Tuesday, May 15, 2012

कुटूंबप्रमुख - १


 काही कामासाठी आम्ही डेक्कनवरच्या एका मोठ्या दुकानात गेलो होतो. ज्या लोकांना काही खरेदी करायची होती ते काउंटरपाशी उभे होते. एका बाजूला सोफा होता, कुणाला बसायचे असेल तर, बसा. त्या गुबगुबीत सोफ्यात एक माणूस , साधारण पंचेचाळीशीतला, आरामात, घरात बसल्यासारखा हातपाय पसरून बसला होता. साहजिकच माझे त्याच्याकडे लक्ष गेले. जरा वेळाने एक बाई त्याच्याजवळ आली,  ती त्या माणसासाठी दुकानातल्या फिल्टरमधून पाणी घेऊन आली होती, तिने ग्लास त्याला दिला, पाणी पिऊन झाल्यावर त्याने रिकामा ग्लास तिच्या हातात दिला, ती ग्लास जागेवर ठेवून आली आणि त्याच्याशेजारी बसली. नंतरच्या त्यांच्या आपसातल्या बोलण्यातून कळले ते असे की ती बाई त्या माणसाची बायको आहे, सोबत कॉलेजमधला मुलगाही आलेला होता, मुलासाठी लॅपटॉप घ्यायला ते कुटूंब आले होते.
 घरी-दारी, सगळीकडेच, बायको म्हणजे, एक हरकाम्या, गुलाम घेऊन फिरतात की काय हे लोक? बाहेर दुकानात देखील, स्वत:चं पाणी स्वत: उठून घेऊ शकत नाहीत? तो माणूस मुलाला म्हणाला , " जा काय त्या लॅपटॉपच्या माहित्या घेऊन ये. मला सांग" दुकानात आल्यावर काउंटरपाशी उभं राहून त्याला कुठली चौकशी करायची नव्हती. मुलगा ती करणार मग सोफ्यात बसलेल्या बापाला हे येऊन सांगणार, मग कदाचित हे महाशय उठणार.... कोण जाणे.
आमचे काम झाले. आम्ही निघालो.
*******
कुटूंबप्रमुखाचं काय नातं असतं त्याच्या कुंटूंबातल्या व्यक्तींशी? वरचं दृश्य माझ्या डोळ्यांना (आणि मनाला) त्रास देऊन गेलं. मागच्या पिढीत हे सरसकट असणार.
 एक वरीष्ठ बाकी सगळे कनिष्ठ, एक आज्ञा देणार बाकीच्यांनी पाळायची, असं का असावं? यात एक लक्षात घ्या, इथे दोन्ही बाजूंनी तक्रार नाही.
तुम्ही म्हणाल, " पाच-सात मिनिटांच्या निरीक्षणावरून एखाद्या कुटूंबाबद्दल असे निष्कर्ष खात्रीने कसे काढता येतील?
मान्य आहे.
पण या निमित्ताने, या गोष्टींचा विचार तर करू या.

पहिल्यांदा घराघरात लोकशाही आली पाहिजे.
तुमच्या घरात लोकशाही आहे?

********

1 comment:

  1. लोकशाही असण्याचे तू काय मापदंड धरशील विद्याताई? म्हणजे मागे जसं स्वातंत्र्य आपण वेगवेगळ्या मापदंडांवर पारखल होत तसं घरातली लोकशाही पारखता येईल.. काय असू शकतात घरातली लोकशाही ओळखण्याचे मापदंड?

    तू लेखात दिलेल्या केस मध्ये काय घडले असते तर तुला त्या कुटुंबात लोकशाही आहे असे वाटले असते??

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...