वारीसने मोठमोठ्या कंपन्यांसाठी मॉडेलिंग केलं. लवकरच तिने न्यूयॉर्क, पॅरीस, रोम, व्हेनिस उथे घरे घेतली, कितीक नव्या बनावटीच्या गाड्या घेतल्या, फ्रान्सच्या अध्यक्षांना, इंग्लंडच्या राणीला , अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांना तिला भॆटायचं होतं.
सगळ्या जगाला तिच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. वेगवेगळ्या वृत्तपत्रांना, मासिकांना, चॅनेल्सना तिच्या मुलाखती हव्या होत्या.
............................
एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाला मुलाखत देताना तिने तिची व्यथा सांगितली.......
वारीस पाच वर्षाची झाल्यावर एके दिवशी तिची आई तिला जिप्सी लोकांच्या तळावर घेऊन गेली. तिथे तिला एका दगडावर झोपवण्यात आलं, तिचे हातपाय बाजूच्या चार दगडांना बांधले, तिला काही कळेना, एक धिप्पाड जिप्सी बाई अर्धवट तुटलेला वस्तरा घेऊन आली, आधी ती त्या वस्तर्यावर थुंकली आणि पूर्वी पडलेल्या रक्ताचे ओघळ साफ केले. वारीसच्या डोळ्यांना पट्टी बांधण्यात आली, ...... त्या बाईने तिचे ठरलेले काम केले, वारीसची सुंता केली. वेदनांचा आगडोंब उसळला... वारीसची शुद्ध हरपली, त्यानंतर त्या बाईने काट्याने भोकं पाडली, दोर्याने खालचा भाग शिवून टाकला, लघवी बाहेर पडण्यापुरती जागा ठेवली.
नंतर अनेक दिवस वारीस तिथेच जिप्सींच्या तळावर पडून होती. जंतूंची विषबाधा झाली होती. तीस-पस्तीस टक्कॆ मुली या काळात सेप्टीकने मरून जातात. ज्यांच्या अंगात प्रखर प्रतिकारशक्ती असते त्या वाचतात. वारीस वाचली.
आफ्रिकेतल्या अनेक देशांप्रमाणे सोमालियातही ’फिमेल जेनायटल म्युटिलेशन - एफजीएमची ’ प्रथा आहे.
स्त्रीच्या योनीमार्गात क्लायटॉरीस नावाची सूक्ष्म मज्जातंतूंची जाळी असते. ती संवेदनशील असते. कामतृप्ती, संभोगसुखाचा आनंद तिला यामुळे मिळतो. स्त्रीची सुंता करताना ही क्लायटॉरीस कापून काढतात. आणि बाहेरचे लेबिया मेजोरा शिवून टाकतात जेणेकरून तिला हा आनंद मिळू नये.
वारीसच्या बाबतीत फारच वाईट परीस्थिती होती. त्या जिप्सी बाईनं वारीसचा योनिमार्ग जवळजवळ शिवूनच टाकला होता, केवळ काड्यापेटीतील काडीचं टोक जाईल इतपतच छिद्र ठेवलं होतं. मासिक पाळीच्या काळात रक्तस्त्राव नीट बाहेर येऊ शकायचा नाही. तिला इन्फेक्शनचा त्रास होई. तिच्या पोटात प्रचंड दुखत असे, कळा येत, लघवी करताना, आग जळजळ व्हायची...... असा असह्य त्रास ती काही वर्षे सहन करत होती, वेदनाशामक गोळ्या घ्यायच्या आणि कामाला लागायचं असं तिचं असे. मावशी डॉक्टरकडे जाऊ द्यायची नाही, ”तिथे जाऊन आपली बेअब्रू करून घ्यायची का?” ती म्हणे.
लंडनमधे एकटी राहात असताना वारीसने डॉक्टरांना दाखवून शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे तिच्या वेदना थांबल्या. आता तिला मुले होऊ शकणार होती पण संभोगसुखाचा आनंद ती कधीही मिळवू शकणार नव्हती. तिच्याकडे प्रसिद्धी, पैसा, वैभव सारं होतं...... माणूस म्हणून जो आनंद मिळवायचा तिला हक्क होता, तो मात्र तिच्यापासून हिरावून घेतला गेला होता.
तिच्या एकटीपासून नव्हे जगातल्या हजारो, लाखो स्त्रियांपासून...
या मुलाखतीनंतर एक वादळ उठलं.
वारीसनं या अन्यायकारक दुर्दैवी प्रथेला वाचा फोडली. याचं अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना कौतुक वाटलं, गावोगावी वारीस फॅन क्लब स्थापन झाले, टाईम मासिकाने मुखपृष्ठावर तिचं छायाचित्र टाकून, जगावर प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणून तिची मुलाखत प्रसिद्ध केली. युनोनं या प्रथेला आळा घालण्यासाठी जनजागरण मोहिम हाती घेतली, याच्या नेतृत्वाचा मान वारीसला देण्यात आला. बीबीसीच्या चॅनेल फोरने वारीसवर लघुपट तयार करायचा ठरवलं, हवं तितकं मानधन देण्याची तयारी दर्शविली. वारीसने ते अफाट मानधन युनोच्या एफजीएम प्रतिरोधक समितीला दान करून टाकलं.
वारीस म्हणजे वाळवंटातलं फूल, तिने स्वत:च्या आत्मचरित्राला तेच नाव दिलं ’डेझर्ट फ्लॉवर’
त्यावर नुकताच गेल्यावर्षी एक चित्रपट निघाला आहे.
********
********
(संदर्भासाठी डॉ. श्रीकांत मुंदरगी यांच्या ’वाळूत उमललेलं फूल’ या चंद्रकांत दिवाळी अंकातील लेखाचा उपयोग झाला आहे. )
*****
जळजळीत! वाचलं पाहिजे पुस्तक!
ReplyDelete- सचिन
काल मी तुझे दोन्ही ब्लॉग वाचले. खूपच अस्वस्थ वाटलं. आत्ता परत एकदा वाचले.
ReplyDeleteभयंकर आहे.
स्त्रीला लैगिक सुखाचे दरवाजे बंद करण्यासाठी एफ जी एम सारखी अमानुष प्रथाच कशाला हवी?
ReplyDeleteमुळात असं काही सुख असतं; केवळ त्या सुखासाठीच स्त्रीच्या शरीरात काही रचना केलेली आहे; ते तिला हवंसं वाटणं नैसर्गिक आहे; हे स्त्रीपर्यंत पोहोचूच न देता स्त्री ही पुरुषाच्या सुखासाठीच निर्माण झालेली आहे; त्याबाबतीत तिच्या स्वतःच्या काही इच्छा असता कामा नयेत /असत नाहीत असंच तिला वाढवणं, वागवणं अशी वृत्ती तर जगभरातच दिसते. एफ जी एम सारखे त्याचे काही साईड-इफेक्टही नाहीत. पुरुष सुखी-जग सुखी.
विद्या, अगदी वेगळ्या विषयाला हात घातलास. वारीस ची कहाणी अस्वस्थ करते.
अश्विनीच्या मताला धरुन......
ReplyDeleteमुळात असं काही सुख असतं; केवळ त्या सुखासाठीच स्त्रीच्या शरीरात काही रचना केलेली आहे; ते तिला हवंसं वाटणं नैसर्गिक आहे;हे समाजातील अनेक पुरुषांना माहीत आहे की नाही कोण जाणे.
एकंदरीतच आपल्या समाजात,खूप घरांमध्ये,जेव्हा पुरुषाची इच्छा होते तेव्हा आणि तेव्हाच शरीरसुखाचा विचार केला जातो. कधी तरी तिला इच्छा झाली आहे,कींवा तिला आत्ता गरज वाटते आहे म्हणून तिच्या पुढाकाराने ही गोष्ट पुरुषाकडून मान्य केली जात नाही.याचेच आपल्या समाजात जास्त प्रमाण दिसते.
यात पुष्कळदा पुरुषांचा मूड,त्यांची बाहेरची टेंशन्स,त्यांची त्यावेळेची गरज याचा जितक्या स्त्रीया विचार करताना दिसतात.तेवढा विचार पुरुषांकडून होताना दिसत नाही.कित्येकदा ब-याच
जणांना,बहुतेक घरांत,स्त्रीयांना असं काही वाटू शकते,तिची ही गरज असू शकते हे मान्यच नसते.