Thursday, January 28, 2010

सखीत्व

’नाद तुझा लागला, ग गौराई छंद तुझा लागला’
आमच्या मावशी आणि त्यांच्या मैत्रिणी फेर धरून एका तालात नाचत म्हणत होत्या. पायांची त्रिकोणी हालचाल ,एक टाळी खाली, एक टाळी वर,
आमचे डोळे फिरत होते.
गेली दहा वर्षे मावशी आमच्याकडे येताहेत, त्या इतक्या छान नाचतात आणि गातात , मला माहितच नव्हतं. लोककलाकारांचा असतो तसा त्यांचा खडा आणि मोकळा आवाज, थेट काळजाला हात घालणारा. आम्ही भारावून गेलो, मी आणि अश्विनी.
मावळात नागपंचमी ते गौरी उठे पर्यन्त रोज बायका देवळात जमून नागपंचमीचे खेळ खेळतात. आमच्या मावशी इथे सुतारदर्‍यात राहतात. तिथे त्या मैत्रिणी जमवून कुणाकुणाच्या घरी खेळतात. पाच सहा वर्षांपासून मी हे खेळ बघायला जायचं ठरवतीये. नव्हतं जमलं. कारण काहीच नाही, आपण कुठल्या कुठल्या फुटकळ गोष्टी करत राहतो आणि महत्त्वाच्या मागे पडत जातात तसंच.

यावर्षी माझ्यासाठी मावशींनी खास त्यांच्या घरी खेळ ठेवले होते. अश्विनीला विचारलं , येतेस का? तयार झाली. माझा मंगळागौरींचा काहीच संबंध आलेला नाही. अश्विनीला ते खेळ माहित होते, बरेचसे येत होते, आवडीचे होते. रात्री दहाला आम्ही मावशींकडे गेलो, बारापर्यंत थांबलो, त्या बायका पुढेही दीड-दोन पर्यंत खेळत होत्या. अश्विनी म्हणाली, आम्ही खेळतो ते अगदी प्राथमिक आहे, ह्या तर ग्रॅजुऎट आहेत.

त्यांच्या त्या खेळावरच खरं तर एक सविस्तर लेख लिहायला हवा. आम्ही बघत होतो, त्यांचा उत्साह ओसंडून वाहात होता. गुगल अर्थ वर जर चैतन्य प्रकाशमान होताना दिसू शकत असतं तर अख्ख्या पुण्यात आम्ही उभ्या होतो तो ठिपका तेजाने उजळलेला दिसला असता. तो अनुभव आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आदिवासींपासून आजपर्यंतच्या प्रवासात कुठल्या ट्प्प्यावर आपला तो नृत्याचा धागा तुटून गेला कोण जाणे, समुहनृत्याचा.

ते असो, आज मला वेगळं सांगायचं आहे. मी पाहात होते त्या बायकांमधला परस्पर संबंध. त्यांच्या गप्पा, त्यांच्या चेष्टा, गमती. कोणीच पुरूष नसल्याने त्या निवांत, मोकळ्या झालेल्या होत्या. मजा करत होत्या. त्यांचं त्यांचं एक समाज जीवन त्यांनी घडवलं होतं, परंपरेची त्यांना मदत झालेली असली तरी त्यातून वाट त्यांनीच शोधली होती. हे सखीत्व किती लोभस होतं. रोजची जगण्याची लढाई खेळत असताना त्यांना याची किती मदत होत असणार!

मधे मी एका महिला मंडळाच्या घरगुती कार्यक्रमाला गेले होते. तिथेही सगळ्या आज्याच होत्या आणि मस्त मजा करत होत्या. दूरदूरून येऊन नियमीतपणे भेटत होत्या. सखीत्व ही तुम्हाला मोकळं ्करणारी गोष्ट आहे.

या सखीत्वावर एकमेंकींना सामर्थ्य देण्याची चळवळ उभी राहीली. त्यांनी काही सामाजीक आणि राजकीय बदल घडवून आणले.एकमेंकींना भेटत राहून, अनुभवांविषयी बोलत राहूनच ’जे जे खाजगी ते ते राजकीय’ असं म्हणत जहाल स्त्रीवादी चळवळ ्पुढे आली. या चळवळीने कितीक गृहीतकांना धक्का दिला. विशेषतः घर ही स्त्रीसाठीची सुरक्षीत जागा आहे या समजाला मोडीत काढलं. घरातच स्त्रीयांना कशाकशाला तोंड द्यावं लागतं हे दाखवून दिलं. आताही कौटुंबीक हिंसाचार कायदा का आला? त्याची आकडेवारी काय दाखवून देते?

आपण हे सगळंच सोडून देऊ या. समजू यात की हे आपल्यापासून खूप दूर आहे. हे आपलं जग नाहीच मुळी! समजू यात की आपल्या जगात आपण सुरक्षीतच आहोत. हिंसा केवळ शारीरिक नसते. आपण ज्या वर्गात आहोत तिथे स्त्रीला तिची जागा (?) दाखवून देण्याचे खूप सभ्य मार्ग आहेत, विनोद हा त्यातला एक. (कधी कधी मला वाटते की बायका खरोखरच मठ्ठ आहेत असा तर पुरूषांचा समज झालेला नाही ना? हे सारं आम्ही हसून साजरं करावं अशी त्यांची इच्छा असते?) आपण स्त्री म्हणून एका पातळीवर असतो, सारख्या प्रश्नांना सामोरं जात असतो, काही सारखं शोधायचं असतं. त्यासाठी एकमेकींची मदत होऊ शकते. प्रवासात सोबत आहे याचा आधार असतो.

काही गोष्टींशी लढण्याचं बळ मी सखीत्वातून मिळवू शकते.



००००००००००००००

मैत्री ही खरं ’चला करू या’ म्हणून करण्याची गोष्ट नाही. ती होते. मैत्रीत सगळं बोलावच लागतं असं नाही, न बोलूनही कळतं. मैत्रीत महत्वाचं असतं कळणं, आतून आतून काय वाटतयं ते सहज कळणं , शब्द कुठलेही असोत. समजून घेणं, त्याची खात्री असणं.

००००००००००००००

Thursday, January 14, 2010

... मज फूलही रुतावे

पुस्तकातल्या गोष्टीतल्या जादूगाराचे प्राण कसे एखाद्या झाडावरच्या पंचरंगी पक्षात असतात की नाही?  तसा माझा जीव आहे शब्दात!


मी पुढे जे काही लिहिणार आहे ते तुमच्यापैकी कुणाकुणाला साधे सोडून देण्याजोगे वाटेलही. पण म्हंटलं नां, माझा जीव आहे शब्दांवर.

लग्नानंतर आपण मिटून जायचं नाही म्हणजे काय काय करायचं? काय असते आपली ओळख? आपलं शिक्षण? आपल्या पदव्या? आपला रंग , आपली उंची? आपला सुगरणपणा? छे!! आपली ओळख असते आपली भाषा, आपल्या रिती, आपली माणसं, आपले विचार.

माझं नाव (पूर्णच) मी बदलणार नव्हते. पण गंमत अशी की माझ्या सासूबाईंचं (लग्नानंतरचं बदललेलं) नावही विद्याच आहे. नातेवाईकांना माझं नाव बदललंच पाहिजे असं वाटत होतं आणि माझ्या नणंदा का बदलायचं म्हणून त्यांच्याशी वाद घालत होत्या.(तिथेच उपस्थित असणार्‍या माझं म्हणणं काय आहे हे दोन्ही पक्षांना जाणून घ्यावं असं वाटलं नाही) माझं नाव बदलायचं नाही हे मिलिन्दकडच्यांचं मत किती कौतुकास्पद होतं हे तुम्हांला आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात येईल.पण मी तिथेच नव्हते थांबू शकत, माझं आडनावंही मी बदलणार नव्हते (हे तर माझ्या आईलाही आवडलं नव्हतं) हे मिलिन्दकडे नव्हतं पटलेलं, त्यांनी चालवून घेतलं.

या वीस-पंचवीस वर्षात नवर्‍याच्या आई-वडिलांना सुनेनेही आई-बाबा म्हणायची पद्धत रुढ झाली आहे. माझ्या आई-बाबांखेरीज आणखी कुणाला आई-बाबा म्हणणे मला शक्य नव्हते, ते माझ्यासाठी केवळ शब्द नाहीत, आईबाबांचं शब्दरूपच आहे ते! विचारांनी म्हणाल तर माझ्याशी जास्त जुळणारे माझ्या सासूबाईंचे विचार आहेत, पण ती आई आहे ना? तिच्यात आतडं गुंतलयं माझं. आमच्याकडे आत्या- मामा म्हणायची पद्धत आहे. मी तसं म्हणायला सुरूवात केली. हे ही त्यांनी चालवून घेतलं.

लग्नानंतरही माझं घर मी सोडून दिलेलं नव्हतं त्यामुळे लोकांच्या प्रश्नांना माझी उत्तरेही वेगळी असायची. बरेचदा विचारला गेलेला एक प्रश्न म्हणजे, ’कुलदैवत कुठलं तुमचं?’

’आमच्याकडे आहे तिरूपतीचा बालाजी आणि मिलिन्दकडे अंबेजोगाईची योगेश्वरी’

असं उत्तर मिळाल्यावर समोरचा चक्रावत असे. (लोकांनाही अशा उत्तरांची सवय होऊ देत की!) स्पष्टीकरणासाठी मी तयार असे, पण पुढचा प्रश्न कोणी विचारत नसे. माझ्या मावशा वगैरेंनी हा प्रश्न विचारला तर आवर्जून मी मिलिन्दकडे का? / ना? अशी सुरवात करायचे.

आमच्याकडचा देवघरातला योगेश्वरीचा फोटो पाहून एकीने, ’म्हणजे तुम्ही कोकणस्थ का? (किती छान!) माहित नव्हतं. (वाटलं नव्हतं)’

’मी नाही. मी देशस्थ, मिलिन्द आहे कोकणस्थ.’

आमच्याकडे साबुदाण्याची उसळ म्हणतात, मिलिन्दकडे खिचडी. मी माझा शब्द सोडला नाही, मिलिन्दने त्याचा. मुलांना दोन्ही कळतात. आमच्याकडे म्हणतात स्नान, मिलिन्दकडे आंघोळ. मी स्नान हाच शब्द वापरते. माझी चुलतबहीण लग्नानंतर आंघोळ हा शब्द वापरायला लागली. विचारले,’का गं?’ तर म्हणाली,’ अगं स्नान म्हंटल्यावर सगळे, काय अभ्यंगस्नान का? म्हणून चिडवायचे, मग आठवणीने आंघोळ म्हणायला सुरूवात केली, आता तोच शब्द तोंडात बसलाय.’ (लग्नानंतर काय काय सोडावं लागतं याची एक झलक)

हे लिहिता लिहिता वाटतयं शब्दांच्या वापराच्या बाबतीत उलटही होत असेल, पुरूषांनाही त्यांचे शब्द सोडावे लागत असतील. दोघांमधे जो तथाकथित वरच्या सांस्कृतिक स्तरावरचा समजला जात असेल, त्याची सरशी होत असणार. शब्दांचं हे वैविध्य जपायला हवं. शब्द नुसते एकटे येत नाहीत, त्यांच्यामागे काहीतरी सांस्कृतिक संचित असतं तेही तर जपायला हवं. का आपण एकसारखे होत जाणार?

आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर आपल्या शब्दांनाही टिकवायला हवं, वापरायला हवं. आपलं जे जे आहे ते जपायला हवं. नाहीतर नुसते हाडामासाचेच उरू आपण.

Sunday, January 10, 2010

बालपणीच्या आठवणी......कोल्हापूरची........(२)

मी १ ली मधे व माझी ताई १० वी मधे एकाच शाळेत त्यामुळे बरोबरच जायचो. (वडिल भाऊ म्हणतो तसे ती माझी आई बहिण होती) म्हणजे मला नेण्याआणण्याची जबाबदारी ताईचीच. आमच्या शाळेत एक बकुळीच झाड होत. त्याची फुलं वेचून ती मला त्याचा गजरा करुन घालायची. तिने एक गाणे शिकवले होते ते अजून मला पाठ आहे...

या बाई या, या बाई या,
बकुळीच्या झाडा खाली फुले वेचुया,
ऊन पडले, ऊन पडले पहाटेला सुख देव गाणे बोलले..
रान हालले, रान हालले पाने फुले दिसे कशी गोडगोडुली...

एकदा माझी शाळा लवकर सुटली. ताईची सुटायला वेळ होता, तेव्हा बाई म्हणाल्या "जा तुझ्या बहिणीच्या वर्गात" मी तिकडे गेले. वर्गावरील बाईंना माझी अडचण कळली. त्यांनी मला शाळासुटेपर्यंत मागच्या बाकावर बसण्याची परवानगी दिली. मला कंटाळा येऊ नये म्हणून एक अख्खा खडू चित्र काढायला दिला. "अखख्या खडूने" मला इतका आनंद झाला की मी तो नुसता हातात धरुन शाळा सुटेपर्यंत बसू शकले.

माझी आई पण नोकरी करत होती. त्यामुळे मला सांभाळायची बरीचशी जबाबदारी ताईचीच होती. त्यामुळे ती कुठेही मैत्रिणींकडे गेली तरी माझ पार्सल तिला न्यावच लागे. त्यामुळे अजूनही ’त्या’ मैत्रिणी भेटल्या की त्या अजूनही माझ्याशी बोलताना मला लहान समजूनच बोलतात.
.............................................................................

जाणीव.....

खरतर खूप दिवस झाले. पण दीपाने लिहीलेल्या जाणीवे बद्दलच वाचल्यानंतर माझ्या घरातील एक जाणीव पट्कन माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. उशिरा का होईना पण लिहिते.
माझी बहीण लोणावळ्याच्या कॉलेज मधे नोकरी करत होती. तिचे यजमान (पराग) VIT कॉलेज मधे होते. तेव्हा मुलं १ व ५ वर्षांची. त्यावेळी मुलं ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी असं त्यांनी ठरवून त्याप्रमाणे त्यांच वेळापत्रक बनवलं. ताईची रविवारची सुट्टी, त्यामुळे परागने गुरुवारी सुट्टी करुन घेतली. (नशिबाने तसं शक्य होतं). म्हणजे २ पूर्ण दिवस मुलांसोबत. ताईची ६.१० ची सिंहगड, त्यामुळे सकाळी मुलांकडे बघण्यासाठी परागने कॉलेजची वेळ ११ ते ७ अशी करुन घेतली. त्या सकाळच्या वेळेत पराग मुलांना उठवून, त्यांच सगळं अवरायचा. म्हणजे दात घासणे, शी-शू, अंघोळ, खायला घालणे. एकाला शाळेत पाठवणे, एकाला पाळणाघरात सोडणे आणि मग कॉलेजला जाणे.
तेव्हा आमचे नातेवाईक परागचे कौतुक करायचे. त्या दोघांना मात्र ते फारसे आवडत नसे. कारण त्यांच्यामते ही आमची जबाबदारीच आहे. त्यात विशेष काही नाही.

Friday, January 8, 2010

हरलेली मी

अगदी काल-परवाचा ताजा प्रसंग...माझ्या भावजयीचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम.सगळी तयारी झाली होती.झोपाळा सजवला,ओटीचे ताट सजवले,औक्षणाची तयारी केली,सर्व काही.आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.आईने मला आमच्याकडील बायकांना भावजयीची ओटी भरायला बोलवायला सांगितले.माझ्या जरा नावडीचे आणि मला अवघड असे ते काम.अवघड अश्यासाठी की त्या बायकांमध्ये अश्या दोघीजणी होत्या की त्यांना माझी इच्छा असूनही मी बोलवू शकले नाही.कारण एक विध्वा व दुसरी अशी की जिला मूलबाळ नाही. विचार आला आणि आईपाशी गेले.मी त्या दोघींना बोलावू का असे तिला विचारता तीही दोन मिनीटे थांबली आणि तिने माझ्याकडे बघून नकारात्मक मान हलवली.त्या दोघींच्याच बाजूला बसलेल्या बायकांना बोलावताना मला माझीच लाज वाटत होती.किंबहूना अपराध्यासारखे वाटत होते.मला माझा स्वत:चाच राग आला होता. मी काय आणि माझी आई काय अश्या रुढी अजिबात न मानणा-या.पण आमच्या मनावर या समाजाचे दडपण नकळत होतेच.आपण कीतीही म्हणलं तरी ही चौकट मोडण्याचे धाडस आपल्यात नसतच.म्हणजे माझ्याततरी नव्हतं.विचार केला तर त्याप्रसंगी माझी आई माझ्या पाठीशी उभी राहीली असती तर सगळ्यांशी वाद घेऊन त्याला विरोध देखील केला असता.पण तसे झाले नाही.मनातून पटत नसताना देखील आईचे मी ऎकलेच.इतर ठीकाणी नाहीपण आपल्या माहेरच्या,हक्काच्या माणसांमध्ये आपण ही चौकट मोडू शकू असे अनेकदा मला वाटत होते. पण ते तेवढे सोपे नव्हते.काय झालं असतं त्यादोघींनी तिची ओटी भरली असती तर....?इतक्या सगळ्या बायकांत त्या दोघींना वेगळी वागणूक देणारी मी शेवटी इतर बायकांसारखीच निघाले.भले ते वागणे मला पटो अथवा ना पटो.या सगळ्यांच्या विरोधात जाण्याची ताकद माझ्यात नव्हती.आणि ह्यामध्ये मी माझी हार झाली असे समजते.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...