधवा’ स्त्री चालत नसे. का? एखाद्या स्त्रीचा नवरा गेला म्हणजे ती अशुभ झाली? त्या स्त्रीच्या मनावर ह्यामुळे किती आघात होत असतील हे मी खूप जवळून पाहिले आहे. त्यामुळेच मी ठरवले होते की मी अशा प्रथांमधे सहभागी होणार नाही.

  लग्न झाल्यावर, काही दिवसांनी आमच्याकडे सासूबाईंच्या मैत्रिणी जेवायला आल्या होत्या. जेवण झाल्यावर, सासूबाईंनी मला त्यांची ओटी भरायला सांगितली. मी मनात नसतानाही (कशी भरायची हे विचारून विचारून) ओटी भरली. मग अशा प्रसंगांची २/३ वेळा पुनरावृत्ती झाली. कधी ओटी भरली तर कधी निघायच्या वेळेस ह्ळद-कुंकु लावायचे. प्रत्येक वेळी मनात आले की आपण हे काय करतो आहे आणि का? सासूबाईंना बरे वाटावे म्हणून? का आपले ’इंप्रेशन’ चांगले असावे म्हणून? खरेतर त्या कशाचीच गरज नव्हती. मग मी एकेदिवशी सासूबाईंना कारणासहित सांगितले की मला हे सांगू नका, मी नाही करणार. त्यांनीही त्यापुढे मला कधी सांगितले नाही.

  आत्ता विचार करत होते की त्या प्रत्येक क्षणी माझ्या ज्या भावना होत्या त्याला म्हणायचे का ‘तुटलेपण’ ? म्हणजे मी जे करत होते त्याच्याशी माझी काही जवळीक नव्हती, माझ्या मनात त्याचे काही स्थान नव्हते ?

  ReplyDelete
 5. आशा, स्त्रियांमधे आपल्या समाजात एवढ्या प्रतवार्‍या केलेल्या आहेत.
  विधवांना इतक्या गोष्टी नाकारलेल्या होत्या, की त्यापेक्षा कसाही असो नवरा असलेला बरा. याउलट विधूरांना काहीही नाकारलेलं नाही. ते एक सुपारी कनवटीला बांधून सगळंच करू शकतात.
  मला वाटतं मुलींनीही लग्न झाल्यावर आपली ओळख का बदलावी?
  मूळात आपली कुणाचीतरी मुलगी असल्याची ओळख बदलून कुणाची तरी बायको अशी का दाखवायची?
  आपण संभ्रमात असतो तेंव्हा रूढ पद्धती स्विकारतो. नकारासाठी आपलं मत ठाम असायला लागतं.नंतर तू केलंस तसं घडू शकतं.
  मीसुद्धा कितीतरी बाबतीत सुरवातीला ठाम नव्हते. कितीतरी गोष्टींबाबत मी अजूनही विचार करतेच आहे. कितीदातरी मनात असूनही तडजोडी करायला लागतात.
  स्वतःला उत्तर देताना मी सांगते की मी एक सर्वसामान्य बाई आहे. मला झेपतील एव्हढेच/ माझ्या कुवतीएव्हढेच बदल मी करू शकते.
  पण तेव्हडे बदल मी करतेच.
  खरं सांगू का? माणसे असतात बरी पण व्यवस्था नसते चांगली! मी माझ्या मर्यादेपर्यन्त माणसांना सांभाळते.

  ReplyDelete
 6. मुलींना घरात वाढवलं जायचं तेच मुळी हे त्यांचं घर नव्हे, त्यांचं घर म्हणजे त्यांच्या नवर्‍याचं घर. >> आणि वर शिकवतांना भाषा काय तर "उद्या लोकाच्या घरी जायचे आहे.. जरा नीट
  वागाय-बोलायला शिका.. (निदान माझ्या घरी असे दोन्ही बाजूंनी तोंडात मारणारे बोलले जायचे)

  आत्ता नको, एकदा लग्न होऊदे, मग कापा नवर्‍याला आवडले तर! >> अशी मुलांना कोणती गोष्ट करतांना अडवले जाते का? म्हणजे अगदी साधे उदाहरण द्यायचे तर समजा दाखवायच्या प्रोग्राम मध्ये मुलाने मिशी ठेवली असेल तरी लग्नाच्या वेळेस त्याला वाटेल तेव्हा तो उडवून टाकू शकतो.. तेव्हा कोणी म्हणत नाही.. "एकदा लग्न होऊदेत.. मग बायकोला विचारून उडव मिशी.."

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...