माझे बाबा सगळ्या भांवंडांत लहान. त्यामुळे त्यांच्या मोठ्या बहीणीची नात ज्योतीनंदा माझ्या बरोबरीची.
लग्नाकार्यात, सुट्टीत भेट होईल तेव्हा आम्ही बरोबर असायचो.
तिच्याबद्दलची पहिली आठवण अशी आहे.....
माझ्या एका आतेभावाचं लग्न होतं. लग्नाला सगळे बस करून गेलेलो. मग आतेबहीणींबरोबर आम्ही नवरी पाहायला गेलो. तेव्हा ती होती, ज्योतीनंदा. आम्ही दोघीही पहिली-दुसरीत असू. त्या लग्नात आम्ही मिळून खेळलो. तेव्हा कधी नव्हे ते मला दोन नवीन कपडे शिवले होते. नाहीतर, घरात घालायचे दोन, बाहेर जायचा एक आणि एक गणवेश एव्हढेच चार/पाच झगे असायचे. एकदम दोन म्हणजे चैनच! एक परकर पोलकं आणि एक झगा. मी अगदी खूष होते.
आमची परीस्थिती बेताचीच होती, त्यांची तर आमच्याहूनही साधारण असेल.
तिने मागीतला म्हणून का तिच्याकडे नव्हता म्हणून आईने दुसर्या दिवशी माझा नवा झगा ज्योतीनंदाला घालायला दिला. मीही आनंदी माणसे जशी उदार होऊ शकतात तशी झालेले. लग्न झालं आमचा परतीचा प्रवास सुरू झाला, तरीही ती आपली माझा झगा घालूनच बसलेली. मी माझं परकर पोलकं बदलून साधासा फ्रॉक घालून बसले होते. मी आईला म्हणाले देखील ’ आई, ही अजून माझा झगा का देत नाहीये?’ आई म्हणाली, "गावी पोचलो की देईल." आणि झालं काय की ती आणि तिचे आई-बाबा गावी आलेच नाहीत, मधेच तिच्या आत्याचं गाव लागलं तिथे उतरून गेले. उतरताना काय म्हणणार?
झालं! माझा नवाकोरा झगा गेलाच!
किती दिवस मला हळहळ वाटत राहिली.
पुढच्या वर्षी ती भेटली तेव्हाही मला माझा झगाच आठवत होता पण आई म्हणालेली आता काही बोलू नकोस, म्हणून मी शहाण्या मुलीसारखी गप्प बसलेले.
आणखी दोन-तीन वर्षांनी काय झालं? ज्योतीच्या धाकट्या मावशीचं म्हणजे माझ्या आतेबहीणीचं लग्न झालं. लग्नानंतर ती हैद्राबादला गेली होती, येताना ती ज्योतीसाठी खड्यांच्या, बर्यापैकी महाग अशा दोन बांगड्या घेऊन आली. आम्ही मांडवपरतनीला जाणार नव्हतो पण गेलो. माझ्या तिथे असण्याची आतेबहीणीला कल्पना नव्हती. तिने एकच जोड आणलेला, अंदाजाने. झालं काय की तो ज्योतीच्या हातात जात नव्हता. माझ्या हातात जाऊ शकला. मला खूप आवडलेला. सुंदरच होता तो बांगड्यांचा जोड! पण ताई म्हणाली म्हणून मी नको, नको असं केलं. शेवटी आग्रह करून आतेबहीणीने तो मला दिलाच.
मी त्या बांगड्या पुढे चार वर्षे तरी घातल्या असतील.
त्या मला मिळाल्या याचं ज्योतीला काय वाटलं असेल कुणास ठाऊक? ती माझ्याजवळ काही बोलली नाही.
ज्योतीनंदा म्हंटलं की हे दोन प्रसंग मला आठवतातच.
तिचे बाबा थोडे विक्षिप्तच आहेत. आम्ही सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. सुट्टीत गेलेलो असताना म्हणत होते, " चांगलं श्रीमंताचं स्थळ आलंय ज्योतीसाठी, तिचं लग्नच करतो." मला तेंव्हा शिंगं फुटायला लागलेली. मी त्यांच्याशी खूप भांडले. वेगवेगळे मुद्दे घेऊन भांडत होते. शेवटी शेवटी म्हणाले की मी पोलीसात कळवीन, कायद्याने बालविवाहाला बंदी आहे.’ ते खरं माझ्याशी भांडण्याची मजा घेत असणार, मला ते कळत होतं तरीही लहान वयात एकदाचं मुलीचं लग्न लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं ही कल्पनादेखिल मला सहन होत नव्हती. विशेष म्हणजे मी जिच्यासाठी भांडतेय ती ज्योती भांडणात कुठेच नव्हती ती शांतच.
ती शिकली दहावी/ बारावी ..... नुसती माझ्यासारखी शिकत नव्हती, त्याजोडीला घरकाम, स्वैपाक हे ही करायला लागलेली,
पुढे दोन चार महिने या मामाकडे, त्या मावशीकडे असं केवळ नवरा मिळेपर्यंत राहिली.
यथावकाश तिचं जमलं. मामा मावश्यांनी पुढाकार घेऊन लग्न लावून दिलं.
मी ME करत होते तोवर तर ती दोन मुलांची आई झालेली. संसारात रूळलेली.
नांदेडला गेले तर चुलतभावाला म्हणाले, " चल ज्योतीकडे जाऊन येऊ. " तेव्हा मी आवर्जून सगळ्या सगळ्यांकडे जात असे.
आमच्याकडे देशस्थात कसं आहे? नातेवाईकांचा भरपूर गोतवळा आणि गुंता! साधसं काही असलं तरी जेवायला ३०/४० लोक सहज बोलावतील. बहुतेक बाबतीत त्यांचे माझे विचार पटणारे नाहीत. पण ती सगळी माझ्याकडची माणसं आहेत आणि त्यांच्यात मला रस आहे.
हं. तर ज्योतीकडे गेले तर तिची मुलं, पुतणे आजूबाजूला. ही कायम साडीत. मोठीच वाटायला लागलेली.
तिचे विषय वेगळे माझे वेगळे. खरं म्हणजे तसे ते पूर्वीपासूनच होते. पण आता खूप अंतर पडलंय हे जाणवत होतं.
त्यानंतर कधी मी तिच्याकडे गेले नाही.
पुढे माझंही लग्न झालं, मुलंबाळं, मीही संसारात बुडून गेले.
दरम्यान कधीतरी भॆट, कधीतरी दिसणं, वरवरचं बोलणं बस्सं!
चार वर्षांपूर्वी एका लग्नाच्या निमित्ताने भेटलो.
निजामाबादला लग्न होतं, पुष्कळ बारा-चौदा तासांचा प्रवास होता.
सर्वांच्या मिळून भेंड्या, काहीतरी गप्पा, आठवणी निघत होत्या.
नंतर म्हणाली, " मी आता विद्याच्या शेजारी बसणार आहे."
मग आमच्या दोघींत गप्पा म्हणजे
इतकं औपचारीक बोलणं सुरू झालं.
जवळपास एकमेकींची काहीच माहिती नाही असंच होतं.
तिच्या मोठ्या मुलाला कॅन्सर झालेला, पहिल्या स्टेजलाच कळला, व्यवस्थित औषधोपचार केले आणि तो पूर्ण बरा झालाय आता काहीच धोका नाही हे कळलेलं.
तॊ विषय निघाला. म्हणाली आता अगदी छान आहे, पॉलीटेक्नीक करतोय.
मग त्या दिवसांमधलं सांगायला लागली.
मुलांचं असं कळलं. त्याच्यासाठी मुंबईच्या फेर्या, औषधोपचार, लाखभर रूपये खर्च येणार होता.
माझे तर हातपायच गळाले. एव्हढे पैसे कसे आणि कुठून उभे करू?
ह्यांना पण काही कळेना.
कोणीतरी सांगितलं, खासदारांना भेट.
अजूनही कोणी कोणी काय काय सांगितलेलं असेलच.
म्हणाली, " मला परक्या पुरूषांशी कधी बोलून माहित नाही." एकटी खासदारांना भेटायला गेली. (भेट मिळण्यासाठीही दोन, तीन फेर्या झाल्या असतील.) सोबत रिपोर्टस. " त्यांच्याशी कसं काय बोलले माहित नाही. देवाने बळ दिलं बघ."
मग त्यांनी सतराशे साठ गोष्टींची पूर्तता करायला सांगितली, त्यासाठी अर्ज करणं, नगरपालिकेत खेटे घालणं, सगळं केलं.
साधी सही कशी करायची ते या बाईला येत नव्हतं.
खासदार निधीतून पन्नास-साठ हजारांची मदत मिळाली. बाकीचे इकडून तिकडून उभे केले.
एकटीने मुंबईचा प्रवास, लोकलने फिरणं, तिथं राहणं, मुलाची काळजी, त्याची पथ्यं सांभाळणं, सगळं निभावलं.
ज्योती किती बदलली होती.
म्हणाले, "ज्योती, तू ग्रेट आहेस."