Sunday, July 19, 2015

गोधडी



लेकीची गोधडी फाटली होती आणि मलाही माझ्यासाठी एक हवी होती.
लहानपणी माझी माझी एक गोधडी होती आणि ती मला फार प्रिय होती.
कुशनसाठी कापड पाहात होतो तर तिथे गोधडी पाहिली, रजई / रजईत आत कापूस असतो ना?
ती वापरा आणि टाकून द्या प्रकारातली होती, सवलतीतील किंमतही मला जास्त वाटली,
म्हणून घेतली नाही.
आणि एकदम मला आठवलं की अरेच्चा! मला तर घरी गोधडी शिवायची होती!

हं!

आई बाबा येणारच होते, आईला म्हणाले की तुझ्या जुन्या सुती साड्या घेऊन ये.
आई साड्या आणि जुनी शालही घेऊन आली.

इंटरनेटवर गोधड्या पाहायला सुरूवात केली.
भारतातल्या  गोधड्या पाहिल्या.
नीलिमा मिश्रा सर्च देऊन पाहिल्या.
गोधड्या आहेत पण खूपच्या खूप नाहीयेत.
तेच जर क्विल्ट सर्च दिला तर आहेत.
अमेरीकन क्विल्टचे खूप प्रकार दिसतात.
मागे चार-सहा वर्षांपूर्वी जेव्हा मला गोधडी शिवायची होती, तेव्हाही मी बरेच प्रकार पाहिलेले.

यावेळी माझं क्विल्ट नाही हे नक्की होतं.
माझ्या परंपरेतली माझ्या मातीतली डिझाईन्स मला हवी होती.

बरेच क्विल्टचे प्रकार पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्हांला मोहवून टाकण्याची शक्ती क्विल्ट्मधे आहे.
अनेक प्रकार! वेगवेगळ्या रंगसंगती, छोट्या छोट्या तुकड्यांची असंख्य कॉम्बीनेशन्स!
डोळे फिरावेत इतकी कामातली सफाई!

मी त्या सगळ्या प्रकारांना म्हंटलं, नाही!
मला माझी साधीसुधी गोधडीच हवी होती.
माझ्या आजीला,पणजीला तिच्या आजीला ज्यांनी ऊब दिली ती गोधडी!

खाली एक सुती, मांजरपाटाचं कापड अंथरलं. (तीनदा धुवून आता आकसणार नाही याची खात्री झाली.)
त्यावर आईची सुती साडी, त्यावर शाल, त्यावर पुन्हा सुती साडी,
यावर आता मला घरचे माझ्या शिवणकामातले तुकडे जोडायचे होते!

रंग जाऊ नये म्हणून ते कपडे आधी केमिकलमधे टाकून, मग धुवून वाळवले.
त्यांच्यावरून इस्त्री फिरवली.
मोठ्या सुया, गोधडीचा दोरा आणलेलाच होता.
पहिले ३/ ४ तुकडे लावले. आणि मनातल्या मनात कुठे कुठले तुकडे असतील असं करत गोधडी पूर्ण करत आणली!
आई गं!
बसूनच राहिले.
मी काय आरंभलं आहे याची मला जाणीवच झालेली नव्हती.
मी सहज अगदी सहज सुरूवात केलेली!
पण बाई गं! कुठे कुठले तुकडे जोडणार आहेस? माहित आहे का तुला?
हरक्षणी डिझाईन बदलणार आहे.
कुठे लाल घेऊ? कुठे पिवळा घेऊ? कुठे काळा घेऊ?
तुकडा बदलला की गोधडी बदलणार होती.
गोधडी म्हणजे एक चित्र आहे, हे मला पहिल्यांदा आतून कळलं.
माझ्यासमोर कोरा कॅनव्हास होता आणि रंगांचा ब्रश दोन ठिकाणी टेकवून मी नुसती बसून राहिलेले.
काय करू? कशी करू?
क्विल्ट त्यामानाने खूप सोपं आहे, एक भौमितीक रचना मनात धरून ती रिपीट करत राहायची!
काय तयार करायचंय हे पूर्ण मनात तयार असलेलं. त्यात कलेपेक्षा कुसर अधिक आहे.
गोधडी या माध्यमात प्रचंड ताकद आहे.
त्यात कुठलाही फॉर्म / रचना ठरलेली नाही.
तुकड्यांची लांबी रुंदी, रंग काय हवं ते तुम्ही ठरवायचं आहे.
खूपच मोकळीक दिलेली आहे.
अधिक स्वातंत्र्य त्यामुळे अधिक जबाबदारी!
मनात येईल ते करण्याची पूर्ण मुभा आहे!
पाहणाराला त्यात तुमचं व्यक्तीमत्व दिसणार आहे.
डोळे या गोधडी नावाच्या कलाकृतीवरून कसे फिरणार हे मी ठरवणार आहे.
आहे का मला तितकी रंगांची जाण?
मी अक्षरश: काहीही म्हणू शकते, व्यक्त होऊ शकते यातून.
समोरच्याला ते कळेल की नाही, माहीत नाही.
माझा आतला प्रवाह यातून वाहू शकणार आहे.
गोधडीने मला दिलेली सगळी उर्जा हातात धरून मी बसून राहिले होते.

माझ्याकडे मोजके, शिवणकामातून उरलेले तुकडे होते,
त्यांनीच मला माझं काम करायचं होतं.

माझ्या आजी/पणजीकडे तर याहून कमी तुकडे असतील.
त्यातच तिने ठरवलं असेल, इथे हा तुकडा लावू, तिथे तो, मग पुन्हा हा.
शिवून झाल्यावर तिला किती समाधान मिळालं असेल.
तिच्या किती दु:खांचा निचरा झाला असेल.
तिघीचौघींनी मिळून गोधडी केली असेल आणि मग कुणी कुणी ती पांघरली असेल.
त्या मायेने आत आत ऊब निर्माण झाली असेल. काय काय झाकलं गेलं असेल.

त्या माझ्या आज्या/पणज्यांनी मला बळ दिलं.
" अशी बसून काय राहतेस? घे करायला. जे होईल ते तु्झं असणार आहे."

आई होतीच. आई- मी आणि माझी लेक अशा तिघींनी मिळून गोधडी पूर्ण केली.
मला खूप आवडलीय. अगदी प्राथमिक आहे तरीही.

अजून दोन करायच्या आहेत, त्यात आणखी रंगांचे प्रयोग करता येतील.

गोधडीने मला तिचं गूज सांगितलंय.
मला जितकं जमेल तितक्या छान गोधड्या मी करीन.

Sunday, July 12, 2015

जोक??

काही दिवसांपूर्वी व्हॉटसॅपवरच्या एका ग्रुपवर एक जोक शेअर केला गेला. एका मुलानी फ़ॉरवर्ड केलेला तो जोक असा होता,
दोन बायका बुद्धिबळ खेळत असतात.....
           :
           :
:
:
                 :
                 :
खाली कशाला आलात, जोक वरतीच संपला!
   लगेच त्यावर ठरलेले ‘डोळ्या्तून हसून हसून पाणी येणारे’ ते स्माईली पाठवले गेले. त्या क्षणी डोक्यात सणक गेली आणि त्या मुलाला विचारावं वाटलं, हे असे जोक पाठवून तुम्ही मुलींची टिंगल करता - त्यांना ह्युमिलिएट करता असं नाही वाटत का? त्यावरचा त्याचा रिप्लाय कळस गाठणारा होता.
"सत्यं नेहमी कटु असतं."
सत्यं? ‘बायका बिनडोक असतात, उगाच न झेपणारी बौद्धिक कामं न करता त्यांनी चूपचाप घर सांभाळावे’, या मानसिकतेचीच ही पुढच्या काळातली आवृत्ती असं वाटून मी त्याला प्रत्युत्तर द्यायचंच हे ठरवलं आणि लिहीलं,
"अजूनही मुलींना कमी लेखण्याची मानसिकता आहे आणि आपली आत्ताची पिढी पण तीच मानसिकता अंगी बाणवते, हे तू दाखवून दिलंस, धन्यवाद."
त्यावर धडाधड मेसेजेस येऊ लागले,
"Chill yar, it's just a joke" वगैरे.....
आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे मेसेज मुख्यत: ग्रुपमधल्या मुलींकडूनच आले. म्हणजे ज्यांच्या वतीने मी बाजू मांडतीये, वाद घालतीये, त्याच मला पाठिंबा द्यायच्या ऐवजी मला ‘Chill’ करायचा प्रयत्न करतायत! हा माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का होता.....ज्या मुद्द्यावर सर्व स्त्रियांनी (आणि बाकीही सद्सद्विवेक जागृत असणा-या लोकांनी) एकत्र यायला हवं, त्याऐवजी या मुद्द्यावर बोलणा-यांचेच पाय ओढले जात आहेत....
   थोड्या वेळानी त्या मुलाचा परत मेसेज, "ह्या जोकमध्ये बायका असा उल्लेख केलाय, आणि तुम्ही अजूनही मुली आहात."
यावर लगेच बाकीच्यांचे पाठिंबादर्शक रिप्लाय, "पॉईंट आहे" वगैरे.....  आता या सारवासारव करणा-या मेसेज मध्येही लोकांना काय ‘पॉईंट’ दिसला काय माहित.....उगाच एकाची बाजू लावून धरण्यासाठी आंधळेपणानी फ़क्त ‘री’ ओढायची....
      बायका असो वा मुली, शेवटी हा विनोद ‘स्त्री’ वरच केला गेला होता ना....आत्ता जरी हा फक्त एक ‘विनोद’ वाटत असला, तरी तो अनेक ग्रुप्सवर फॉरवर्ड होणार - त्यावर लोकं ‘जोक’ म्हणून हसणार...आणि न कळत अशीच मानसिकता एखाद्या व्हायरस सारखी समाजात भिनत जाणार. ज्या मुलींनी हा फक्त एक ‘जोक’ म्हणून सोडून दिला, त्याकडे फार काही गांभीर्याने पाहिले नाही, त्या मुलींना उद्देशून मला असे लिहावेसे वाटते की, ‘it's just a joke’ इतक्या casually घेऊन आणि त्याकडे दुर्लक्ष करून आपण एक प्रकारे त्याला प्रोत्साहन किंवा छुपा पाठिंबाच दाखवत नाही का? अशाच जोकसारख्या छोट्या छोट्या बिनमहत्वाच्या वाटणा-या गोष्टींमुळेच आज २१ व्या शतकातही ‘स्त्री’ ची प्रतिमा तशीच राहिलेली आहे. बाह्यत: जरी स्त्री-पु्रूष समभाव वगैरे दिसत असला तरी समाजातील ‘स्त्री’ बद्दलची मानसिकता, तिची प्रतिमा तसूभरही बदललेली नाही. फक्त तिची जागा दाखवण्याच्या, कमी लेखण्याच्या पद्धती बदलल्या आहेत.....असं असताना आज या विनोदाकडे कानाडॊळा करून चालेल का?
      त्यावर काही जणांचं म्हणणं असं की आपल्या ग्रुपचा समाज तेवढा सुशिक्षित आहे की तो मुलींचा मान राखेल.......‘सुशिक्षित?’ नुसतं उच्चशिक्षण घेतलेले, पण अशी मानसिकता असलेले लोक ‘सुशिक्षित’ कसे? असा मला प्रश्न पडतो. आणि जर तुम्ही म्हणता की हा समाज मुलींचा मान राखण्याइतका ‘समंजस’ वगैरे आहे, तर असे जोक्स शेअर तरी कसे केले जातात?
त्यानंतर एक-दोन दिवसातच त्या मुलाचा आणखी एक मेसेज आला, ‘मुलापेक्षा मुलगी कशी चांगली-महान’ अशा अर्थाचा तो मेसेज होता आणि खाली लिहीलं होतं, माझ्या जोक वर रूष्ट झालेल्यांसाठी खास....
खरं तर हे ही अपेक्षित नव्हतं मला..... ‘स्त्री’ ला काय हवंय, फक्त बरोबरीचा दर्जा. उगाच देवीच्या स्थानावर बसवलेलंही नकोय. कारण त्यामुळे तिचा चुकण्याचा अधिकारच तुम्ही नाकारताय....या दोन टोकाच्या भूमिका घेण्यापेक्षा ‘स्त्री’ ला माणूस म्हणूनच वागवा असं मनापासून सांगावसं वाटतं....
     सर्वात महत्वाचं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं किंवा समोर जे चुकीचं घडतंय त्याला विरोध न करता गप्पं बसणं हे आधी आपण थांबवलं पाहिजे. म्हणतात ना, म्हातारी मेल्याचं दु:खं नाही, काळ सोकावतो......आपण विरोध दर्शवला, किमान आपली बाजू, आपलं म्हणणं नीट पोहोचवू शकलो, तरीही खूप सुधारणा होऊ शकेल, असं वाटतं.

--- गौतमी

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...