जहाल स्त्रीवाद्यांची भूमिका टोकाची आहे असं मला वाटतं, अजूनही वाटतं. वारीसची गोष्ट वाचल्यावर पहिल्यांदा मला ती कळू शकली. पुरूष विविध मार्गांनी स्त्रीवर सत्ता प्रस्थापित करतात. हिंसा, ताकद वापरून किंवा प्रेम वापरून. त्यातल्या काहींनी म्हंटलं आम्हांला पुरूषांशी संबंधच नकोत. आमच्या लैंगिक गरजा देखिल आम्ही आपसात भागवू, आम्ही निसर्गाविरूद्ध जावू. वंशसातत्याचं हत्यार कुणी आमच्याविरूद्ध वापरू नये, आम्ही प्रयोगशाळांमधे मुलं तयार करू, थोडे शुक्राणू साठवून ठेवले की झालं! पण या पुरूषांशी आम्हांला कुठल्याही प्रकारचे संबंधच नकोत.
खरं आहे. शोषणाच्या अशा प्रथा अस्तित्वात असतील तर कुणीतरी अशी टोकाची भूमिका घ्यायला हवीच होती.
..........
पुरूष ही जमात कायम घाबरतच आली आहे स्त्रिला, तिच्यातल्या नवनिर्मितीच्या क्षमतेला..... स्त्रियांना घाबरून आधीच आपली बाजू सावरण्याचे हे प्रयत्न आहेत. यावरून असं दिसतंय की स्त्रियांच्या लैंगिक क्षमतेलाही पुरूष घाबरताहेत. स्त्री हवी तर आहे, विशेषत: तिचं गर्भाशय हवंच आहे. ते तेव्हढं वापरून घेऊ. आपल्या शरीरसुखासाठी ती आहे, तिला आपण सुखी करू शकू याची खात्री नाही. म्हणून तिच्या अपेक्षाच कापून काढायच्या! कसला न्याय आहे!
पुरूषांना कधी कळलाच नाही, बायकी समजल्या जाणार्या भावनांमधील आनंद! देण्यातला आनंद! त्यांची कीव येते, त्यांना युद्धाचीच भाषा कळते, त्यांच्यासाठी प्रेम, सुख या देखिल जिंकायच्या गोष्टी आहेत! सहकार्य, दुसर्याचा आनंद त्यांना कुणी शिकवलाच नाही, ते लढतच असतात मग ते युद्धभूमीवर असोत की शय्यागृहात असोत! बिच्चारे!
समाजपद्धतीत पुरूषांना वाढवण्यातल्या या चुका आहेत.
लग्नाच्या पारंपारीक नात्यात दोघांनी एका पातळीवर असण्यातला, मैत्रीतला, चुकतमाकत शिकण्यातला, एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांचं स्वातंत्र्य जपण्यातला, एकमेकांचं शरीरसुख शोधण्यातला, आनंद जर कळू शकला तर पुरूषही युद्धाचे पवित्रे सोडून देतील.
******
No comments:
Post a Comment