Sunday, January 10, 2010

बालपणीच्या आठवणी......कोल्हापूरची........(२)

मी १ ली मधे व माझी ताई १० वी मधे एकाच शाळेत त्यामुळे बरोबरच जायचो. (वडिल भाऊ म्हणतो तसे ती माझी आई बहिण होती) म्हणजे मला नेण्याआणण्याची जबाबदारी ताईचीच. आमच्या शाळेत एक बकुळीच झाड होत. त्याची फुलं वेचून ती मला त्याचा गजरा करुन घालायची. तिने एक गाणे शिकवले होते ते अजून मला पाठ आहे...

या बाई या, या बाई या,
बकुळीच्या झाडा खाली फुले वेचुया,
ऊन पडले, ऊन पडले पहाटेला सुख देव गाणे बोलले..
रान हालले, रान हालले पाने फुले दिसे कशी गोडगोडुली...

एकदा माझी शाळा लवकर सुटली. ताईची सुटायला वेळ होता, तेव्हा बाई म्हणाल्या "जा तुझ्या बहिणीच्या वर्गात" मी तिकडे गेले. वर्गावरील बाईंना माझी अडचण कळली. त्यांनी मला शाळासुटेपर्यंत मागच्या बाकावर बसण्याची परवानगी दिली. मला कंटाळा येऊ नये म्हणून एक अख्खा खडू चित्र काढायला दिला. "अखख्या खडूने" मला इतका आनंद झाला की मी तो नुसता हातात धरुन शाळा सुटेपर्यंत बसू शकले.

माझी आई पण नोकरी करत होती. त्यामुळे मला सांभाळायची बरीचशी जबाबदारी ताईचीच होती. त्यामुळे ती कुठेही मैत्रिणींकडे गेली तरी माझ पार्सल तिला न्यावच लागे. त्यामुळे अजूनही ’त्या’ मैत्रिणी भेटल्या की त्या अजूनही माझ्याशी बोलताना मला लहान समजूनच बोलतात.
.............................................................................

जाणीव.....

खरतर खूप दिवस झाले. पण दीपाने लिहीलेल्या जाणीवे बद्दलच वाचल्यानंतर माझ्या घरातील एक जाणीव पट्कन माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. उशिरा का होईना पण लिहिते.
माझी बहीण लोणावळ्याच्या कॉलेज मधे नोकरी करत होती. तिचे यजमान (पराग) VIT कॉलेज मधे होते. तेव्हा मुलं १ व ५ वर्षांची. त्यावेळी मुलं ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी असं त्यांनी ठरवून त्याप्रमाणे त्यांच वेळापत्रक बनवलं. ताईची रविवारची सुट्टी, त्यामुळे परागने गुरुवारी सुट्टी करुन घेतली. (नशिबाने तसं शक्य होतं). म्हणजे २ पूर्ण दिवस मुलांसोबत. ताईची ६.१० ची सिंहगड, त्यामुळे सकाळी मुलांकडे बघण्यासाठी परागने कॉलेजची वेळ ११ ते ७ अशी करुन घेतली. त्या सकाळच्या वेळेत पराग मुलांना उठवून, त्यांच सगळं अवरायचा. म्हणजे दात घासणे, शी-शू, अंघोळ, खायला घालणे. एकाला शाळेत पाठवणे, एकाला पाळणाघरात सोडणे आणि मग कॉलेजला जाणे.
तेव्हा आमचे नातेवाईक परागचे कौतुक करायचे. त्या दोघांना मात्र ते फारसे आवडत नसे. कारण त्यांच्यामते ही आमची जबाबदारीच आहे. त्यात विशेष काही नाही.

1 comment:

  1. वैशाली,
    तुझा ’आई बहिण’ हा शब्द मला खूप आवडला.
    नातेवाईक परागचे कौतुक करायचे (नावं ठेवायचे नाहीत), ही पण एक बदलाची खूणच आहे.

    ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...