Saturday, March 8, 2025

वाचण्याचा सोहळा

 


हे चित्र मला फार आवडलं आहे.

ही तरुणी पाय पोटाशी घेऊन पुस्तक वाचत बसली आहे.

छान सजून, तयार होऊन बसली आहे.

आपण पुस्तक वाचायला असं सज - धजके बसतो का? नाही.

 जर कुणी पुस्तक वाचण्याचा सोहळा करण्या आधी आवरत असेल तर भारीच!!

  आपण असं तयार कधी बरं होतो? काही सण, समारंभ, कार्यक्रम असेल तर... नवीन कपडे.. सळसळते... नाजूकसा गजरा..अंबाड्याभोवती... हातात बांगड्या, छानशी अंगठी... ओढणी सुद्धा घेतलेली आहे...

 हिच्याही घरी तसंच काही असेल कदाचित , एखादा सण...

 कदाचित तिचं लग्न झालेलं आहे... कदाचित नाही.

 ती कुठल्या जाती, धर्माची आहे? कुठल्याही... महत्त्वाचं.. ती स्त्री आहे आणि ती वाचत बसली आहे.

  नुसती वाचते आहे असं नाही.. शेजारी वाफाळता कप आहे... वाचण्याचा सोहळा सुरू आहे.

 सणादिवशी सगळे जमले आहेत, नातेवाईक.. मित्र - मैत्रिणी... काहीतरी हसणं, खेळणं.. मजा चालू असेल... बाहेरच्या खोलीत, अंगणात...

  हिला मात्र ओढ लागलेली पुस्तकातल्या गोष्टींची.. कदाचित पुढे काय होईल? ची... आपली ही नायिका आहेच नादिष्ट.. मन मानेल तसं करणारी... त्या बाहेरच्या सगळ्यांना सोडून ती आतल्या खोलीत आली आहे... स्वतः च्या, स्वतः ला हव्याशा जागेत... घरातल्या आणि मनातल्याही!! येताना मस्त गरम चहा किंवा कॉफीचा  कप घेऊन आली आहे .

   किती सुंदर चित्र आहे हे!!!


तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना असं आपल्या या नायिकेसारखं, मनाला वाटेल तेव्हा... वाचनाचा सोहळा करता यावा,  याच महिला दिनाच्या शुभेच्छा!! 🌹🌹
- विद्या कुळकर्णी 

( हे बोहो पद्धतीचं चित्र आहे, प्रीती या चित्रकर्तीचं, हे मला नेटवर भेटलं.)

Friday, March 8, 2024

हिरो

 

माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले नाहीत. एकदा एका बाईंचे बरेच पैसे, काही वर्षांचे अडकून होते. तर आपल्या या मैत्रिणीने त्याचा पाठपुरावा करून ते पैसे त्या बाईंना मिळवून दिले. 

 बाई म्हणाल्या," तुम्ही माझं रखडलेलं काम केलंत, तुम्हाला किती देऊ?"

 तर आपली ही मैत्रिण, आपण तिला सुमन म्हणूया. 

सुमन म्हणाली," अहो, हे माझं काम आहे, ते मी केलं, त्याचा पगार मी घेते. मला काही नको."

बाईंनी दोन तीनदा विचारलं. सुमन ठाम होती.

 मग एके दिवशी त्या बाई सोन्याची अंगठी सुमनसाठी घेऊन आल्या, भेट म्हणून.

 सुमन म्हणाली," मला नको."

तिने अंगठी परत केली.

त्या बाई मागे लागल्या, सुमनवर काही परिणाम झाला नाही. 

एके दिवशी सुमन तिच्या जागेवर नाही हे पाहून त्यांनी सुमनच्या टेबलवर अंगठी ठेवली आणि निघून गेल्या.

 सुमन जागेवर आली, तिने अंगठी पाहिली, आता अशी महागाची वस्तू टेबलवर कशी सोडून द्यायची? सुमन अंगठी घेऊन घरी आली, तिला रात्रभर झोप आली नाही, अंगठी परत करायची कशी? हाच विचार.

  दुसऱ्या दिवशी त्याच ऑफिसमधे काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीकडे आली आणि तिला काय घडलं ते सांगितलं.

 मैत्रीणीने फोन करून त्या बाईंना बोलावलं, त्या मैत्रिणीच्या ओळखीच्या होत्या, त्यांचे एवढे पैसे सुटले तर, जिने काम करून दिलं तिला काहीतरी दिलंच पाहिजे, असं त्यांना वाटत होतं.

 मैत्रीणीने सुमनलाही बोलवून घेतलं. 

 सुमनजवळची अंगठी घेतली, त्या बाईंच्या हातात ठेवली," ती घ्यायला नाही म्हणते आहे, तुम्हाला कळत कसं नाही? या तुमच्या अंगठीमुळे ती रात्रभर झोपू शकली नाही, ही अंगठी घ्या आणि जा. पुन्हा कधीही सुमनला काही देण्याचा प्रयत्न करू नका."

त्या बाई अंगठी घेऊन निघून गेल्या.

  ही जी सुमन आहे..... ती हिरो आहे!!!

 मला तिचा अभिमान वाटतो! तिचा आणि माझ्या मैत्रिणीचाही!!

आजूबाजूच्या भ्रष्टाचारी जगात असं कुणीतरी ठाम उभं राहणं किती आश्वासक आहे!!

 रोज लोकलने प्रवास करणारी... गर्दीत मिसळून गेलेली सुमन... हिरो आहे!

****

आमच्याकडे अलका मावशी कामाला यायच्या. त्यांचं काम एकदम स्वच्छ. तांब्या, पितळेची सोडाच पण स्टीलची भांडी पण लखलखणार! फरशी अशी पुसून घेतील की पायाला स्वच्छता जाणवेल. हे त्या काही मी सांगते म्हणून, कुणी सांगतं म्हणून करायच्या नाहीत, त्यांना स्वतःलाच जाता येता/ वरवर/ कसंही काम केलेलं चालायचं नाही. अतिशय दर्जेदार काम आणि कामावर निष्ठा! 

  हे एक दिवस, दोन दिवस नाही..

 तब्बल बावीस वर्षे त्या आमच्याकडे यायच्या.

 त्या हिरो आहेत.

कामाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन किती प्रोत्साहक आहे!!

रस्त्यावरून भराभर चालताना त्या दिसल्या तर ओळखू यायच्या नाहीत, बस मिळाली पटकन चढतील..... त्या हिरो आहेत.

****

माझी एक मैत्रीण आहे.. नृत्य तिच्या आवडीचं! अप्रतिम नृत्यांगना आहे. काव्यवेडी आहे, कवितांवर उत्तम कार्यक्रम सादर करते. उत्तम रसिक आहे. नृत्य - संगीत - साहित्य यांचा आस्वादही घेते आणि सादरही करते. एवढंच नाही पर्यावरणाबाबत जागरूक, प्लॅस्टिक वापरणार नाही, पुनर्वापर करेल. वीजेचा, पाण्याचा काळजीपूर्वक वापर करेल, हे अगदी रोज हं!

   केमो करून आली, चार दिवसांचा थकवा गेला की पुन्हा शेजारणींना गोळा करेल, चला गं जरा व्यायाम करू, योगासनं करू, विचार करू, व्यक्त होऊ.

 ती हिरो आहे.

ती कार चालवत असेल, कुठे सिग्नलला ती थांबलेली दिसेल... तुम्हाला कळणारही नाही..ही कोण ते!! .... ती हिरो आहे.

*****

माझ्या एका मैत्रिणीने आंतरजातीय लग्न केलं आहे. समाजाला मान्य नसणारी गोष्ट. नातेवाईकांचा विरोध. 

 तिची आई ठामपणे तिच्यामागे उभी राहिली. मराठवाड्यातल्या एका छोट्या गावातली ही बाई!

 हे ही आज नाही, वीस वर्षांपूर्वी!!

 मुलांच्या बरोबरीने मुलीला वाढवलं, शिकवलं. आनंदाने तिने निवडलेला मुलगा आपलासा केला.

 ती हिरो आहे.

  एखाद्या लग्नकार्यात किंवा नातवांच्या गॅदरिंग मधे तुम्हाला ही आजी भेटेल, हसरी आणि उत्साही! तुम्हाला कळणार नाही... ती हिरो आहे.

*****

या स्त्रिया, या स्त्रियांच्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या.... मला प्रेरणा देत राहिल्या. माझं जगणं सुंदर करत राहिल्या. 

   प्रत्येक जण खास असते. आपल्याला कळत नाही, ओळखू येत नाही..... माझी प्रत्येक मैत्रीण खास आहे. प्रत्येक बाई खास आहे.

 कधीतरी त्या खास असण्यावर कवडसा पडतो आणि ती उजळलेली मला दिसते. तिच्या उजळण्याचा प्रकाश माझ्यावर पडतो आणि माझं असणं मलाच आवडायला लागतं.



****


महिलादिनाच्या शुभेच्छा!! 💐💐

Wednesday, March 8, 2023

यात्रा

 यात्रा हे मुक्ता बाम लिखित दिग्दर्शित नाटक आहे. एकपात्री आहे, सुकन्या गुरव ने आक्काच्या भूमिकेचं सोनं केलं आहे.


 यात्रा ही आक्काची गोष्ट आहे.

छोट्या गावात प्रेमळ आईबाबांच्या सावलीत वाढणारी आक्का त्यांच्यासोबत पंढरपूरच्या वारीला जायला निघते, तिथे गर्दीत हरवते, एक दलाल तिला कोठीवर घेऊन येतो, तिथे ती मोठी होते, व्यवसाय करू लागते, एकाच्या प्रेमात पडते , तो धोका देतो, अशा माणसाचा गर्भ वाढवायचा नाही म्हणून ती पाडून टाकते. कायम तिच्या मनात ही इच्छा असते की वारीला जायचं, यात्रा पूर्ण करायची, दरवेळी ती सुटू शकत नाही, यात्रा पुरी होत नाही. ती अडकते, कोठीची प्रमुख होते.

 हा तिचा प्रवास या नाटकात आहे.


तसं पाहिलं तर ठराविक टप्पे घेत जाणारं हे नाटक आहे. तरीही हे महत्त्वाचं नाटक का आहे?

 कारण हे केवळ ती चं नाटक राहात नाही, ते नाटक पाहणाऱ्या प्रत्येकीचं नाटक होतं. आक्का जरी वेश्या असली तरी आधी ती स्री आहे आणि या नाटकाला येणारी प्रत्येक गृहिणी ही देखील आधी स्री आहे.

 यात्रा ही स्त्री च्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या धडपडीची गोष्ट आहे.

 नाटकाचा वरचा स्तर हा आक्काच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा आहे. जी वळणं घेत, धक्के देत पुढे जाते. 

 आणखी एक स्तर हा तिचं बाई म्हणून घडणं दाखवणारा आहे.

  ही साधारण ९० च्या दशकातली गोष्ट आहे.


ती चं घरातलं वाढणं आणि कोठीतलं वाढणं यात तसा काही फरक नाही, मुलीनी काय करावं? काय नाही? याचे नियम घरातही आहेत. भांडी घासा, केर काढा, शिवण करा, सुईत दोरा ओवा, हे दोन्हीकडेही आहेच. सुमी काय आणि कमला काय! दोघी सारख्याच आहेत.

बाई म्हणून जगतानाच्या मर्यादांबद्दल ती म्हणते.... 

इथे मला एक सांगू देत की अतिशय साधं, सुंदर आणि समर्पक नेपथ्य आहे. चार बाजूंना चार रंगांच्या साड्या सोडलेल्या आहेत. मध्यभागी एक चौरस लेवल आहे! बस!  त्यातली पहिली साडी बालपणाची, बाईपणाची, तिची गाठ तिच्या पदराला सुरूवातीपासूनच बांधलेली आहे...


 आक्का म्हणते, " हळूहळू त्या मागे ओढणाऱ्या गोष्टीची सवय होऊन गेली मला, तिला बांधून घेऊन फिरता येतं तेवढंच जग असतं, आसं वाटायला लागलं होतं मला" 

 मधे मधे येणारी साडी असतानाही, तिच्याशी खेळत, ते बंधन समजून घेत तिच्या हालचाली, वावर दिग्दर्शिकेनं उत्तमरीत्या अधोरेखित केला आहे.

 तिसरा स्तर आहे तिच्या आणि विठ्ठलाच्या नात्याचा! " इट्टल म्हणेल तो मार्ग, इट्टल म्हणेल ती यात्रा!

 आपन काय होणार? आपन नाही ठरवायचं? आसं आसतं होय!" 

 संवाद अर्थवाही आहेत.

आवा चालली पंढरपुरा.... या भारूडाचा खोलात जाऊन लावलेला अर्थ.... हा आणखी एक सशक्त धागा या नाटकात आहे. 

 आवा पंढरपुरला जात नाही, जाऊ शकत नाही. " मुले लेकरे घरदार, माझे इथेच पंढरपूर" आक्का म्हणते आवाला घरादाराचा मोह नव्हता, ती घरदार सोडू शकत नव्हती कारण ते तिच्या असण्याचा भाग झालं होतं. आक्का ही तिचं, तिच्या बायकांचं घरदार, त्यांची जबाबदारी सोडू शकत नाही. ते तिच्या असण्याचा भाग होऊन गेलेलं असतं. पटतंच आपल्याला. बंडखोरी केवळ आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यातच असते का? जेव्हा तुम्ही सगळी तोडमोड करू शकत असता तेव्हा जबाबदारी उचलण्यातली बंडखोरी आक्का दाखवून देते असं मला वाटतं. ती सुटू शकत असते आणि ती थांबणं निवडते. विठ्ठलाला ती म्हणते," ही यात्रा तू माझ्यासाठी लिहीली आहेस का? मी स्विकारते"

 तिचा तो स्वीकार मात्र आपल्या डोळ्यात पाणी उभं करतो.

  आक्का अशी आपल्या डोळ्यांदेखत समजदार होतं जाते, शहाणपण तिच्यात असतंच... मी उपाशी मरंल पण न्हाई खाणार .. म्हणणारी छोटी आक्का ते जेवते अन् म्हणते.. थोडं अन्न पोटात गेलं अन् मन सावरलं... मुंग्यांची रांग कुटं जात आसंल?.. असा प्रश्न पडणारी छोटी आक्का.. खूप खूप शहाणी होते.. हा प्रवास पाहणं एक सुंदर अनुभव देतं त्याचवेळी आपल्याला जागं करत जातं, !!.... आसं असतं व्हयं बाईंचं जगणं? 

हे अतिशय सुंदर बांधलेलं नाटक आहे. ( हे गंगूबाई काठीयावाडी च्या आधीचं नाटक आहे.) अतिशय गुंगवून टाकणारं तरीही विचार करायला लावणारं मुक्ताचं लेखन आहे. नाटकाचा ओघ , वळणं यातनं आपण पार होत असताना, कधी नाटक संपलं? कळत नाही.

आणि रंगमंचावर फक्त एकटी सुकन्या असते. १७-१८ व्यक्तिरेखा ती आपल्या समोर उभ्या करते. आवाज आणि लकबींसह! ती एक कमाल अभिनेत्री आहे. आपण थक्क होतो. सुकन्या, तुझ्या अभिनयातून यापुढेही तू वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहेस! शुभेच्छा!🌹

 मुक्ताने नाटक बसवताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आहे. तिचं सामाजिक भान तिच्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून जाणवत राहतं. तिचं म्हणणं ती ठाम पणे मांडते. जेव्हा काजलमौसी मरते आणि आक्काला आता तिथून सुटता येत नाही, ती म्हणते," इट्टला, तू खेळायलास का माझ्याशी?" .... हे आक्काला समजणं किंवा तिने तो अर्थ लावणं, तिच्या घडण्यातून ते येणं.... आपण अवाक होतो... ही २०- २१ वर्षांची लेखिका आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. मुक्ता, तुझ्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत, तू असंच सशक्त लेखन करणार आहेस. आहेसच! शुभेच्छा!🌹

दोघींचे सूर छान जुळलेले आहेत. दोघींनीही बरीच बक्षिसे या नाटकासाठी पटकावलेली आहेत. या दोघीच नव्हे तर त्यांची अख्खी टीम एकमेकांना सहकार्य करत उत्तम काम करते. अभिनंदन आणि शुभेच्छा! 🌹🌹

  


 यात्रा चा जेव्हा केव्हा प्रयोग असेल तेव्हा नक्की पाहा. 

महिलादिनाच्या निमित्ताने, जीवनाच्या ओघात, सहजपणे,  एक समजूतदार शहाणपण, आयुष्याचा अर्थ कळणं, तुमच्या - माझ्यात, सगळ्यात येऊ दे, याच शुभेच्छा!🌹🌹

-- विद्या कुळकर्णी 

Tuesday, March 30, 2021

दिवे लागले रे दिवे लागले

 दिवे लागले रे दिवे लागले

तमाच्या तळाशी दिवे लागले

 स्त्री - पुरूष समानतेकडे जाणारा रस्ता हा स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग आहे. किंबहुना तो पुरुष स्वातंत्र्याचाही मार्ग आहे.
 पुरुषसत्ताक पद्धतीत पुरूषाकडे सत्ता जरूर आहे पण स्वातंत्र्य आहे का?
 या व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं आणि पुरुषांचंही शोषण होतं.
 गेल्या काही वर्षांत माझ्या हे लक्षात आलं आहे की non judgmental होणं ही स्वतंत्र होण्याची गुरुकिल्ली आहे.
 हे चूक ते बरोबर, असं काही नसतं. हे कळलं.
जग या आणि अशा पद्धतीने असलं/ चाललं पाहिजे असा आग्रह मी सोडून दिला. माझी जी " आदर्श जगाची" कल्पना आहे, त्यानुसार जग घडवण्याची धडपड थांबवली.
 " आहे तसं जग" स्विकारण्याचा प्रयत्न सुरू केला.
 तसं स्विकारूनही मला हवे आहेत ते बदल घडतील अशी आशा ठेवून स्वतः ला आणि जगालाही मदत करायला सुरुवात केली.
 समोरच्या रागावलेल्या माणसाकडे प्रेमाने पाहणं शक्य झालं, सत्ता वापरणारा कसा सत्तेने बांधला गेला आहे, मजबूर आहे हे दिसायला लागलं, दुसर्यावर हल्ला करणारा आतून किती पोखरलेला आहे, हे दिसायला लागलं. वेगवेगळे मुखवटे चढवून वावरणारे, त्या मुखवट्यांची जाणीव नसणारे दिसले की त्यांना प्रेमाची गरज आहे, आहे तसं स्विकारण्याची गरज आहे, हे स्पष्ट दिसायला लागलं. त्या प्रेमाने त्यातल्या काही जणी/जणांचे मुखवटे गळून पडले आणि आतला झरा वाहायला लागला. हा आलेला अनुभव अतीव आनंदाचा होता.
  माणसांना योग्य दिशा दाखवण्याआधी त्यांना समजून घेणं, त्यांच्यावर प्रेम करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तसं केलं की आपली आपली दिशा प्रत्येकाला सापडते. 
 कुणाला मदत करायची असेल तर त्याला/ तिला जाणून घ्या, विनाअट स्विकारा, त्यांच्या जाणीवांचा परीघ वाढवा, त्यांच्या निर्णयाचा आदर करा.
 Non judgmental होणं म्हणजे " तमाच्या तळाशी एक दिवा लावणं" आहे.
 
 मार्च महिन्यात " महिला दिन" येतो.
त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना स्वातंत्र्याचा मार्ग गवसो, त्यावर पुढे जाता येवो " शुभेच्छा! 🌹
 "तुमच्या स्वातंत्र्याच्या मार्गावर कुणीतरी दिवा लावून तो प्रकाशित करो आणि तुम्हालाही कुणाच्या वाटेवर दिवा ठेवता येवो."
 शुभेच्छा! 🌹🌹

Wednesday, March 4, 2020

एक थप्पड !

थप्पड पाहिला, आवडला. जरूर पाहा.
ज्या संयतपणे आणि संथपणे घेतला आहे, आवडलं.
थप्पड खाल्ली आणि तडकाफडकी माहेरी निघून गेली असं नाही होत.  ती चार दिवस जाऊ देते हळूहळू तिला उमजायला लागतं, मग ती ठरवते हे शक्य नाही. तिची साधी, सोपी , थेट उत्तरे आहेत. " मी जेव्हा आनंदी आहे असं म्हणीन तेव्हा मी आनंदी असले पाहिजे."
" माझं तुझ्यावर प्रेम नाही उरलेलं , मी तुझ्याबरोबर नाही राहू शकत"
 एका थपडेमुळे तिला सगळं दिसायला लागतं, जे की ती चालवून घेत होती.
 तो एक थप्पड मारतो त्यामागे काय काय आहे? तोल गेला, राग आला, म्हणून बॉसला थप्पड नाही मारत, पण बायको आहे तर हक्क आहे , मारू शकतो. बेभान झाला तरी काही भान सांभाळून आहेच!!
 एका थपडेने तिला जागं केलं तसं त्याला केलं नाही, ही खरी शोकांतिका आहे.
 त्याला बिचार्याला काही कळलंच नाही. ना तो विचार करू शकला, ना समजून घेऊ शकला. त्याला साधं नीट सॉरी म्हणायला देखील जमलं नाही.
 सिनेमातला काही ढोबळपणा आवडला नाही काही आवडला. कामवाली बाई शेवटी जेव्हा नवर्याला उलटून थपडा मारते ते पाहायला आवडलं. का? मनात हिंसा चालते का आपल्याला?

 तिने जर भर पार्टीत उलटून नवर्याला थप्पड मारली असती तर काय झालं असतं? गोष्ट कशी बदलली असती?

 आपण एक समाज म्हणून अहिंसेकडे जात असू, जायला हवं, तर मनातल्या " हिंसेचं " काय करायचं? हे आपण शिकायला हवं.

शेवटी एखादी नावडती गोष्ट घडली तर दोघांनीही मिळून शिकायला हवं. लग्नात मिळून शिकणं हवं की नको? नाहीतर लग्न कशाला चालू ठेवायचं? 😊
खरंय!

या येत्या महिलादिनानिमित्त सगळ्या जोडप्यांना मिळून शिकणं जमायला लागो.
त्यासाठी सर्वांना शुभेच्छा!!!
-- विद्या

वाचण्याचा सोहळा

  हे चित्र मला फार आवडलं आहे. ही तरुणी पाय पोटाशी घेऊन पुस्तक वाचत बसली आहे. छान सजून, तयार होऊन बसली आहे. आपण पुस्तक वाचायला असं सज - धजके ...