यात्रा हे मुक्ता बाम लिखित दिग्दर्शित नाटक आहे. एकपात्री आहे, सुकन्या गुरव ने आक्काच्या भूमिकेचं सोनं केलं आहे.
यात्रा ही आक्काची गोष्ट आहे.
छोट्या गावात प्रेमळ आईबाबांच्या सावलीत वाढणारी आक्का त्यांच्यासोबत पंढरपूरच्या वारीला जायला निघते, तिथे गर्दीत हरवते, एक दलाल तिला कोठीवर घेऊन येतो, तिथे ती मोठी होते, व्यवसाय करू लागते, एकाच्या प्रेमात पडते , तो धोका देतो, अशा माणसाचा गर्भ वाढवायचा नाही म्हणून ती पाडून टाकते. कायम तिच्या मनात ही इच्छा असते की वारीला जायचं, यात्रा पूर्ण करायची, दरवेळी ती सुटू शकत नाही, यात्रा पुरी होत नाही. ती अडकते, कोठीची प्रमुख होते.
हा तिचा प्रवास या नाटकात आहे.
तसं पाहिलं तर ठराविक टप्पे घेत जाणारं हे नाटक आहे. तरीही हे महत्त्वाचं नाटक का आहे?
कारण हे केवळ ती चं नाटक राहात नाही, ते नाटक पाहणाऱ्या प्रत्येकीचं नाटक होतं. आक्का जरी वेश्या असली तरी आधी ती स्री आहे आणि या नाटकाला येणारी प्रत्येक गृहिणी ही देखील आधी स्री आहे.
यात्रा ही स्त्री च्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या धडपडीची गोष्ट आहे.
नाटकाचा वरचा स्तर हा आक्काच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा आहे. जी वळणं घेत, धक्के देत पुढे जाते.
आणखी एक स्तर हा तिचं बाई म्हणून घडणं दाखवणारा आहे.
ही साधारण ९० च्या दशकातली गोष्ट आहे.
ती चं घरातलं वाढणं आणि कोठीतलं वाढणं यात तसा काही फरक नाही, मुलीनी काय करावं? काय नाही? याचे नियम घरातही आहेत. भांडी घासा, केर काढा, शिवण करा, सुईत दोरा ओवा, हे दोन्हीकडेही आहेच. सुमी काय आणि कमला काय! दोघी सारख्याच आहेत.
बाई म्हणून जगतानाच्या मर्यादांबद्दल ती म्हणते....
इथे मला एक सांगू देत की अतिशय साधं, सुंदर आणि समर्पक नेपथ्य आहे. चार बाजूंना चार रंगांच्या साड्या सोडलेल्या आहेत. मध्यभागी एक चौरस लेवल आहे! बस! त्यातली पहिली साडी बालपणाची, बाईपणाची, तिची गाठ तिच्या पदराला सुरूवातीपासूनच बांधलेली आहे...
आक्का म्हणते, " हळूहळू त्या मागे ओढणाऱ्या गोष्टीची सवय होऊन गेली मला, तिला बांधून घेऊन फिरता येतं तेवढंच जग असतं, आसं वाटायला लागलं होतं मला"
मधे मधे येणारी साडी असतानाही, तिच्याशी खेळत, ते बंधन समजून घेत तिच्या हालचाली, वावर दिग्दर्शिकेनं उत्तमरीत्या अधोरेखित केला आहे.
तिसरा स्तर आहे तिच्या आणि विठ्ठलाच्या नात्याचा! " इट्टल म्हणेल तो मार्ग, इट्टल म्हणेल ती यात्रा!
आपन काय होणार? आपन नाही ठरवायचं? आसं आसतं होय!"
संवाद अर्थवाही आहेत.
आवा चालली पंढरपुरा.... या भारूडाचा खोलात जाऊन लावलेला अर्थ.... हा आणखी एक सशक्त धागा या नाटकात आहे.
आवा पंढरपुरला जात नाही, जाऊ शकत नाही. " मुले लेकरे घरदार, माझे इथेच पंढरपूर" आक्का म्हणते आवाला घरादाराचा मोह नव्हता, ती घरदार सोडू शकत नव्हती कारण ते तिच्या असण्याचा भाग झालं होतं. आक्का ही तिचं, तिच्या बायकांचं घरदार, त्यांची जबाबदारी सोडू शकत नाही. ते तिच्या असण्याचा भाग होऊन गेलेलं असतं. पटतंच आपल्याला. बंडखोरी केवळ आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यातच असते का? जेव्हा तुम्ही सगळी तोडमोड करू शकत असता तेव्हा जबाबदारी उचलण्यातली बंडखोरी आक्का दाखवून देते असं मला वाटतं. ती सुटू शकत असते आणि ती थांबणं निवडते. विठ्ठलाला ती म्हणते," ही यात्रा तू माझ्यासाठी लिहीली आहेस का? मी स्विकारते"
तिचा तो स्वीकार मात्र आपल्या डोळ्यात पाणी उभं करतो.
आक्का अशी आपल्या डोळ्यांदेखत समजदार होतं जाते, शहाणपण तिच्यात असतंच... मी उपाशी मरंल पण न्हाई खाणार .. म्हणणारी छोटी आक्का ते जेवते अन् म्हणते.. थोडं अन्न पोटात गेलं अन् मन सावरलं... मुंग्यांची रांग कुटं जात आसंल?.. असा प्रश्न पडणारी छोटी आक्का.. खूप खूप शहाणी होते.. हा प्रवास पाहणं एक सुंदर अनुभव देतं त्याचवेळी आपल्याला जागं करत जातं, !!.... आसं असतं व्हयं बाईंचं जगणं?
हे अतिशय सुंदर बांधलेलं नाटक आहे. ( हे गंगूबाई काठीयावाडी च्या आधीचं नाटक आहे.) अतिशय गुंगवून टाकणारं तरीही विचार करायला लावणारं मुक्ताचं लेखन आहे. नाटकाचा ओघ , वळणं यातनं आपण पार होत असताना, कधी नाटक संपलं? कळत नाही.
आणि रंगमंचावर फक्त एकटी सुकन्या असते. १७-१८ व्यक्तिरेखा ती आपल्या समोर उभ्या करते. आवाज आणि लकबींसह! ती एक कमाल अभिनेत्री आहे. आपण थक्क होतो. सुकन्या, तुझ्या अभिनयातून यापुढेही तू वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहेस! शुभेच्छा!🌹
मुक्ताने नाटक बसवताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आहे. तिचं सामाजिक भान तिच्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून जाणवत राहतं. तिचं म्हणणं ती ठाम पणे मांडते. जेव्हा काजलमौसी मरते आणि आक्काला आता तिथून सुटता येत नाही, ती म्हणते," इट्टला, तू खेळायलास का माझ्याशी?" .... हे आक्काला समजणं किंवा तिने तो अर्थ लावणं, तिच्या घडण्यातून ते येणं.... आपण अवाक होतो... ही २०- २१ वर्षांची लेखिका आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. मुक्ता, तुझ्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत, तू असंच सशक्त लेखन करणार आहेस. आहेसच! शुभेच्छा!🌹
दोघींचे सूर छान जुळलेले आहेत. दोघींनीही बरीच बक्षिसे या नाटकासाठी पटकावलेली आहेत. या दोघीच नव्हे तर त्यांची अख्खी टीम एकमेकांना सहकार्य करत उत्तम काम करते. अभिनंदन आणि शुभेच्छा! 🌹🌹
यात्रा चा जेव्हा केव्हा प्रयोग असेल तेव्हा नक्की पाहा.
महिलादिनाच्या निमित्ताने, जीवनाच्या ओघात, सहजपणे, एक समजूतदार शहाणपण, आयुष्याचा अर्थ कळणं, तुमच्या - माझ्यात, सगळ्यात येऊ दे, याच शुभेच्छा!🌹🌹
-- विद्या कुळकर्णी