Thursday, July 31, 2014

हे ही कधीतरी बोललं पाहिजे

दोन वर्षांपूर्वी लिहिलेला लेख

********

मी खूप हिंमत करून हे लिहित आहे.
मी शेवटपर्य़ंत लिहू शकीन असं वाटतंय.
सत्यमेव जयते चा दुसरा बाललैंगिक शोषणावरचा भाग पाहिला.
आणि लिहायचेच असे ठरवले आहे.
*******

मी पाच- सहा वर्षांची होते. वाड्यात सगळे मुलगे आणि मी एकटी मुलगी. सगळ्या घरांमधून फिरायचे, सगळ्यांची लाडकी. खूप बोलत असे. वाड्यातले नुकते लग्न झालेले, उमेदवार असलेले काका/ काकू मला खास गप्पा मारायला बोलवत.
आणि
.........................
त्यातलेच एक काका होते, तेव्हा काकू बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या होत्या. त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि दार लावून घेतलं. फारतर पाच मिनिटे मी त्यांच्या खोलीत असेन. जे काय त्यांनी केलं ते किळसवाणं होतं.
.................
नंतर
त्यांनी मला बांगड्यांच्या आकारातलं लोखंडी स्प्रिंग दिलं, ते फोर्बस कंपनीत होते, तिथल्या टाकाऊ मालातलं ते असायचं, वाड्यातल्या आम्हां मुलांना ते खेळणं फार आवडायचं, पूर्वीही त्यांनी मला दिलेलं होतं, मी त्यांना आणखी मिळालं तर आणा असं सांगीतलेलं.
.........
मी घरी आले, ते खेळणं कोपर्‍यात टाकून दिलं. घरात कोणाशीही काही बोलले नाही.
........
सहा वर्षांच्या एका छोट्या मुलीसाठी ही असली घाणेरडी गोष्ट ....... कुणाला न सांगता...... स्वत:च्या मनात पुरून ठेवणं...... खूप अवघड होतं...... ती एक बोलकी मुलगी होती..... काही खुट्ट वाजलं तरी वाडाभर जाऊन सांगायची......
तिने ते केलं..... कुणालाही काही सांगीतलं नाही..... तिला कळलंच नसणार, कसं सांगावं ते....
.......
आणखी चार दिवसांनी ....... त्यांनी अचानक मला उचलून त्यांच्या खोलीत नेलं...... मी ओरडले नाही.... पुन्हा तसेच.... पाच मिनिटांनी मला बाहेर सोडले आणि चाराणे माझ्या हातात ठेवले..... चॉकलेट घे म्हणून.......
................................
मी ते पैसे घट्ट मुठीत धरून घरी घेऊन आले................. माझ्या लाडक्या खिडकीत बसले................... आणि ते पैसे खिडकीतून मागच्या बोळीत टाकून दिले.
.........................
जे काय घडतंय त्याचं काय करायचं मला काहीच कळत नव्हतं.
....
आणखी दोन दिवसांनी असेल... मी खाली अंगणात खेळत होते, ते वरच्या मजल्यावर राहायचे ...... गॅलरीच्या कठड्याला टेकून त्यांनी मला ’ये ’ अशी हाताने खूण केली. मी जे पळत घरात जाऊन बसले. कोणीही कितीही बोलावलं तरी बाहेरच आले नाही. नाही मला खेळायचं आणि नाही मला बाहेर यायचं असंच सांगत राहिले........
.......
नळाजवळ आम्ही लावलेल्या गुलाबाशेजारी उभी असलेली ती सहा वर्षांची मुलगी.... छोटीशी.... फ्रॉक घातलेली..... आणि वर कठड्याला टेकून तिला ये म्हणणारा तिच्या गोष्टीतला राक्षस......
ते दोघे अजून माझ्या डोळ्यासमोर आहेत....
त्यानंतर जीव खाऊन ती मुलगी घरात पळाली... ते ही
.........................

पुन्हा असं काही झालं नाही. त्यांच्याबद्दल लोक, आईबाबा चांगलंच बोलायचे, "किती बिचारा सज्जन माणूस" असेच. ते कधी घरी आले तर मी पळून बाहेर जायची. काकू आल्यावरही मी शक्यतो त्यांच्या घरात जायचीच नाही. त्यांचं बाळ पाहायला आईबरोबर गेले तर आईचा पदर धरूनच बसले.
पुढे वर्षसहा महिन्यात ते वाडा सोडून दुसरीकडे राहायला गेले.

पुढे साताठ वर्षांनी ते अकाली गेले. सगळेच त्याबद्दल हळहळत होते.
मला इतकं बरं वाटलं.

.....................

पुढे कधीही असं काही घडलं नाही.
माझं बालपण याने काळवंडून गेलं नाही.
मी ते माझ्या मनात पुरून ठेवलं...... जणू दुसर्‍याच कुणा मुलीचा अनुभव असावा तसं.
सुरूवातीला याचा खूप त्रास झाला असेल. ते कळावं असं माझं वय नव्हतं.
मोठी होता होता, कधी कधी हे आठवलं की मला त्रास व्हायचा.
मोठी झाल्यावर यात माझा काहीच दोष नव्हता, मी मला कोसत बसले नाही.
तरीही ही खूप त्रासदायक आठवण होती.

....................

मी हे अजूनही आईबाबांशी बोलू शकलेले नाही.
मी त्यांना सांगीतलेलंच नाही.

.......................

लग्नानंतर मिलिन्दशी बोलावं, असं बरेचदा वाटून गेलेलं.......
मी शब्दच गोळा करू शकायचे नाही....

...........
आम्ही मॉन्सून वेडींग हा सिनेमा पाहायला गेलेलो. शेवटी शेवटी मी रडायला सुरूवात केली. मी वेड्यासारखी रडत होते. सिनेमा संपला. मी रडत होते.... आम्ही रस्त्यावरून चालत होतो..... मी रडत होते. मिलिन्दला कळेनाच मला काय झालंय ते...... मला वाटतं आम्ही हॉटेलात गेलो.... तिथेही मी रडत होते....... मला रडू आवरताच येत नव्हतं.
किती वर्षांनी त्या घटनेसाठी मी रडून घेतलं.
...................
घरी आल्यावर मी मिलिन्दला सांगीतलं....
इतक्या वर्षांनी..... पहिल्यांदा.... मी कुणाशीतरी बोलले.....
खूप मोकळं मोकळं वाटलं.....

..........
परवा शनिवारी.... सकाळी कोरीगडावर जाऊन आले..... संध्याकाळी/ रात्री आशाकडे छान जेवलो, मस्त गप्पा मारल्या. अख्खा दिवस छान गेलेला. रविवारी सकाळी घरी आले. पुन्हा थोड्यावेळाने झोपले....

अकराला मिलिन्दने उठवलं. ’तुला सत्यमेव जयते पाहायचंय ना?" उठले.... अख्खा एपिसोडभर रडतच होते.

मिलिन्द म्हणाला ," किती हिमतीनं सांगीतलं ना त्यांनी! "

वाटलं आता बोललंच पाहिजे......
तुम्हांला तरी सांगीतलं पाहिजे.
 
...................

Tuesday, July 15, 2014

अनिता

अनिता आमच्या हॉस्टेलवर महिनाभरासाठी आलेली. सुरूवातीला तिची आमची फारशी ओळख नव्हती.
ती उशीरापर्यंत झोपायची. मी कॉलेजला गेल्यावर कधीतरी तिच्या कामावर जायची. रात्री जेवायला नसायची. उशीराच यायची.

ती मिडी/ स्कर्ट असले आमच्यापेक्षा आधुनिक कपडे घालायची. उंच टाचांच्या सॅंडल्स वगैरे, कापलेले केस खांद्यापर्यंत रूळत असायचे.
उशीरा उठायची त्यामुळे दोन-तीन दिवसांनी कधीतरी आंघोळ, स्वच्छता कमीच पण सुगंध फवारून, हलका मेक अप करून तयार!
कुठेतरी रिसेप्शनीस्ट होती. खरं तिच्याकडे दोन - चारच ड्रेस होते पण अत्याधुनिक असे, दुरून महागडे वाटायचे पण नीट पाहिले तर तुळशी बागेतलेच.

आल्यानंतर दहा-बारा दिवसांनी बोलणे झाले असेल.

तिचे लग्न झालेले होते, बरेचदा ती छोटेसे नकली मंगळसूत्र घालायची. सासर शिरूरजवळच्या कुठल्याशा खेड्यातले होते. नवरा स्थानिक पुढार्‍याचा मुलगा होता. मी त्या पुढार्‍याचे नाव ऎकलेले नव्हते. हिला नोकरी करायचीच होती, म्हणून ती इथे राहात होती. मला तिचे कौतुक वाटले.

आणखी एका जरा सविस्तर भेटीत कळले की तिचे आंतरजातीय लग्न होते. ती ब्राह्मण तर नवरा मराठा. पळून जाऊन आळंदीत लग्न केले होते. मुलगा आईला पसंत नव्हता. बहुदा तिच्या कॉलेजमधेच होता. आई जुन्या पुण्यात कुठल्याशा पेठेत राहायची. वडील नव्हते, एक भाऊ आणि आई वाड्यात राहायचे. सासरकडच्या सगळ्यांना पसंत होती, तिकडे काही प्रश्न नव्हता. लवकरच पुण्यात घर घेऊन ती आणि तिचा नवरा असे दोघे इथेच राहणार होते.

एकदा कधीतरी आम्ही आपापल्या आयांबद्दल बोलत होतो, जरा मजेमजेचं तरी आपुलकीचं असं बोलणं चाललेलं.
अनिता म्हणाली, " माझी आई, आई नाही वैरीण आहे. मला आयुष्यभर तोंड दाखवू नकोस म्हणाली आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी एकदा भाऊ वाटेत भेटला म्हणून घरी गेले होते. बसले, जरा वेळाने तिला सांगितलं की तीन महिने झाले आहेत. चिडली. उठून माझ्या पोटावर लाथा मारल्या. "पाप आहे" म्हणत होती. त्याने माझं अ‍ॅबॉर्शन झालं. माझं बाळ पडून गेलं. मी तिचं कधीही तोंड पाहणार नाही. कधीही त्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. " आम्ही सुन्न झालो. तिही रडत नव्हती. बधीर झालेली.

दुपारी तिला भेटायला किंवा घेऊन जायला कोणीतरी नवर्‍याचा मित्र यायचा, आम्ही कधी त्याला बघितलं नव्हतं. पण तो शीळ घालायचा आणि ही जायची.
 नवर्‍याच्या मित्राबरोबर बाईकवरून जायला काहीच हरकत नव्हती पण त्याने शीळ का घालावी? नीट रितसर आत येऊन बोलावू का नये? असे आपले आम्हांला वाटायचे.
आम्ही तशा मागासलेल्याच होतो.

सासर कसं आहे? असं एकदा विचारत होते तर म्हणाली, "एकदा गेलेय, आठ दहा दिवस राहून आले आहे. सासू आणि नणंदही चांगलीच आहे. नणंद माझ्या एवढीच आहे. तिची मैत्रिण म्हणूनच गेले होते."
" का?"
"अजून गावी कोणाला सांगितलेलं नाही. स्थानिक निवडणुका आहेत, त्या झाल्या की सांगू असं सासर्‍यांनी ठरवलं आहे."
मी उडालेच.
" काय? ही फसवणूक आहे. तुला कळतंय का? तुमचं लग्न कायदेशीर आहे का? तुझ्याकडे काही पुरावा आहे? उद्या लग्न झालेलंच नाही म्हणाले तर? तुझा नवरा फिरला तर? सासरच्यांच्या दबावाखाली आला आणि लग्नच नाकारलं तर? आधी मॅरेज सर्टीफिकेट घेऊन ठेव. लग्नाचे फोटो तुझ्या ताब्यत ठेव. "
मी चिडलेले. मला कळेना, ही मुलगी मूर्ख तर नाही? मला कळतंय ते हिला कळतंय की नाही? मी कितीतरी वेळ तिच्याशी बोलत रहिलेले.
पुन्हा एकदोनदा ति्ला आठवण केली की याबद्दल नवर्‍याशी बोल म्हणून.
मी तिच्याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. बोलू, हिला थोडं शहाणं करू असं मला वाटत होतं.
एक दिवस अचानकच आमचा निरोप न घेता दुपारीच ती निघून गेली.
ठरलेला महिना आणि पुढे मला वाटतं दहा - बारा दिवस ती राहिली असेल.
आमच्याकडे कुणाकडेही पत्ता नव्हता. पुन्हा कधी दिसलीही नाही.

मधेच एक दिवस ती कुठे काम करायची, त्या ऑफीसची पार्टी होती, तिकडे खूप वेळ लागणार आणि इतक्या उशीरा आलेलं त्या हॉस्टेलवर चालायचं नाही. मग ती तिथेच राहीली, हॉटेलमधेच! हे आम्हां सगळ्या जणींना खटकलेलं.

आम्ही खरं काय हिची विचित्र गोष्ट म्हणत रहिलो. तिला नावं ठेवली. अर्थात आस्थेनं ऎकून घ्यायचो  पण मदतीचा हात पुढे केला नाही. तो करेकरेतो ती निघूनच गेली आणि आम्ही तिची आठवणही काढत राहिलो नाही.

ती परिस्थितीने कॉलगर्लचं काम करायला लागलेली का? कोण जाणे.
******

मी स्वत:च्या आणि स्त्रियांच्या हक्कांबद्दल जागरूक असले तरी लैंगिकतेच्या बाबतीत अक्षरश: काहीच विचार केलेला नव्हता.
"लैंगिक स्वातंत्र्य आणि माझ्या शरीरावर माझा हक्क" हे मी शिकले, लैंगिकतेचं राजकारण शिकले ती स्त्री अभ्यास केंद्रात.
तोवर बायका बायकांमधे लैंगिकतेमुळे केलं जाणारं विभाजन मला मान्यच असावं, मी काही विचारच केलेला नव्हता त्यावर.
आता मी सगळ्या स्त्रियांकडे समानतेने बघू शकते.

*******
कदाचित तेव्हा मी तिला काही मदत करू शकलेही नसते.
आता करू शकेन.

********

आपल्या मुलीने जातीबाहेर लग्न केलं, एवढं कारणंही आईचं मुलीवरचं प्रेम संपायला पुरतं. 
अशा आया असतात.
आई थोडी उदार झाली असती, तिला आपल्या मुलीवर थोडसं प्रेम करता आलं असतं तर...
एक अनिता कदाचित वाचली असती.
*******

Monday, June 30, 2014

शीला

शीला केरळातल्या पट्टनमतिट्टाहून आलेली. महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातल्या इंजिनीअरींग कॉलेजमधून तिने BE केलं होतं. नंतर इथे पुण्यात नोकरी करत होती. आमच्या हॉस्टेलवर राहात होती.

साधी सरळ मुलगी! प्रेमात पडली होती. लग्न ठरलेलं. ते चार वर्षांनी करायचं हे ही ठरलेलं. तो मुलगा मुंबईत राहायचा. मुंबईपेक्षा एकट्या मुलीला राहायला पुणं सुरक्षित! म्हणून आईवडिलांनी वर्षभर पुण्यात राहून नोकरी करण्याला परवानगी दिली होती.

आता आई-बाबांचं ऎकायचं, नंतर नवर्‍याचं, मग संसार मुलं.... तिचं अगदी पक्कं होतं.

आमच्यापेक्षा तिचं जरा निराळं होतं. आमचं सार्‍याजणींचं भविष्य धुसर, अनिश्चित होतं. तिचं दृष्टीपथात. त्यापेक्षाही खरं प्रेमाने तिला वर उचललेलं.

तिच्या प्रेमकथेच्या खरं मजाच होत्या.

एक म्हणजे दोघंही पट्टनमतिट्टाच्या एकाच हॉस्पीटलमधे चार महिन्यांच्या अंतराने जन्मलेले.

दुसरं..

ही दोघं आणि आणखीही आठ-दहा जण असतील, इथे शिकायला आलेले. हा खरं तर तिच्या मैत्रिणीचा चांगला मित्र! तिघेही एकाच वर्गात. पण शीला त्याच्याशी फारसं बोलत नसे. दोघांचं कसं जमलं, हा तपशील मी विसरले आहे. पण दोघांचं नक्की ठरल्यावर त्यांनी घरी सांगायच्या आत, या दोघांना त्या छोट्या गावातल्या शीलाच्या एका दूरच्या काकांनी पाहिलं. तेच तिचे local guardian होते. योगायोगाने चारच दिवसांनी ते गावी, पट्टनमतिट्टाला जाणार होते. दोघी मैत्रिणी काळजीत पडल्या. ते काका घरी जाऊन हे नक्की सांगणार! मग घरी कसा गोंधळ माजेल, कदाचित फिसकटेल हे दिसायला लागलं. मग काकांच्या आधी आपणच घरी सांगावं हा विचार करून रिझर्वेशन नसताना तसाच प्रवास करत दोघी मैत्रिणी गावी गेल्या. शीला अशी अचानक कशी काय आली? आई-बाबांना कळेना.

हिने सांगितलं की ते काका उद्या-परवा येणार आहेत, त्यांनी मला एका मुलाबरोबर पाहिलं, ते येऊन काही सांगतील तर त्याच्या आत आपणच खुलासा करावा म्हणून आले आहे. आई-बाबा म्हणाले, " अगं, वेडी की काय तू? तेव्हढ्यासाठी आलीस? त्यांनी काहीही सांगितलं तरी आमचा काय आमच्या मुलीवर विश्वास नाही? आमची खात्री आहे. तू काहीही काळजी करू नकोस. " ........ झालं! इथवर गोष्ट आली की ख्यॅ! ख्यॅ! ख्यॅ! आम्ही नुसत्या हसायला लागायचो. मग काकांना जी शंका आली ती खरीच आहे....... वगैरे वगैरे सांगताना तिची उडालेली त्रेधातिरीपीट ऎकायला जाम मजा यायची.

एकाच जाती-पोटजातीतल्या आणि अनुरूप असणार्‍या दोघांच्या लग्नाला दोन्हीकडच्यांनीही पाठिंबा द्यावा यात नवल ते काय?

तिचं सगळं शिस्तीत चालायचं. सकाळी उठल्यावर प्रार्थना, झोपताना देवाचे आभार, वगैरे वगैरे. तिच्या आयुष्यात आलेल्या ’त्याच्या’ वर ती खूष होती आणि हे करणार्‍या देवाबद्दल कृतज्ञ!



आमच्या हॉस्टेलच्या शेजारी दर गुरूवारी सकाळी भजनी मंडळाच्या बायका जमून भजनं म्हणत. जो काही टिपेचा सूर लावीत! बस्स! मी म्हणायचे काय कटकट आहे! आणि माझ्या दोन मैत्रिणी नसरीन आणि शीला मला समजावीत असत की " असं म्हणू नये. देवाचं नाव आपोआप कानावर पडतं. " :)

नसरीन सारखीच शीला ही एकमेव ख्रिश्चन मैत्रिण!

तिचे बाबा तिकडे चर्चमधे फादर होते. म्हणजे तो हुद्दा की संबोधन कोण जाणे!

तिचे घरी आणि त्याला मुंबईला फोन करण्याचे दिवस ठरलेले होते. (तिचा पगार ती जपून वापरत असे.) मुंबईला फोन केला की आधी नणंदेशी किंवा सासूबाईंशी अदबीने बोलणं मग त्याच्याशी. तेव्हा सर्रास मोबाईल नव्हते, आम्ही सगळ्याच १/४ रेट झाल्यावर घरी फोन करत असू.

ते दोघे एकाआड एका रविवारी भेटत असत. बरेचदा लोणावळ्याला.  दोघांनांही ते बरे पडे.

एकदा काय निरोपात गडबड झाली माहित नाही पण ही लोणावळ्याला गेली आणि तो आलाच नाही. आम्ही कुठे कुठे भटकायला गेलेलो परत हॉस्टेलवर आलो तर ही पांघरूण घेऊन झोपलेली. कुणाशी काही बोलेना. रडतच असलेली. आम्हीही शांत बसलो. तेव्हा काय किंवा नंतर काय कधीही आम्ही या प्रसंगाची खिल्ली उडवली नाही.

एकदा कधीतरी लोकरीच्या विणकामाचा विषय निघाला, मी शिकवू शकेन म्हंटल्यावर दोघी- तिघीजणी जाऊन तुळशीबागेतून लोकर , सुया घेऊन आल्या. मी काहीतरी साधीशी विण शिकवली असेल. नसरीनने पण कुणासाठीतरी करायला घेतला. शीलाला आपण त्याच्यासाठी स्वेटर विणतोय हे इतकं भारी वाटत होतं. मला म्हणाली, "तुझं लग्न ठरलं की तुही एक छानसा विण. "

" मी? ह्या!"

" कशी गं तू? तुला काहीच नवर्‍यासाठी करायला नको आहे. त्याला किती छान वाटेल! विचार करून बघ. "

" मला वाटतं, ही अशी भेट मला मिळाली तर मला किती छान वाटेल! तुम्ही स्वत:ला छान वाटण्याचा जरा विचार करून बघा. " :)

त्या रविवारी तो यायचा होता. मुंबईहून पुण्याला. त्याला साडी नेसलेली आवडते म्हणून शीला एक साडी घेऊन आली होती. ती तिला नेसायची होती. इतक्या लगेच ब्लाऊज कसा शिवून मिळेल? मग काय सगळ्याच जणी सल्ले द्यायला तयार! रेडीमेड कुठे मिळेल? पासून काळा चालेल, पर्यंत. ती कॉटनची काळ्यावर डिझाईन असलेली साडी होती. मी म्हणाले, " तुला अगदी मॅंचिग हवा आहे ना? मग काय कर, तुझ्याकडे काळा ब्लाऊज आहेच ना, त्याच्या नुसत्या बाह्या बदल. साडीच्या आतल्या बाजूकडून बाह्या कापून घ्यायच्या आणि जोडायच्या, कोणीही हे पटकन करून देईल. "

"वा!" ती एकदम खूष झाली.

पण दोन दिवसांत हे करून देईल असा कोणी टेलर मिळाला नाही.

" विद्या, तूच दे ना करून. "

" बरं. " मीही उदारपणे म्हणाले.

रविवारी सगळ्याजणी कुठे कुठे गेलेल्या. आम्ही दोघीच होतो. तो दुपारी चारला यायचा होता.

मी उशीरा उठून सावकाश आवरून, पेपर वाचून, निवान्तच. तिने जुना ब्लाऊज उसवून ठेवलेला, आणि माझ्या मागे पुढे.

जेवायला दोघीच होतो. शेवटी ती म्हणाली, " विद्या, शिवून देणारेस की नाही?"

" देते की! कितीसा वेळ लागणारे!"

" जेवण झालं की दुसरं काहीही करू नकोस."

जेवणानंतर खरंच मी शिवायला घेतला.

मग माझ्याजवळ बसून त्याच्याबद्दल काय काय सांगायला लागली.

ती इतकी त्याच्या प्रेमात बुडालेली होती आणि इतकी सुंदर दिसत होती.

म्हणाली, " त्याला दुबईला जाऊन खूप पैसा कमवायचाय. दोन-चार वर्षच जाईन म्हणतो आहे. आमच्याकडे हे फार आहे. पुरूषमंडळी आखातात आणि बरेचदा बायका इकडॆ. लग्न झालं तरी आम्हांला एकत्र राहायला मिळणार की नाही कोण जाणे. "

ती काळजीतही होती आणि सुखातही.

मी नुसती ऎकत होते.

ती बोलत होती.

प्रेमामुळे माणसं कशी फुलून येतात, कशी तरंगायला लागतात हे मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिलं ते तेव्हा!

तिचाही स्वर इतका सलगीचा होता, इतका आतला होता.

नुसत्या मैत्रीने , स्नेहाने मी न्हाऊन निघत होते.



माणसाला काय बरं हवं असतं?

आतलं आतलं बोलता यावं असं एक माणूस!



शीलाही पत्त्यासगट कुठेतरी हरवून गेली.

पट्टनमतिट्टा ? की मुंबई? की दुबई?

कुठे आहेस तू?



स्वत:ला छान वाटावं याचा विचार करून बघितलास की नाही अजूनतरी?


********


Saturday, June 28, 2014

माझ्या सासूबाई

माझ्या सासूबाई - सुमती भिडे. आधीच्या सुधा आठवले.त्यांनी  मला कधीच प्रत्यक्ष पाहिलं नाही. कारण त्या आमच्या लग्नाच्या आधी काही वर्ष दृष्टीहीन झाल्या होत्या.
.........

लग्नाच्याबाबतीत निर्णय घेताना माझ्या मनावर ताण आला.
त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. हे गृहित धरुन मगच "हो" असा निर्णय घ्यायचा आणि एकदा "हो" असा निर्णय घेतल्यावर मग त्याचा व्यवस्थित स्विकार करायचा हे मी मला सांगत होते.

हो असं ठरलं.

माझ्या लग्नाच्या सर्व खरेदी साठी त्या आमच्याबरोबर आल्या. प्रत्येक खरेदीच्यावेळी त्यांचं असं मत होतं. अगदी डिझाईन, रंग इ... बाबत. त्यांच्या दोघी बहिणींच्या मदतीने त्यांनी संपूर्ण कार्य पार पाडलं.

आता माझा खरा कसोटीचा काळ चालू झाला.
मला स्वयंपाकाची सवय नव्हती. भाज्या फारशा येत नव्हत्या. पण आता ही आपलीच जबाबदारी आहे असं होतं त्यामुळे ताण होता. मी नोकरी करत होते. सकाळी नऊ वाजता जायचे ते संध्याकाळी सहा वाजता यायचे.

लग्नानंतर नोकरी चालू झाली. पहिल्या दिवशी सकाळचं करुन कामावर गेले. संध्याकाळी घरी आले तर सगळा स्वयंपाक तयार. अगदी कुकर सुध्दा. मला म्हणाल्या अगं माझा वेळ जात नाही कंटाळा येतो. मी करत जाईन संध्याकाळचं. तूही दमतेस. मला फक्त पोळ्या नाही जमत. लाटताना पोळपाट कुठं संपतो त्याचा अंदाज नाही येत. पोळ्या बाई करतील, बाकी मी करेन. त्यांनी ते ठरवूनच टाकलं होतं. 

हळूहळू जरा आमची एकमेकींशी ओळख झाल्यावर मला त्यांनी वेगवेगळ्या भाज्या शिकवायला सुरुवात केली. भाजी शिकून झाली की मला ती लिहून ठेवायला सांगायच्या. प्रमाण सुध्दा अचूक असायचं. त्यांचं माहेर नागपूरचं असल्याने पदार्थ पण चमचमीत असायचे. मला म्हणायच्या सगळ्या गोष्टी तू एकदा शिकून घे. मग आवडल्या तर कर. मग माझी एक पाककृतीची वही तयार झाली.
घराची स्वच्छता, आवराआवरी त्याच करायच्या. किराणा सामान संपत आलं की त्यांनी मनात यादी केलेलीच असायची. ती फक्त कागदावर उतरवायची मदत मी करायचे.

दिवाळी मधे मला म्हणाल्या आनंदला तू तेल लाव आणि तुला मी लावते. कदाचित स्पर्शातून त्यांना मला पाहिचं असेल.
दिवाळीत फराळाच्या गोष्टी करण्यासाठी त्यांची मदत होणार नव्हती. त्यामुळे त्यांनी मला स्पष्टपणे सांगून टाकलं, काहीही घरी करण्यात कष्ट करु नकोस. सरळ चितळ्यांकडून विकत आण. मला एकदम हलकच वाटलं.

उन्हाळाच्या सुट्टीत मला म्हणाल्या साखर आंब्याच्या कै-या आणून दे. मी त्यांना सामान आणून दिलं. एक दिवस कामावरुन घरी आले तर साखर आंबा तय्यार. असच लोणचं पण घातलं. 

आमची ओळख अजून विस्तारली. जवळीक वाढली. तशी त्यांनी मग मला संसाराच्या व्यवस्थापनाबाबत टीप्स द्यायला सुरुवात केली. गुंतवणूक, बचत याबाबत सल्ला दिला. मला माझं स्वत:च स्वतंत्र बचत खातं उघडायाल सांगितलं. म्हणाल्या तुझे तू स्वतंत्रपणे पैसे ह्यामधे ठेव. घरात खर्च करुन टाकू नकोस.

घरी एकटं बसून त्यांना कंटाळा यायचा. मग कधी कधी गावात बहिणीकडे जायच्या. एकट्य़ा जायच्या. मी सोडू का असं विचारल्यावर म्हणायच्या कशाला तुझा वेळ घालवते मला माहिती आहे रस्ता. एक दिवस मी त्यांच्या बरोबर गेले. तेव्हा बघितलं त्या सतत रिक्षावाल्यांशी बोलत होत्या. कुठल्या भागात आलो आहोत हे तपासत होत्या. शेवटपर्यंत त्यांनी अचूक ठिकाणं सांगितली. नगरला सुध्दा मोठ्या मुलाकडे त्या कधीकधी एकट्य़ाने प्रवास करुन जायच्या. 

टि व्ही वरच्या सिरीयल, बातम्या, इतर कार्यक्रम त्या आवडीने बघायच्या. हो बघायच्याच. मी घरी आले की कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यायच्या. 

त्यांना आता नातवंड येण्याकडे डोळे लागले होते. माझ्यावर त्यांच बारीक लक्ष असायचं. प्रत्येक महिन्यात पाळी येऊन गेली का ते विचारायच्या. मग हळूहळू कळलं की मला औषध - उपचाराची गरज आहे. दवाखान्याच्या वा-या, मनावरचा ताण हे सगळं सुरु झालं. त्यांना ते जाणवत होतं. एक दिवस मला म्हणाल्या, एक लक्षात घे मुलं झाली म्हणजे आकाशाला हात टेकले असं अजिबात नाही. मुलं झाली की संसार परिपूर्ण असं नसतं. शेवटी माणुसकी महत्वाची.
त्यानंतर त्यांनी मला कधीच त्याबाबतीत विचारलं नाही.
.............

त्यांचा संसार खूप खडतर झाला.
आनंदच्या जन्मानंतर डायबेटिस झाला. पण संसारच्या जबाबदारीमुळे कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि त्याचा परिणाम दृष्टी जाण्यापर्यंत झाला.

नव-याच्या व एका मुलाच्या अकाली निधनाने खचून न जाता त्यांनी त्यांच्या जबाबदा-या खंबीरपणे पार पाडल्या.

"त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. " हे माझं मत पूर्ण चुकीचं ठरलं. मी मात्र छोट्य़ा छोट्य़ा गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून रहात असे.

खूप स्वाभिमानाने त्या जगल्या. त्यांना कोणाला सांभाळायची वेळ येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. अचानक एक दिवस रात्री पाठ दुखीचा त्रास सुरु झाला आणि ह्र्दय विकाराच्या झटक्याने त्या सकाळी आम्हाला कायमच्या सोडून गेल्या.
.......

त्यांनी शिकवलेल्या भाज्या मी करते. स्वयंपाघरातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाळते. त्या आजही माझ्याबरोबर आहेतच.

Thursday, June 26, 2014

शकुंतलामावशी

   आम्ही वाडयातून आमच्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो तेव्हा मी चार पाच वर्षांची असेन आणि माझा भाऊ वर्षादीड वर्षांचा.आईची बाळंतपणाची रजा जसजशी संपत आली तसा आम्हाला संभाळायचा प्रश्न पुढे उभा राहीला. कोणीतरी संभाळायला ठेऊ या म्हणून शोध सुरु झाला.कारण घरात आजोबा होते पण माझी आजी पॅरेलिसीसने अंथरुणात होती.आई बाबांना दोघांनाही नोकरी करणे भाग होते.कीर्लोस्करांच्या बंगल्यावर बाबा तेव्हा साहेबांचे पी.ए. म्हणून काम बघत होते.तेथे स्वयंपाकाला असणारा बाळू सोलापूरचा रहाणारा.त्याच्या ओळखीची एक बाई.नव-याने सोडून दिलेली.....शकुंतला नाव तिचं.तिला आमच्याकडे रहायला ठेवा असा बाळूचा आग्रह.तिची पण सोय होईल आणि मुलांनाही संभाळेल.अतिशय प्रामाणिक आहे.त्याच्यावर विश्वास ठेवून बाबांनी तिला पुण्याला आमच्याकडे बोलावून घेतले.
   शकुंतला बाई.काय म्हणायचे त्यांना ?  कोणत्या गावाच्या ? कोणाच्या कोण...कोणावर  तरी विश्वास ठेवून आमच्या घराचा आसरा मिळेल अश्या आशेने आमच्याकडे आल्या आणि आमच्यातल्याच एक झाल्या. एखादी आजी काय करेल इतक्या प्रेमाने तिने आम्हा दोघांना लहानाचे मोठे केलं.अतिशय शिस्तीच्या,प्रसंगी धाक दाखवून पण अतिशय प्रेमळ.आमच्या झोपायच्या,खाण्यापिण्याच्या वेळा अगदी चोख सांभाळणारी.तिच्या हातच्या पातळ तव्यावरच्या भाक-या आणि झणझणीत पिठलं ......त्याची चव आजूनही जिभेवर आहे.मला एकदा हुक्की आली.मला स्वयंपाक शिकायचा म्हणून...तिने मला पहील्यांदा भाकरी शिकवली तो दिवस आजही मनात ताजा आहे.पहील्या पहील्यांदा माझ्या हातून खूपच जाड भाकरी थापली जायची.त्याला चिरा पडायच्या,फुगायची पण नाही.पण तेथून ती भाकरी पातळ जमेपर्यंतचे तिचे शिकवणे आजही आठवते.जेव्हा जेव्हा आजही मी भाकरी करते तेव्हा तेव्हा एकही दिवस असा जात नाही की मावशींची आठवण येत नाही. रावण पिठलं...हे त्यांनीच मला शिकवलं .म्हणाल्या असा ठसका लागायला हवा तेव्हा जमलं खरं पिठलं.त्यांची वाक्य आजही कानात आहेत.
    आमची आजारपण,आमचे धडपडणे....एक ना अनेक उद्योग.आईने डोळे झाकून त्यांच्यावर सोपवून नोकरी केली.तेव्हा रजाही सारख्या मिळायच्या नाहीत.आणि रजा घ्यायची गरजही कधी वाटली नाही.इतक्या प्रामाणिक,विश्वासू आणि प्रेमळ होत्या त्या. स्वत:ची कामे स्वत: करणार आणि दुस-यासाठीही झिजणार.आमच्या घरातच त्यांनी त्यांचं म्हातारपण घालवलं .त्या ऎंशी वर्षाच्या असतील त्यांना गुदघेदुखीचा त्रास अनेक वर्षे होता.आणि शेवटी शेवटी तर त्यांना चालणेही अवघड होऊन बसलं.जमीनीवर खुरडत खुरडत चालायच्या त्यातच म्हातारपणामुळे डोळ्यांना दिसणं कमी झालं होतं.एक दिवस आम्हाला म्हणाल्या मला एखाद्या वृद्धाश्रमात ठेवा साहेब .आता मला होत नाही आणि तुम्ही माझं केलेलं मला आवडणार नाही.माझे शेवटचे जे काही दिवस राहीलेत ते मी तेथे काढेन.आम्ही सगळ्यांनीच त्या गोष्टीला नकार दिला.पण त्यांचा एकच हट्ट की तुम्ही माझं करायच नाही.या कल्पनेनेच मला आधीच मरण येईल.आई बाबांनी ऎकल नाही.त्याचा त्यांनी इतका धसका घेतला की त्या आजारी पडल्या आणि अंथरुणाला खिळल्या.अनेक दिवस औषधे चालू होती पण काही उपयोग झाला नाही.त्यांच्या गावी सोलापूरला त्यांचा भाचा होता त्याला बोलावून घ्या म्हणाल्या.तेव्हा पत्र पाठवून त्याला बोलावून घेतले.आमच्या हातून त्यांना सेवा करुन घ्यायची नव्हती.तो गावी त्यांना घेऊन गेला आणि दहा बारा दिवसातच त्या गेल्या.त्यांचा शेवट आमच्या घरातच व्हावा असे आम्हा प्रत्येकाला वाटत होते.पण ते घडले नाही.माझ्या घडण्याच्या काळातली आई बाबांच्या इतकीच महत्वाची व्यक्ती म्हणजे शकुंतला मावशी होत्या.
   माझ्या आयुष्यात अशी काही माणसे आहेत की ज्यांच्या नसण्याने मी अपूर्ण रहाते त्यापैकी एक शकुंतलामावशी....

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...