खरं बोलणं हा नातेसंबंधांचा पाया आहे. नाती जितकी जवळची असतील तितकं आपण अधिक खरं बोलतो. पूर्ण खरं बोलतायेण्याजोगी काही नाती आपल्याला असली पाहिजेत. नाहीतर आपण धुक्यातलं काहीतरी बोलत बसतो आणि तेच खरं आहे असं समजून चालतो. नंतर (की आधीपासूनच) खरं काय ते शोधणंही सोडून देतो.
खर्याच्या प्रत्येकाच्या व्याख्याही वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपण खरं बोललो तरी ऎकणारे वेगळाच अर्थ लावतात. त्यांना पूर्ण खरं ऎकायची सवयच नसते ना? कधी कधी मी माझ्या थेट खर्याचा अर्थ समजावून सांगते आणि याचा अर्थ हाच + एव्हढाच आहे असंही सांगते.
दूरच्या माणसांशीही शक्यतो खरंच बोलावं असा माझा प्रयत्न असतो. खरं पचणार नाही असं वाटलं तर मी बोलायचं टाळते पण शक्यतो खोटं बोलत नाही.
आपल्या समाजात सगळीकडे खोटं बोलणं, खोटं वागणं, खोटं कौतुक , खोटी सभ्यता असं सुरू आहे. तुम्हांला ही नाटकं करायचा कंटाळा नाही येत?
मला येतो. म्हणजे मी ती करत नाही असं नाही. पण कुणाशीतरी खरं बोलून पहा, इतकं मोकळं छान वाटतं.
समाजात बदल करता येणं आपल्याला शक्य आहे का? नाही. पण आपल्या आजूबाजूचा परीसर स्वच्छ करायला काय हरकत आहे?
आपल्या जवळच्या व्यक्तींपुरतं साधं, स्वच्छ, सरळ आणि खरं जगून पाहूया.
खरं बोलणं म्हणजे स्वत: स्वत:ला स्वीकारणं आहे.
***
माझ्या बहीणीकडे एक कौटूंबिक प्रश्न निर्माण झाला. मी त्यात पडले. तिथे घरात कोणीही कोणाशीही खरं बोलत नव्हतं. ते लोक स्वत:शीही खरं बोलत नव्हते. मी माझ्या भाचीला म्हणाले,” पहिल्यांदा आपण हे ठरवून टाकूया की मी तुझ्याशी खरंच बोलेन आणि तुही काही झालं तरी माझ्याशी खरंच बोलशील.” बहीणीशीही हेच बोलले, पुढे त्या दोघींनीही तसं ठरवलं. यामुळे एकमेकांबद्दलचे गैरसमज कमी व्हायला मदत झाली. घरात संवाद सुरू झाला.
***
घरात नवरा- बायकोने एकमेकांशी खरं बोललं पाहिजे. म्हणजे आपण खोटं बोलत असतो का? तर नाही. ”खरं” म्हणजे काय खरं आहे ते शोधून बोललं पाहिजे. बर्याच जणांना/ जणींना स्वत:शीही खरं बोलायची सवय नसते. अशी मंडळी स्वत:कडेही समाजाच्या नजरेतूनच बघतात.
पण काही प्रश्न आहेत...
मिलिन्दशी सगळंच बोलत राहणं आणि खरं बोलत राहणं , त्याला न आवडणारंही बोलत राहणं ही माझीच गरज होऊन बसली होती/ आहे.
स्वत: त्यांचं काही सांगणं ही त्याची गरज नाही आणि ऎकणं ही सुद्धा! दीड-दोन वर्षांपूर्वी मी त्याला सांगीतलं... मी तुला सगळंच सांगत बसणार नाही. तू विचारलंस तरच सांगेन. क्वचित तो विचारतो, बहुतेकदा विचारतच नाही.
माझा समज होता सगळं सांगून मी त्याला माझ्या जगण्यात सहभागी करून घेते. खरंच आहे ते!
माझा बहुदा ओव्हरडोस होत असणार आता मी त्याला आवश्यक वाटेल, वेळ असेल तेवढंच सांगते.
नवरा - बायकोत तो म्हणतो असायला हवं ते अंतर हे असेल.
***
काही वेळा नेमकं बोलता येणं, खरं शोधता येणं... अशी कौशल्ये नसतील तर काय करायचं?
बोललेलं समजून घेता आलं नाही तर?
मला माहीत नाही.
***
आपल्या आई-वडिलांशी चांगले संबंध असणं ही एक समाधानाची बाब असते.
त्यांनाही आवश्यक ते सगळं सांगीतलं पाहिजे. परवानगी मागायची असे नाही.
असं सांगणं म्हणजे त्यांनाही आपल्या आयुष्यात स्थान देणं असतं.
***
कुणाशीही मनापासून बोलणं, सांगणं म्हणजे आपल्या जगण्यात त्याला/ तिला सहभागी करून घेणं, सोबती बनवणं असतं.
****