छान राहणं, छान दिसावंसं वाटणं, कुणाचं तरी किंवा सगळ्यांचं आपल्याकडे लक्ष जावं अशी इच्छा, या नैसर्गीक आदिम प्रेरणांपैकी आहेत.
मला ’मी’ छान दिसावं, माझ्याकडे कुणी पाहावं, असं वाटत असेल तर त्यात नाकबूल करण्यासारखं काय आहे?
प्रसाधनांचा वापर पूर्वापार चालत आलेला आहे.
त्यात काही नियम ठरवता येणार नाहीत.
निदान एक सारासार विचार केलेला असतो का?
समजा बाहेर जाताना किंवा कुठे कार्यक्रमाला जाताना मी माझे ओठ रंगवते. तर का?
मला माहित आहे, माझे ओठ लाल नाहीत. रंग वापरून मी तुम्हांला फसवते आहे. का?
माझ्यासाठी, मला छान वाटावं यासाठी मी ओठ रंगवलेले नाहीत, तसं असतं तर मी घरी रंगवून बसले असते ना?
मी ओठ रंगवते कारण तुम्ही माझ्याकडे पाहावं, दाद द्यावी अशी माझी इच्छा आहे.
यातही चुकीचं काहीच नाही, फक्त हा विचार मी केलेला आहे ना? हे तपासायला हवं.
समजा मला कुणाला फसवायचंच नाहीये.
’जशी आहे तशी’ मी स्वत:ला स्वीकारलेलं आहे, तुम्हीही तसंच स्वीकारा असं मला म्हणायचंय.
ते तरी शक्य असतं का?
मी उदास आहे.... दाराची बेल वाजते, येईल त्याला/तिला मी हसर्या चेहर्याने सामोरी जातेच ना?
किंवा फोन आला तर उत्साही स्वरांत बोलतेच ना?
म्हणजे मी जशी नाही तशी दाखवते आहे, ही फसवणूकच नाही का?
तर फसवणूक अटळ आहे.
जिने तिने/ज्याने त्याने आपल्या मर्यादा ठरवायच्या.
मग हलकी लिपस्टीक लावायची/ गडद लावायची, केसांचं काय करायचं? आणि यात वेळ किती घालवायचा? हे तुमचं तुम्ही ठरवा.
आपण जसं तयार होऊन समाजात जातो, त्याद्वारे काय संदेश देतो, तेच आपल्याला द्यायचे आहेत ना? याबद्दल सतर्क राहायला हवं.
जे प्रसाधनांचं तेच कपड्यांचं.
रंगसंगती हा काय प्रकार आहे? कुठल्या रंगाबरोबर कुठला रंग जातो हे ही तेव्हाच्या फॅशनच्या चलतीनुसार ठरतं.
बायकांच्या कपड्यांवर फारच बोललं जातं. विशेषत: जेव्हा ते पुरूषी नजरेला आव्हान देणारे असतात.
बलात्कार हे बायका असले तसले कपडे घालून ओढवून घेतात, हा ही एक पसरवलेला गैरसमज आहे.
यावरचा अभ्यास असं सांगतो, बलात्काराचं कारण "घातलेले कपडे" नसतं, अंगभर पदर घेणार्या, मोठ्ठं कुंकू लावणार्या बायकांवरही बलात्कार होतात. लिंगपिसाटांची संख्या नगण्य असते, बलात्कार करणारा पुरूष संधी साधत असतो.
एवढ्यात एक ’बेशरमी मोर्चा" निघालेला. त्यावर उलटसुलट चर्चा झाली. "बायकांनी काय घालायचं हे बायका ठरवतील." याबाबत वाद असायचे कारण नाही.
बायकांनी काय घालायचं हे जर पुरूषांच्या हातात दिलं तर ते काय! बुरखा घालायला लावतील आणि मग उघडे हात किंवा चेहरा दिसला तरी ती बाई आपल्याला उपलब्ध आहे असे समजतील. या मोर्च्यामागे सांगायचं मुख्य होतं ते असं की बाई ही उपभोग्य वस्तू नाही.
मी जे कपडे घालून समाजात वावरते त्याने काही संदेश दिले जातात, त्यावर माझं नियंत्रण नाही. तसे संदेश गेलेले मला चालणार आहेत का? किंवा मला त्याची पर्वा नाही? याचा मी विचार केलेला असला पाहिजे. कुठल्याही स्त्रीकडे पुरूषांच्या नजरा वळणार आहेत. किंवा तशा वळलेल्या मला आवडणार आहेत, तुमचं उत्तर काहीही असू देत, या प्रश्नाचा तुम्ही विचार केलेला असला पाहिजे. मी तोकडे कपडे घालीन, ठीकच आहे. पण लोक बघणार आहेत हे विसरून मला चालणार नाही. मी जे कपडे घालते त्याने "इतरांनी माझ्या शरीराकडे कसं पाहावं हे सांगते" आणि "मी माझ्या शरीराकडे कसं पाहते" हे ही सांगते. आपण घातलेल्या कपड्यांद्वारेही इतरांशी बोलत असतो, हे लक्षात घेऊ या.
बायकांनी काय कपडे घातले तर ते सभ्य कुठले असभ्य, हे तो तो समाज आणि तो काळ ठरवत असतो. कुठले कपडे पुरूषी नजरेला चाळवणारे आहेत, हे ही समाजानुसार वेगवेगळं असतं.
आपल्याकडे साडी नेसतात तर पोट आणि पाठीचा काही भाग उघडा असतो. त्याचे कुणालाच काही वाटत नाही. एका युरोपीय महिलेची, जिने भारतीयाशी लग्न केलेलं होतं, आत्मकथा वाचल्याचे आठवते. ती साडी नेसून पोपला भेटायला गेली तर त्यांना ते भयंकर अपमानास्पद वाटले. त्यांच्याकडे पाय उघडे असले तर चालतात.
केरळात कामकरी स्त्रियांनी उत्तरीय घ्यायचे नाही अशी पद्धत होती. त्यांनी फक्त कमरेच्या खालचेच वस्त्र नेसायचे असे. त्यावेळच्या एका कादंबरीत असे कथानक आहे की एक कामकरी मुलगी फॅशन म्हणून एक ब्लाऊज शिवून घालते तर तिला ती कशी वाया चालली आहे याबद्दलची बोलणी खावी लागतात. समाजात वावरणार्या सगळ्याच बायका जर फक्त कमरेखालचे वस्त्रच नेसत असतील, तर पुरूषांच्या दृष्टीने काय नि बायकांच्या दृष्टीने काय त्यात काहीच वावगे नसणार. केवळ या वेषभूषेमुळे बलात्कारांची संख्या वाढलेली असेल? मुळीच नाही.
******
मी कितीही असं म्हणत असले की चेहरा रंगवायचा की नाही, कपडे कुठले घालायचे? याचे स्वातंत्र्य मला आहे. तसे ते नसते, समाज त्याला दिशा दाखवत असतो.
कुठल्याही समाजात आणि कुठल्याही काळात आपण असलो तरी त्या समाजाचा, काळाचा .... एक सारासार विवेक असतो.... त्याला धरून मी माझी प्रतिमा कशी असेल हे ठरवते ..... त्याप्रमाणे वागते.
*****