दिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे आणि तीन बायका! त्यापैकी दोघी साठी ओलांडलेल्या आणि एक जेमतेम पंचवीस तीसची.
पहिल्या दिवशी संध्याकाळी बीचवर गेलो तेव्हा किना-यावरच्या एका बंगल्यातून त्या दोघी आज्ज्या मस्तपैकी पोहायचे वेश घालून बाहेर पडल्या. समुद्रात लांबपर्यंत गेल्या आणि भीज भीज भिजत बसल्या. आम्ही लांबवर चक्कर मारून आलो तरी त्या समुद्रातच. अगदी अंधारून आलं तसं किना-यावरचे लाईफ़गार्ड समुद्रात गेलेल्यांना बाहेर हाकलू लागले, तेव्हा त्या बाहेर पडल्या. दुस-या दिवशी आम्ही समुद्रावर पोचलो तर या बायका बहुदा शॉपिंग करून आल्या होत्या. गाडीवानाशी काहीतरी थट्टेचं बोलत, हसत हसत आमच्यासमोरच गाडीतून उतरल्या आणि थोड्याच वेळात आमच्यामागोमाग परत समुद्रावर. उशिरापर्यंत समुद्रावर थांबून परत फिरताना मी रोज त्यांच्या त्या समुद्रकाठावरच्या बंगल्याच्या कुंपणावरून आत डोकावून पहात असे. समुद्रात भिजून आल्यावर या बायका बंगल्याच्या अंगणात खुर्च्या टाकून, पाय लांब करून, गप्पा टाकत टाकत आवडत्या दारूचे घुटके घेत बसत असतील असं मला उगीचच वाटत असे :) ते चित्र पुर्ण झालं नाही, पण मला त्या आज्ज्या भारीच आवडल्या. त्यांच्यात काही नातं असेल-नसेल, त्यांची कुटुंबं, गोतावळा कुठे परदेशी असेल, त्यांची काहीतरी गोष्ट असेल...कोणास ठाऊक. तिथे त्या दोघी प्रचंड खूश दिसायच्या. प्रत्येक क्षण असोशीने जगत आहेत असं वाटायचं.
पुण्यात परतण्याच्या आदले दिवशी दुपारी आम्ही आमच्या मुकामाच्या जागी आलो, तर एक परदेशी मुलगी तिथल्या हिरवळीवर आपली सॅक टाकून आरामात बसली होती. पंचवीस-तीस वर्षाची असेल. आम्ही रहात होतो, ते अभयारण्यातलं चारपाच खोल्यांचं एक छोटंसं रिसॉर्ट होतं. त्याचे मालक -पैंगणकर जवळच्याच गावात राहात. अधूनमधून थोडावेळ येऊन जात, एरवी शुकशुकाट. ती त्यांचीच वाट पाहात होती. त्यांना फोन लावून द्याल का म्हणाली, म्हणून आम्ही तिला नंबर दिला. तर मोकळंढाकळं हसत म्हणाली की अजून सिमकार्डच घेतलं नाहीये! तिथे मोबाईलला रेंज नव्हती. एका विशिष्ट जागीच रेंज असे. तिला बरोबर घेऊन त्या जागी गेले आणि फोन लावून दिला. परत खोलीकडे येताना तिचं धन्यवादाचं भाषण संपेचना! थोड्याच वेळात पैंगणकर आले. त्यांच्याशी बोलून तिने खोली ताब्यात घेतली आणि अर्ध्याच तासात पाठपिशवी अडकवून, ताडताड टांगा टाकत कुठेतरी निघूनही गेली. आम्हीही यथावकाश बाहेर पडलो आणि समुद्रावर फिरून, जेवणं आटोपून सावकाश रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास परत आलो. परदेशी पाहुणीच्या खोलीला कुलूपच दिसलं. तेवढ्यात गाडी घेऊन पैंगणकर आले, त्यांना सहजच विचारलं तिच्याबद्दल. तर ते म्हणाले, "आत्ता ती प्रवेशद्वारापाशी दिसली. तिथून चालत येते आहे. एकटीच आहे. मी गाडी थांबवून माझ्याबरोबर चल म्हणलं, तर थांबलीच नाही. मला ओळखलं नसेल किंवा तशीही ही लोकं फारसं लावून घेत नाहीत. येईल थोड्या वेळात." मी ऐकतच राहिले! प्रवेशद्वारापासून सहजच दोन किलोमीटरचं अंतर होतं. तिथे फक्त राहाण्याच्या ठिकाणी दिवे आहेत, बाकी रस्त्यांवरसुद्धा दिवे नाहीत. छोटे रस्ते आणि दोन्ही बाजूला घनदाट झाडी. त्यात पुन्हा ऐन दिवाळीतला अमावस्येचा काळोख. जंगलभागातल्या वाड्यावस्त्यांवर रात्री बाईकवर एकेकटी जाणारी मंडळी पाहूनही आम्हाला आश्चर्य वाटे. भसकन एखादा प्राणी वाटेवर आला तर भंबेरीच. रात्री जेवणानंतर सगळे मिळून रस्त्यावर फिरत असू तेव्हाही आजूबाजूच्या थोड्याशा हालचालीनेही थरकाप होत असे. अशा ठिकाणी, ही जगाच्या कोणत्यातरी भागातून आलेली मुलगी एकटीच अंधार कापत, चालत येत होती! मला अगदी काळजीच वाटू लागली तिची आणि खूप कौतुकही. वीसेक मिनिटात ती पुन्हा दुपारसारखीच ताडताड टांगा टाकत आली आणि खोलीत अदृष्य झाली. हातात ना टॉर्च होता, ना मोबाईल. किंवा इथे येतायेता सॅकमधे टाकला असेल. अनोळखी मुलखातला प्रवास, एकटीने, तोही अशा दाट जंगलभागात. निर्मनुष्य जागी मुक्काम. उद्या पहाटे आम्ही इथून गेलो की हिच्या सोबतीला इथे चिटपाखरू असणार नाही - किंवा चिटपाखरुच फक्त असणार. या वयात किती समृद्ध अनुभवांना ती पुढे होऊन आलिंगन देते आहे!
मागे कधीतरी वाचलेला एक लेख आठवला ’मोकाट स्वच्छंद कुमारिकांचे देश!’ त्यात म्हणलं आहे - "ज्या देशात कुमारिका मोकाटपणे, स्वच्छंद वृत्तीनं हिंडू शकतात ते देश चिरायु होवोत. इथं कळपाचं काहीतरी आपल्या मनात येतं. तसं नाही, एकट्या कुमारिकेलाही मोकाट आणि स्वच्छंद जगता आलं पाहिजे. दिवसा-रात्रीच्या कोणत्याही प्रहरी कुमारिकेला निर्भयपणे, मोकळेपणाने कुठंही जाता आलं पाहिजे. तिच्या मनास येईल ते करता आलं पाहिजे. मोकाट आणि स्वच्छंद या शब्दांना जबाबदारीच्या मर्यादेत पाहिलं पाहिजे." ...ती ज्या देशातून आली आहे, त्या देशानं, तिथल्या संस्कृतीनं तिच्यात हे मोकाटपण, स्वच्छंदपण रुजवलं असावं का? आणि त्या साठी ओलांडलेल्या बायकांमधेही? ते रुजलं की जगाकडे आणि आयुष्याकडे असं स्वच्छ नजरेने, हसत हसत पहाता येत असेल का? अजूनही त्या तिघी मनात रेंगाळताहेत. विशेषतः ती एकटी मुलगी. तळव्यावर चेहरा टेकून तिच्याकडे पहात मी विचार करत बसले आहे...असं खुल्या दिलानं, आजुबाजूच्या जगावर विश्वास टाकून, मोकळं होऊन एकटं हिंडणं आपल्याला यापुढेतरी कधी जमेल?