Sunday, April 15, 2012

बायका आणि त्यांची कामे


स्त्री आणि पुरूषाला समान कामाला समान वेतन असायला हवे. मग स्त्रीने कामात कुठल्याही सवलती मागू नयेत, असेच माझे मत होते. अगदी गरोदरपणात देखील...

मुक्ताच्या वेळी मी नाशिकला एकलहर्‍याच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात होते. मी प्रेग्नंट आहे, या कारणासाठी कुठलीही सवलत कधी मागीतली नाही. तीन तीन मजले, लोखंडी जिन्याचे चढून जायचे, तिथला प्रचंड आवाज, बॉयलर रुमजवळ असो, जनरेटर्स जवळ असो की ऍश हॅन्डलिंग प्लान्ट असो की आणखी कुठे असो, मी जात असे, मला वाटे, मूल जन्माला घालणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, माझ्या नोकरीशी त्याचा काही संबंध नाही, नोकरीत मी १००% द्यायलाच हवेत. आठवा महिना संपेपर्यंत मी हे सगळं करत होते, मला कधी माझ्या शरीराची लाज वाटली नाही की कामाची नाही.

 आता माझं मत बदललं आहे. आम्हांला हे शिकायला होतं.

 आपल्याला खाजगी जीवन आणि व्यावसायिक जीवन यांची अशी फारकत करता येणार नाही. घरात आणि नोकरीच्या ठिकाणी असा माणूस विखुरलेला असू शकत नाही, तसं केलं की बायकांवर त्याचा ताण जास्त येतो. कारण नोकरीच्या ठिकाणी जशी कामाची समानता असते/असू शकते, तशी ती घरी असत नाही. बायकांचं कर्तृत्व केवळ त्यांच्या व्यावसायिक यशावर मोजलं जात नाही, तर त्यांनी घर कसं सांभाळलं, मुलांना कसं वाढवलं, हे प्रामुख्याने बघितलं जातं. ते बाईचंच काम समजलं जातं. साधं मुलाला ताप आला तर काय करायचं, रजा घ्यायची की अन्य काही व्यवस्था करायची हे बाईलाच बघायला लागतं, घरी एकशे दहा टक्के देऊन कामाच्या ठिकाणी तिने शंभर टक्के दिलंच पाहिजे असं अपेक्षिलं जातं. याकडे आपण डोळेझाक करणार का?

 मूल जन्माला घालणं ही जरी खाजगी बाब असली, तरी ते मूल समाजासाठीच असतं ना? बाई पुढची पिढी जन्माला घालत असते ना? मग या काळात जर तिला सवलती मिळाल्या तर कुठे बिघडलं?  किंवा मिळायलाच हव्यात.

 पूर्वी स्त्रीवादी स्त्रिया म्हणायच्या की आम्ही पुरूषांच्या बरोबरीच्या आहोत, कुठलंही काम आम्ही त्यांच्यासारखं करू शकतो आम्हांला समानता हवी. आता स्त्रियांना कळलंय, त्या म्हणताहेत, आम्ही स्त्रिया आहोत, आम्हांला पुरूष व्हायचं नाहीये. आमच्या बाईपणासह आम्ही अभिमानाने उभ्या राहू, त्यासह आम्हांला समानता हवी.

******
 प्रोटेस्टंटांनी पहिल्यांदा work is worship ही संकल्पना आणली. म्हणजे रोज किंवा दर रविवारी चर्चमधे गेलंच पाहिजे असं नाही, तुम्ही तुमचं काम जीव ओतून केलंत, मन लावून केलंत की ते ईश्वराजवळ पोचतं.
 त्यामुळे ’कामाशी बांधीलकी’ हा एक प्रतिष्ठेचा विचार झाला आहे.

 बाईसाठी घर / मुलं सांभाळणं हे नैतिकदृष्ट्या अधिक वरचढ काम समजलं जातं. त्यामुळे तिच्याकडून त्या कामाला प्राथमिकता दिली जाते.
आणि घरं आणि मुलं सांभाळणं हे काम कोणीतरी तर करायलाच हवं आहे.

 कामावर पोचायला उशीर होणार्‍या कर्मचार्‍यांत मुख्यत्वे बायका असतात, त्याच्या कारणांचा अभ्यास केला असता असं बाहेर आलं की बहुतेक सगळ्या बायकांना घरचं सारं आवरूनच घराबाहेर पडायला लागतं, तर बहुतेक सगळे पुरूष फक्त स्वत:चं आवरतात आणि घराबाहेर पडतात.

******

6 comments:

 1. मला पटले हे... स्त्री पुरुषांना प्रत्येक बाबतीत समान मानता नाही येणार, कारण दोघांमध्ये निसर्गानेच इतका भेद केला आहे की तो ढाचा मोडणे कठीण आहे. त्यामुळे अशा काही सुविधा त्यांना मिळायलाच हव्यात.

  ReplyDelete
 2. काहीही आवडीचे करायचे असल्यास,नोकरी करायची असल्यास बायकांना घर / मुलं सांभाळणं हे कम्पलसरी आहेच.ही कामे त्यांचीच.कीत्येक घरात मी कमावतो,घर मी चालवतो.असा माज पुरुषांना असतो.आणि घर/मुलं संभाळणं याला काय अक्कल लागते असा अविर्भाव त्यांच्या वागण्या बोण्यातून आपल्याला दीसतो.समाजाला दाखवायला,चारचौघांच्यात मिरवायला या पुरुषांना शिकलेल्या बायका लागतात.पण तिने स्वत:चे काही आवडीचे करायचे म्हणाले तर घर ,मुलं संभाळून काही करायचे असेल तर करायचे अश्या मताचे पुरुष आज घरोघरी दीसतात.

  ReplyDelete
 3. या विषयावर इतकं सुसंबद्ध लिहील्याबद्द्ल अभिनंदन...
  सगळे मुद्दे पटताहेत आणि वरचा दिपश्रीचा....
  माझ्या स्वतःच्या बाबतीत कित्येकदा मी स्वतःच एक पाऊल मागे घेते कारण शेवटी या रॅटरेसमध्ये किती खेचलं जायचं हे आपणच ठरवायचं...काही गोष्टीमध्ये त्यामुळे आपण मागेही पडत असू पण त्याने मला स्वतःला फ़रक पडत नाही....माझी मुलं, त्यांना वेळ देणं हेही माझंच काम आहे आणि त्यातल्या अचिव्हमेंटमधला माझा आनंद कुणीही समजू/हिरावू शकणार नाही...:)

  ReplyDelete
 4. बाळंतपणात ठीक आहे. तिथे त्या बाळाची नैसर्गिक गरज म्हणून, हक्क म्हणून, बाईने त्याच्याजवळ राहाणे आवश्यक असते. आणि बायका होता होईतो बाळंतपणाची रजा बाळाच्या जन्मानंतर वापरण्यासाठीच राखून ठेवतात. नवव्या महिन्यात विश्रांती आवश्यक असतानाही त्या तसंच रेटून काम करत असतात. पण

  "कामावर पोचायला उशीर होणार्‍या कर्मचार्‍यांत मुख्यत्वे बायका असतात, त्याच्या कारणांचा अभ्यास केला असता असं बाहेर आलं की बहुतेक सगळ्या बायकांना घरचं सारं आवरूनच घराबाहेर पडायला लागतं, तर बहुतेक सगळे पुरूष फक्त स्वत:चं आवरतात आणि घराबाहेर पडतात"

  हे जरी खरं असलं, यातून असा अर्थ ध्वनित होतो का की कामावर पोचायला एखादीला उशीर होत असेल तर बाकीच्यांनी ते समजून घेतले पाहिजे?

  मला वाटतं ही अपेक्षा चुकीची आहे.
  अर्थार्जन हे पुरुषांचं आणि घर आणि मूल हे बायकांचं क्षेत्र अशी विभागणी पूर्वीपासूनची आहे. त्यामुळे अर्थार्जनाच्या क्षेत्रात कामाच्या वेळा, हक्काच्या रजा, सवलती या बाबतीत, घरातल्या कामांची कोणतीही जबाबदारी नसलेला पुरुष हाच प्रमाण मानला गेला आहे. त्याला कधी कामाच्या ठिकाणी उशीरापर्यंत काम करण्यात अडचण नसते, मुलांच्या आजारपणासाठी, घरी पाहुणे आले म्हणून, घरातल्या धार्मिक समारंभांसाठी म्हणून, मुलांच्या शाळेच्या कारणासाठी म्हणून रजा घ्यायची वेळ त्याच्यावर फारशी कधी येत नाही. ती बाजू बाई सांभाळतेच. नोकरी करणारी असली तरी आणि नसली तरी. त्यासाठी ती अपर्णाने लिहिल्याप्रमाणे दोन पावले मागे राहाणेही मान्य करते.

  अर्थार्जनासाठी घरदार वाऱ्यावर सोडून द्यायला लावणारी ही व्यवस्था बदलणं, 'घर, मूल ही बाईचीच जबाबदारी' या आपल्या गृहीतकात बदल झाल्याशिवाय अशक्यच आहे. पुरुषांसाठी हे गृहीतक फार सोयीचं असल्यानं त्यांच्याकडून अशा बदलाची अपेक्षा ठेवणं हे तर अनैसर्गिकच वाटावं अशी परिस्थिती अजूनही आहे. पण हळूहळू का होईना, हे बदल घडतील अशी अपेक्षा ठेवूया आणि तसे प्रयत्नही करूया.

  ReplyDelete
 5. छान लिहीलयस.. काही मुद्यांशी मी सहमत आहे.
  बाळंतपणाच्या सुमारास सवलती घेण्याला पर्याय नसला तरी सांसारिक अडचणींचा विचार करता कायम सवलती घेण्याकडे स्त्रियांचा कल नाईलाजाने वाढत जातो. यामुळे तिचे करियर तिने गांभीर्याने घेतले तरी पुरूष सहकारी घेत नाहीत आणि घराप्रमाणेच तिथेही तिला दुय्यम स्थान मिळते. म्हणूनच बाईपणासह समानता मागणे योग्य असले तरी मिळवणे दुरापास्त आहे.
  लग्न करणे-न करणे, मूल जन्माला घालणे-न घालणे हे सामाजिक नव्हे तर वैयक्तिक प्रश्न आहेत, त्याची जबाबदारी समाजाने का घ्यावी. या बाबतीत तिला एकाच पुरूषाचे सहकार्य मिळवण्याचा हक्क आहे आणि तो म्हणजे तिचा जोडीदार. स्त्रियांना बाहेरील कामाच्या जागी वेळेच्या आणि उत्पादनक्षमतेच्या (घरी १००% द्यावेच लागत असल्याने) मर्यादा आहेत त्यामुळे त्यांनी त्या स्वीकारून समान वेतनाचा आग्रह धरू नये असे मला वाटते. जिला तसे वाटते तिने घर आणि करियर यांना स्वतंत्र पारड्यात ठेवावे.

  ReplyDelete
 6. विषयांतर असेल , पण खालील टिप्पण करणे महत्वाचे आहे असे वाटते.

  > प्रोटेस्टंटांनी पहिल्यांदा work is worship ही संकल्पना आणली. म्हणजे रोज किंवा दर रविवारी
  >चर्चमधे गेलंच पाहिजे असं नाही, तुम्ही तुमचं काम जीव ओतून केलंत, मन लावून केलंत की ते
  >ईश्वराजवळ पोचतं.
  >त्यामुळे ’कामाशी बांधीलकी’ हा एक प्रतिष्ठेचा विचार झाला आहे.


  सावता माळी – सन १२५० – १२९५
  कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी |
  लसूण मिरची कोथीम्बिरी | अवघा झाला माझा हरी |
  सावन्त्याने केला मळा | विठ्ठल देखियला डोळा |

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...